

हिरण्यकेशी नदीवर २५ पासून उपसाबंदी

आजरा : प्रतिनिधी
आजरा, ता. कोल्हापूर पाटबंधारे विभाग ( दक्षिण), चित्री मध्यम प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे चित्री मध्यम प्रकल्पांतर्गत हिरण्यकेशी नदीच्या भागात शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर २५ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत उपसाबंदी लागू करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता शिल्या राजे यांनी दिले आहेत.
चित्री मध्यम प्रकल्प ऐनापुर, गजरगाव, हरळी, गिजवणे, जरळी, निलजी व खणदाळ येथील कोल्हापूर पध्दतीचे बंधारे भादवण बंधा-याची खालील बाजू ते खणदाळ बंधा-या पर्यंत नदीच्या दोनही तिरावर शेती पंपासाठी सदर बंदी घालण्यात आली आहे. चित्री प्रकल्पापासून ते नांगनूर बंधाऱ्यापर्यंत सद्य स्थितीला टंचाई सदृश्य परिस्थीती तयार झाल्याने पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सदर उपसा बंदी करण्यात आली आहे.
उपसाबंदी कालावधीत अनाधिकृत रितीने पाणी उपसा करताना आढळणाऱ्याचे उपसा यंत्र जप्त करण्या बरोबरच एक वर्षाकरिता पाणी परवाना रद्द करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.


प्रोत्साहन अनुदानापासून जिल्ह्यातील १५ हजार शेतकरी वंचित आंबादास दावणे यांना निवेदन… सरसकट लाभ देण्याची मागणी

आजरा: प्रतिनिधी
महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती प्रोत्साहन अनुदान योजने अंतर्गत लाभ न मिळालेल्या सभासद कर्जदार यांना सरसकट लाभ मिळावा अशी मागणी विविध विकास कार्यकारी सेवा संस्था चेअरमन संचालक सभासद असोसिएशनच्यावतीने करण्यात आली आहे. या योजनेपासून जिल्ह्यातील सुमारे १५ हजार शेतकरी वंचित राहीले आहेत. याबाबत तातडीने कार्यवाही अशी मागणी संस्थेच्या प्रतिनिधींनी विरोधी पक्ष नेते आंबादास दाणवे यांच्याकडे केली आहे. कोल्हापूर दौऱ्यावेळी श्री. दानवे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हंटले आहे, महाराष्ट्र शासनाकडून सेवा संस्थेचे जे सभासद कर्जदार नियमित कर्ज परतफेड करत आहेत. त्यांच्या करीता महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती प्रोत्साहन अनुदान योजनेअंतर्गत वेळेवर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या सभासद शेतकरी यांना ५० हजार पर्यंत भरपाई देण्याचे जाही केले आहे. परंतु अद्याप बऱ्याच सभासद कर्जदारांना सदर योजनेचा लाभ मिळालेला नाही. जिल्ह्यात सुमारे १५ हजार सभासद या योजनेपासून वंचित राहीले आहेत. या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली आहे. याबाबत श्री. दानवे यांची संस्थेचे अध्यक्ष आप्पासो पाटील व सदस्यांनी घेतली. याबाबतचे गाऱ्हाणे मांडले. या वेळी दानवे यांनी सदर योजनेचा लाभ संबंधीत शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगीतले. जिल्हाधिकारी श्री. येडगे यांची भेट घेण्यात आली. त्यांनीही सकारात्मकता दर्शवली आहे. ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांनी असोसिएशनशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष श्री. पाटील यांनी केले आहे.
यावेळी सचिव जयराम पाटील, शिवाजी इंगळे, उत्तम रेडेकर, पांडुरंग जाधव, पांडुरंग सावरतकर या वेळी उपस्थित होते.


शिरसंगी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ

आजरा : प्रतिनिधी
शिरसंगी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. दलित वस्तीतील काँक्रिटीकरण रस्त्यासाठी पाच लाख रुपयांचा निधी व आरसीसी बंदिस्त गटर साठी पाच लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून या दोन्ही कामांचा शुभारंभ सरपंच संदीप चौगले यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी स्वागत व प्रस्ताविक ग्रामसेवक मुरलीधर कुंभार यांनी केले.
दलित वस्तीसाठी काँक्रिटीकरण रस्त्यासाठी पाच लाखाचा निधी मंजूर झाला असून त्याचबरोबर बंदिस्त आरसीसी गटर्स साठी पाच लाखाचा निधी मंजूर झाल्याचे सरपंच संदीप चौगुले यांनी सांगितले.
यावेळी उपसरपंच पांडुरंग टकेकर , भाजप कोल्हापूर जिल्हा चिटणीस सी. आर. देसाई, भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष संतोष चौगले माजी उपसरपंच वसंत सुतार ,थळोबा कांबळे ,सर्जेराव कांबळे, सागर कुंभार, पिराजी कांबळे, दत्तात्रय होडगे, ग्रा,पं सदस्या रेश्मा कांबळे, सुमन होडगे, शांताराम पाटील गोठणदेव दूध संस्थेचे चेअरमन नारायण साठपे, आनंदा टकेकर विजय मुळीक उपस्थित होते.
आभार सर्जेराव कांबळे यांनी मानले.


साळगाव शाळेत कराटे प्रशिक्षण व करिअर मार्गदर्शन

आजरा: प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत साळगाव प्राथमिक शाळेत मुलींच्या आत्मसंरक्षणासाठी राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण व बी एस एफ मध्ये नुकतीच निवड झालेल्या कु. शिवानी पसारे या मुलीची मुलाखत व ट्रेनिंग अनुभव असा संयुक्त कार्यक्रम शाळेत संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. मंजिरी यमगेकर होत्या.
समग्र शिक्षा, मुंबई अंतर्गत मुलींच्या आत्मरक्षणासाठी कराटे प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक सुषमा पिसाळ व प्रतिभा जाधव यांनी दाखवले व त्यानंतर मडिलगे गावची कन्या कु. शिवानी पसारे या मुलीने आपल्या गरीब परिस्थितीवर मात करत ,अथक प्रयत्नाने , BSF मध्ये निवड झाली. या ट्रेनिंग काळातील तीचे अनुभव व परीक्षेसाठी शारिरीक व मानसिक तयारी कशी केली , शालेय जीवनापासुन स्पर्धा परीक्षेची कशी तयारी करावा ,अभ्यास कोणता करावा याबद्दल मुलांना प्रेरणा देणारे अनुभव तिने सांगितले .
सौ. यमगेकर यांनी या मुलीची ओळख करुन देताना यश मिळवायचे असेल तर जिद्द व कष्ट हे गरिबीच्या आड येतनाही या मुलीने ते दाखवुन दिले आहे व याचा अभिमान वाटतो असे सांगितले . यावेळी निवृत्ती मिटके व सौ. गिता जंगम उपस्थित होते श्री संजय मोहिते यांनी सर्वांचे आभार मानले.

महा आवास योजनेंतर्गत उत्तुर ग्रामपंचायत राज्यात प्रथम

उत्तूर : प्रतिनिधी
केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या अंमलबजावणीमध्ये गतिमानता व गुणवत्ता आणणेसाठी जिल्ह्यात महा आवास अभियान २०२२-२३ राबविण्यात आले होते. त्यास अनुसरून २२ घरकुलांना मंजुरी मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल उत्तुर ग्रामपंचायतीचा कोल्हापूर येथील ताराराणी महोत्सवात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी सरपंच किरण आमणगी, उपसरपंच समीक्षा देसाई ग्रामविकास अधिकारी प्रकाश पाटील, ग्रामपंचायत सदस्य महेश करंबळी, सुवर्णा नाईक, भैरू कुंभार ,अनिता घोडके, सुनीता हत्तीरगे, लता गुरव, सरिता कुरुणकर व ग्राम रोजगार सेवक दादासाहेब सावंत उपस्थीत होते.


त्रिवेणी पुरस्काराचे आज वितरण
उत्तूर: प्रतिनिधी
उत्तुर येथील त्रिवेणी सांस्कृतिक, शैक्षणीक व क्रीडा संस्था, उत्तुर यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचा वितरण सोहळा आज शनिवार दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोजी पद्मभूषण डॉ. जे. पी. नाईक स्मारक, बहिरेवाडी ता. आजरा येथे दुपारी दोन वाजता संपन्न होणार आहे. त्रिवेणी मार्फत दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गुण गौरव मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जातो. या कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


निधन वार्ता…
जिजाबाई देसाई

पेरणोली ता. आजरा येथील जिजाबाई शंकर देसाई (वय ७४ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले .त्यांच्या पश्चात चार मुले, सूना,एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे .रक्षा विसर्जन रविवार दि.११ रोजी रोजी सकाळी ९ वाजता करण्यात येणार आहे.जे पी नाईक पतसंस्थेचे संचालक रवींद्र देसाई यांच्या आई होत.
शिवाजी उत्तूरकर

उत्तुर ता. आजरा येथील शिवाजी दत्तू उत्तूरकरकर (वय ७५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
तुकाराम कोंडुसकर

सोहाळे (ता. आजरा) येथील तुकाराम आनंदा कोंडुसकर (वय ६३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, तीन विवाहित मुली, आई असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ११) आहे. काजू उद्योजक प्रकाश कोंडूसकर यांचे ते बंधू होत.



