दि. २६ सप्टेबर २०२४


गरजले पण बरसले नाहीत…

ज्योतिप्रसाद सावंत
आजरा साखर कारखान्याच्या वार्षिक सभा पार्श्वभूमीवर नऊ माजी संचालकांनी सभेपूर्वी दोन दिवस आधी कारखान्याच्या वार्षिक अहवालावर आक्षेप घेत आक्रमक भूमिका घेतली होती. प्रत्यक्षात मात्र सभेकडे यातील बहुतांशी मंडळींनी पाठ फिरवल्याने ते फक्त गरजलेच, बरसले नाहीत… याचा प्रत्यय सभासदांना आला.
आजरा साखर कारखाना निवडणुकीनंतर पार पडलेल्या या पहिल्याच वार्षिक सर्व साधारण सभेमध्ये विविध बारा प्रश्न माजी संचालकांनी उपस्थित केले होते. या माजी संचालकांमध्ये अशोकअण्णा चराटी, प्राध्यापक सुनील शिंत्रे या माजी अध्यक्षांचाही समावेश होता. वास्तविक कारखान्याची सध्याची आर्थिक स्थिती जगजाहीर आहे . कारखाना चालवताना अर्थ सहाय्य उपलब्ध करून घेण्यासाठी अहवालामध्ये म्हणण्यापेक्षा ताळेबंदामध्ये अनेक प्रकारचे फेरबदल करून घेण्याची गेल्या काही वर्षापासून एक परंपरा सुरू झाली आहे अहवाल तयार करणे हे अलीकडच्या काळातील मोठे दिव्य समजले जाते. कारण ताळेबंद, नफा- तोटा पत्रकारांवरच शासकीय अथवा बँकांकडून मिळणारे अर्थसहाय्य अवलंबून असते ही बाब आता नवीन राहिली नाही. यामध्ये प्राधान्याने स्थावर व कायम मालमत्तेचे मूल्यांकन वाढवणे, कारखाना नफ्यात दाखवणे या प्रमुख बाबींचा समावेश होताना दिसतो.
नेमका हाच धागा पकडत संबंधित माजी संचालकांनी विद्यमान संचालक मंडळासमोर विविध प्रश्न उपस्थित केले होते. सभेमध्ये मात्र केवळ प्रा. सुनील शिंत्रे, अंजनाताई रेडेकर व तानाजी देसाई यांनी या प्रश्नांवर थोडाफार आवाज उठवला . मात्र संस्थेचे अध्यक्ष वसंतराव धुरे यांना सभा हाताळण्याचे चांगलेच कौशल्य असल्यामुळे सुरुवातीलाच त्यांनी प्रा. शिंत्रे व अंजनाताई रेडेकर यांना व्यासपीठावर बसण्यासाठी आमंत्रित करून त्यांचा सभेतील आक्रमकपणा खाली आणण्याचे काम केले. प्रा. शिंत्रे यांनी तर आक्रमकपणाऐवजी समजूतदारपणा दाखवत कांही आक्षेपांसह सूचनाही केल्या. अंजनाताईंनीही सुरुवातीलाच आपण कारखान्याचे हितचिंतक म्हणून कांही सूचना करत असल्याचे स्पष्ट केले. रहाता राहिली ती सुनील शिंदे, तानाजी देसाई,इंद्रजीत देसाई, संजय देसाई, युवराज पोवार, तुळसाप्पा पोवार आदी नेहमीची मंडळी. युवराज पोवार हे आक्रमक झाले परंतु त्यांचा आक्रमकपणा शेती अधिकाऱ्याच्या बाबतीत होता. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळाला याचा फारसा खुलासा करावा लागला नाही.
कारखाना आजच आर्थिक अडचणीत नाही तर गेली दहा-पंधरा वर्षे तो अडचणीतच आहे. कारखान्यात कोणीही सत्तेवर आले तरीही कारखान्याला आर्थिक अडचणीतून तातडीने बाहेर काढणे ही केवळ अशक्य गोष्ट आहे, सद्यस्थितीत कारखान्याचे अध्यक्षपदासह संचालकपद हा केवळ काटेरी मुकुट आहे याचे भान असल्याने केवळ विरोधासाठी विरोध म्हणून कदाचित कांही प्रश्न माजी संचालक यांनी उपस्थित केले असावेत असेही सभा संपल्यानंतर वाटत होते.
एकंदर जे सभेपूर्वी गरजले ते सभेमध्ये बरसले असते तर निश्चितच सत्ताधाऱ्यांनाही आपणाला कोणीतरी विरोधक व विचारणारे आहे असे वाटले असते. पण कागदावरचे प्रश्न विचारणारी मंडळी सत्तेत असतानाही हे प्रश्न अनुत्तरितच होते हेही नाकारता येत नाही…

अर्बन बँकेला “सर्वोत्कृष्ट बँक” पुरस्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि. यांचे मार्फत आजरा अर्बन बँकेला “सर्वोत्कृष्ट बँक” पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये रु.५०१ कोटीपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या बँकांच्या गटात सर्वोत्तम नागरी सहकारी बँकेस दिला जाणारा जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार बँकेस सलग तिसऱ्या वर्षी असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष श्री. निपुणराव कोरे व महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या उपाध्यक्षा सौ. वैशालीताई आवाडे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी बँकेचे चेअरमन श्री. रमेश कुरुणकर, संचालक श्री. सुरेश डांग, श्री. विलास नाईक, डॉ. अनिल देशपांडे, श्री. किशोर भुसारी, श्री. आनंदा फडके, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रशांत गंभीर उपस्थित होते.
आजरा तालुक्यामध्ये ६४ वर्षापूर्वी बँकेचा कार्यविस्तार सुरू झाला. शेतीपुरक उद्योग, छोटे व्यावसायिक व उद्योग यांना अर्थ पुरवठा हा केंद्र बिंदू मानून बँकेने आतापर्यन्त जवळपास रु.१५०० कोटीच्या वर व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. स्वभांडवलावर मल्टी स्टेट दर्जा प्राप्त करणारी जिल्ह्यातील आजरा बँक ही एकमेव बँक असून शेड्यूल बँकेकडे वाटचाल सुरू आहे. बँकेत आधुनिक अशा FCO कार्य प्रणालीच्या माध्यमातून सेव्हिंग खाती उघडण्याबाबतची व केंद्र शासनाची PMFME (सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग) व PMEGP व राज्य शासनाची अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना, मोबाईल बँकिंग, Google Pay, PhonePe, Paytm, QR Code तसेच Whatsap Banking च्या माध्यमातून सर्व ग्राहकांना आपल्या बँकेतील त्यांच्या सर्व खात्यांचे statement पाहणे, चेक बुक रिक्वेस्ट देणे, खाते ब्लॉक करणे इ. सुविधा उपलब्ध आहेत.
बँक महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई, सिंधुदुर्ग या जिल्हयात व कर्नाटक राज्यातील बेळगावी व उत्तर कन्नड जिल्हयात एकूण ३५ शाखांच्या माध्यमातून सेवा देत आहे.
भविष्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने गरजू व्यावसायिक व उद्योजकांना व त्यांच्या गरजाना अर्थ पुरवठा करून देशाच्या प्रगतिमध्ये योगदान देण्याचा मानस असून वरील सेवा सुविधांचा लाभ घेण्यासाठी बँकेच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधनेचे आवाहन बँकेचे चेअरमन श्री. रमेश कुरुणकर यांनी केले.

आजरा महाविद्यालयात तालुकास्तरीय शालेय निबंध व वक्तृत्व स्पर्धा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
अण्णा- भाऊ स्मृती पंधरवड्यानिमित्त आजरा महाविद्यालयामध्ये ज्युनिअर, व्होकेशनल विभागाच्या वतीने तालुकास्तरीय शालेय निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.
अण्णा भाऊ स्मृती पंधरवडा कार्यक्रमाचे मान्यवरांच्या उपस्थितीत कै. काशिनाथ चराटी व कै. माधवराव देशपांडे यांच्या प्रतिमेच्या पूजनाने व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेमधील यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे….
निबंध स्पर्धा…
प्रथम क्रमांक- प्रणाली नामदेव कुंभार ( पार्वती शंकर विद्यालय उत्तुर), द्वितीय क्रमांक- दिपाली उदय नेवगे ( बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल गवसे), तृतीय क्रमांक- संकेत सुनील कांबळे ( पेरणोली हायस्कूल पेरणोली.)
उत्तेजनार्थ- सिद्धी युवराज सुतार ( मडिलगे हायस्कूल मडिलगे ),हर्षदा निलेश नरवलकर. ( माध्यमिक विद्यालय अर्दाळ.)
वक्तृत्व स्पर्धा…
प्रथम क्रमांक-सिमरन भिकाजी पाटील (व्यंकटराव हायस्कूल आजरा ) द्वितीय क्रमांक- निवेदिता पांडुरंग सागर ( माध्यमिक विद्यालय अर्दाळ ), तृतीय क्रमांक- संचिता संतोष दिवेकर ( बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल गवसे )
उत्तेजनार्थ- सौरभ संतोष पाटील ( पार्वती शंकर विद्यालय उत्तुर ),रिया राजाराम सावंत.( पार्वती शंकर विद्यालय उत्तुर ),समृद्धी उत्तम वांद्रे ( पेरणोली हायस्कूल पेरणोली )
या सर्व विद्यार्थ्यांचे रोख रक्कम स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन प्राचार्य डॉ .ए.एन.सादळे,उप्राचार्य दिलीप संकपाळ, एम.एच. देसाई, योगेश पाटील व मान्यवरांच्या गौरवण्यात आले.
या कार्यक्रमासाठी ज्युनिअर व्होकेशनल विभागातील सर्व शिक्षक व शिक्षिका तसेच प्रशासकीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवड…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी कला उत्सवात महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा मंडळाकडून नृत्य विभागातील परीक्षक म्हणून आजरा येथील अश्विन गणपत मनगूतकर यांची निवड करण्यात आली आहे.


(Advt.)
लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..
तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त
✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
✅ इतर अनेक सुविधा
🏡साईटचा पत्ता :
समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा
☎️ संपर्क –
+91 9527 97 3969



