रविवार दिनांक ४ मे २०२५



गव्याच्या हल्ल्यात वृद्ध ठार
. आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
साळगाव ता. आजरा येथील धोंडीबा हरी व्हळतकर या ७० वर्षीय वृद्ध गव्याने केलेल्या हल्ल्यात तो ठार झाला आहे. शनिवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, धोंडीबा व्हळतकर हे नेहमीप्रमाणे आपल्या साळगाव येथील काळवट नावाच्या जमिनीमध्ये सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रखवालीच्या उद्देशाने निघून गेले ते उशिरापर्यंत परतले नाही तर म्हणून त्यांची पत्नी व पांडुरंग पाटील हे त्यांना शोधण्यासाठी शेताकडे गेले असता ते गव्याने धडक दिलेल्या व बेशुद्ध अवस्थेत शेतामध्ये पडलेले आढळले. ग्रामस्थांनी त्यांना दवाखान्यात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
सदर वृत्त वनविभागाच्या अधिकाऱ्यांना समजताच परिक्षेत्र वन अधिकारी मनोज कुमार कोळी, वनपाल एस. एस. मुजावर, वनरक्षक घोरपडे यांच्यासह वनविभागाचे अधिकारी तातडीने आजरा ग्रामीण रुग्णालयात दाखल होऊन त्यांनी संबंधित घटनेची माहिती घेतली.
गव्यांना रोखण्याचे आव्हान….
सद्यस्थितीस तालुक्यात हत्तींचा उपद्रव थोडा कमी झाला असून गव्यांचा मात्र तालुकाभर सुळसुळाट झाला आहे . होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी जरीस आला आहे ,तर जीवितहानी, हल्ले, शेती नुकसानीचे पंचनामे करताना वनविभाग वैतागून जात आहे. गव्यांच्या कायमस्वरूपी बंदोबस्ताचे आव्हान कायम आहे.


दूध धंद्याला प्रमुख धंदा केल्यास शेतकऱ्यांचे भवितव्य उज्वल
आ. सतेज पाटीलमलिग्रेत भावेश्वरी दूध संस्थेचे उद्घाटन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सत्ता आल्यानंतर काटकसरीचा कारभार केल्याने गोकुळची प्रगती सुरू आहे. शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती अजून वाढली पाहिजे.त्यामुळे दूध धंद्याकडे जोडधंदा म्हणून न करता प्रमुख धंदा म्हणून काम केल्यास शेतकऱ्यांचे भवितव्य उज्वल असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी केले.
मलिग्रे ता. आजरा येथे श्री भावेश्वरी सहकारी दूध व्यावसायिक संस्थेचे उद्घाटन आमदार पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. गोकूळच्या संचालिका अंजना रेडेकर अध्यक्षस्थानी होत्या.यावेळी आजरा कारखाना अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. पाटील म्हणाले, दुधामुळे जिल्ह्याची आर्थिक उन्नती झाली. गोकुळ आणि जिल्हा बँक टिकल्या पाहिजे. ह्या संस्था सर्वसामान्यांच्या दृष्टीने जिल्ह्याच्या अर्थवाहिन्या आहेत. आम्ही या दोन संस्था आई वडीलांसारख्या जोपासत आहोत. सत्तेत आल्यानंतर १५०० कोटी रूपये वाढवले. ८ लाखाचे १८ लाख लिटर संकलन झाले. एक रूपयातील ८६ पैसे शेतकऱ्यांना देतो.१४ पैशात प्रशासकीय व्यवहार केले. ७० लाख रुपये वीज बिलाची बचत केली.
संचालिका अंजनाताई रेडेकर म्हणाल्या, पाडव्याला २१ लाख लिटर संकलन झाले. गोकुळ प्रगतीपथावर असून दूध संस्थांनी नवीन उत्पादक शेतकरी तयार करावेत. व्यावसाय म्हणून दूध धंदा तरूणांनी करावा.यावेळी माजी सरपंच दत्ता परीट, काँ. संजय तर्डेकर, रामराजे कुपेकर यांची भाषणे झाली.
यावेळी जि. प. चे माजी अध्यक्ष उमेश आपटे,माजी सभापती मसणू सुतार,विद्याधर गुरबे,दिग्विजय कुराडे,रमेश रेडेकर, संजय सावंत,विकास बागडी, रामदास पाटील आदी उपस्थित होते. कारखाना संचालक अशोक तर्डेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
संजय घाटगे यांनी आभार मानले.


उत्तुरमध्ये संवेदना कमल पुरस्कार वितरण उत्साहात

उत्तुर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संवेदना फाउंडेशन, आजरा यांच्या वतीने आयोजित ‘संवेदना कमल पुरस्कार २०२५’ सोहळा कन्या विद्यालय, उत्तुर येथे उत्साहात पार पडला. समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.
या वर्षी आरोग्य क्षेत्रात डॉ. चंद्रकांत खोत, उद्योग क्षेत्रात दयानंद देसाई, राजेश शहा आणि साधना पाटील, सांस्कृतिक क्षेत्रात एम. के. गोंधळी, कृषी क्षेत्रात लता रेडेकर, क्रीडा क्षेत्रात सुनील ईश्वर शिवणे, शैक्षणिक क्षेत्रात कृष्णा खाडे, समाजकार्य क्षेत्रात विद्या तावडे आणि साहित्य क्षेत्रात नंदू आकाताई सखाराम साळोखे यांना ‘संवेदना कमल पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला.
यासोबतच साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या स्थानिक लेखक, कवी आणि विचारवंतांचा स्नेहमेळावा पार पडला.या संवादात सामाजिक जाणिवा, नव्या लेखकांची गरज आणि संवेदनशीलतेचा वारसा पुढे नेण्याबाबत चर्चा झाली.
कार्यक्रमाला नागरिक, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फाउंडेशनचे कार्यप्रमुख नित्यानंद पाटील यांनी “संवेदना कमल पुरस्कार ही केवळ सन्मानाची परंपरा नाही, तर प्रेरणा, कृती आणि सकारात्मक परिवर्तनाची चळवळ आहे.” असे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे नियोजन तानाजी पावले, संतोष शिवणे, दीपक कांबळे, संतोष गुरव आणि रामकृष्ण मगदुम यांनी केले .

सातेवाडी येथील राईवला महिला दूध संस्थेच्या चेअरमनपदी वृषाली पोतनीस व्हा. चेअरमनपदी अनुसया पाटील

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सातेवाडी येथील श्री. राईवला महिला सहकारी दूध संस्थेच्या चेअरमनपदी वृषाली पोतनीस यांची तर व्हा. चेअरमनपदी अनुसया पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी आर. डी. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या विशेष सभेत या निवडी करण्यात आल्या.
स्वागत व प्रास्ताविक सचिव बंडू पाटील यांनी केले. चेअरमनपदासाठी पोतनीस यांचे संचालक सुमन पोतनीस यांनी सुचविले. त्यास संचालक स्वाती पोतनीस यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमनपदासाठी पाटील यांचे नाव संचालक राजश्री पोतनीस यांनी सुचविले त्यास संचालक शोभा पोतनीस यांनी अनुमोदन दिले. यानंतर नूतन चेअरमन, व्हा. चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे संस्थापक राजाराम पोतनीस, संचालक शारदा पोतनीस, मनिषा पोतनीस उपस्थित होते. सचिव पाटील यांनी आभार मानले.


निधन वार्ता
मारुती बेळगुंदकर

चाफे गल्ली आजरा येथील मारुती जोतिबा बेळगुळकर ( वय ७२ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, जावई, नातवंडे असा परिवार आहे.


निधन वार्ता
रामजी पंडित

हात्तिवडे ता. आजरा येथील रामजी तुकाराम पंडित ( वय ७५ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज रविवारी सकाळी नऊ वाजता आहे.


निधन वार्ता
सौ.सोनाबाई हरळकर

सौ. सोनाबाई हणमंत हरळकर (वय ६५ वर्षे) रा.मडिलगे ता.आजरा यांचे काल सकाळी अकस्मिक निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक बहीण असा परिवार आहे.




