mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

 


बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार


       आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आवंडी धनगर वाडा क्रमांक तीन येथील जानू धुळू कोकरे यांची शेळी बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावली.

     बुधवारी पहाटेच्या दरम्यान बिबट्याने जानू कोकरे यांच्या घराजवळ बांधलेल्या जनावरांमधील शेळीवर हल्ला चढविला. सदर प्रकार सुरू असताना इतर जनावरांनी गोंधळ घातल्याने कोकरे कुटुंबीय घराबाहेर आले.दरम्यान बिबट्याने शेळीला जखमी अवस्थेत तिथेच टाकून जंगलाच्या दिशेने पलायन केले. अल्पावधीतच शेळीच्या मृत्यू झाला. आवडी धनगर वाडा परिसरात पाळीव जनावरांवर बिबट्यांकडून हल्ला होण्याची सत्र सुरूच आहे.यामुळे या परिसरात राहणारे धनगर बांधव अडचणीत येऊ लागले आहेत.

     वनविभागाकडून सदर प्रकाराची माहिती घेण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

हाळोली येथील श्री शंकरलिंगदेव मंदिराचा आजपासून वास्तुशांतीकलशारोहण सोहळा


        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      हाळोली,ता.आजरा येथील श्री शंकरलिंगदेव मंदिर जीर्णोद्धार वास्तुशांती, नंदी प्राणप्रतिष्ठापण व कलशारोहण सोहळा आज गुरुवार दिनांक २ मे २०२४ व शुक्रवार दिनांक ३ मे २०२४ रोजी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती देवस्थान व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष दशरथ अमृते, उपाध्यक्ष गोविंद केरकर व सचिव बंडोपंत बांदेकर यांनी दिली.

       गुरुवार दिनांक २ मे रोजी सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत कलश नंदी मूर्ती मिरवणूक व नगरप्रदक्षिणा , हळदीकुंकू, ओटी भरणे हा कार्यक्रम होणार आहे. या मिरवणुकीत मेढेवाडी भजनी मंडळ व शेळप भजनी मंडळ सहभागी होणार आहे.

       सकाळी सव्वा दहा नंतर प्रायश्चित्त, गणेश पूजन, पुण्याहवाचन, स्थळ शुद्धी, शांती होम, देवता स्थापना, नवग्रह स्थापन, होम हवन व आरती होणार असून रात्री नऊ ते अकरा वाजेपर्यंत संगीत विशारद ह. भ. प. वनिताताई पाटील, भिवंडी( मुंबई ) यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री कीर्तन व त्यानंतर जागराचा कार्यक्रम होणार आहे.

       शुक्रवार दिनांक ३ मे २०२४ रोजी सकाळी सात वाजता देवता पूजन, मुख्य देवता हवन, नंदीस्थापना, प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण, नैवेद्य, पूर्णाहुती त्यानंतर सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी अभिषेक, पूजा, नैवेद्य, आरती, गा-हाणे, प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम होणार आहे.सकाळी १० वाजून ५६ मिनिटांनी कलशारोहण कार्यक्रम परमपूज्य श्री. किशन महाराज, समर्थ नगर यांच्या हस्ते होणार असून दुपारी १.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असल्याचे व्यवस्थापन कमिटीच्या वतीने सांगण्यात आले.

      कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवस्थान व्यवस्थापन कमिटी श्रीशंकरलिंग देवालय, ग्रामस्थ मंडळ हाळोली/ मुंबई ग्रामस्थ मंडळ दर्डेवाडी/ मुंबई प्रयत्नशील आहेत.

प्रा. मंडलिक यांच्या प्रचारासाठी आम. आबिटकर यांच्या गाठीभेटी

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आम. प्रकाश आबिटकर यांनी आजरा शहरातील विविध प्रभागातील प्रमुख कार्यकर्ते व मान्यवरांच्या घरी भेट घेत संवाद साधला.

      ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्त्वाने देशाचा विकास करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीही जात-पात, धर्म न बघता समाजातील सर्व घटकांचा विकास केला आहे. विविध जनकल्याणकारी योजना राबवून देशातील प्रत्येक नागरीकाला शासनांच्या योजनांचा लाभ दिला आहे. ही विकास गंगा हीच सुरू राहण्यासाठी खासदार संजय मंडलिक यांना दुसऱ्यांदा खासदार करण्यासाठी व आदरणीय मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी जास्तीत-जास्त मताधिक्य द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

      यावेळी भाजपा नेते सुधिर कुंभार, भाजपा तालुकाप्रमुख बाळ केसरकर, नाथ देसाई, जिेतेंद्र टोपले, दयानंद भुसारी, बापू टोपले, जी.एम.पाटील, इंद्रजित देसाई, विजयभाऊ थोरवत, भैय्या टोपले, आनंदा कुंभार, मारुती बिरजे, रविंद्र पारपोलकर, आण्णा फडके, समीर मोरजकर,धनाजी पारपोलकर, महेश खेडेकर, संतोष भाटले, अनिकेत शिंत्रे, महेश दळवी, अनिल पाटील, गणपत डोंगरे, रविंद्र हुक्केरी, दत्तात्रय मोहिते, निखील पाचवडेकर, सी.डी.सरदेसाई, काका देसाई, धनंजय पाटील, संतोष भाटले यांच्यासह प्रमुख मान्यवर व नागरीक उपस्थित होते.

निधन वार्ता
मारुती पाटील

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

    शिरसंगी ता.आजरा येथील ह.भ.प.मारुती आण्णापा पाटील (वय ७६ वर्षे ) यांचे निधन झाले .

     त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

प्रकाशदादा गेले…. ‘अर्बन ‘ परिवारात शोककळा..

mrityunjay mahanews

मोटर सायकलवरच हृदयविकाराचा झटका… आज-यातील एकाचा मृत्यू…  

mrityunjay mahanews

पेरणोली येथे गव्याचा हल्ला…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!