शुक्रवार दिनांक ११ एप्रिल २०२५


पालापाचोळा पेटवताना शेजारच्या शेतात आग पसरली
दोघांविरोधात गुन्हा नोंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
स्वतःच्या शेतामध्ये पालापाचोळा पेटवण्याच्या उद्देशाने भर दुपारी लावलेल्या आगीवर नियंत्रण ठेवता न आल्याने आजूबाजूच्या शेतामध्ये आग पसरून विठ्ठल महादेव जाधव यांच्या शेतातील काजू, आंबा, चिक्कू,मेसकाठी इत्यादीचे सुमारे पाच लाखांचे नुकसान केल्याप्रकरणी साळगाव येथील बंडू गोविंद जाधव व रोहन सागर जाधव यांच्या विरोधात पोलीसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद विठ्ठल महादेव जाधव रा. पेरणोली यांनी आजरा पोलिसात दिली असून सदर फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार पांडुरंग येलकर करीत आहेत.



तालुक्यातील वनविभागाच्या प्रश्नाबाबत मनसेचे निवेदन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जंगली जनावरांकडून होणारे हल्ले व जीवित हानी, वणवे लावून जैवविविधता नष्ट करण्याचे वाढलेले प्रकार, बेकायदेशीर रित्या झाडांची कत्तल करून होणारी तस्करी थांबवण्याच्या पार्श्वभूमीवर आजरा तालुका मनसेच्या वतीने वनविभागाला निवेदन देण्यात आले आहे.
वन विभागाने तातडीने यावर उपाय योजना करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदनावर संघटनेचे तालुका अध्यक्ष आनंदा घंटे, उपाध्यक्ष सुशांत पोवार, महिला आघाडी प्रमुख सौ. सरिता सावंत, वसंत घाटगे सुनील पाटील, संतोष शिवगंड यांच्या सह्या आहेत.


निधन वार्ता
जोतिबा शेडगे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हात्तीवडे ता. आजरा येथील सचिव जोतिबा मारुती शेडगे ( वय ५५ वर्षे) यांचे प्रदीर्घ आजाराने महागाव येथे उपचारादरम्यान काल गुरुवारी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार असून आज शुक्रवारी सकाळी नऊ वाजता रक्षा विसर्जन कार्यक्रम आहे.


आजरा मर्चंटस् सोसायटीला ४५ लाख ४२ हजारांचा ढोबळ नफा : अध्यक्ष कारेकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील आजरा मर्चंटस् को ऑप क्रेडिट सोसायटीला सन २०२४-२५ या वर्षाअखेर ४५ लाख ४२ हजार इतका ढोबळ नफा झाला असल्याची माहिती चेअरमन रमेश कारेकर यांनी दिली.
संस्थेच्या ठेवी १६ कोटी ६९ लाख २८ हजार ९५ इतक्या असून कर्ज वाटप ११ कोटी ६४ लाख ६७ हजार ७५८ इतके आहे. गुंतवणूक ७ कोटी ४३ लाख ४ हजार ८३ इतकी आहे. थकबाकी ०.६० टक्के असून ढोबळ एन. पी. ए. ०.६० टक्के असून निव्वळ एन. पी. ए ० टक्के आहे. ऑडीट वर्ग सतत ‘ अ ‘ राहिला आहे. संस्थेचा वार्षिक व्यवसाय ६८ कोटी ४० लाख ८३ हजार ३७३ इतका असून संस्थेचे खेळते भांडवल २२ कोटी ५३ लाख ७२ हजार ७९१ आहे. संस्थेच्या शाखा महागाव, तारळे, राशिवडे व मलकापूर येथे असून सर्व शाखा नफ्यामध्ये असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी संस्थेच व्हा. चेअरमन सुरज जाधव, ज्येष्ठ संचालक बसवराज गुंजाटी, दिवाकर नलावडे, शिवलिंगाप्पा तेरणी, गोपाळ पाटील, रूद्राप्पा पाटील, गोपाळ जाधव, शामराव कारंडे, ऋषिकेश महाळंक, संचालिका उमा हुक्केरी, स्मिता टोपले, व्यवस्थापक गोपाळ पाटील उपस्थित होते.


बोलकेवाडी येथे उद्या जोतिबा यात्रा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सालाबादप्रमाणे बोलकेवाडी ग्रामस्थ मंडळ, बोलकेवाडी व ग्रामस्थ मंडळ, मुंबई यांच्या वतीने बोलकेवाडी ता. आजरा येथे उद्या शनिवार दिनांक १२ रोजी जोतिबा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रेनिमित्त दुपारी बारा वाजता सासनकाठी मिरवणूक निघणार असून सायंकाळी पाच वाजल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले असल्याचे संयोजकांनी सांगितले.


उर्दु – मराठी विद्यामंदिरचे प्रज्ञाशोध परीक्षेत यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उर्दु मराठी विद्यामंदिरच्या चौथीच्या विद्यार्थ्यांनी प्रज्ञाशोध परीक्षेत यश संपादन केले. यामध्ये जारा माणगांवकर तालुक्यात प्रथम व जिल्हा गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक पटकाविला. मोहम्मदसफवान लतिफ, आईशा नाईकवाडे, आनिया आगलावे, सफरीना दरवाजकर, आईशा मोमीन, अब्दुल्ला शिडवणकर, हूमेरा मालदार, मोहम्मदउसेद माणगांवकर. हूमेरा खलिफ, राफिया अत्तार यांनी यश संपादन केले.
या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षक रिजवान माणगांवकर, मोहम्मद तगारे यांचे लाभले. तर मुख्याध्यापक युनुस लाडजी, मुसा सुतार यांचे प्रोत्साहन लाभले.



