सर्वसामान्यांचा आधारवड गेला…
डॉक्टर अशोक फर्नांडिस यांचे निधन

आजरा : प्रतिनिधी
आजरा येथील सुप्रसिद्ध डॉ.अशोक फर्नांडिस (वय ६२ वर्षे)यांचे अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे आज उपचारादरम्यान निधन झाले.
सर्वसामान्य रुग्णांचा आधारवड अशी ओळख असणाऱ्या डॉक्टर अशोक फर्नांडिस यांच्या आकस्मिक जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ.स्मिता, एक मुलगा, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.
हसतमुख, हरहुन्नरी व सामाजिक भान असणारे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.

आज माघार…
राष्ट्रवादीची शेवटच्या क्षणी धडपड

आजरा:प्रतिनिधी
आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निवडणूक प्रक्रियेतील आज माघारीचा शेवटचा दिवस असून आज दुपारपर्यंत एकंदरीत चित्र स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादीने मात्र पुन्हा एक वेळ हालचाली सुरू केल्या आहेत.
काल काँग्रेस, भाजपा, शिवसेना आघाडीने नेटक्या पॅनलची घोषणा करून निवडणुकीला समर्थपणे सामोरे जाण्याची तयारी ठेवली आहे. निवडणूक बिनविरोध होण्याच्या दृष्टीने ही रचना करण्यात आली असली तरीही अपवादाने निवडणूक लागली तर सर्व गटांमध्ये तगडे उमेदवार उभे करून निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने पॅनल रचना केली आहे. निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या असतानाच राष्ट्रवादीच्या निर्णया विरोधात कार्यकर्त्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचा राष्ट्रवादी नेत्यांनी निर्णय घेतल्याचा आरोप आता होत आहे. कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या रेट यामुळे राष्ट्रवादीने पुन्हा एकदा त्यांना रचनेच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत पण याला यश येईल असे वाटत नाही.
आज माघारीच्या दिवशी अपक्षांची भूमिका काय राहणार ? यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. निवडणुकीचे संपूर्ण भवितव्य आता अपक्षांच्या हाती आहे. भाजपा, काँग्रेस, शिवसेना आघाडीने पॅनल जाहीर केल्यानंतर अपक्षांची माघारीसाठी मनधरणी सुरू केली आहे.
हे सर्व सुरू असतानाच बुधवारी सायंकाळी राष्ट्रवादीच्या प्रमुख मंडळींनी मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु मंत्री मुश्रीफ यांची भेट झाली नाही. आज शुक्रवारी सकाळी पुन्हा एक वेळ मंत्री मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून पुढील दिशा ठरवणार असल्याचे राष्ट्रवादीच्या प्रमुख मंडळींनी सांगितले.
घाईत घेतलेला निर्णय अडचणीचा ठरला
कारखान्यात विजयाचे प्रबळ दावेदार असणाऱ्या राष्ट्रवादीच्या प्रमुख मंडळींमध्ये सुरुवातीपासूनच बेबनाव, कुरबुरी व विस्कळीतपणाचे वातावरण दिसत होते. इतर पक्षातील सहकाऱ्यांना फारशी कल्पना न देता राष्ट्रवादीच्या प्रमुख मंडळींनी जागा वाटपाचे घोडे अडल्यानंतर चक्क निवडणुकीतून बाहेर होण्याचा निर्णय घेतला. याचा फटका सोबत असणाऱ्या शिवसेना व इतर मंडळींना बसला. राष्ट्रवादीच्या नादाने फरफट होण्याची शक्यता लक्षात येताच त्यांनी थेट अशोकअण्णा चराटी-जयवंतराव शिंपी यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेतला. वेळ निघून गेली. आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीची धडपड सुरू झाली आहे.


करवाढ रोखण्यासाठी आजरेकर एकवटले… सोमवारी मोर्चा

आजरा:प्रतिनिधी
आजरा नगरपंचायतीकडून वाढीव दराने कर आकारणीच्या नोटिसा शहरवासीयांना मिळू लागल्यानंतर शहरवासीय आक्रमक झाले आहेत. करवा रोखण्यासाठी संपूर्ण नागरेकर एकवटले असून सोमवार दिनांक ४ डिसेंबर रोजी नगरपंचायतीवर प्रचंड मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
आजरा नगरपंचायतीचा एकंदर कारभार हा शहरवासीयांना त्रासाचा ठरू लागला आहे. अनियमित पाणीपुरवठा, बांधकाम परवान्यात होणारी दिरंगाई, निकृष्ट दर्जाची विकासकामे, शहरवासीयांच्या तक्रारींना दाद न देणारे प्रशासन, वेळ मारून नेण्याचे काम करणारी कर्मचारी मंडळी यामुळे शहरवासीय नाराज असतानाच नवीन करवाढीमुळे शहरवासीयांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे त.
या सर्व प्रकाराचा उद्रेक करवाढीच्या नोटिसा लागू केल्यानंतर प्रकर्षाने जाणवू लागला आहे. कोणत्याही परिस्थितीत करवाढ रद्द झालीच पाहिजे यासाठी शहरवासीय संघटित झाल्या असून एकत्रित लढा उभा केला जात आहे. इतर नगरपंचायतींची कर आकारणी, कर कमी करण्यातील कायदेशीर मार्ग या सर्वाचा अभ्यासही केला जात आहे.
सोमवार दिनांक ४ रोजी नेटका मोर्चा काढण्याची नियोजन संघटित रित्या सुरू आहे. याबाबत गेले आठ दिवस जनजागृती करण्यात येत आहे त्यामुळे सोमवारच्या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
विद्यमान नगरसेवकही मोर्चात सहभागी होणार
सुरुवातीला करवाढीस विद्यमान नगरसेवकांना जबाबदार धरले जात होते. परंतु नगरसेवकांनी प्रशासनातील प्रमुख अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकार बैठकीत यातील बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. केवळ एवढ्यावरच न थांबता या करवाढीस आपला ठाम विरोध होता व आजही आहे असेही स्पष्ट केल्यानंतर नगरसेवकांवरील शहरवासीयांचा रोष कमी झाला आहे. या आंदोलनात नगरसेवकही सहभागी होणार आहेत.


श्री बीरेश्वर संस्थेतर्फे मयत सभासदांच्या वारसाला तीस हजार रुपयांची मदत

गडहिंग्लज:प्रतिनिधी
एकसंबा येथील श्री बीरेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी (मल्टीस्टेट)यांचे मार्फत अमूल्या कर्ज योजनेअंतर्गत १८ ते ५५ वर्षे वयोगटातील महिला सभासदांना कर्ज पुरवठा केला जातो. यावेळी संबंधित महिलेचा पती व महिला यांचा संयुक्त विमा काढला जातो. ५० आठवडे मुदतीने दिल्या जाणाऱ्या अमूल्र्या कर्जाच्या परतफेड कालावधीत सभासदाचा पती अथवा सभासदाचा मृत्यू झाल्यास वारसाला रुपये तीस हजार दिले जातात.
गडहिंग्लज शाखेतील महिला सभासद महादेवी राजेंद्र मोळदी यांचे पती राजेंद्र मोळदी यांचे आकस्मिक निधन झाल्याने श्रीमती महादेवी यांना ३० हजार रुपयांची मदत संस्थेचे संस्थापक खास. अण्णासाहेब जोल्ले व सह-संस्थापिका आम. शशिकला जोल्लेवहिनी यांच्या माध्यमातून संस्थेमार्फत देण्यात आली. सदर रकमेचे वितरण शाखा संचालक संतोषअण्णा चिक्कोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्था शाखा अध्यक्ष भास्कर पाटील, संचालक विठ्ठल भमनगोळ, दीपक साखरे, शाखाधिकारी मनोहर पाटील, विजय कुंभार, कावेरी देसाई, संस्कृती सावंत व अमित बाळनाईक यांच्यासह सभासद व लाभार्थी उपस्थित होते.



