

जनता बँक उत्तूर विभागासाठी विकासगंगा बनेल
के. पी. पाटील यांचे प्रतिपादन : जनता बँक आजरा च्या उत्तूर शाखेचे उद्घाटन

उत्तूर : प्रतिनिधी
बहुजनांच्या विकासाचे ध्येय ठेवून कार्यरत असलेली जनता सहकारी बँक आजरा ही उत्तूर विभागासाठी विकासाची गंगा ठरेल, असे प्रतिपादन माजी आमदार व दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्रीचे चेअरमन के. पी. पाटील यांनी केले. जनता सहकारी बँक आजराच्या उत्तूर शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती वसंतराव धुरे होते.
स्वागत संचालक महादेव पोवार यांनी केले. बँकेच्या विस्ताराची व योजनांची माहिती संचालक विजयराव देसाई यांनी दिली. प्रास्ताविकात बँकेचे चेअरमन मुकुंदराव देसाई म्हणाले, तालुक्यातील दुसऱ्या आणि एकूण १७ व्या शाखेचे उद्घाटन आज उत्तूर येथे झाले आहे. या विभागाची गेल्या अनेक वर्षांची मागणी यानिमित्ताने पूर्ण झाली आहे. बँकेकडे २९० कोटींपेक्षा अधिक ठेवी असून येत्या महिन्याभरात ३०० कोटींच्या ठेवींचा टप्पा बँक ओलांडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी आमदार पाटील म्हणाले, आंबेओहोळमुळे उत्तूर विभागात आता सुबत्तता येईल. जनता बँकेची शाखा सुरू झाल्यामुळे या विभागातील शेती, उद्योग व व्यवसायाला बळ मिळेल. भागातील ग्रामस्थांनी बँकेच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार बँकेच्यावतीने करण्यात आला.
यानंतर जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांनी बँकेच्या शाखा उद्घाटनाला शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात धुरे म्हणाले, बँकेचे चेअरमन देसाई यांनी जिल्हा बँकेत उत्कृष्ट काम केले असून त्यांच्या अनुभवाचा लाभ जनता बँकेला झाला आहे. उत्तूर विभाग जनता बँकेच्या पाठिशी ठामपणे उभा राहील, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी उत्तूरच्या सरपंच सौ. वैशाली आपटे, गोकुळचे माजी चेअरमन रवींद्र आपटे, माजी सभापती विष्णूपंत केसरकर, अल्बर्ट डिसोझा, उदयराज पवार, काशिनाथ तेली, शिरिष देसाई, दीपकराव देसाई, विश्वनाथ करंबळी, तालुका संघाचे चेअरमन एम के. देसाई, विजय वांगणेकर, यांच्यास जनता बैंक, तालुका संघाचे संचालक, व परिसरातील विविध गावचे सरपंच, विवि संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. एकनाथ गिलबिले यांनी सूत्रसंचलन केले तर संचालक जोतिबा चाळके यांनी आभार मानले.
सहकारात डोळसपणे काम करण्याची गरज
सध्या सहकारी संस्थांच्याबाबतीत काळजी वाटण्यासारखे वातावरण आहे. राजकारणातुन कारण नसताना प्रशासक नेमण्याचे प्रकार सुरू झाले असून यापुढे सहकारात डोळसपणे काम करण्याची गरज असल्याचे मत के. पी. पाटील यांनी व्यक्त केले.

विनापरवाना बांधकामांची माहिती तातडीने सभागृहास सादर करा ….आजरा नगरपंचायतीच्या मासिक सभेत नगरसेवकांनी बांधकाम विभागाला विभागाला धरले धारेवर

आजरा :मुख्य प्रतिनिधी
आजरा शहरांमध्ये परवान्यापेक्षा विनापरवाना बांधकामांनी जोर धरला असून यावर नगरपंचायतीच्या बांधकाम विभागाचे कोणतेही नियंत्रण नाही. शहरामध्ये नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर विनापरवाना बांधकामे झाली किती ? किती बांधकामांचे परवाने घेतले व परवाने न घेता बांधकाम झालेल्यांवर कोणती कारवाई केली? बांधकाम विभाग केवळ नावालाच आहे काय ? असे प्रश्न उपस्थित करत नगरसेविका यास्मिन बूड्डेखान व नगरसेवक विलास नाईक ,उपनगराध्यक्षा सौ.संजीवनी सावंत यांच्यासाह सर्वच नगरसेवकांनी बांधकाम विभागाला धारेवर धरले. अखेर तातडीने गेल्या चार वर्षात झालेल्या विनापरवाना बांधकामाची माहिती सभागृहासमोर सादर करण्याच्या सुचना बांधकाम विभागाला करण्यात आल्या. आजरा नगरपंचायतीची मासिक सभा नगराध्यक्षा श्रीमती ज्योत्स्ना चराटी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेमध्ये बांधकाम विभागासह पाणी पुरवठा विभाग व अन्य विभागावर जोरदार चर्चा करण्यात आली.
ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर शहरातील विविध भागात विविध प्रभागांमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. हे खड्डे मुजवणार तरी कधी? असा सवाल नगर सेविका सौ. शुभदा जोशी व नगरसेवक संभाजी पाटील यांनी उपस्थित केला. रस्त्यांची डागडुजी वेळीच होत नसल्यामुळे स्थानिक नागरिक आपणाला धारेवर धरताना दिसतात. नागरिकांना उत्तरे देऊन कंटाळा आला आहे. आता सर्व अधिकाऱ्यांना या रस्त्यावरून चालत न्यावे म्हणजे त्यांना या गोष्टीचे गांभीर्य येईल असे नगरसेविका शुभदा जोशी यांनी सुचवले. फंडाअभावी बांधकाम विभागाची अनेक कामे प्रलंबित आहेत. शासनाचे फंड आणायची कोणाची? हि जबाबदारी अधिकारी वर्गाची आहे की नाही? असा सवाल नगरसेवक अशोकआण्णा चराटी व विलास नाईक यांनी केला.नगरपंचायत निधीतून एका विशिष्ट रकमेपलीकडील कामे करता येत नाहीत त्यासाठी शासन निधीचीच गरज आहे असे मुख्याधिकारी अजिंक्य पाटील यांनी यावेळी सांगून शासन निधीसाठी एकत्रित प्रयत्न करूया असेही सुचवले.
काही अधिकाऱ्यांना एकाच वेळी दोन-तीन नगरपंचायतीचा कार्यभार आहे परंतु आजरा नगरपंचायतीला असे अधिकारी वेळ देताना दिसत नाहीत. फोन करूनही असे अधिकारी नगरपंचायतीत येण्यास टाळाटाळ करून कामाकडे दुर्लक्ष करताना दिसतात असे प्रकार यापुढे घडता कामा नयेत अशा शब्दात नगराध्यक्षा चराटी यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. शहरांमध्ये मोबाइल टॉवरची कोणत्याही प्रकारची परवानगी नसतानाही बिनदिक्कतपणे असे टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. याला जबाबदार कोण? याकडे नगरपंचायत प्रशासनाचे लक्ष नाही का ?असा सवाल नगरसेविका सौ. जोशी यांनी उपस्थित केला. शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेवरही सभेमध्ये जोरदार चर्चा झाली. यापूर्वी योजनेला मंजुरी मिळाली असे सांगण्यात आले होते परंतु प्रत्यक्षात या योजनेला मंजुरी मिळाली नाही असे नगरसेविका सौ. शुभदा जोशी यांनी सांगितले तर पाणीपुरवठा समितीचे सभापती अशोकआण्णा चराटी यांनी नवीन पाणीपुरवठा योजना प्रति व्यक्ती १३५ लिटरअसे गृहीत धरून करण्यात येणार आहे. त्यामुळे ही सुधारित पाणीपुरवठा योजना २८ ते ३० कोटींची असून ही नव्याने मंजुरीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सभागृहासमोर स्पष्ट केले.
येथील महाराष्ट्र बँक इमारती इमारतीच्या मागील बाजूस असणाऱ्या गल्लीमध्ये केवळ ही जागा खाजगी असल्यामुळे येथील गटर्स न केल्याने या परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे . पेविंग ब्लॉक टाकता येत असतील तर गटर्स का होत नाहीत? असा प्रश्न यासिराबी लमतुरे यांनी केला.
साळगाव रस्त्यावर नगरपंचायत मालकीच्या खुल्या भूखंडापैकी काही जागा येथील शिवाजीराव सावंत वाचनालयास देण्याबरोबरच शिवाजीनगर येथील शासकीय गोदामासमोरून प. पू. मोरजकर महाराजांच्या समाधी स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूसह ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्या जन्मस्थळा पर्यंतच्या मृत्युंजय कॉलनी असे नाव देण्याचा ठराव संमत करण्यात आला. हा ठराव नगरसेवक संभाजी पाटील यांनी मांडला.
नगरसेवक किरण कांबळे यांनी सन २१-२२ मधील कामे होऊनही या कामांकरता अद्याप फंड उपलब्ध होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
सभेमध्ये झालेल्या चर्चेत नगरसेवक सिकंदर दरवाजकर ,नगरसेविका सुमैय्या खेडेकर, कक्ष अधिकारी संजय यादव, आदींनी भाग घेतला.
सभेस नगरसेवक अनिरुद्ध केसरकर, सिकंदर दरवाजकर,सौ. रेश्मा शेख सौ. सीमा पोवार, सौ. शकुंतला सलामवाडे यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होता.

डाॅ.नरेंद्र दाभोळकर यांच्या खुन्याचा शोध घेण्याची मागणी
आजरा :प्रतिनिधी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा आजरा गिरणी कामगार संघटना श्रमिक मुक्तीदल यांचे वतीने मा. पंतप्रधान व राष्ट्रपती यांच्या नावे डाॅ.नरेंद्र दाभोळकर याच्या खुन्याचा शोध घेण्याची मागणीचे निवेदन मा.तहसीलदार आजरा व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले .
डाॅ. नरेंद्र दाभोळकर या प्रखर बुद्धीनिष्ट चळवळ उभी करणाऱ्या आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती सारखी चळवळ उभी करणारा ध्येयवादी कार्यकर्ताची नऊ वर्षांपूर्वी पुणे येथे हत्या झाली त्या पाठोपाठ काॅ. गोविंद पानसरे, डाॅ एम एम कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश याच्या हत्या झाल्या. या हत्या केवळ वैयक्तिक आणि परस्पर हेवे दाव्यातून झालेल्या नाहीत, तर एक चुकीची सामाजिक व्यवस्था स्पष्ट करू पाहणार्या कार्यकर्तेना पायबंद घालण्याच्या हेतूने हत्या झाल्या आहेत. हे आता जगापुढे अनेक माध्यमातून स्पष्ट झाले आहे. या महामानवाची हत्या राजकीय सामाजिक भुमिका समोर ठेवूनच या भुमिकेचे जे समर्थक आहेत .त्याना प्रस्थापित समाजातील व राजकीय व्यवस्थेचे समर्थन आहे. अशाच्या कडून हत्या झाल्या हे निर्विवाद सत्य आहे. परंतू समतेवर न्यायावर श्रध्दा ठेवणारे कार्यकर्ते गप्प बसलेले नाहीत.
डाॅ दाभोळकरानी स्थापन केलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती इतर पुरोगामी संघटना मार्फत कार्यकर्ते न्यायासाठी आज ही लढत आहेत. जो पर्यंत त्या हत्या करणारे चा शोध लागत नाही, तो पर्यंत ते अखंडपणे लढत राहतील. म्हणून महाराष्ट्र शासन व भारत सरकार कडे आम्ही योग्य त्या न्यायाची अपेक्षा करीत आहोत.संविधानावर आमचा विश्वास आहे.त्यासाठी महात्मा गांधीच्या अहिंसक सत्याग्रह मार्गाने आम्ही लढत राहू, आशा अपेक्षेचे निवेदन दिले आहे. यावेळी राजा शिरगुपे जेष्ठ विचारवंत काॅ. काशिनाथ मोरे, काॅ. संजय घाटगे, काॅ. संपत देसाई; काॅ. आप्पा कुलकर्णी काॅ. शांताराम पाटील, डाॅ धनाजी राणे, दिनकर शिपुरकर , शांताराम हारेर , कृष्णा सावंत, प्रकाश जाधव; पांडूरंग पाटील, आप्पा पाटील, हिंदूराव कांबळे, मनपा बोलके, नारायण भंडागे याच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते

दुध उत्पादनात वाढ करण्यासाठी आधुनिकतेची जोड द्यावी:अंजनाताई रेडेकर
आजरा :प्रतिनिधी
दूध उत्पादनात वाढ करण्यासाठी या व्यवसायाला आधुनिकतेची जोड देवून अधिकाधिक दुधाचे उत्पादन घ्यावे व उत्पादीत झालेले सर्व दुध गोकुळ दूध संघाला पाठवावे असे आवाहन गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांनी केले. त्या वाटंगी ता, आजरा येथिल महात्मा फुले दूध संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या.
यावेळी गोकुळच्या संचालीका श्रीमती रेडेकर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या संस्थेला सर्वाधीक दूध पुरवठा करणा-या सभासदांना यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले. सध्याच्या काळामध्ये दूध व्यवसाय हाच हमखास व शाखत आर्थिक विकास देणार व्यवसाय आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये अनेक उद्योगधंदे बंद पडले. फक्त दूध उत्पादन हो व्यवसाय सुरू राहीला. या व्यवसायाच्या माध्यमातून दहा दिवसाला दूध बिलाची रक्कम शेतक-याला मिळते. त्यामुळेच ग्रामीण भागातील अर्थकारणाला गती मिळाली आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून शेतक-यांची आर्थिक उन्नती झाली आहे म्हणून शेतक-याने या व्यवसायाकडे शेतीला पुरक व्यवसाय म्हणून न पाहता मुख्य व्यवसाय म्हणून पहावे. यावेळी श्रीमती रेडेकर यांनी गोकुळ दूध संघाच्या मार्फत देण्यात येणा-या विविध सोयीसुविधांची माहिती दिली. परराज्यातून संकरीत जातीच्या म्हैशी खरेदी केल्यास रु. २५०००/- अनुदान मिळते. वासरू संगोपणासाठीही संघाच्या वतीने अनुदान मिळते, या सर्व अनुदानांचा लाभ शेतक-यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी वैरण विकास चे कुंभार व गीता उत्तुरकर यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला गीलबीले सर, बाळु चौगुले, बाबुराव नार्वेकर, मसणू कांबळे, महादेव कसलकर, मधुकर जाधव, संतोष बिर्जे, संजय गुरव, इंदुबाई कुंभार, शालन चौगुले यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी व सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.

आज-यातील दहीहंडीवर ‘संघर्ष’ ने कोरले नाव
गोविंदानी धरला ठेका…नेत्रदीपक विद्युत रोषणाई

आजरा : प्रतिनिधी
आजरा येथे स्वराज्य तालीम मंडळ यांच्या वतीने
बांधण्यात आलेली दहीहंडी फोडण्याचा मान गडहिंग्लज येथील संघर्ष गोविंदा पथकाने पटकावला.नेत्रदीपक विद्युत रोषणाई व संगीताच्या ठेक्यावर पार पडलेल्या याकार्यक्रम प्रसंगी आजरातालुक्यातील बाळगोपाळांसाठी वयोवृद्ध मंडळी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
या वेळी ५५हजार ५५५ रूपयांचे रोख बक्षिस देऊन या मंडळास गौरविण्यात आले.
या वेळी राधानगरी, भुदरगड व आजरा चे युवा नेते राहुल देसाई यांच्या उपस्थीत हा सोहळा पार पडला.
या वेळी भाजपचे नेते शिवाजी पाटील,सहा.पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे, अरुण देसाई, जनार्दन टोपले,गारगोटी ग्रा.पं. सदस्य प्रकाश वास्कर,मंडळाचे प्रमुख नगरसेवक अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.




