

हालेवाडी येथील लक्ष्मी मंदिरात पावणेसहा लाखांची धाडसी चोरी
मूर्तीवरील 14 तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांकडून लंपास
उत्तूर पंचक्रोशीत खळबळ

हालेवाडी( ता. आजरा) येथे भरवस्तीत असणाऱ्या लक्ष्मी मंदिराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी मूर्तीच्या अंगावरील 5 लाख 72 हजार रुपयांचे सुमारे चौदा तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली असून यामुळे उत्तूर पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शुक्रवार दिनांक 19 रोजी रात्री ते शनिवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी भरवस्तीत असणाऱ्या लक्ष्मी मंदिरात दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी देवीच्या मूर्तीवर घालण्याकरता असणारे सुमारे चौदा तोळे सोन्याचे दागिने काढून घेऊन पोबारा केला. शनिवारी सकाळी मंदिराची देखभाल करणारे सुनील शिवाजी पाटील हे मंदिराची स्वच्छता व मूर्तीची पूजा करण्यासाठी गेले असता सदर चोरी निदर्शनास आली. घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी मंदिराजवळ मोठी गर्दी केली तातडीने आज -याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे व त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते.

श्वानपथक आरदाळच्या दिशेने मार्गस्थ झाले.सदर चोरीचे व्रृत्त समजताच गडहिंग्लज उपविभागातील प्रमुख पोलिस अधिकारीही उपविभागातील घटनास्थळी दाखल झाले.
सीसीटीव्ही यंत्रणाच चोरटयांकडुन लंपास…
सदर मंदिरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा कार्यान्वित आहे हे चोरट्यांना माहित होते. चोरी केल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही ची संपूर्ण यंत्रणा आपल्या सोबत नेल्याने तपासावर मर्यादा येताना दिसत होत्या. या चोरीची फिर्याद सुनील पाटील यांनी दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


जनता बँकेच्या उत्तूर शाखेचे उद्या उद्घाटन

आजरा येथील जनता सहकारी बँक लिमिटेड आजरा या बँकेच्या उत्तुर शाखेचे उद्घाटन रविवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11.15 वाजता माजी आमदार के. पी. पाटील यांच्या हस्ते व आजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष वसंतराव धुरे यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी दिली.
या कार्यक्रमास जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, गोकुळ दूध संघाच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेशराव आपटे, जिल्हा परिषद माजी सदस्य काशिनाथ तेली, आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे, आजरा पंचायत समितीचे माजी सभापती उदयराज पवार, माजी उपसभापती शिरीष देसाई, आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक विश्वनाथअण्णा करंबळी, तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष एम. के. देसाई, संजय गांधी निराधार योजना कमिटीचे अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा, आजरा कारखान्याचे माजी अध्यक्ष व माजी पंचायत समिती सभापती विष्णुपंत केसरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले.
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.बी. पाटील, शाखाधिकारी एम.डी. पाटील यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.





