रविवार दि.८ फेब्रुवारी २०२६

मतदानाचा टक्का घसरला…
आजरा तालुक्यात चुरशीने ६४ टक्के मतदान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत चुरशीने ६३.९० टक्के मतदान झाले. परंतु गत वेळेपेक्षा सुमारे ६ टक्के इतके मतदान कमी झाले आहे. जिल्हा परिषदेच्या ८ तर पंचायत समितीच्या १८ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून सोमवारी मतमोजणी प्रक्रिया आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या एकूण ९६६११ मतदानापैकी ६१,७३१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यापैकी ३१९९७ महीला मतदारांनी तर २९७३४ पुरुष मतदारांनी मतदान केले. सर्वात जास्त मतदान मोरेवाडी येथे ७७.१५ टक्के इतके झाले तर सर्वात कमी मतदान वडकशिवाले मतदान केंद्रावर ४८.२२ टक्के इतके झाले. काही ठिकाणी वादाचे प्रसंग वगळता मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडली.
जिल्हा परिषदेच्या ८ तर पंचायत समितीच्या १८ जागांसाठी आज मतदान झाले. महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना शिंदे या घटक पक्षात थेट लढत झाली. तिनही पक्षाचे तुल्यबळ उमेदवार रिंगणात उत्तरल्याने रंगत वाढली होती. सर्वांनी पदयात्रा, प्रचार सभा, कोपरा सभा, वैयक्तीक गाठी भेटीवर जोर देत प्रचारात धुरळा उडवला. नेतेमंडळीपेक्षा उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले. आज सकाळ पासून मतदानाला सुरवात झाली. सकाळच्या पहिल्या टप्प्यात संथ गतीने मतदान झाले. दुपारनंतर मतदान केंद्रावर रांगा दिसू लागल्या. मतदानाचा टक्का वाढला. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत पन्नास टक्केच्यावर मतदान गेले. त्यानंतर पूढील दोन तासात मतदानाची प्रक्रिया संथ राहीली. काही ठिकाणी कार्यकर्त्यांच्यामध्ये मतदान केंद्रावर ये जा करण्यावरून शाब्दिक बाचाबाची झाली. यावरून एकमेकावर धावून जाण्याचे प्रकार घडले. पोलीसांनी तात्काळ हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना बाजूला हटवले.
दृष्टीक्षेपात गट व पंचायत समिती निहाय टक्केवारी
उत्तूर जिल्हा परिषद गट- ६३.३५
उत्तूर पंचायत समिती -६३.५२
भादवण पंचायत समिती – ६२.९४
पेरणोली जिल्हा परिषद गट- ६४. ६२
पेरणोली पंचायत समिती गण ६४.२३
वाटंगी पंचायत समिती गण ६५.०४

वाटंगीत मारहाण
मतदारांना ने -आण करण्यावरून वाटंगी येथे भाजपा व राष्ट्रवादी समर्थक कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची होऊन यामध्ये एकाला मारहाण देखील झाली पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर सदर प्रकरण शांत झाले.
मुंबई,पुणेस्थित चाकरमानीही मतदानासाठी हजर
मुंबई व पुण्यासह बाहेरगावचे मतदार आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खाजगी बसेसचा व वाहनांचा वापर केल्याचे दिसत होते.
आजरा बाजारपेठ थंडावली…
आजरा नगरपंचायत हद्द वगळता इतरत्र सर्वत्र मतदानाचे धुमशान सुरू असल्याने आजरा शहरात मात्र निवडणुकीची फक्त चर्चाच दिसत होती. ग्रामीण मतदार हा निवडणुकीत गुंतल्याने शहरातील बाजारपेठ थंडावली होती.
निधन वार्ता
श्रीमती शांता पोवार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
रवळनाथ कॉलनी, आजरा येथील श्रीमती शांता शंकर पोवार ( वय ८८ वर्षे ) यांचे आज रविवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा, दोन मुली, सूना,नातवंडे असा परिवार आहे. शिवाजीनगर तरुण मंडळाचे कार्यकर्ते व आयटीआयचे सेवानिवृत्त शिक्षक विजय पोवार यांच्या त्या आई होत. अंत्यविधी आज रविवारी सकाळी दहा वाजता वडाचा गोंड स्मशानभूमी येथे करण्यात येणार आहेत.

ठिकठिकाणी लिंबू – नारळ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
निवडणूक प्रक्रिया आधुनिक पद्धतीने पार पडत असली तरीही अनेक ठिकाणी अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे प्रकार अनेक ठिकाणी आढळून आले. ठीक ठिकाणी नारळ, लिंबू टाकणे गावांच्या वेशीवर गुलाल हळद-कुंकू यांच्या रेघोट्या मारणे यासारखे प्रकार अवलंबण्यात आले होते.
निवडणूक कालावधीत बुवा व बाबांना चांगलेच महत्त्व आल्याचे यामुळे आधोरेखित झाले आहे. आज दिवसभर या प्रकारांची चर्चा सुरू होती. विशेषता कोळींद्रे जिल्हा परिषद मतदार संघात हे प्रकार मोठ्या प्रमाणावर आढळले.

उत्तूर भागात चुरशीने मतदान निकालाची उत्सुकता

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्तूर भागात मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली. सर्व मतदान केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
उत्तूर केंद्रावर एकूण ७,४०५ मतदारांपैकी ४,९५८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. याठिकाणी ६६.९५ टक्के मतदानाची नोंद झाली. बहिरेवाडी येथे ३,१५९ मतदारांपैकी २,१६३ मतदारांनी मतदान केले असून तेथे ६८.४७ टक्के मतदान झाले.
चव्हाणवाडी येथे ९०८ मतदारांपैकी ५६२ मतदारांनी मतदान करून ६१.८९ टक्के मतदानाची नोंद झाली. मुमेवाडी येथे १,५६५ मतदारांपैकी ९९९ मतदारांनी मतदान केले असून तेथे ६२ टक्के मतदान झाले. आरदाळ येथे ६३.२३ टक्के तर पेंढारवाडी येथे ६१९ मतदारांपैकी ३७३ मतदारांनी मतदान करून सुमारे ६१ टक्के मतदान झाले. या मतदारसंघांमध्ये पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. पोलिस उपविभागीय अधिकारी रामदास इंगवले व पी.एस.आय. युवराज धोंड यांनी प्रत्येक मतदान केंद्राला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.सकाळी पहिल्या दोन तासांत तसेच संध्याकाळी शेवटच्या दोन तासांत मतदानासाठी मतदारांची लक्षणीय गर्दी दिसून आली. मात्र दुपारच्या वेळेत उन्हाच्या तीव्रतेमुळे मतदान केंद्रांवरील गर्दी काहीशी कमी होती.
राष्ट्रवादीने शेवटच्या दोन दिवसात घातलेल्या जोडण्या, ताराराणीचे उमेश आपटे यांनी प्रचाराचे उठवलेले रान व प्रथमच पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार उभे करून त्यांच्यासाठी लावलेली ताकद यामुळे आता सर्वांचे लक्ष निवडणूक निकालाकडे लागले असून उत्तूर भागातील सर्वसामान्य मतदारांमध्ये निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
छायावृत्त…

आजरा येथील ख्रिस्ती बांधवांच्या फेस्त/ यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर सामूहिक प्रार्थनेसह धार्मिक कार्यक्रम रोजरी चर्चमध्ये पार पडले.आज यात्रेचा मुख्य दिवस आहे.
फोटो क्लिक

नागझरी ते परोली फाटयावर विजेचे खांब… खांबावर दिवे… पण विजेचा पत्ता नाही… खांब उभे करून दोन वर्षे झाली दिवे पेटलेच नाहीत…
ते केव्हा पेटणार…?


