mrityunjaymahanews
अन्य

शनिवार – सातच्या बातम्या

शनिवार दिनांक ५ सप्टेंबर २०२६

आजरा आंबोली मार्गावर दुकान फोडून ५६ हजाराचा काजूगर चोरीला

आजरा : प्रतिनिधी

आजरा येथील मिनर्व्हा हॉटेल समोरील बापू तांदूळ विक्री केंद्र या बंद दुकानाचा पाठीमागील पत्रा उचकटून अज्ञात चोरट्याने ७० किलो वजनाचा व्हाईट मिक्स काजूगर चोरून नेल्याची घटना घडली आहे.

फिर्यादी अब्दुलगफार बाबालाल नेसरीकर (वय ४७, व्यवसाय व्यापारी, रा. एमआयडीसी, आजरा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. ३ सप्टेंबर रात्री १० वाजल्यापासून ते ४ सप्टेंबर सकाळी ८ वाजेपर्यंतच्या दरम्यान ही चोरी झाली असून चोरीस गेलेल्या मालाची किंमत ५६ हजार रुपये आहे.

या प्रकरणी आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

मराठा समाजाचा अंत पाहू नका – मराठा महासंघाचे निवेदन

आजरा : प्रतिनिधी

मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे सुरू असलेले आमरण उपोषण आज सातव्या दिवशी पोहोचले असून सरकारने अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही. याची गांभीर्याने दखल घेऊन मराठा समाजाचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अन्यथा मराठा समाजाचा उद्रेक होईल, असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघ, कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

शासनाच्या न्या. शिंदे समितीने शोधलेल्या ५८ लाख कुणबी नोंदणी धारकांना तातडीने कुणबी दाखले द्यावेत. जात पडताळणी विभागाने विनाकारण त्रुटी काढून दाखले देण्यास विलंब करू नये. सारथी व आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळास शासनाने तातडीने प्रत्येकी एक हजार कोटीचा भरीव निधी द्यावा. तसेच कोल्हापूर, सातारा गॅझेट लागू करावे, या प्रमुख मागण्यांसाठी हे उपोषण सुरू आहे.

या मागण्यांची शासनाने त्वरीत दखल घेऊन पूर्तता करावी. अन्यथा येत्या १२ सप्टेंबर रोजी मुंबई येथे महाआंदोलन करावे लागेल व यानंतर होणाऱ्या गंभीर परिणामास राज्य शासन जबाबदार राहील, असे निवेदनात म्हटले आहे.

याबाबतचे निवेदन प्रतिनिधी स्वरूपात आग्रा तहसीलदारांकडे देण्यात आले असून यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे , सी.आर. देसाई, प्रकाश देसाई, शंकरराव शिंदे, महादेव पोवार, डॉ. धनाजी राणे, सी.डी.सरदेसाई, किरण तानवडे, दत्तात्रय मोहिते, शिवाजी इंजल उपस्थित होते.

गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांच्या परतीसाठी जादा एसटी गाड्या सोडा…

आगार प्रमुखांना निवेदन

आजरा : प्रतिनिधी

गणेशोत्सवाचा आनंद उरकून पुन्हा कर्मभूमीकडे निघणाऱ्या चाकरमान्यांची परतीच्या प्रवासात होणारी परवड थांबवण्यासाठी एसटी प्रशासनाने तातडीने अतिरिक्त बस फेऱ्यांचे नियोजन करावे, अशी जोरदार मागणी आज निवेदनाद्वारे आगार प्रमुखांकडे करण्यात आली. सण संपल्यानंतर स्थानकांवर होणारी गर्दी, गाड्या वेळेत न मिळणे आणि ताटकळत राहावे लागणे यांमुळे चाकरमान्यांचे अतोनात हाल होतात. हे हाल टाळण्यासाठी प्रशासनाने वेळेत योग्य पावले उचलावीत असा सूर या प्रसंगी उमटला.

हे निवेदन देतेवेळी जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई, वृषाल हुक्केरी, किशोर जाधव, शंकर सुतार आणि सचिन इंदुलकर उपस्थित होते. लालपरी आणि मुंबई-ठाण्यात राबणाऱ्या चाकरमान्यांचे नाते जिव्हाळ्याचे आहे. त्यामुळे विसर्जनानंतर परतणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन जादा गाड्यांचे वेळापत्रक आणि आरक्षण वेळेत जाहीर करावे, अशी विनंती लोकप्रतिनिधींनी केली.

आनंदराव नादवडेकर पतसंस्थेला ५९ लाखांचा उच्चांक नफा : सोमवारी वार्षिक सभा

आजरा : प्रतिनिधी

प्राथमिक शिक्षकांची आदर्शवत पतसंस्था अशी ओळख असणाऱ्या आनंदराव नादवडेकर प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेला गत आर्थिक वर्षात तब्बल ५९ लाख ३ हजार १९९ रुपयांचा निव्वळ नफा झाला असून सभासदांना एकूण सभासद लाभांश १५% सभासद दिवाळी भेट १३% व सभासद दिवाळी भेटवस्तू ४% असा तब्बल ३२% इतका लाभांश संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा सुभाष नाईक उपाध्यक्षा शुभांगी बाबुराव पेडणेकर व संचालक मंडळाने पत्रकार बैठकीत बोलताना जाहीर केला आहे.

संस्थेचे भाग भांडवल ९३ लाख ३७ हजार इतके असून संस्थेकडे ६८ कोटी ६२ लाखांच्या ठेवी आहेत तर ५० कोटी ५५ लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. संस्थेला सातत्याने लेखापरीक्षणाचा ‘अ’ वर्ग प्राप्त झाला असल्याचेही सौ.नाईक यांनी सांगितले.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी पंडित, संचालक सदाशिव दिवेकर, प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक शिवाजी बोलके, शिक्षक नेते सुनील शिंदे, अनिल गोवेकर ,सुभाष नाईक यांच्यासह सर्व संचालक व व्यवस्थापक तुकाराम प्रभू उपस्थित होते.

आजऱ्यात आठवडा बाजारात रानभाजी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

आजरा : प्रतिनिधी

शुक्रवारच्या आठवडा बाजाराचे औचित्य साधून आजरा तालुका कृषी विभाग आणि रणरागिणी महिला बचत गट, बोलकेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आजरा येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. शासनाच्या माध्यमातून आठवडा बाजारात प्रथमच अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन झाल्याने नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

महोत्सवात बचत गटातील महिलांनी विविध प्रकारच्या पारंपरिक, नैसर्गिक व औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्या विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. यामध्ये कुर्डू, कारटूल, भारंगी, चवळी, कुरुकली, पात्री, उंदीरकान, कांगुनी, अळू, अंबाडी आदी रानभाज्यांचा समावेश होता.

रानभाज्यांमध्ये नैसर्गिकरीत्या मिळणारे जीवनसत्त्वे, खनिजे, तंतुमय पदार्थ व विविध पोषक घटक असल्याने त्या आहाराच्या दृष्टीने उपयुक्त मानल्या जातात. स्थानिक वातावरणात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या या भाज्यांमुळे पारंपरिक आहारपद्धती जपण्यासही मदत होते. त्यामुळे दैनंदिन आहारात योग्य पद्धतीने रानभाज्यांचा समावेश करण्याचे आवाहन बचत गटातील महिलांनी नागरिकांना केले.

रानभाज्यांचे महत्त्व समजावून सांगितल्यानंतर नागरिकांनी विविध भाज्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. त्यामुळे महिला बचत गटालाही चांगला आर्थिक लाभ झाला. स्थानिक उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देतानाच आरोग्यदायी पारंपरिक आहाराचा प्रचार करणारा हा उपक्रम ठरला.

यावेळी रणरागिणी महिला बचत गटाच्या सारिका बोलके, अश्विनी कोलेकर, गीता बोलके, शालन डोंगरे, पुष्पा बोलके, उज्ज्वला कोलेकर, सरिता बोलके, मंगल बोलके, रुपाली कोलेकर, वर्षा बोलके, सुवर्णा भादवणकर, सुनीता कोलेकर, नीता बोलके, किशोर कतकर आदी महिला उपस्थित होत्या.

संघर्षाला लाभलीली यशाची किनार, शर्वरी सावंत ची एमबीबीएससाठी निवड


उत्तूर : प्रतिनिधी 

उत्तूर (ता. आजरा) येथील शर्वरी शिवाजी सावंत हिने राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) २०२६ मध्ये ५१७ गुण मिळवत एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सोलापूर येथील अश्विनी रूरल मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्याच प्रवेश फेरीत तिची निवड निश्चित झाली.वैद्यकीय शिक्षणाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसतानाही शर्वरीने जिद्द, सातत्य आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर हे यश मिळवले. मर्यादित साधनांमध्ये अभ्यास करत तिने नीट परीक्षेची प्रभावी तयारी केली आणि वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न साकार केले. शर्वरीच्या यशाबद्दल पालक, शिक्षक, नातेवाईक आणि उत्तूर परिसरातील ग्रामस्थांकडून तिचे अभिनंदन होत असून, तिच्या यशाने परिसरातील विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.

निधन वार्ता
सोमा कांबळे

किणे, तालुका आजरा येथील सोमा तातोबा कांबळे (वय १०२ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, दोन विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

आजरा तालुका खरेदी विक्री संघाचे माजी संचालक शंकर सोमा कांबळे यांचे ते वडील होत.

आजचे पंचांग

दिनांक : ५ सप्टेंबर २०२६
वार : शनिवार
माह (अमावस्यांत) : श्रावण
माह (पूर्णिमांत) : भाद्रपद
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : नवमी तिथी (रात्री ०९.५३ पर्यंत) त्यानंतर दशमी तिथी
नक्षत्र : मृगशीर्ष नक्षत्र (रात्री ०९.३० पर्यंत) त्यानंतर आर्द्रा नक्षत्र
योग : वज्र योग (दुपारी १२.४६ पर्यंत) त्यानंतर सिद्धि योग
करण : तैतुला करण (सकाळी ११.०४ पर्यंत) त्यानंतर गराजा करण
चंद्र राशी : वृषभ राशी (सकाळी १०.१७ पर्यंत) त्यानंतर मिथुन राशी
सूर्य राशी : सिंह राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०९.३१ ते सकाळी ११.०४ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१२ ते दुपारी ०१.०२
सूर्योदय : सकाळी ०६.२५
सूर्यास्त : सायंकाळी ०६.४९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

 

संबंधित पोस्ट

बुधवार – सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

उचंगी परिसरात हत्तीचा धुमाकूळ पावर ट्रीलर केले पलटी

mrityunjay mahanews

आजरा तालुक्यातील आजच्या ठळक घडामोडी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!