mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शुक्रवार दि.३० मे २०२५       

माणसे मेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का…?
बुरुडे – महागाव रस्ता प्रकरणी शिवसेना आक्रमक

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      बुरुडे – महागाव मार्गावर पडलेले खड्डे त्यामुळे वारंवार होणारे अपघात त्यात जखमी होणारे तालुकावासीय मग वेळोवेळी मागणी करूनही खड्डे मुजवण्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे शिवसेना आक्रमक झाली असून माणसे मेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का ? असा संतप्त सवाल करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना शिवसैनिकांनी व बुरुडे ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरले. एकमेकांकडे बोट दाखवून तालुकावासीयांची दिशाभूल थांबवा आमचा अंत पाहू नका अशा स्पष्ट शब्दात अधिकाऱ्यांना सुनावले. प्रसंगी अधिकाऱ्यांना कोंडूनही घालू असा इशाराही देण्यात आला. अखेर खड्डे आठ दिवसात मुजवण्याची ग्वाही बांधकाम अधिकाऱ्यांनी दिल्याने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी होणारे आंदोलन तात्पुरते स्थगित केले.

      शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाबरोबर अधिकाऱ्यांची बैठक झाली.तहसीलदार समीर माने बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

     आजरा – बुरुडे – महागाव मार्गावर खड्डे पडले आहेत. यामुळे वहानधारकांचे हाल होत आहेत. त्याचबरोबर संताजी पुलाची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. याबाबत शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवला व आंदोलनाचा इशारा दिला होता. काल गुरुवारी याबाबत प्रशासनासोबत बैठक झाली. सार्वजनिक बांधकामचे अधिकारी श्री. सुर्वे, आयसी कंपनीचे पर्यवेक्षक धनंजय गवळी यांनी आठ दिवसात रस्त्यावरील खड्डे मुजवण्याची ग्वाही दिली. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्याचे ठरले.

        यावेळी उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, तालुका प्रमुख युवराज पोवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. बैठकीस निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, बुरुडे सरपंच श्रीमती गुरव, उपसरपंच सुनिल बागवे, मेंढोलीचे सरपंच विलास जोशीलकर, संजय येसादे, संकेत सावंत, ओमकार माद्याळकर, हरीभाऊ कांबळे, चंद्रकांत व्हरकटे, सुयश पाटील, महेश पाटील, मारुती देशमुख आदी उपस्थित होते.

सरोळी येथे स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध…

लावलेली मीटर्स काढून घेणे भाग पाडले…


       आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       सरोळी (ता. आजरा) येथे स्मार्ट मीटर बसवण्यास काल गुरुवारी ग्रामस्थांनी वीज वितरण व कंपनीच्या कर्मचाऱ्यांना विरोध केला. त्यामुळे वीज वितरण व कंपनीच्या कर्मचाऱ्यांना माघारी फिरावे लागले. काही बसवलेली मीटर्स काढून घेवून परत जुनी मिटर बसवावी लागली. काही काळ गोंधळाचे वातावरण तयार झाले होते.

       वीज वितरण व संबंधित कंपनीच्या वतीने येथे स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरु होते. यापूर्वी येथे काही मीटर बसवण्यात आली आहेत. प्राथमिक शाळा परिसरात आज स्मार्ट मीटर बसवण्याचे काम कर्मचारी करत होते त्याला ग्रामस्थांनी विरोध केला. ग्रामस्थ बबन बार्देस्कर यांनी संबंधीत घरमालकाची परवानगी घेतली होती का ? अशी विचारण केली व मीटर बसवण्यास विरोध केला. दरम्यान ग्रामस्थ जमा झाले. त्यांनी विरोध केल्याने पुन्हा जूनी मीटर बसवण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली. ग्रामस्थ विजय पाटील यांनी बदललेली मीटरच्या ठिकाणी पुन्हा जूनी मीटर बसवण्यात यावीत याबाबत वीज वितरणने लेखी पत्र दिल्याचे सांगीतले.

      याबाबत वीज वितरणचे सहाय्यक अभियंता अजित कांबळेंशी संपर्क केल्यावर ते म्हणाले, ग्रामस्थांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी विरोध केला. स्मार्ट मीटर बसवल्यावर ते काढून पुन्हा जूने मीटर बसवल्यावर आँनलाईनमुळे वीज बिलाची तांत्रिक अडचण येत असल्याचे सांगीतले. वरिष्ठांनी दुरध्वनीवरून ग्रामस्थांशी चर्चा केली.

पहिल्या पावसातच रस्त्याचा दर्जा स्पष्ट…

चिखल झाकण्यासाठी खडीचा वापर

      आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      मान्सूनपूर्व पावसामुळे आजरा पेरणी रस्त्यावर ठिकठिकाणी झालेल्या चिखलाबाबत वाहन चालकांकडून तीव्र संताप व्यक्त होत असताना संबंधित ठेकेदारांनी चिखलावर खडी टाकून कामाच्या दर्जावर पांघरून टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न चालवला आहे. परंतु येत्या काही दिवसात जोरदार पाऊस झाल्यानंतर ठेकेदाराचा हा फार्म्युला कितपत चालणार ?हा संशोधनाचा विषय आहे.

      मुळातच यामुळे रस्त्याचा दर्जा चर्चेत आला आहे. खडी टाकल्यामुळे दुचाकी स्वारांच्या अडचणीत वाढच झाली आहे. या मार्गावरील अनेकांनी आता दुचाकी ऐवजी एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करण्यास सुरुवात केली आहे.

      पावसाळाभर आता या मार्गावरील वाहन चालकांना कसरत करावी लागणार आहे.

अखिल भारतीय नामदेव क्षत्रीय महासंघाची  विभागीय कार्यकारिणी जाहीर…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

       गडहिंग्लज येथे तालुक्यातील सर्व शिंपी समाजाची बैठक विठ्ठल मंदिरात उत्साहात पार पडली. या बैठकीमध्ये अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ, नवी दिल्ली. शाखा महाराष्ट्र. तर्फे आजरा व चंदगड तालुका कार्यकारणी सदस्य जाहीर करण्यात आले. व नियुक्ती पत्र देण्यात आले.

      जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या नागपुर येथील संत नामदेव राष्ट्रिय एकात्मता विश्व महासंमेलनाच्या नियोजनासाठी ही बैठक झाली .त्यावेळी आखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासं‌घाचे राष्ट्रीय अध्यक्ष भास्कर टोम्पे अध्यक्षस्थानी होते. त्याचबरोबर राज्याध्यक्ष महेश मांढरे, जिल्हाध्यक्ष सुरेश पुकाळे, महिकाध्यक्षा सौ. सुचिता महाडिक राजन उरुणकर, अनंत जांगजोड, दिन‌कर पतंगे, मिनल कुडाळकर, शाहूदा जौजाळ, संतोष मुळे, राजन उरुणकर आदींची भाषणे झाली, पांडुरंग काकडे यांनी आभार मानले.

चंदगड,आजरा तालुक्याची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे...

सौ. सुप्रिया श्रीकांत रेळेकर-अध्यक्ष(आजरा)

श्री. अरुण नरहरी मुळे-कार्याध्यक्ष, श्री. मिलींद कृष्णा कोळेकर-उपाध्यक्ष, श्री. दिनेश राम चिकुर्डे-सचिव, श्री. सचिन सुभाष शिंपी-खजिनदार, श्री. नारायण कृष्णा खटावकरश्री. उदय निवृत्ती खटावकर, सौ. सुप्रिया दिनेश चिकुर्डे, सौ. कार्तिकी दिपक चिकुर्डे, सौ. सुनिता अरुण मुळे, सौ. विद्या धनंजय मुळे, श्रीमती सुषमा राजेश मुळे, श्री. गजानन केशव मिरजकर, श्री. संदिप मारुती औंदकर, श्री. अजय नारायण हावळ (सर्व सदस्य)

   पेरणोली येथे उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर…

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     पेरणोली ता. आजरा येथे उद्या शनिवार दिनांक ३१ मे रोजी रवळनाथ मंदिर येथे सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.

पावसाचा जोर ओसरला

       तब्बल आठ दिवस सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्याने शेती कामाला वेग झाला आहे. आठ दिवस शांत बसलेल्या बळीराजाला खरीपाची वेध लागले असून खरिपाच्या तयारीसाठी लागणारे विविध साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढू लागली आहे.

निधन वार्ता
अनिल ठिकार

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      धनगरमोळा ता. आजरा येथील अनिल अशोक ठिकार ( वय ३५ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई व विवाहित बहीण असा परिवार आहे.

फोटो क्लि

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा कारखान्याची धाव सव्वा तीन लाख मे. टनापर्यंतच

mrityunjay mahanews

आडवी बाटली उभी होणार…

mrityunjay mahanews

प्रतिभाताई कांबळे यांचे निधन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

मोटरसायकल अपघातात एक ठार… एक जखमी

mrityunjay mahanews
error: Content is protected !!