शुक्रवार दि. २९ ऑगस्ट २०२५

बंदूक सदृश्य हत्यारासह तलवार दाखवून केलेला चोरीचा प्रयत्न फसला

आजरा ; मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बुधवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास आजरा येथील एम.आय.डी.सी.त असणाऱ्या श्रीराम ॲग्रो इंडस्ट्रीज नावाच्या काजू कारखाना परिसरात नऊ ते दहा चोरट्यांनी प्रवेश करून पाणी मागण्याच्या बहाण्याने कारखान्याशेजारी रहात असणाऱ्या कामगारांना मारहाण करून बंदूक सदृश्य हत्याराचा धाक व तलवार दाखवून त्यांचे दोरीने हात पाय बांधून कारखान्यातील काजूगर व बियांची चोरी करण्याचा केलेला प्रयत्न सुदैवाने कारखान्यात काहीच नसल्यामुळे सपशेल फसला.
याबाबतची फिर्याद शिवाजी रामचंद्र पाटील राहणार आरदाळ ता. आजरा जि. कोल्हापूर यांनी आजरा पोलिसात दिली आहे. कामगारांना बंदूक सदृश्य हत्यार व तलवारीचा धाक दाखवून कारखान्यात प्रवेश करून गॅस कटरच्या सहाय्याने कडी कट केली. परंतु कारखान्यातील मुद्देमाल आधीच हलवला गेला असल्याने सुदैवाने चोरीस काहीही गेले नाही. संपूर्ण लुटीच्या तयारीने मालवाहू चार चाकीसह आलेल्या चोरट्यांच्या हाती काहीच पडले नाही.
आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

शक्तीपीठ रद्द होईपर्यंत लढा सुरूच राहणार : कॉ. संपत देसाई

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीपीठला कोणते पर्याय आहेत, त्या पर्यायांची तपासणी करण्याचे आदेश आदेश अप्पर सचिव राजेश भोगले यांनी आज दिले आहेत.
आ. सतेज पाटील आणि माजी खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विरोधाची धास्ती घेऊन शासनाने आज पवनार ते सांगली पर्यंतच शक्तीपीठ महामार्गला मंजुरी दिली आहे.शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली लढ्यामुळे सरकारला मूळ रस्त्याची आखणी बदलायला भाग पाडले आहे. हा शेतकऱ्यांचा अंशतः विजय आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना आणि पर्यावरणाला उध्वस्त करणारा शक्तीपीठ रद्द होईपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे असे कॉ. संपत देसाई,समन्वयक, शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती यांनी स्पष्ट केले आहे.
आजरा येथे भर पावसात निघालेला मोर्चा असो की ‘ तिरंगा आमच्या रानात ‘ हे आंदोलन असो या आंदोलनांनी जमीन आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी लढण्याची शेतकऱ्यांची जिद्द दाखवून दिली आहे. संपूर्ण शक्तीपीठ महमार्ग रद्द होईपर्यंत हा लढा चालूच राहील. असेही देसाई यांनी सांगितले.

आजरा बस स्थानक की खाजगी गाड्यांचे वाहनतळ...?

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा बस स्थानकावर सध्या दुचाकी व चारचाकी गाड्या मोठ्या प्रमाणावर पार्किंग केल्या जात असल्याने बस स्थानक हे एसटी बसेससाठी की खाजगी गाड्या पार्क करण्यासाठी ? असा प्रश्न उपस्थित होण्याजोगी परिस्थिती सध्या दिसत आहे.
आजरा येथे नव्याने बांधण्यात आलेल्या बसस्थानकाच्या डाव्या उजव्या बाजूला मोठ्या प्रमाणावर दुचाकी व चार शचाकी वाहने पार्क केली जातात. पार्किंग केलेल्या वाहनांची संख्या पाहिली तर हे बस स्थानक की खाजगी वाहन तळ असाही प्रश्न निर्माण होतो.
मे महिन्यामध्ये ही जागा रिक्षा चालकांनी रिक्षा थांबवण्याकरता मागितली होती. कांही कालावधी करता येथे रिक्षाही थांबत होत्या. परंतु कालांतराने रिक्षा चालकांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. एकीकडे रिक्षा चालकांना रिक्षा उभा करण्यासाठी जागा नाही तर दुसरीकडे बस स्थानकात खाजगी वाहनांची रेलचेल असा विचित्र विरोधाभास येथे आता दिसू लागला आहे.

भूमिपुत्र च्या प्रयत्नामुळे देव कांडगाव बस सेवा सुरू होण्याच्या हालचाली

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा ते गारगोटी रस्त्याच्या सुरु असलेल्या कामामुळे गेले तीन महिने देवकांडगाव येथे बंद असलेल्या बस सेवेबाबत काही दिवसांपूर्वी भूमिपुत्र युवा फाउंडेशन आजरा व देवकांडगाव ग्रामस्थ यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेत आजऱ्याचे तहसीलदार श्री. समीर माने यांनी प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी करत लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या.
यावेळी संबंधित बांधकाम कंपनीचे प्रतिनिधी श्रीशैल मलकूड व आजरा बस आगार प्रमुख श्री. प्रविण पाटील यांना उपस्थित ठेवून ही अडचण सोडवून देण्याच्या संदर्भात सूचना केल्या. बस सेवा बंद असल्याने शाळेची मुले, वयोवृद्ध लोक तसेच इतर नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल श्री. रणजीत सरदेसाई यांनी एसटी प्रशासन व संबंधित बांधकाम कंपनीच्या प्रतिनिधीना चांगलाच जाब विचारला. शेवटी माननीय तहसीलदार यांच्या मध्यस्थीने कोणत्याही परिस्थितीत उद्या दिनांक २९ ऑगस्टपासून बस सेवा सुरळीत करण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला. एसटी सुरू करताना ज्या ठिकाणी अडचणी येतील तेथे संबंधित बांधकाम कंपनीने सहकार्य करून त्यातून अडचणी दूर करून बस सेवा सुरळीत करण्यात मदत करण्याचे आश्वासन यावेळी बांधकाम कंपनीकडून देण्यात आले.
भूमिपुत्र युवा फाउंडेशनने घेतलेली भूमिका आणि तहसीलदार श्री. माने यांनी दाखवलेली कार्यतत्परता याबाबत देवकांडगाव ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले.
यावेळी भूमिपुत्रचे श्री. रणजीत सरदेसाई, विष्णू कुंभार, तहसीलदार समीर माने, आजरा बस आगार प्रमुख श्री. प्रवीण पाटील, श्री. राजाराम येसादे, संबंधित बांधकाम कंपनीचे प्रतिनिधी, देव कांडगाव गावचे सौ. स्वप्नाली राणे, धीरज राणे, श्री. जनार्दन देसाई,श्री. संभाजी तेजम, सौ. रेखा परीट, गौरी चव्हाण, नित्यानंद परीट, सचिन देसाई, स्वप्नील तेजम, मारुती तेजम, पांडुरंग देसाई, गणपती राणे, शिवाजी गिलबिले, रमेश कांबळे, रामदास तेजम, जितेंद्र देसाई तसेच मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

श्री लक्ष्मणबुवा महाराज मोरजकर यांचा सप्ताह सोहळा ३ ते ११ सप्टेंबर अखेर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील ह.भ. प. लक्ष्मणबुवा महाराज मोरजकर यांच्या सप्ताह सोहळ्याचे ३ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर अखेर आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विठोबा देव,नबापूर चे ट्रस्टी सुभाष मोरजकर यांनी दिली.
बुधवार दिनांक ३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता प.पू. महाराजांच्या पोथीचे श्री विठ्ठल मंदिर येथे प्रयाण, दुपारी बारा वाजता भक्तमंडळी सह समाधीस्थळी महाराजांना आमंत्रण असा कार्यक्रम आहे.
दररोज रात्री ९ ते ११ या कालावधीत दैनंदिन भजन सेवा आयोजित करण्यात आली आहे व रात्री ११ च्या पुढे जागर भजन सेवा राहील.
मंगळवार दिनांक ९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता भक्त तिरंग हा अजित तोडकर व सहकारी यांच्या भक्तीरंग हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम होणार असून याच दिवशी जागर होणार आहे. जागराच्या निमित्ताने ह.भ.प. आनंदराव घोरपडे महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे .
बुधवार दिनांक १० रोजी दिंडीचा कार्यक्रम होणार असून दुपारी १२ वाजता महाराजांच्या पालखीने समाधीस्थळी प्रयाण होणार आहे.
गुरुवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी तीन या कालावधीत नेत्र तपासणी शिबिर होणार असून दुपारी १२ ते ४ या कालावधीत महाप्रसाद तर रात्री दहा वाजता तांदळाचा महाप्रसाद व त्यानंतर रात्री बारा वाजता महाराजांचे स्वगृही ही आगमन व सप्ताह समारंभाची सांगता होणार आहे असेही मोरजकर यांनी सांगितले.

व्यंकटराव प्रशालेमध्ये कै. अमृतरावजी देसाई (काका)यांच्या पुण्यदिनानिमित्त प्रतिमापूजन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील व्यंकटराव शिक्षण संकुल आजरा मध्ये आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा येथे संस्थेचे प्रदीर्घकाळ अध्यक्ष पद भूषविलेले तसेच आजऱ्याच्या राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रातील कार्यकर्तृत्व व्यक्तिमत्व कै. अमृतरावजी (काका) देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त संस्थेचे अध्यक्ष श्री. जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, कै. अमृतराव (काका) यांनी आजऱ्याच्या जडणघडणीत व विकासात मोलाचे कार्य केले आहे. त्यांनी आजरा राईस मिल ,जनता बँक, तालुका संघ उभारला तसेच आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी आजरा साखर कारखान्याच्या उभारणीचेही स्वप्न पाहिले. अशा त्यांच्या अनेक कार्यकर्तृत्वांचा आढावा घेतला.
संस्थान काळापासून आजरा येथे जहागिरदार घोरपडे सरकारांनी इचलकरंजी बरोबरच आजरा तालुक्यातील बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी स्थापन केलेल्या व्यंकटराव हायस्कूल या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करत आजच्या या शाळेत पहिली ते पदवीपर्यंत शिक्षण त्याचबरोबर ॲकॅडमीचे वर्गही नवीन उभारलेल्या तीन मजली इमारतीच्या एकाच छताखाली सुरू केले आहे.
या प्रसंगी आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे सचिव श्री.अभिषेक शिंपी , संचालक श्री. कृष्णा पटेकर, श्री. पांडुरंग जाधव, श्री. सचिन शिंपी, श्री. सुधीर जाधव श्री. विलास पाटील, पर्यवेक्षिका सौ. व्ही.जे.शेलार, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.पन्हाळकर सी.एस.,सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.पी. व्ही पाटील यांनी केले. आभार श्री.डी. आर. पाटील यांनी मानले.
वंचितच्या कोल्हापूर दक्षिण विभाग अध्यक्षपदी गौतम कांबळे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर दक्षिण विभाग अध्यक्षपदी हाळोली येथील गौतम कांबळे यांची निवड झाली असल्याचे पक्षाचे अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव किसन चव्हाण यांनी केली आहे.
गौतम कांबळे यांनी यापूर्वी तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे सदर निवड झाल्याने त्यांच्यासह नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष बाबुराव आयवाळे, दीपक कांबळे, संजय शिरगावकर, राज कांबळे, संभाजी कांबळे, शरद कांबळे, विवेकानंद कांबळे, प्रा. ज्योती थडगे, संदीप भोपळे उपस्थित होते.
आभार आप्पासाहेब कमलाकर यांनी मांडले.
निधन वार्ता
बंडू नेऊंगरे

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मडीलगे ता.आजरा येथील बंडू संतू निऊगरे (वय ७८वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली ,जावई नातवंडे असा परिवार आहे.
रावजी बुगडे

मलिग्रे ता.आजरा येथील रावजी तुकाराम बुगडे (वय वर्ष ६२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई असून आज शुक्रवारी रक्षा विसर्जन आहे.

गणेश दर्शन…
आदर्श कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, धनगरमोळा

अध्यक्ष : प्रकाश कृष्णा मोरुस्कर
उपाध्यक्ष : नामदेव धोंडीबा जाधव
सचिव : तुषार भिकाजी खरुडे
खजिनदार : संतोष विष्णू शेटगे
सुभाष चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, आजरा

अध्यक्ष : सचिन सुभाष नलवडे
उपाध्यक्ष : मनीष टोपले. सचिव : महंतेश गुंजाटी
खजिनदार : कपिल नलवडे
विठ्ठल रुक्मिणी चॅरिटेबल ट्रस्ट प्रणित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गांधीनगर आजरा.

अध्यक्ष- श्री.जितेंद्र चव्हाण
उपाध्यक्ष – श्री.राजेंद्र चंदनवाले
खजिनदार – श्री.आकाश शिंदे
सचिव- श्री.निलेश कोरवी व श्री.प्रेम पाथरवट



