mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


नाट्य महोत्सव चालवणे आव्हानात्मक: आय. के. पाटील

आजऱ्यात नाट्यमहोत्सवास सुरुवात


                      आजरा: प्रतिनिधी

      आजर्‍याला नाट्य चळवळीचा वारसा आहे. अनेक नाट्यकर्मी आज-याच्या मातीतून जन्माला आले. कालानुरूप परिस्थिती बदलत गेली. वाढता खर्च व मनोरंजनाची इतर साधने यामुळे नाट्यमहोत्सव चालवणे दिवसेंदिवस आव्हानात्मक बनू लागले आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ नाट्यकर्मी आय.के. पाटील यांनी केले. ते आजरा येथील दहाव्या कै. रमेश टोपले स्मृती राज्यस्तरीय नाट्यमहोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अनिल देशपांडे होते.

       आजरा सूतगणीच्या अध्यक्षा श्रीमती अन्नपूर्णादेवी चराटी, आजरा अर्बन बँकेचे अध्यक्ष रमेश कुरुणकर, डॉ.अनिल देशपांडे,आय.के. पाटील व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

     यावेळी पाटील यांनी नवनाट्य मंडळाच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेतला. अध्यक्षीय भाषणात डॉ. अनिल देशपांडे यांनी आजरेकर नाट्यप्रेमींच्या उदंड प्रतिसादामुळे हा नाट्य महोत्सव यशस्वी होत असल्याचे सांगितले.

    यावेळी सूर राहू दे… हा शुभारंभाचा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. उद्घाटन प्रसंगी माजी नगराध्यक्षा श्रीमती ज्योत्स्ना चराटी, अनिकेत चराटी, योगेश पाटील, शरद टोपले यांच्यासह नाट्यरसिक उपस्थित होते.


काजू उत्पादक परिषद यशस्वी करण्याचे काॅ.शांताराम पाटील यांचे आवाहन


                    आजरा: प्रतिनिधी

       मुंबईत बैठकीच्या खोलीत एक हात जागेत, वळकटीवर गिरणीकामगारनी आयुष्य
घालवून, गावच्या विकासाला हातभार लावला होता. मुंबईत गिरणी उद्योग उध्वस्त झाल्यावर, गिरणीकामगार शेतकरी झाला . येथील शेतक-यांचे अनेक प्रश्न आहेत. यापैकी काजू बियांचा हमी भाव मिळावा हा एक असून यासाठी काजू उत्पादक परिषद यशस्वी करण्याचे आवाहन काॅ. शांताराम पाटील यांनी परिषद नियोजनाच्या बैठकीत केले.

     यावेळी कॉ. पाटील यांनी महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी बहूजनाची शिक्षणाची दारे खुली केल्याने , जनजागृती निर्माण झाली.पूर्वी एखादे पत्र वाचून घ्यायला, गाडीभर लाकडे फोडून घेतली जात होती.आताही भांडवलदार तसेच वागत आहेत. ही परिषद महाराष्ट्र राज्य श्रमिक शेतकरी संघटनेच्या वतीने होत आहे. यासाठी राज्य पातळीवरील प्रमुख नेतृत्व काॅ.राजेंद्र बालके याच्या अध्यक्षतेखाली काॅ.सुभाष काकुस्ते मार्गदर्शन करणार आहेत व काॅ.उदय भट, काॅ. अतूल दिघे, काॅ. दत्तात्रय अत्याळकर प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.

       जिल्हातील गिरणीकामगार, शेतकरी व काजू उत्पादक यानी परिषदला उपस्थित रहावे, असे आवाहन केले.

       यावेळी गोपाळ गावडे गिरणीकामगार चंदगड तालूका अध्यक्ष यांनी काजू दरासाठी शेतकरी संघटीत होऊन, लढा उभारला पाहीजे. शासनाने आयात काजू स्वस्त केला. आणि निर्यातीला कर लावला त्यामुळे शेतकरी अडचणीत आला. यावेळी संजय घाटगे यांनी गिरणीकामगारनी संयुक्त महाराष्ट्रसह वेगवेगळ्या चळवळीत भाग घेत सर्व श्रमिक संघटना पेन्शन, रेशनींग, शेती पिकांना हम्मी भाव याच्यासह अस्तित्वाची लढाई सुरू असल्याचे सांगितले.

      प्रास्ताविक नारायण भंडागे यांनी केले, शांताराम हारेर ,मनप्पा बोलके, जे. के. सावंत, जानबा धडाम, दौलती राणे, हिंदूराव कांबळे, जोतीबा सासुलकर,आबा पाटील, नारायण राणे याच्यासह गिरणी कामगार उपस्थित होते.

    आभार निवृत्ती मिसाळ यांनी मानले.


स्पर्धेत टिकण्यासाठी ध्येय निश्चिती आवश्यक : आमदार जयंत आसगावकर

पं. दीनदयाळ हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात 


                    आजरा: प्रतिनिधी

         ‘ सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे या स्पर्धेत टिकायचे असेल तर तुम्हाला ध्येय निश्चित करून वाटचाल करावी लागेल आज स्पर्धा झपाट्याने वाढत आहे करिअरच्या असंख्य वाटा निर्माण झाल्या आहेत त्यामुळे तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे तेच क्षेत्र निवडा आणि उज्वल यश मिळवा’ असा कानमंत्र आमदार जयंत आसगावकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. पं. दीनदयाळ विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. सुधीर मुंज होते.

        अध्यक्षीय भाषणांमध्ये डॉ. मुंज यांनी संस्थेच्या विकासासाठी त्याचबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी जे जे करता येईल ते ते करण्याची आणि त्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची ग्वाही दिली.

        प्रास्ताविकामध्ये विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. संस्थेचे सचिव मलिककुमार बुरुड यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार केला तर शिक्षण महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जयंतीनिमित्त विद्या शिक्षण संकुल गडहिंग्लज मार्फत दिला जाणारा गुणवंत शिक्षक पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुधीर मुंज यांना देण्यात आला त्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.

       या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रकाश प्रभू यांनी केले. कार्यक्रमास उपाध्यक्षा श्रीमती विमल भुसारी, संचालक सुधीर कुंभार ,नाथा देसाई ,भिकाजी पाटील ,सल्लागार एम. के. नोरेंज ,आनंदा कुंभार त्याचबरोबर श्रीधर गोंधळी ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.


कबड्डी स्पर्धा

          मडीलगे, ता. आजरा येथे महालक्ष्मी यात्रेनिमित्त कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने १९ व २० जानेवारी २०२४ रोजी ६० किलो वजन गटातील निमंत्रित पुरुषांच्या कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती संयोजकांनी दिली. या स्पर्धेतील प्रथम चार क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे २१००१/-,१५००१/- ११००१/-, ७००१/- रुपये रोख व चषक देण्यात येणार असून इतर अनेक व्यक्तिगत बक्षीसेही ठेवण्यात आली असल्याची माहिती संयोजकांनी दिली.


क्रिकेट स्पर्धा


        ग्रामस्थ मंडळ,चांदेवाडी यांच्या वतीने बुधवार दिनांक १७ जानेवारी रोजी ओपन नाईट हाप पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे ५००१/-, ३००१/-, व २००१/- रुपये रोख बक्षीस व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, यासह विविध वैयक्तिक बक्षिसेही ठेवण्यात आली असून स्पर्धेत भाग घेऊन इच्छिणाऱ्या संघांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


कै. रमेश टोपले नाट्यमहोत्सव

आजचा नाट्यप्रयोग

                          स्पायडरमॅन
            (लेखक…विद्याधर अध्यापक)

वेळ- सायंकाळी सात वाजता
आजरा महाविद्यालयाच्या रंगमंचावर


छायावृत्त…


     जानेवारी महिना संपत येईल तसे उन्हाळ्याचे वेध लागल्याने पाटबंधारे विभागाकडून ठिकठिकाणीच्या बंधाऱ्यांमध्ये बरगे टाकून पाणी आडवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.


.

संबंधित पोस्ट

स्वामी विवेकानंद पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!