mrityunjaymahanews
अन्य

बुधवार – सातच्या बातम्या

दिनांक २ सप्टेंबर २०२६

किटवडे येथे हत्तीचा धुमाकूळ ; ऊस, भात पिकाचे नुकसान, बैलगाडी पलटी

किटवडे /आजरा प्रतिनिधी :

किटवडे परिसरात हत्तीने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हत्तीने शेतातील ऊस व भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून एक बैलगाडी पलटी केल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गव्याच्या कळपानंतर आता हत्तीच्या वावरामुळे शेतकरी धास्तावला आहे. रात्रीच्या वेळी शेतात शिरून हत्ती पिकांची नासधूस करीत आहे. बैलगाडीचेही नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमध्ये उत्तम पाटील, रामचंद्र पाटील, गोविंद मालव, आनंदा पाटील,अंकुश सावंत, बयाजी सावंत आदींचा समावेश आहे

या पार्श्वभूमीवर आजरा तालुका वनविभागाने तातडीने हत्तीचा बंदोबस्त करावा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी किटवडे धनगरमोळा येथील शेतकऱ्यांमधून होत आहे.

संस्थेच्या अंतर्गत वादामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

जे.पी. नाईक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज रखडले.

उत्तूर: प्रतिनिधी 

कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तूर येथील जे.पी. नाईक महाविद्यालयात प्रशासकीय व संस्थात्मक वादांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या वर्षीही या महाविद्यालयाने परीक्षा विभागाचे पैसे न भरल्यामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरून घेतले नव्हते, ज्याची पुनरावृत्ती यंदाही होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या महाविद्यालयात प्राचार्याची नियुक्ती रखडल्याने आणि अंतर्गत वादानुळे प्रशासकीय कामकाज कोलमडल्याने विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म भरण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे, यामुळे विद्यार्थ्यांवर एक वर्ष वाया जाण्याची टांगती तलवार निर्माण झाली आहे.

​या प्रकारची गंभीर दखल घेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) कोल्हापूर महानगराच्या वतीने शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंना सविस्तर निवेदन देण्यात आले आहे.

मागील वर्षी स्थानिक स्तरावर व्यवस्थापन परिषद सदस्य अ‍ॅड. स्वागत परुळेकर यांच्याकडे धाव घेतल्यानंतर परीक्षा नियंत्रकांशी चर्चा करून मार्ग काढण्यात आला होता, मात्र यंदाही हाच पेच कायम असल्याने अभाविपने पात्र विद्यार्थ्यांना तात्काळ परीक्षा फॉर्म भरण्यास परवानगी देणे, विशेष मुदतवाढ देणे आणि या वादाचा विद्यार्थ्यांच्या परीक्षेवर परिणाम होऊ नये म्हणून पर्यायी प्रशासकीय व्यवस्था करण्याची आक्रमक मागणी केली आहे.

“संस्थेच्या वादात नाहक गरजू विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहत आहेत. पण विद्यापीठ स्तरावरून अश्या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार”
– स्वागत परुळेकर
(व्यवस्थापन परिषद सदस्य,
शिवाजी विद्यापीठ)

उत्तूरची लेक बनली जुनागडची असिस्टंट कलेक्टर

उत्तूर : प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तूर (ता. आजरा) येथील वृषाली कांबळे यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) यश मिळवत गुजरातमधील जुनागड येथे सहाय्यक जिल्हाधिकारी (असिस्टंट कलेक्टर) म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या या यशामुळे उत्तूरसह संपूर्ण जिल्ह्याचा गौरव झाला आहे.
युपीएससी २०२४ परीक्षेत देशात ३१० वा क्रमांक मिळविल्यानंतर वृषाली यांनी मसुरी येथील प्रशिक्षण पूर्ण केले. गुजरात केडर मिळाल्यानंतर राजकोट व नवी दिल्ली येथे परिविक्षाधीन कालावधी यशस्वीपणे पूर्ण करून त्या स्वतंत्र प्रशासकीय जबाबदारीसाठी सज्ज झाल्या. त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत गुजरात प्रशासनाने त्यांची जुनागड येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

वृषाली यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण सेंट ऑगस्टीन स्कूलमध्ये, तर पुढील शिक्षण मुंबईतील एसआयईएस आणि सेंट झेवियर्स महाविद्यालयात झाले. राज्यशास्त्र विषयातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी वयाच्या २४ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या वृषाली कांबळे यांचे यश राज्यातील युवक-युवतींसाठी प्रेरणादायी ठरत असून, त्यांच्या उज्ज्वल प्रशासकीय कारकिर्दीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आजरा महाविद्यालयात ज्युनिअर विभागाचा शिक्षक-पालक मेळावा उत्साहात संपन्न

आजरा : प्रतिनिधी

आजरा महाविद्यालय, आजरा येथे ज्युनिअर विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी शिक्षक-पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे, शिस्त व अभ्यासाची सवय लावणे आणि पालक-महाविद्यालय यांच्यात सुसंवाद निर्माण करणे हा या मेळाव्यामागचा मुख्य उद्देश होता. मेळावा अत्यंत उत्साही व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रा. अर्चना चव्हाण यांच्या स्वागत व प्रास्ताविकाने झाली. त्यांनी मेळाव्याची पार्श्वभूमी विशद केली. त्यानंतर प्रा. श्रद्धा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे नियमित अध्ययन, वर्गातील उपस्थिती, अभ्यासातील सातत्य आणि परीक्षेचे नियोजन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी संतुलित आहाराचे महत्त्वही त्यांनी पटवून दिले.

पालकांच्या वतीने श्री. मंदार पेंडसे व श्री. अजगेकर यांनी मनोगत व्यक्त करत महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्ता, अभ्यासाचे वातावरण आणि शिक्षकांचे वैयक्तिक लक्ष याबद्दल समाधान व्यक्त केले व काही विधायक सूचना मांडल्या.

उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ यांनी मार्गदर्शन करताना बदलत्या काळात केवळ महाविद्यालयीन शिक्षण पुरेसे नसून पालक-शिक्षकांमधील सततचा संवाद आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी महाविद्यालयात राबविण्यात येत असलेल्या ‘कॉपीमुक्त अभियाना’ची माहिती दिली. परीक्षा काळातील शिस्त, कॉपीमुक्त शपथ, गैरप्रकारांना प्रतिबंध व CCTV च्या कडक निगराणीखाली होणाऱ्या परीक्षा पारदर्शक होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पर्यवेक्षक प्रा. मनोजकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून शिस्तबद्ध दिनचर्या पाळावी व पालकांनी दैनंदिन प्रगतीकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. किरण पोतदार यांनी महाविद्यालयाच्या सोयी-सुविधांचा आढावा घेऊन सर्वांगीण विकासासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.

या मेळाव्यास अधीक्षक श्री. योगेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रा. वैशाली देसाई, प्रा. अनिल निर्मळे, प्रा. रत्नदीप पवार, प्रा. विनायक चव्हाण, प्रा. डॉ. रणजीत भादवणकर यांच्यासह ज्युनिअर विभागातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विठ्ठल हाक्के यांनी केले तर आभार प्रा. शोभा फड यांनी मानले.

निधन वार्ता
लक्ष्मीबाई तानवडे

देवर्डे तालुका आजरा येथील श्रीमती लक्ष्मीबाई परसू तानवडे (वय ८५ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांचे पश्चात एक मुलगा, एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.

श्री. शामराव परसु तानवडे यांच्या त्या आई होत. रक्षाविसर्जन उद्या गुरुवारी सकाळी आहे.

तुकाराम पाटील

तुकाराम सखोबा पाटील रा. कोळिंद्रे यांचे वृद्धापकाळाने  निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ८७ वर्षे होते.

भारतीय सैन्य दलात १५ वर्ष सेवा, निवृत्ती नंतर, महाराष्ट्र मंत्रालय मुंबई इथे १५ वर्ष आदिवासी विभागात, सह सचिव ( राजपत्रीत अधिकारी ) म्हणून काम केले.

त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे, एक विवाहित मुलगी, पत्नी, नातवंडे असा मोठा परिवार आहे,जनता बँक आजरा चे माजी संचालक, महादेव सखोबा पाटील यांचे मोठे बंधू होत.

आजचे पंचांग

दिनांक : २ सप्टेंबर २०२६
वार : बुधवार
माह (अमावस्यांत) : श्रावण
माह (पूर्णिमांत) : भाद्रपद
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : पंचमी तिथी (सकाळी ०६.१३ पर्यंत) त्यानंतर षष्ठी तिथी (३ सप्टेंबर सकाळी ०४.२५ पर्यंत) त्यानंतर सप्तमी तिथी
नक्षत्र : भरणी नक्षत्र (३ सप्टेंबर रात्री ०१.४२ पर्यंत) त्यानंतर कृत्तिका नक्षत्र
योग : ध्रुव योग (रात्री ०९.११ पर्यंत) त्यानंतर व्याघात योग
करण : तैतुला करण (सकाळी ०६.१३ पर्यंत) त्यानंतर गराजा करण (सायंकाळी ०६.५९ पर्यंत) त्यानंतर वाणीजा करण
चंद्र राशी : मेष राशी
सूर्य राशी : सिंह राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी १२.३८ ते दुपारी ०२.११ पर्यंत
सूर्योदय : सकाळी ०६.२५
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५१
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आज-यात बैलगाडी शर्यती वेळी राडा.. बैलांसह तिघे झाले जखमी… पाच जणांविरोधात गुन्हा नोंद

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!