mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरक्रीडागुन्हाठळक बातम्याबिझनेसभारतमहाराष्ट्रराजकीयसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

 बुधवार  दि. ९ जुलै २०२५         

आजऱ्यात प्लास्टिक वापरावर नगरपंचायतीची नजर…
कारवाईचा धडाका

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा नगरपंचायतीच्या वतीने मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता  अभियान अंतर्गत आज शहरामधील व्यवसायिक, अस्थापनाची तपासणी केली असता एकूण १६ किलो प्लास्टिक जप्त केले असून ₹ ५८००/- इतका दंड वसूल केला आहे.

      सदरचे अभियान मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविले असून स्वच्छता निरीक्षक अमर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अभियान राबविण्यात आले, या अभियानामध्ये संजय यादव, अरुण कांबळे, कोमल देसाई, अजिंक्य बागल, अनिकेत पाटील, रमेश कांबळे, जयवंत कांबळे, गणेश राम यांनी सहभाग नोंदवला .

दहशत बिबट्याची…
ठसे रान कुत्र्याच्या पावलांचे...
बहिरेवाडीतील प्रकार


           उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      बहिरेवाडी ता. आजरा येथे बिबटया सदृश्य वन्यप्राणी असल्याचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. या व्हिडिओनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आजरा वनविभागाच्या वतीने वन्यजीव बचाव पथकासह (RRT) यांनी घटनास्थळी पाहणी केली असता जंगली कुञ्याच्या पावलांचे ठसे आढळून आले.

       सदर बिबट्या सदृश्य वन्य प्राणी प्रथम श्रावण मारुती पावले याना त्यांच्या शेताजवळ दिसल्याची माहिती मिळाल्याने त्यांना सोबत घेऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसराची सखोल तपासणी केली. मात्र, तपासणीत बिबट्याचे कोणतेही ठोस पाऊलखुणा किंवा अस्तित्व आढळून आले नाही. त्याऐवजी कुत्र्यांचे ठसे मात्र स्पष्टपणे दिसून आले.

     यावेळी गडहिंग्लज परिमंडळाचे वनाधिकारी सागर पोवार, वनरक्षक आर. बी. पाटील, प्रकाश शिंदे,वन कर्मचारी , आजरा वन्यजीव बचाव पथक, गावचे सरपंच रत्नजा सावंत , उपसरपंच दतात्रय मिसाळ आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुटखा, पान मसाला विक्रेत्यांवर पोलिसांचे धाडसत्र
चौघा विक्रेत्यांवर कारवाई

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

    आजरा शहरातील गुटखा, पान मसाला, सुगंधी सुपारी विक्री करणाऱ्या दुकान चालकांवर पोलिसांनी काल कारवाईचा बडगा उभारत चौघा विक्रेत्यांविरोधात गुन्हा नोंद करून त्यांच्याकडून गुटखा, पान मसाला, सुगंधी सुपारी असे पदार्थ ताब्यात घेतले आहेत.

      कारवाई झालेल्यांमध्ये पंचायत समिती शेजारील तन्मय किराणा दुकान, संभाजी चौकातील अबुल पान शॉप, आजरा-आंबोली मार्गावरील भाई भाई कोल्ड्रिंक्स, बस स्थानकासमोरील शिवतेज पान शॉप चालकांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

      त्यांच्याकडून गुटखा, पान मसाला, सुगंधी सुपारी ताब्यात घेण्यात आली आहे.

पावसाचा जोर ओसरला…
घरांची मात्र पडझड

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा तालुक्यामध्ये एक हजार मिलिमीटर पावसाचा टप्पा ओलांडल्यानंतर मंगळवारी दुपारनंतर पावसाचा जोर ओसरला असून पावसाने विश्रांती घेतल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळे उचंगी प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे तालुक्यातील सर्वच पाणी प्रकल्प तुडुंब झाले आहेत.

      पावसाचा जोर ओसरला असला तरी घरांची पडझड मात्र मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. भादवण येथील भरमू लक्ष्मण खुळे यांच्या घराची भिंत पडून वीस हजार रुपयांचे नुकसान झाले. तर सुधाकर पंडित यांच्या पोल्ट्रीचे मोठे नुकसान झाले आहे. पांडुरंग मगदूम यांच्या रहात्या घराची भिंत कोसळली आहे तर वेळवट्टी येथील निवृत्ती यशवंत पोवार यांच्या घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले आहे.

खड्डे व बंद पथदिव्यांबाबत अन्याय निवारण समिती आक्रमक…
मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

      आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा नगरपंचायत हद्दीतील सर्व गल्ल्या तसेच कॉलनीतील पथदिवे तसेच रस्त्यांबाबतच्या व्यवस्थेची पार दुर्दशा झाली आहे. एकेका गल्लीत जवळपास ६ ते ७ महिने झाले रस्त्यावरची दिवाबत्ती बंद झाली आहे. वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्याचप्रमाणे गटारी व नवीन नळकनेक्शनसाठी रस्ता खुदाई झालेमुळे आणि यावर्षी मे महिन्यापासूनच संततधार पाऊस पडत असलेमुळे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून रस्त्यावरील खड्डे भरणे बाबत व पथदिवे दुरुस्तीबाबत आक्रमक होत आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांना निवेदन दिले आहे.

      आजरा शहरात बहुतांशी भागात पथदिवे सुरु नाहीत तर काही ठिकाणी रस्ता रुंदीकरण व गटारीसाठी जुने लाईट खांब काढले असलेने त्याठिकाणी रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. अशा ठिकाणी नवीन पोल बसवून पथदिव्यांची व्यवस्था करणे गरजेचे आहे.  अनेक मोक्याच्या ठिकाणचे हायमास्ट दिवे बंद आहेत ते हायमास्ट दिवे सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शहरात नवीन पाणी योजना व पावसामुळे संपूर्ण आजरा शहरात चिखलाचे व खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अशा ठिकाणी वाहन चालविणे किंवा नागरिकांना, विद्यार्थ्यांना चालणे जिकिरीचे झाले आहे. साई कॉलनी, राईसमिल परिसर, जोशी गल्ली, गांधीनगर येथील ओढ्याचे ठिकाण, दर्गागल्ली, नाईक गल्ली, कुंभार गल्ली आझाद कॉलनी इ. ठिकाणी तात्पुरते मुरूम टाकून नागरिकांच्या समस्येचे निराकरण करावे. त्यानुसारच व्यंकटराव हायस्कुल ते मिनर्वा हॉटेल पर्यंतचे पावसाचे पाणी पूर्ण रस्त्यावरून वाहत आहे. गटारीत जाण्यासाठी कोठेही नियोजन केलेले दिसत नाही त्याची पाहणी करून ड्रेनहोल अथवा पाईप घालून सदरचे पाणी गटारीत सोडण्यासाठीचीही मागणी करण्यात आली आहे.

      निवेदनावर परशुराम बामणे (अध्यक्ष ), गौरव देशपांडे (उपाध्यक्ष ), पांडुरंग सावरतकर (सचिव ), सुधीर कुंभार (अध्यक्ष ,सल्लागार समिती ), बंडोपंत चव्हाण, जोतिबा आजगेकर, जावेद पठाण, वाय. बी. चव्हाण, अशोक गाडे, मदन तानवडे, दिनकर जाधव आदींच्या सह्या आहेत.

नवोदय परीक्षेत व्यंकटराव हायस्कूलचे यश…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     येथील व्यंकटराव हायस्कूल मधील इयत्ता नववीच्या वर्गात शिकणारी कु. सौश्रुती अमित पुंडपळ हिची नवोदय विद्यालय कागल येथे निवड झाली आहे. तिला ८५ पैकी ७४ गुण मिळाले आहेत. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील मुलांमधून तिची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थीनीला सौ.ए.डी.पाटील, श्री.पी एस.गुरव, श्री. व्ही.ए.चौगुले, श्रीम. पाटील आर. एन. यांचे मार्गदर्शन व प्राचार्य श्री.एम.एम.नागुर्डेकर,माजी प्राचार्य श्री.आर.जी. कुंभार ,पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार यांचे प्रोत्साहन लाभले.

पेरणोलीत पाण्याच्या प्रवाहात अडकून म्हैशीचा मृत्यू

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       पेरणोली ( ता.आजरा) येथील कुरकुंदेश्वराच्या ओढ्यातून वाहून गेलेली म्हैस  ओढयातील पाईपमध्ये  अडकली. पाण्याचा प्रवाह जोरदार असल्यामुळे म्हैशीचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला. भगवान ज्ञानोबा येरुडकर यांची म्हैस आहे. येरूडकर यांचे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाकडून याचा पंचनामा केला जाणार आहे.

शिवसहकार सेनेच्या आजरा तालुका संघटकपदी सुभाष तेंडूलकर 

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      शिवसेना अंगीकृत शिवसहकार सेनेच्या आजरा तालुका संघटकपदी सुभाष तेंडूलकर यांची निवड करण्यात आली. तर निवडीच्यावेळी कोल्हापूर जिल्हा प्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे , गडहिंग्लज तालुका प्रमुख दिलीप माने, अजित खोत, कोल्हापूर जिल्हा सहसंपर्क प्रमुख रियाजभाई शमनजी, शिवसहकार सेनेचे जिल्हा संघटक शैलाप्पा साखरे उपस्थिती होते.

निधन वार्ता
पाडूरंग दिवटे

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      वडकशिवाले ,ता . आजरा येथील जेष्ठ नागरिक पाडूरंग जोती दिवटे ( वय ८३ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले .

      त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. जिल्हा बँकेचे अधिकारी सुनील दिवटे यांचे ते वडील होत.

      रक्षा विर्सजन शुक्रवारी सकाळी दहा वाजता आहे .

 

संबंधित पोस्ट

Big Breaking….

प्रभागाचा विकास हाच ध्यास…सौ.सरीता गावडे

mrityunjay mahanews

विहिरीत बुडाल्याने वृद्धाचा मृत्यू…

mrityunjay mahanews

गणेशमूर्ती सांभाळण्याच्या नादात एकाचा मृत्यू

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

गुरुनाथ यांचा अखेर मृत्यू….

mrityunjay mahanews
error: Content is protected !!