बुधवार २२ एप्रिल २०२६


आजरा दुर्घटना प्रकरणी दोघांना अटक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथे घराची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत महाविद्यालयीन शिक्षिकेसह शालेय विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी ठेकेदार अभिजीत हुक्केरी, उपठेकेदार विनोद मोहीते (दोघेही रा. आजरा) व जेसीबी चालक मिथून चव्हाण रा. विजापुर (कर्नाटक) यांच्यावर आजरा पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे.
उपठेकेदार विनोद मोहीते, जेसीबी चालक मिथून चव्हाण य दोघांना आजरा पोलीसांनी अटक केली आहे.
सोमवार (ता. २०) डॉ. देशपांडे यांच्या जून्या घराचे बांधकाम पाडतांना भिंत रस्त्यावर कोसळल्यामुळे दगड, मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून प्राध्यापिका ज्योती नितीन कुंभार (वय ४२) सध्या रा. आजरा, मुळगाव पेठेवाडी (ता. आजरा), वैष्ण तुकाराम भोसले (वय ११) रा. नाईक गल्ली, आजरा. या जागीच मृत्यू पावल्या. यामध्ये ललिता तुकाराम भोसले (वय ४५) जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. संबंधीतांनी घर पाडताना कोणतीही सुरक्षिततेची उपाययोजना केली नाही. निष्काळजीपणा, हयगयीने, परिस्थितीकडे दुर्लक्ष करून कोणाच्याही जीवाची पर्वा न करता भिंती पाडल्यामुळे तिघांच्यावर आजरा पोलीसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याचे पोलीसांनी सांगीतले. उपठेकेदार विनोद मोहीते व मिथून चव्हाण यांना आज न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.
दरम्यान वैष्णवी हिच्यावर मंगळवारी सकाळी शिवाजीनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाण्याचा योग्य वापर व नियोजन करणे काळाची गरज : जलअभ्यासक टी. एस. गडकरी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
या काही वर्षात पाटबंधारे प्रकल्पाची उभारणी झाली. मुबलक पाणीसाठे तयार झाले आहेत. पण त्याप्रमाणात पाण्याविषयी समाजात जनजागृती झालेली दिसत नाही. आजही पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. पाण्याचा योग्य वापर व नियोजन करणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन जलअभ्यासक टी. एस. गडकरी यांनी केले.
येथील तहसीलदार कार्यालयालयाच्या सभागृहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरावडा अंतर्गत जलसंपदा विभागाच्यावतीने जलव्यवस्थापनाबाबत शेतकरी संवाद मेळावा झाला. सर्फनाला बांधकाम प्रकल्पाच्या उपविभागीय अभियंता स्वाती उरुणकर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होत्या.
गडहिंग्लज पाटबंधारे उपविभागीय अभियंता अविनाश फडतरे, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेटे, कृषी तंज्ञत्रान व्यवस्थापन (आत्माचे) तंत्र अधिकारी अमित यमगेकर, संताजी घोरपडे कारखान्याचे केन डेव्हलमेंट विभागाचे प्रमोद तारळेकर प्रमुख उपस्थित होते. उपस्थितांनी जलप्रतिज्ञा घेतली.
श्री. फडतरे यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात जलव्यवस्थापनाबाबत माहीती दिली. श्री. गड़करी म्हणाले, पाण्याचे महत्व ऋग्वेदामधे सांगीतले आहे. पाणी हे उत्पादनाचे साधन आहे. त्याचबरोबर राष्ट्र उन्नतीचे साधन आहे. पाण्यामुळे केवळ शेतीच नव्हे औद्योगिक व पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण होते. शाश्वत पाणी वापर गरजेचा आहे. शेती विकासातून आर्थिक प्रगती साधता येते. गौतम बुध्दांच्या काळात शरयू नदीच्या पाण्यावरून तंटा झाला होता. त्यानंतर अनेकदा राज्य, देशादेशात नदीच्या पाण्यावरून वाद आहेत. पाण्यावरून तिसरे महायुध्द होईल असेही सांगीतले जाते. भविष्यात पाण्याची गरज लक्षात घेता जलव्यवस्थापन करणे गरजेचे आहे. वैयक्तिक व ग्रामस्तरावर यासाठी सकारात्मक पावले उचलावी लागतील.
प्रमोद तारळेकर यांनी ठिबक सिंचनचे महत्व विशद केले. दिनेश शेटे यांनी छोट्या छोट्या कृतीतून शेतकरी व नागरीकांनी पाणी बचतीचे प्रयोग राबल्याचे सांगीतले. श्रीमती उरुणकर व श्री. यमगेकर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बापू देशपांडे, दयानंद निऊंगरे, दत्तात्रय पाटील, जितेंद्र नांदवडेकर, विकास सुतार यांच्यासह शेतकरी व पाटबंधारे शाखेचे कर्मचारी उपस्थित होते. कालवा निरीक्षक दीपक राजवंशी यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

भालचंद्र कांगो यांच्या उपस्थितीत लोकशाहीर गव्हाणकर पुरस्काराचे वितरण….
वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांची उपस्थिती

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
लोकशाहीर द.ना. गव्हाणकर पुरस्काराचे वितरण २ मे रोजी डॉ. भालचंद्र कांगो यांच्या हस्ते होणार असून यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसनसो मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थिती राहणार आहे अशी माहिती पुरस्कार व स्मारक समितीच्या वतीने कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई यांनी दिली.
डॉ. भालचंद्र कांगो हे भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षाचे केंद्रीय नेते असून भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे ते राष्ट्रीय सचिव आहेत. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि हरियाणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. विद्यार्थी दशेपासूनच डॉ. कांगो हे डाव्या चळवळीत सक्रिय राहिले आहेत. वैद्यकीय पदवी प्राप्त झाल्यानंतर डाव्या चळवळीत पूर्णवेळ काम करण्याचा निर्णय त्यांनी केला. आयुष्यभर कष्टकरी, कामगार, शेतकरी यांच्या न्याय हक्कासाठी ते संघर्ष करीत आले आहेत. त्यांच्या हस्ते हा पुरस्कार संभाजी भगत यांना देण्याचा निर्णय पुरस्कार समितीने घेतला आहे.
यावेळी जेष्ठ सदस्य मुकुंददादा देसाई, सुधीरभाऊ देसाई, समितीचे सचिव सुनील पाटील, डॉ नवनाथ शिंदे, मीना मंगळूरकर, युवराज पोवार, कॉम्रेड संजय तरडेकर, पुष्पलता घोळसे, कृष्णा सावंत, काशिनाथ मोरे, रोहित शेंडे, रवींद्र भाटले, संजय घाडगे, रणजित कालेकर, विक्रम देसाई, अमित सामंत यांच्यासह कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी लोकशाही द ना गव्हाणकर स्मृती पुरस्कार समिती नोंदणी करण्याचा निर्णय करण्यात आला.

आजरा नगरपंचायत हद्दीतील जर्जर इमारतींवर तात्काळ कारवाईची मागणी ;
अन्याय निवारण समिती आक्रमक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरातील जर्जर व धोकादायक इमारतींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने नगरपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, नगरपंचायत हद्दीत अनेक ठिकाणी जीर्ण अवस्थेतील व धोकादायक इमारती उभ्या असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तेंव्हा अशा धोकादायक इमारतींचे तात्काळ सर्वेक्षण करून यादी तयार करावी आणि संबंधित मालकांना नोटीस बजावून आवश्यक ती दुरुस्ती किंवा पाडकाम करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच, नोटीसचे पालन न झाल्यास नगरपंचायतीने स्वतः कारवाई करून खर्च संबंधित मालकांकडून वसूल करावा, अशी सूचनाही करण्यात आली आहे. पाडकाम करताना सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे, तसेच अशा ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवून नागरिकांना पूर्वसूचना देण्यात यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, भविष्यात दिनांक २० एप्रिल रोजी दुर्घटना घडली अशा दुर्घटना टाळण्यासाठी विशेष मोहीम (Special Drive) राबविण्याची मागणीही समितीने केली आहे.
या निवेदनावर समितीचे अध्यक्ष व नगरसेवक श्री. परशुराम बामणे( भाऊजी)पांडुरंग सावरतकर सचिव. नगरसेवक विक्रम पटेकर,जोतीबा आजगेकर, बंडोपंत चव्हाण, जावेद पठाण, मिनीन डिसोझा, संजय जोशी, संतोष बांदिवडेकर, अभिजित संकपाळ सदस्य यांच्या स्वाक्षऱ्या असून नगरपंचायतीने तात्काळ योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

शेळप येथे शनिवारी वारकरी कीर्तन संमेलन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शेळप ता. आजरा येथे शनिवार दिनांक २५ एप्रिल रोजी सारथी चॅरिटेबल ट्रस्ट, गडहिंग्लज व आजरा तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने वारकरी कीर्तन संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सारथी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रा.सुनील शिंत्रे यांनी दिली.
ह.भ.प.श्री ज्ञानेश्वर बंडगर महाराज सांगोला/ पंढरपूर ह. भ. प. श्री. श्रीरंग गायकवाड प्रवचनकार व संपादक दैनिक तरुण भारत,कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या संमेलनाची सुरुवात ध्वज पूजनाने सकाळी दहा वाजता होणार आहे. त्यानंतर गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांच्या हस्ते व्यासपीठ पूजन व ११ ते १२.३० वाजेपर्यंत ह.भ.प. श्रीरंग गायकवाड यांचे व्याख्यान त्यानंतर हरिपाठ, वारकरी सन्मान सोहळा व दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत ह.भ.प.श्री. ज्ञानेश्वर बंडगर महाराज यांचे कीर्तन होणार असल्याचे प्राध्यापक शिंत्रे यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे निमंत्रक युवराज पोवार, संजय घाटगे उपस्थित होते.
‘मांडे मोटिवेटर्स तर्फे ‘ उत्तूर चषक २०२६’ स्पर्धेचे आयोजन

उतूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर व चव्हाणवाडी, मुंमेवाडीतील खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी ‘मानाचा उतूर चषक २०२६’ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी १५,००० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ११,००० रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ७,००० रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले असून आकर्षक चषकही देण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संघ व्यवस्थापकांनी ४,००० रुपये अनामत रक्कम जमा करून संघ नोंदणी करावी लागणार आहे. पहिल्या आठ संघांना प्राधान्य देण्यात येणार असून खेळाडूंची निवड लिलाव पद्धतीने करण्यात येणार आहे.
१८ एप्रिल पासून खेळाडू फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली असून संघ नोंदणीची अंतिम तारीख २१ एप्रिल २०२६ देण्यात आली आहे. स्पर्धेला १ मे २०२६ पासून सुरुवात होणार आहे.

आजचे पंचांग
दिनांक : २२ एप्रिल २२६
वार : बुधवार
माह (अमावस्यांत) : वैशाख
माह (पूर्णिमांत) : वैशाख
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : षष्ठी (रात्री १०.४९ पर्यंत) त्यानंतर सप्तमी तिथी
नक्षत्र : आर्द्रा नक्षत्र (रात्री १०.१२ पर्यंत) त्यानंतर पुनर्वसू नक्षत्र
योग : अतिगण्ड योग (सकाळी ०९.०७ पर्यंत) त्यानंतर सुकर्मा योग
करण : कौलव करण (दुपारी १२.०१ पर्यंत) त्यानंतर तैतुला करण
चंद्र राशी : मिथुन राशी
सूर्य राशी : मेष राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी २.३७ ते दुपारी ०२.१२ पर्यंत
सूर्योदय : सकाळी ०६.१८
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५७
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

आयपीएल न्यूज
काल मंगळवारी झालेल्या सामन्यात हैदराबादने दिल्लीवर मोठा विजय मिळवला.६८ चेंडूत १० चौकार व १० षटकारांसह नाबाद १३५ धावा काढणारा अभिषेक शर्मा सामनावीर ठरला.
आजचा सामना
लखनौ विरुद्ध राजस्थान
स्थळ : लखनौ
वेळ : सायंकाळी ७.३० वाजता


