गुरूवार दि. १० जुलै २०२५


बांबूच्या मूल्यवर्धनातून मोठ्या प्रमाणावर रोजगार : विनय कोलते

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महाराष्ट्रातील बांबू उद्योगात आजऱ्याच्या मेसकाठी (माणगा) बांबूला मोठी मागणी आहे. माणगा बांबूवर प्रक्रिया करुन अनेक उत्पादने बनवली गेली पाहिजेत. बांबूच्या मूल्यवर्धनातून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकेल. असे प्रतिपादन बांबू तज्ञ विनय कोलते यांनी केले.
येथील आजरा महाविद्यालयात व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. आजरा बांबू क्लस्टर फाऊंडेशन, आजरा महाविद्यालयचा पर्यावरण, भूगोल विभाग आणि ग्रीन क्लबच्यावतीने आयोजीत बांबू उद्द्योगातील भविष्यातील संधी या विषयावर वेणुवेध द बाबू रिसर्च फाऊंडेशन पुणेचे संचालक व बांबूतज्ञ विनय कोलते यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डा. अशोक सादळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे यांनी स्वागत केले. आजरा बांबू क्लस्टर फाऊंडेशनचे संयोजक सतीश कांबळे यांनी प्रास्ताविक केले. कोलते म्हणाले, विद्यार्थ्यांनी नव्या आश्वासक बांबू उद्योगांकडे करियर म्हणून पाहावे. बांबू प्रक्रिया उद्योगामध्ये मेसकाठी (माणगा) ऐवजी इतर बांबू प्रजातींना व्यावसायिकदृष्ट्या महत्त्व आहे. शेतकऱ्यांनी पारंपारिक बांबू लागवडीसोबत इतरही व्यावसायिक बांबू प्रजातीची लागवडीसाठी पुढे आले पाहिजे. बांबू आधारीत उद्योग निमींतीवर भर द्यावा. प्राचार्य डॉ. सादळे यांचे भाषण झाले. विद्यार्थानी बांबू प्रक्रीयेची माहीती घ्यावी. असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कृषी सहाय्यक योगेश जगताप, रवी तळेवाडीकर, दीपक डोंगरे, सुवर्णा धामणेकर- भोकरे, वैशाली देसाई, शोभा केंद्रे फ़ड, अनुराधा गोटखिंडे, पुनम लिचम यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
प्रा. विठ्ठल हाक्के यांनी सूत्रसंचालन तर प्रा. रत्नदीप पवार यांनी आभार मानले.

एका रस्त्याच्या कामासाठी दुसऱ्या रस्त्याची दुर्दशा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा – चंदगड मार्गाचे रुंदीकरण काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा मार्ग तयार करण्याकरता लागणारे साहित्य भरून मोठ्या प्रमाणावर डंपर्स जात असल्याने किणे – कोळींद्रे रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा झाली आहे.
क्षमतेपेक्षा जास्त माल भरून अवजड वाहने सातत्याने या मार्गावरून जात असल्याने रस्ता पूर्णपणे उखडला असून रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले आहेत. स्थानिक शेतकरी व वाहन चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पावसाळ्यामध्ये खड्ड्यांतूनच वाट काढावी लागत आहे.
एका रस्त्याच्या कामासाठी दुसऱ्या रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा होत असल्याबद्दल नागरिकातून संताप व्यक्त होत आहे.


रक्तदान शिबिर उत्साहात…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आरोग्य विभाग,पंचायत समिती आजरा यांच्या वतीने आजरा तालुक्यातील सर्व शासकिय कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र तसेच तरुण मंडळे यांच्या सहभागातून ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालय येथे रक्तदान शिबीर उत्साहात पार पडले.
शिबीराचे उदघाटन श्री. समिर माने, तहसिलदार आजरा यांचे हस्ते करण्यात आले. सदर प्रसंगी डॉ. श्री. अमोल पाटील वैदयकिय अधिक्षक ग्रामिण रुग्णालय आजरा, डॉ. श्री. आर. जी. गुरव तालुका आरोग्य अधिकारी पं.स. आजरा तसेच श्री. विजय थोरवत व आज-यातील प्रतिष्ठीत नागरीक व तालुक्यातील आरोग्य कर्मचारी हजर होते.
तहसिलदार माने यांनी स्वतः रक्तदान करून जनतेसमोर रक्तदान करण्याबाबत आवाहन केले,श. डॉ. श्री. अमोल पाटील वैदयकिय अधिक्षक ग्रामिण रुग्णालय आजरा यांनी आज रक्तदान करून त्यांनी आजअखेर ३३ वेळा रक्तदान केल्याचे सांगीतले.
रक्तदान शिबीरामध्ये विविध तरुण मंडळे, नागरीक, आरोग्य कर्मचारी यांनी रक्तदान शिबीरामध्ये भाग घेतला. एकूण ४४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

ॲलोपॅथी डॉक्टरांवर अन्याय करणारा निर्णय शासनाने रद्द करावा…
आजरा इंडियन मेडिकल असोसिएशनची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महाराष्ट्र मेडिकल कौन्सील (एम.एम.सी.) ही ॲलोपॅथी पदवी प्राप्त असणाऱ्या डॉक्टरांची नोंदणी व नियंत्रण करणारी संस्था आहे. तरीसुद्धा होमिओपॅथी चिकित्सा करणाऱ्या डॉक्टरांना एक वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स ऑफ मॉडर्न फार्मेकोलॉजी हा कोर्स सुरु करून त्यांना एम. एम. सी. ची नोंदणी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय साडेपाच वर्षे व त्या पुढील शिक्षण घेतलेल्या ॲलोपॅथी डॉक्टरांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे हा निर्णय शासनाने रद्द करावा असे निवेदन आजरा इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे आजऱ्याचे नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांना देण्यात आले आहे.
होमिओपॅथी आणि आयुर्वेद या वेगळ्या रुग्णचिकित्सा पद्धती असून त्यांची औषध योजना व उपचार पद्धती ॲलोपॅथी पेक्षा वेगळ्या आहेत. या शाखामधील डॉक्टरांना त्यांच्या त्यांच्या पॅथी प्रमाणे नोंदणी करण्यासाठी होमिओपॅथी आणि आयुर्वेद या वेगवेगळ्या संस्था आहेत. त्याप्रमाणे त्यांची नोंदणी होत असते. याचा विरोध इंडियन मेडिकल असोसिएशनने कधीही केलेला नाही. परंतु होमिओपॅथी शिकलेल्या डॉक्टरांना ॲलोपॅथी औषधे वापरता यावीत म्हणून महाराष्ट्र शासनाने सर्टिफिकेट कोर्स ऑफ मॉडर्न फार्मेकॉलॉजी हा एक वर्षाचा कोर्स सुरु केला आहे. वास्तवीक ॲलोपॅथी मधील फार्मेकॉलॉजी हा विषय दीड वर्षे शिकवला जातो व संपूर्ण अभ्यासक्रमात त्याचा मेडिसिन सर्जरी गायनॅकॉलॉजी या विषयांबरोबर कायम संदर्भ येत रहातो. असे असताना आठवड्यातून दोन-तीन दिवस फार्मेकॉलोजी शिकवून होमिओपॅथी डॉक्टरांना एम.एम सी.ने दि. ३० जूनच्या परिपत्रकाद्वारे नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही गोष्ट साडेपाच वर्षे व त्या पुढील उच्च शिक्षण घेतलेल्या ॲलोपॅथी डॉक्टरांवर अन्याय करणारी आहे. त्यामुळे एम.एम.सी. ने घेतलेला निर्णय शासनाने रद्द करावा अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन आजरा आय.एम.ए.ने तहसीलदार यांना दिले.
यावेळी डॉ.दीपक सातोसकर (प्रेसिडेंट आय. एम.ए.), डॉ. रविंद्र गुरव (व्हा. प्रेसिडेंट ),डॉ. अनिल देशपांडे, डॉ. कुलदीप देसाई, डॉ.अनिकेत मगदूम आदी उपस्थित होते.


एम.टी.एस. परीक्षेत ‘व्यंकटराव ‘चे यश…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
नौरोसजी वाडिया कॉलेज,पुणे यांचे मार्फत एप्रिल २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एमटीएस परीक्षेत व्यंकटराव हायस्कूल, आजरा प्रशालेतील इयत्ता नववीच्या* तब्बल २२ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
जिल्हा,तालुका,विशेष प्राविण्य व प्रशस्तीपत्रधारक विद्यार्थी अशा सर्वच गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांनी स्थान पटकाविले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे संचालक श्री.सचिन शिंपी, श्री.कृष्णा पटेकर ,प्राचार्य एम.एम. नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार यांचे हस्ते सत्कार करण्यात आले.
यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे…
पाटील प्रणव भगवान _ जिल्ह्यात तिसरा ,शेख जुवेरिया समीर स्पेशल प्राईझ,पाटील वेदिका शांताराम तालुकास्तरीय प्रथम
प्रमाणपत्रधारक विद्यार्थी पुढीलप्रमाणे…
येसणे प्रेम रमेश ,आजगेकर माधवी जीवन,मोटे ईशान सुरजीत,नाईक सृष्टी सजीव,हरेर अनुष्का अजित ,तावडे सिद्धी दशरथ, कार्तिक सुरेश हुबळे,गिरी शलाका ओमकार,देशमुख रिया अरविंद,माने मधुरा महेश,भोसले अंशुमन हिम्मत,कुंभार यशराज संतोष,सावंत अवधूत अमित,पोटे मानसी अनिल,अस्वले अनुष्का शरद,सुतार आर्या दीपक,सुतार दर्शना दिलीप ,माडभगत मैथिली वसंत, खरुडे आदित्य कृष्णा ,
श्री.पी.एस.गुरव,सौ.ए.डी.पाटील,श्री.एस.वाय.भोये श्रीमती एस. टी.पाटील यांनी मार्गदर्शन केले तर संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांचे प्रोत्साहन लाभले.


निधन वार्ता
पार्वती पाटील

शिरसंगी ता.आजरा येथील
पार्वती शंकर पाटील ( वय ६९ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, तीन विवाहित मुली,दोन विवाहित मुले, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.




