
वादळी पावसाने आज-याला झोडपले…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरासह तालुक्यातील जोरदार वादळी पावसाने काल मंगळवारी दुपारनंतर हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे महिनाभर उकाड्याने त्रस्त झालेल्या शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. जोरदार वारे बीज यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळणे, विद्युत पुरवठा खंडीत होणे यासारखे प्रकार घडले.
काल दुपारी तीन वाजता पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे संभाजी चौक ते बस स्थानक परिसराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने बराच काळ वीज पुरवठा खंडित झाला होता.

रस्ता कामासाठी ठिकठिकाणी केलेल्या खुदाईमुळे रस्त्यावर चिखल झाल्याने दुचाकी सरांना बरीच कसरत करावी लागली. चार ते पाच ठिकाणी दुचाकी घसरून अपघात झाले आहेत.
पावसाअभावी अडचणीत झालेल्या उसासह इतर पिकांना मात्र पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून शक्तिपीठ मार्गास विरोध करणार :संभाजीराजे छत्रपती

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आधीच आजरा तालुक्यातील धरणांमुळे विस्थापित झालेल्या लोकांच्या पुनर्वसित जमिनी पुन्हा शक्तीपीठ महमार्गासाठी काढून घेतल्या जाणार आहेत. शक्तीपीठ तर कोल्हापुरात आहे. तेथे जायला कोणत्याही भविकाने या शक्तीपीठ महामार्गची मागणी केलेली नाही. शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचे पाप सत्ताधाऱ्यांनी करू नये. शेतक-यांना उध्वस्त करणाऱ्या या महामार्गविरोधी लढ्यात शेतक-यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहणार असा विश्वास संभाजी राजे छत्रपती यांनी दिला.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर आयोजित खेडगे येथील प्रचार सभेत ते बोलत होते.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, तालुक्यामध्ये ठीक-ठिकाणी झालेल्या पाणी प्रकल्पांमध्ये शेतकऱ्यांनी मोठे योगदान दिले आहे. प्रसंगी स्वतःची घरदारे सोडून विस्थापित झालेली ही मंडळी आता कुठे स्थिरस्थावर होत असताना शक्तिपीठ महामार्गाचा घाट सरकारकडून घातला जात आहे. एकदा विस्थापित झालेल्या या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गासाठी संपादित होण्याची शक्यता आहे. गरज नसलेल्या या मार्गाकरिता विस्थापितांच्या दृष्टीने जमीन संपादन हे अन्यायकारक आहे. शेतकरी आता जागरूक झाला आहे. या महामार्गाला ठिकठिकाणी विरोध होत आहे. शेतकऱ्यांच्या या लढ्यात आपण अग्रभागी असू.विकासाच्या नावावर गरज नसताना कोट्यावधी रुपये उधळण्याचा हा सरकारचा डाव संघटितरित्या हाणून पाडूया असेही त्यांनी आवाहन केले.
यावेळी कॉ. संपत देसाई म्हणाले, या देशातील लोकहिताचे नवनवे कायदे कष्टकरी जनतेने लढून करायला भाग पाडले आहेत. पण भाजपा आणि मित्र पक्षांचे हे सरकार चळवळी दडपून टाकत आहेत. म्हणूनच आम्ही दडपशाही करणाऱ्या या सरकारच्या विरोधात इंडिया आघाडीच्या बाजूने उतरलो आहोत. जरी इंडिया आघाडीची सत्ता आली तरी आम्हाला लढावे लागणारच आहे, पण इंडिया आघाडीचे सरकार चळवळींची दखल घेणारे असेल याचा आम्हाला विश्वास आहे. सर्वसामान्यांच्या विरोधात धोरणे लादणाऱ्या मोदी सरकारला सत्तेवरून हटवायचे असेल तर शाहू छत्रपती यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी मुकुंदराव देसाई, उदय पवार, संतोष मासोळे, रणजित देसाई, शांताराम पाटील, राजू होलम, रणजित देसाई, शिवराज देसाई, संकेत सावंत, संतोष पाटील, गंगाराम ढोकरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

आजरा अर्बन बँकेच्या ३३ व्या बेळगुंदी शाखेचा शुभारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मल्टी स्टेट दर्जा प्राप्त केलेली देशातील २१ वी नॉन शेड्यूल्ड नागरी सहकारी बँक व शेड्यूल्ड दर्जाकडे वाटचाल असलेल्या दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट) या बँकेची ३३ व्या बेळगुंदी, ता.जि. बेळगावी शाखेचा उद्घाटन समारंभ दि. २३ एप्रिल २०२४ रोजी सर्व अद्ययावत सेवासह पार पडला.
याप्रसंगी अण्णा भाऊ संस्था समूह प्रमूख व बँकेचे संचालक श्री. अशोकअण्णा चराटी यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देणेसाठी बेळगुंदी येथे शाखा सुरू केलेचे आपल्या मनोगतामध्ये संगितले. बेळगुंदी व परिसरातील ग्राहकांना बँकेमार्फत अद्यावत व तत्पर सेवा देणेची ग्वाही चेअरमन श्री. रमेश कुरुणकर यांनी दिली. चेअरमन श्री. रमेश कुरुणकर व सौ. मंगल कुरुणकर यांचे हस्ते नवीन जागेत सत्यनारायण पुजा करणेत आली.
बेळगुंदी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. सुभाष हदगल यांनी शाखा सुरू केलेबद्दल शुभेच्छा दिल्या असून बँकेकडून जलद सोयी सुविधा देणे विषयी बँकेचे संचालक मंडळाला आवाहन केले.
यावेळी बँकेचे व्हा.चेअरमन श्री. सुनील मगदुम, संचालक श्री. सुरेश डांग, श्री. विलास नाईक, डॉ. दीपक सातोसकर, डॉ. अनिल देशपांडे, श्री. किशोर भुसारी, श्री. बसवराज महाळंक, श्री. मारुती मोरे, श्री. आनंदा फडके, सौ. प्रणिता केसरकर, श्रीमती शैला टोपले, सौ. अस्मिता सबनिस, श्री. सुर्यकांत भोईटे, श्री. किरण पाटील, श्री. संजय चव्हाण, ॲड. सचिन इंजल, श्री. मनोहर कावेरी, श्री. जयवंत खराडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रशांत गंभीर तसेच बेळगुंदी व परिसरातील प्रतिष्ठित मंडळी श्री. नानासाहेब पाटील, श्री. शामराव बेनके, श्री. प्रसाद बोकडे, श्री. सूरज बेटगेरीकर, श्री. विक्रम बाचीकर, श्री. अमितकुमार पाटील, श्री. मोहन परब आदि मान्यवर उपस्थित होते.

निधन वार्ता
अंतू पोटे

आरदाळ ता.आजरा येथील अंतू कुंडलिक पोटे (वय वर्ष ८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, पत्नी, नातवंडे असा परिवार आहे.


