गुरुवार दि.२९ मे २०२५

अन्यथा रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करणार...

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा-बुरुडे-महागाव रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून याबाबत वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला तसेच काम करणाऱ्या कंपनीला भेटून संबंधित रस्त्याच्या व संताजी पुलाची दुरुस्तीची मागणी करुनसुद्धा आजपर्यंत दुरुस्ती झालेली नाही. यासाठी शिवसेना उबाठा तर्फे तहसीलदार, आजरा पोलीस स्टेशन आणि सर्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे. त्याचबरोबर खड्ड्यामध्ये वृक्षारोपणाचा इशाराही दिला आहे.
प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे आणि उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली संबंधित रस्त्यावर व संताजी पुलावर उद्या शुक्रवारी वृक्षारोपण आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर बुरुडे सरपंच वैशाली गुरव, संजय येसादे, ओंकार माद्याळकर, महेश पाटील,सुरेश पाटील, समीर चांद, विलास जोशीलकर, सुनील बागवे, प्रमिला पाटील, दिनेश कांबळे आदींच्या सह्या आहेत.

हरपवडे येथील रासूबाई मंदिर अखेर भाविकांसाठी खुले…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मौजे हरपवडे ता.आजरा या गावातील वादग्रस्त असणारे श्री.रासुबाई मंदिर ग्रामस्थांसाठी सौ. मनीषा गोविंद गुरव यांच्या हस्ते खुले करण्यात आले. तूर्तास हरपवडे येथील या मंदिराचा वाद संपुष्टात आला आहे.
सचिव , पश्चिम महाराष्ट्र समिती कोल्हापूर यांच्या दालनामध्ये सुनावण्या होऊन दि.१५ मे रोजी सौ. मनीषा गोविंद गुरव यांच्या अध्यक्षतेखाली १३ जणांची श्री. रासुबाई स्थानिक व्यवस्थापन सल्लागार उपसमितीची नियुक्ती करून श्री रासुबाई देवस्थानचा वाद संपुष्ठात आणला.
त्यानंतर मंदिराच्या किल्ल्या गाव कामगार पोलीस पाटील यांच्या ताब्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूर यांनी दिल्या होत्या. त्या संदर्भात सचिव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूर यांनी दि.२३ मे रोजी गाव कामगार पोलीस पाटील यांना लेखी आदेश देऊन पुढील व्यवस्थान पहाणीसाठी श्री. रासुबाई स्थानिक व्यवस्थापन सल्लागार उपसमितीच्या अध्यक्षा व समिती सदस्या यांच्याकडे मंदिराच्या चाव्या देणेत याव्यात. त्या प्रमाणे पोलीस पाटील यांनी समितीच्या अध्यक्षा सौ. मनीषा गोविंद गुरव यांच्याकडे चाव्या दिल्या. त्यानंतर समितीच्या अध्यक्षा व पो. पाटील यांच्या वतीने गाभारा उघडण्यात आला.
यावेळी समितीचे सदस्य, सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष उपस्थित होते. त्यानंतर देवीची पूजा सुरेश गुरव (पुजारी) व इतर गावकी करणारे गुरव यांचे वतीने देवीची विधीवत पूजा करून हरपवडे ग्रामस्थ व महिला यांच्या उपस्थितीत महा आरती करण्यात आली. या वेळी मा.सरपंच गोविंद गुरव, सरपंच सागर पाटील, डे. शिवाजी कांबळे, पो.पाटील निलोफर मुल्ला व आदिल मुल्ला यांचा सत्कार करणेत आला. व माजी सरपंच गोविंद गुरव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री. प्रकाश संपकाळ यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूर यांचे व ग्रामस्थांचे आभार मानले.

मलिग्रे येथील रवळनाथ दूध संस्थेच्या चेअरमनपदी मारूती कोकीतकर
व्हा. चेअरमनपदी ईश्वर चौगले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मलिग्रे ता.आजरा येथील रवळनाथ दूध संस्थेच्या चेअरमनपदी मारूती कोकीतकर यांची तर व्हा. चेअरमनपदी ईश्वर चौगले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संजय थैल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या विशेष सभेत या निवडी करण्यात आल्या.
चेअरमनपदासाठी कोकीतकर यांचे नाव संचालक शिवाजी कागिनकर यांनी सुचविले. त्यास संचालक शामराव कांबळे यांनी अनुमोदन दिले. व्हा.चेअरमनपदासाठी चौगले यांचे नाव संचालक तुळसाबाई बुगडे यांनी सुचविले. त्यास संतोष धुमाळे यांनी अनुमोदन दिले.
यावेळी संचालक सुमन सावंत, भिकाजी सुतार, संभाजी बुगडे, दत्ता यमेटकर, बाळू येसणे उपस्थित होते. सचिव एम. जी. बुगडे यांनी आभार मानले.

भादवण सरपंच सौ. माधुरी गाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भादवण गावच्या लोकनियुक्त सरपंच प्रा. सौ. माधुरी रणजित गाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांना फळ वाटप व गावामध्ये वृक्षारोपण करण्यात आले शालेय मुलांना वह्यांचे वाटपही करण्यात आले . याप्रसंगी आदर्श विद्यामंदिर शाळेची विद्यार्थीनी कुमारी श्रेया विजय गाडे हिची क्रिडा प्रबोधिनी कोल्हापूर येथे निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
शिवसेना ( उबाठा गट )आजरा तालुका अध्यक्ष युवराज पोवार, डॉ. शेख व त्यांचा सर्व स्टाफ ,आजरा साखर कारखाना संचालक श्री. राजेश जोशीलकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री. शिवाजी कुंभार, प्राचार्य रणजीत गाडे, श्री. विष्णू मुळीक, जयसिंग पाटील,श्री. स्वप्निल शिंदे,श्री. संदीप सुतार श्री.अंकुश खवरे, श्री. आकाश जोशिलकर, श्री.दत्ता गोईलकर,श्री. धनाजी गुरव , विजय गाडे, श्री.राजेश गाडे, यांच्यासह मान्यवर व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते .

सूर्यदर्शनानंतर
पुन्हा ढगाळ वातावरण…
तब्बल आठ दिवस सुरू असलेल्या पावसाच्या विश्रांतीनंतर आजरा तालुकावासीयांना बुधवारी सूर्यदर्शन झाले. पुन्हा सायंकाळ नंतर मात्र ढगाळ वातावरण तयार झाले आहे.
काल दिवसभर स्वच्छ वातावरण राहिले. पावसाने उघडीप दिल्याने आजरा शहर बाजारपेठेत गर्दी दिसत होती. सूर्य दर्शनानंतर सायंकाळी पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले.
निधन वार्ता
जनाबाई जाधव
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली ता.आजरा येथील जनाबाई ज्ञानोबा जाधव ( वय ९० वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली, सूना,नातवंडे असा परिवार आहे.
प्राथमिक शिक्षक वंदन जाधव यांच्या त्या आई होत. आज गुरूवारी सकाळी ९ वाजता रक्षा विसर्जन आहे.
नामदेव गुरव
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कासारकांडगाव ता.आजरा येथील नामदेव वासुदेव गुरव ( वय ४५ वर्षे ) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, भाऊ असा परिवार आहे.
फोटो क्लिक




