दिनांक ३१ ऑगस्ट २०२६

श्री रवळनाथ मंदिरात स्थिर उंबरा व चौकट स्थापना विधी उत्साहात संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्री रवळनाथ देवालय उपसमितीच्या वतीने आयोजित श्री रवळनाथ मंदिराचा स्थिर उंबरा व चौकट स्थापना विधी रविवार दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजता स्त्री-पुरुष भाविकांच्या प्रचंड उपस्थितीत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
मंदिर जीर्णोद्धार व सुशोभीकरणाचे काम वेगात सुरू असून, दगडी कोरीव काम असलेला मुख्य प्रवेशद्वाराचा उंबरा व चौकट विधिवत पूजन करून बसविण्यात आली. सकाळपासूनच भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. मंत्रघोषात व पारंपारिक वाद्यांच्या गजरात हा ऐतिहासिक विधी पार पडला.
यावेळी महिला भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती. भाविकांनी श्री रवळनाथाचे दर्शन घेऊन या ऐतिहासिक कार्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभल्याची भावना व्यक्त केली.
मंदिराचे बांधकाम गतीने होत असून लवकरच कळसारोहण होणार असल्याची माहिती श्री रवळनाथ देवालय उपसमिती, आजरा यांच्यावतीने देण्यात आली.

आजरा येथे संघर्ष व लढा मेळावा संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर येथे ६, ७ व ८ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या अखिल भारतीय किसान सभेच्या २४ व्या राज्य अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आजरा तालुक्याचा संघर्ष व लढा मेळावा आज श्रमिक पतसंस्था, जिजामाता कॉलनी येथे झाला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते अधिवक्ता दशरथ दळवी होते.
दळवी म्हणाले, जमीन, पाणी, पीक, कर्ज, हमीभाव, देवस्थान जमीन यासाठी किसान सभेने सातत्याने लढे उभारले आहेत. देवस्थान-मठ ट्रस्ट जमीन प्रश्नावर शेतकऱ्यांनी एकजूट ठेवावी.
जिल्हा सहसचिव संग्राम सावंत म्हणाले, देवस्थान व मठ ट्रस्ट जमीन कसणाऱ्यांना मालकी हक्क मिळेपर्यंत लढा सुरू राहील. राज्य अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
कॉ. संजय घाटगे, तालुका नेते कॉ. शिवाजी गुरव, कॉ. शांताराम पाटील यांनी शेतमजूर, कामगार, भूमिहीन प्रश्नांवर लढा एकत्र करण्यावर भर दिला.
मेळाव्यातील ठराव –
१) देवस्थान-मठ ट्रस्ट जमीन कसणाऱ्यांचे हक्क सुरक्षित करावेत
२) शेतीमालाला हमीभाव द्यावा
३) कर्जमुक्ती व पीक विमा प्रभावी करावा
४) सिंचन, वीज, नुकसान भरपाई प्रश्न सोडवावेत
५) शेतमजूर, बेघर यांच्यासाठी गावठाणवाढ व रोजगार हमी राबवावी
६) राज्य अधिवेशनासाठी तिन्ही तालुक्यात प्रचार करावा.
यावेळी सुरेश शिंगटे, ज्योतीराम राणे, श्रावण चौगुले, दत्तात्रय कांबळे, संतोष मासोळे, संभाजी मोहिते, शिवाजी गिलबिले, भगवान सूर्यवंशी, राजेंद्र देशमुख, रामा कांबळे, संतोष माने, सचिन लोहार, शुभम कांबळे व शेतकरी उपस्थित होते.

आजरा महाविद्यालयात संख्याशास्त्र प्राध्यापक प्रशिक्षण शिबिर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील संख्याशास्त्र विषयाच्या प्राध्यापकांचे प्रशिक्षण शिबिर आजरा महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाले. अध्यक्षस्थानी जनता एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अशोकअण्णा चराटी होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सोमनाथ पवार व आजरा अर्बन बँकेचे संचालक डॉ. सुनील देशपांडे उपस्थित होते.
डॉ. देशपांडे म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे प्राध्यापकांना अद्यावत राहावे लागेल. डॉ. पवार म्हणाले, आजरा महाविद्यालयाचे संख्याशास्त्रातील योगदान मोठे आहे, येथील विद्यार्थी विविध शासकीय पदांवर कार्यरत आहेत.
प्रा. वर्षा पाटील यांनी स्वागत केले. प्रभारी प्राचार्य व अभ्यास मंडळ अध्यक्ष प्रा. डॉ. किरण पोतदार यांनी बी.एस्सी. भाग ३ मध्ये AI व ॲक्च्युरल सायन्स समाविष्ट केल्याची माहिती दिली.
यावेळी चेअरमन चराटी यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून उद्घाटन झाले. माजी विद्यार्थिनी तेजश्री राजे व वैशाली मळेकर (MPSC द्वारे सिंधुदुर्ग येथे सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी) यांचा चराटी यांच्या हस्ते, तर शिवाजी विद्यापीठात द्वितीय क्रमांक मिळवलेल्या निशा दोरुगडे हिचा डॉ. देशपांडे यांच्या हस्ते सत्कार झाला. डॉ. पोतदार यांचाही प्राध्यापकांतर्फे सत्कार झाला.
कोल्हापूर, कराड, सांगली, वाई, विटा, कवठेमहांकाळ येथील प्राध्यापक सहभागी झाले. यावेळी संचालक आय. के. पाटील, अनिकेत चराटी, कार्यालय अधीक्षक योगेश पाटील उपस्थित होते. डॉ. सोमनाथ पवार, डॉ. सुकुमार राजगुरू, डॉ. अशोक दोरुगडे, सुरेश परीट यांची व्याख्याने झाली.
सूत्रसंचालन प्रा. डॉ. अशोक बाचूळकर यांनी केले, आभार समन्वयक प्रा. श्रुती ओतारी यांनी मानले. संयोजन प्रा. वर्षा पाटील, प्रा. श्रद्धा तेजम, डॉ. मल्हारराव ठोंबरे, प्रा. संजय सावंत यांनी केले.

उत्तूर बसस्थानकावर नवा पेच
प्रकल्प रद्द करा -प्रकाश बेलवाडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
उत्तूर : मंदार हाळवणकर
उत्तूर (ता. आजरा) येथील प्रस्तावित बसस्थानकाचा वाद अधिकच तीव्र झाला असून, गर्जना संघटनेचे अध्यक्ष प्रकाश बेलवाडे यांनी हा संपूर्ण प्रकल्प रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
बसस्थानकासंदर्भातील सर्व निर्णयप्रक्रियेची जिल्हास्तरीय स्वतंत्र चौकशी करून चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणतेही बांधकाम पुढे नेऊ नये, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या पत्रात बेलवाडे यांनी बसस्थानकाचा विषय केवळ बांधकामापुरता मर्यादित नसून तो सार्वजनिक आरोग्य, शासकीय जमीन, बांधकाम परवानग्या, सार्वजनिक मालमत्ता आणि शासन निधीच्या वापराशी संबंधित असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावरील चौकशी ऐवजी निष्पक्ष जिल्हास्तरीय समितीकडून सर्व बाबींची सखोल तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.पत्रामध्ये एकूण १४ गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले असून, उपलब्ध कागदपत्रांवरून निर्णय प्रक्रियेत अनेक विसंगती दिसून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. दोषी व्यक्तींना कोणतेही संरक्षण न देता जबाबदारी निश्चित करावी तसेच शासनाच्या मालमत्तेचे व सार्वजनिक हिताचे संरक्षण करावे, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, तक्रार प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांच्या आत प्राथमिक कार्यवाही करून त्याबाबत लेखी माहिती द्यावी, अन्यथा उपलब्ध कायदेशीर उपाययोजनांचा अवलंब करण्यात येईल, असा इशाराही बेलवाडे यांनी प्रशासनाला दिला आहे.
दरम्यान, याच प्रश्नावर ग्रामपंचायत सदस्य संभाजी कुराडे यांनी बसस्थानकाचे बांधकाम २१ सप्टेंबरपर्यंत सुरू न झाल्यास अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे एकाच प्रकल्पाबाबत दोन परस्परविरोधी भूमिका समोर आल्याने उत्तूर बसस्थानकाचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, जिल्हा प्रशासन नेमका कोणता निर्णय घेते याकडे संपूर्ण आजरा तालुक्याचे लक्ष लागले आहे.

व्यंकटराव शिक्षण संकुलात रक्षाबंधन उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये रक्षाबंधनाचा सण उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रशालेतील विद्यार्थीनींनी स्वतःच्या कल्पकतेतून व कौशल्यातून आकर्षक राख्या तयार केल्या होत्या. या स्वयंनिर्मित राख्या त्यांनी प्रशालेतील विद्यार्थी बंधूंना बांधून रक्षाबंधनाच्या सणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यामुळे संपूर्ण प्रशालेत आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाचे आयोजन श्री. एस. वाय. भोये यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी-विद्यार्थिनींनी केले. प्रशालेतील सर्व शिक्षक बंधूंनाही विद्यार्थीनींनी प्रेमपूर्वक राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गातील भगिनींकडून राखी बांधण्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थीनींनी आपल्या बंधूंच्या मनगटावर राखी बांधत परस्पर स्नेह, प्रेम आणि संरक्षणाची भावना व्यक्त केली.
या कार्यक्रमास प्रशालेचे प्राचार्य श्री. एस. एन. पाटील, पर्यवेक्षिका, सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया पाईम ,तनिष्का मांगले यांनी केले व अंकिता देसाई, गुंजन मोरे, वैष्णवी मातले, हंसिका नाईक, कविता सांगणे ,भाग्यश्री इलगे यांनी रक्षाबंधन बद्दल माहिती सांगितली. तसेच आभार मानसी पवार यांनी मांडले.
शिष्यवृत्ती गुणवंत व मार्गदर्शक शिक्षकांचा कास्ट्राईबतर्फे सन्मान.

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कास्ट्राईब शिक्षक संघटना, आजरा तालुका शाखेतर्फे शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य व जिल्हा गुणवत्ताधारक ठरलेल्या १४२ विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला. इयत्ता चौथी, पाचवी, सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तक भेट देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तानाजी गस्ती होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून गौतम वर्धन, पी. डी. सरदेसाई, तुकाराम संघवी, विजय कांबळे, श्रीनाथ पाटील, किरण आमणगी व सुभाष कांबळे उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या आजरा तालुका शाखेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी सुरेश देशमुख, सरचिटणीसपदी दीपक कांबळे, कोषाध्यक्षपदी दशरथ कांबळे व कार्याध्यक्षपदी अमित कांबळे यांची निवड करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजीव नाईक, भिकाजी कांबळे, बाळू कांबळे व महेश कांबळे यांनी विशेष सहकार्य केले.

निधन वार्ता
अर्जुन कोंडुस्कर

चांदेवाडी तालुका आजरा येथील अर्जुन बाळकू कोंडूसकर ( वय ७६ वर्षे ) वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा , दोन विवाहीत मुली , सुन , दोन नातवंडे असा परिवार आहे. शिंदे सेनेचे कार्यकर्ते व पंडित दीनदयाळ विद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी विजय कोंडुस्कर यांचे ते वडील होत.
