mrityunjaymahanews
अन्य

गुरुवार सातच्या बातम्या

गणेशोत्सवासाठी आजरा पोलिसांची कडक नियमावली; डॉल्बीला परवानगी नाही.


आजरा : प्रतिनिधी

गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा पोलीस दल व आजरा पोलीस ठाण्याच्या वतीने आजरा तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात गणेशोत्सव मंडळांची बैठक पार पडली. बैठकीत गणेशोत्सव शांततेत, शिस्तीत साजरा करण्याबाबत विविध सूचना करण्यात आल्या. तालुक्यातील ११६ गणेशोत्सव मंडळांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

आजरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब सरवदे यांनी गणेशोत्सव मंडळांनी रजिस्ट्रेशन करणे आणि स्पीकर परवाना घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करावी, मंडपामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच प्रत्येक मंडळाने मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मिरवणुकीदरम्यान CO₂, लेझर व प्रेशर प्लेटचा वापर करू नये. तसेच साऊंड सिस्टीम दोन बेस व दोन टॉपपेक्षा अधिक असल्यास परवानगी मिळणार नाही. डॉल्बीला कोणत्याही प्रकारची परवानगी दिली जाणार नसल्याचे सरवदे यांनी स्पष्ट केले. गणपती मिरवणूक एका ठिकाणी विनाकारण रेंगाळत ठेवू नये, अशा सूचनाही त्यांनी केल्या. आजरा शहरातील मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी क्रेनची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली.
वर्गणीसाठी जबरदस्ती केल्यास कारवाईचा इशारा देत, जबरदस्तीने वर्गणी मागितल्याची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलिसांनी दिला.

तहसीलदार समीर माने यांनी गणेश मंडळांच्या मिरवणुकीत आक्षेपार्ह बॅनर अथवा मजकूर लावू नये, तसेच मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह किंवा वादग्रस्त संदेश प्रसारित करू नयेत, असे आवाहन केले. महाप्रसादासह अन्नवाटपाचे उपक्रम आयोजित करताना अन्न व औषध प्रशासनाची आवश्यक परवानगी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. गणेश मंडळांनी सामाजिक व विधायक उपक्रम राबवावेत, असेही त्यांनी सांगितले.

महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अतुल पाटील यांनी गणेश मंडळांनी वीज कनेक्शनसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, तसेच मंडपामध्ये शॉर्टसर्किट होणार नाही यासाठी सुरक्षित विद्युत यंत्रणा बसवावी, असे आवाहन केले. यावेळी सहाय्यक अभियंता कृष्णा कोळी व वायरमन संतोष डोंगरे उपस्थित होते.

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांनी गणेशोत्सव काळात निर्माण होणारे निर्माल्य पाण्यामध्ये टाकू नये. निर्माल्य स्वतंत्रपणे जमा करून घनकचऱ्यासोबत योग्य पद्धतीने संकलित करण्याच्या सूचना केल्या.आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरत सुर्वे यांनी शहरातील गणेश मंडळांनी नगरपंचायतीची रीतसर परवानगी घ्यावी, तसेच गणेश विसर्जनाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी, असे सांगितले. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मूर्तीदान उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

गणेशोत्सव काळात महिलांची छेडछाड होणार नाही महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे यासाठी मंडळांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. महिलांच्या सबलीकरणासाठी गणेश मंडळांनी समुपदेशन व मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करावेत. यासाठी महिला दक्षता समितीच्या माध्यमातून आवश्यक मार्गदर्शन करण्यात येईल, असे माजी सभापतीसौ. रचना होलम यांनी सांगितले.

बैठकीस महावितरणचे अधिकारी, नगरपंचायतीचे अधिकारी, ज्योत्स्ना चराटी, गीता पोतदार, महिला दक्षता समितीच्या धनश्री देसाई, पूनम पाचवडेकर, गौरव देशपांडे, राजू विभुते, संजय येसादे, आजरा तालुक्यातील लोकप्रतिनिधी, गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी, शांतता समितीचे सदस्य, महिला दक्षता समितीच्या सदस्या, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उत्तुरमध्ये आधुनिक बसस्थानक व ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याची मागणी.

आजरा .- प्रतिनिधी.

उत्तुर ता. आजरा व परिसरातील नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासह आरोग्यसेवेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी गर्जना संघटनेने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की उत्तुर ता. आजरा येथे दुप्पट मोठे व आधुनिक बसस्थानक तसेच बसस्थानकापासून १०० मीटर अंतरावर ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याची मागणी केली आहे.

सध्याच्या प्रस्तावापेक्षा अधिक सुविधा असलेले बसस्थानक उभारून त्यातील व्यावसायिक गाळे उत्तुर ग्रामपंचायतीला देण्यात यावेत, अशी संघटनेची मागणी आहे. त्यातून ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध होऊन गावाच्या विकासाला हातभार लागेल. त्याचबरोबर ५० खाटांचे रुग्णालय झाल्यास अपघातग्रस्त, सर्पदंश झालेले रुग्ण तसेच गर्भवती महिलांना वेळेत उपचार मिळून अनेकांचे प्राण वाचू शकतील.

या दोन्ही प्रकल्पांमध्ये पारदर्शकता आणि दर्जेदार कामाची हमी मिळावी, तसेच निविदा प्रक्रिया, परवानग्या, बांधकामाचा दर्जा आणि खर्चाचे नियमित लेखापरीक्षण व्हावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. उत्तुर बसस्थानकासाठी प्रशासकीय मान्यता रु ४१० लाख, निविदा रु २८३ लाख आणि प्रत्यक्ष खर्च रु ८० ते रु ९० लाख असल्याचा दावा / आक्षेप पुढे करण्यात आला असून, या रकमेतील तफावत स्पष्ट करण्यासाठी स्वतंत्र चौकशी व लेखापरीक्षण करून जनतेसमोर वस्तुस्थिती मांडावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

आधुनिक बसस्थानक आणि ५० खाटांचे रुग्णालय हे उत्तुरच्या आरोग्य, वाहतूक आणि आर्थिक विकासाला चालना देणारे प्रकल्प ठरतील असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार गर्जना संघटनेने म्हटले आहे.

कुरकुंदेश्वर विकास सेवा संस्थेची वार्षिक सभा संपन्न

O

पेरणोली : प्रतिनिधी

पेरणोली येथील कुरकुंदेश्वर विकास सेवा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन श्री. अमरसिंह पवार हे होते सुरवातीला श्रद्धाजंलीचा ठराव माडण्यात आला. सचिव मच्छिंद्र कळेकर यांनी अहवाल वाचन केले यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली . भरत सावंत , संजय मोहिते , शिवाजी मस्कर , संभाजी पारधे , दिलीप देसाई यांनी संस्था इमारत बांधकाम , कर्जमाफी , लाभांश वाटप याबाबत चर्चेत सहभाग घेतला . चर्चेला उत्तर देताना चेअरमन अमरसिंह पवार व नेते मा उदय पवार यांनी संस्थेचा कारभार पारदर्शक व काटकसरीने करत संस्थेला दिड लाखाचा नफा झाला आहे यावर्षि ४ % लाभांश वाटप करणार आहे व संस्थेची इमारत बांधकाम बाबतही निर्णय घेतला आहे असे सांगितले तसेच संस्थेमार्फत विविध कर्ज योजना , शेतकरी विमा याबाबतही मार्गदर्शन केले

यावेळी व्हा चेअरमन ध्रुवबाळ काटकर , धनाजी सावंत , श्री रामराव देसाई , कृष्णा सावंत , भरत पाटील , आनंदा सुतार धनाजी पारधे आनंदा ढोकरे, अशोक जाधव, ज्ञानोबा गुरव यांच्या सह संस्थेचे सभासद उपस्थित होते. 

संस्थेचे जेष्ठ सभासद व आजरा साखर संचालक श्री उदय पवार यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत सर्वांचे आभार मानले .

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५०व्या जयंतीनिमित्त देवर्डे येथे उद्या रंगणार भक्ती-ज्ञानाचा जागर ; वारकरी सांस्कृतिक परंपरेचा होणार जागर...

आजरा : प्रतिनिधी

संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५०व्या जन्मजयंतीनिमित्त पुणे महसूल विभागातील सर्व तालुक्यांमध्ये एकाच वेळी तालुकास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

याच उपक्रमांतर्गत ‘ज्ञान माऊली’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता श्री विठ्ठल मंदिर, देवर्डे, ता. आजरा, जि. कोल्हापूर येथे करण्यात आले आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अध्यात्मिक विचारांचा, वारकरी संप्रदायाच्या समृद्ध परंपरेचा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा परिचय करून देणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी यावेळी रसिकांना अनुभवता येणार आहे. भक्तिगीते, अभंग, कीर्तन, वारकरी परंपरा तसेच संत ज्ञानेश्वरांच्या कार्याचा जागर या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे.

देवर्डे व परिसरातील नागरिक, वारकरी, भाविक आणि सांस्कृतिक रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘ज्ञान माऊली’ कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

निधन वार्ता

सुभाष मोरजकर

श्री विठोबा देव मंदिर नबापूर ,आजराचे ट्रस्टी सुभाष वासुदेव मोरजकर ( वय ७७ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, मुलगी, सून,जावई ,नातवंडे असा परिवार आहे. तालुका खरेदी विक्री संघाचे ते सेवानिवृत्त कर्मचारी होत. रक्षाविसर्जन उद्या शुक्रवारी सकाळी नऊ वाजता आहे.

भिकाजी कांबळे.


बेलेवाडी हूबळगी येथील प्राथमिक शिक्षक भिकाजी दत्तू कांबळे ( वय ५८) यांचे निधन झाले. मांगनूर(ता.कागल) येथील प्राथमिक शाळेत ते मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते.
त्यांच्या मागे पत्नी,एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

आजचे पंचांग

दिनांक : ३ सप्टेंबर २०२६
वार : गुरुवार
माह (अमावस्यांत) : श्रावण
माह (पूर्णिमांत) : भाद्रपद
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : सप्तमी तिथी (४ सप्टेंबर पहाटे 02:25 पर्यंत) त्यानंतर अष्टमी तिथी
नक्षत्र : कृत्तिका नक्षत्र (4 सप्टेंबर रात्री १२.२८ पर्यंत) त्यानंतर रोहिणी नक्षत्र
योग : व्याघात योग (सायंकाळी ०६.३२ पर्यंत) त्यानंतर हर्षण योग
करण : विस्ती भद्रा करण (दुपारी ०३.२७ पर्यंत) त्यानंतर भाव करण
चंद्र राशी : मेष राशी (सकाळी ०७.२५ पर्यंत) त्यानंतर वृषभ राशी
सूर्य राशी : सिंह राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०२.११ ते दुपारी ०३.४४ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१३ ते दुपारी ०१.०३
सूर्योदय : सकाळी ०६.२५
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५१
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

तरुणाची आत्महत्या…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

BREAKING NEWS…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!