शुक्रवार ८ मे २०२६


तुफान पावसाने आजर्याला झोडपले
विज गायब… झाडे कोसळली

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहर व तालुक्यामध्ये पावसाने विजेच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे ठिकठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. आजरा – पेरणोली मार्गावर वृक्ष कोसळल्याने एका चार चाकीचे मोठे नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत विद्युत पुरवठा खंडित झाला होता.
दुपारी अचानकपणे सुरू झालेल्या या पावसामुळे शहरातील ठिकठिकाणी गटर्समधील पाणी रस्त्यावर आले. रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.
सुमारे तासभर ५५ मिनिटे पावसाची नोंद झाल्याचे सांगण्यात आले. पावसामुळे वीट व्यावसायिकांसह काजू आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे.
साळगाव कोळींद्रेकर सुटले…
केवळ एक दिवस महालक्ष्मी यात्रा आधी झाल्याने साळगाव व कोळींद्रे येथील ग्रामस्थ पावसाच्या तडाख्यातून बचावले. हाच पाऊस जर बुधवारी झाला असता तर स्थानिक ग्रामस्थ व्यापारी व यात्रेकरूंची मोठी दैना झाली असती.

पंचायत समितीच्या बांधकाम विभाग जि. प. सभापती नांदेकर यांच्याकडून धारेवर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जिल्ह्यातून पदाधिकारी कामकाजाचा आढावा घेण्यासाठी येणार असल्याची कल्पना देवून देखील अधिकाऱ्यांकडे माहीतीची टिप्पण नाही. मग अधिकारी करतात तरी काय ? आढावा मांडता येत नसेल तर, पुढे काम करणेच अवघड आहे. असा संताप व्यक्त करीत जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य विभागाच्या सभापती सारीका नांदेकर यांनी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. कामकाजाची पध्दत सुधारण्याचा सल्ला दिला.
सभापती सौ. नांदेकर या काल आजरा तालुक्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी आरोग्य व बांधकाम विभागाचा आढावा घेतला. उत्तूर व भादवण प्राथमिक आरोग्य केंद्राना भेटी दिल्या व तेथील समस्या जाणून घेवून सूचना दिल्या. सभापती जयश्री गाडे, पंचायत समिती सदस्य समीर पारदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द पिंपळे, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रविद्र गुरव उपस्थित होते.
येथील पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक झाली. डॉ. गुरव यांनी आरोग्य विभागाचा आढावा मांडला. बांधकाम विभागाचे अधिकारी आढावा मांडण्यासाठी उभे राहील्यावर कामकाजाची टिप्पणी कुठे आहे अशी विचारणा सभापती नांदेकर यांनी केली. अधिकारी गडबडले. त्यांनी वीज गेल्याचे कारण सांगीतले. यावर सौ. नांदेकर संतापल्या.कामकाजाचा आढावा घेण्यासाठी येत असल्याची कल्पना देवून देखील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. एवढा गचाळपणा कसला ? यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही. असे सांगत कामकाजाची पध्दत सुधारा असा सल्ला दिला. अधिकाऱ्याना चांगलेच धारेवर धरले.
या वेळी बाबा नांदेकर, सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रचे जिल्हा अध्यक्ष जी. एम. पाटील, संजय गाडे यांच्यासह दोनही विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मनिषा घोडे यांनी आभार मानले.

महिला कर्मचारी करणार आज सामूहिक मुंडण
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
राज्यातील समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आंदोलन तीव्र झाले आहे. आता महिला कर्मचाऱ्यांनी थेट मुंडण आंदोलनाचा इशारा दिला आहे. सातत्याने आंदोलन करूनही दखल घेतली जात नसल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी आज ८ मे रोजी सामूहिक मुंडण करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यभर खळबळ उडाली आहे.९ मार्च २०२६ पासून तीन हजारांहून अधिक कंत्राटी कर्मचारी आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण व अन्न त्याग आंदोलन करत आहेत. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २० एप्रिल रोजी पुरुष कर्मचाऱ्यांनी मुंडण आंदोलन केले होते. मात्र त्यानंतरही शासनाकडून ठोस निर्णय झाला नाही.
समग्र शिक्षा अभियानात मागील २० ते २५ वर्षांपासून अनेक कर्मचारी मानधन व कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहेत. विषय साधन व्यक्ती, विशेष शिक्षक, डेटा एंट्री ऑपरेटर, लेखा कर्मचारी, एमआयएस समन्वयक, अभियंता, जिल्हा समन्वयक, सहायक कार्यक्रम अधिकारी तसेच कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विविध पदांवर हे कर्मचारी कार्यरत आहेत. दीर्घ सेवेनंतरही कायमस्वरूपी नियुक्ती न मिळाल्याने त्यांच्यात असंतोष वाढला आहे.

आजचे पंचांग
दिनांक : 8 मे 2026
वार : शुक्रवार
माह (अमावस्यांत) : वैशाख
माह (पूर्णिमांत) : ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : षष्ठी तिथी (दुपारी 12:21 पर्यंत) त्यानंतर सप्तमी तिथी
नक्षत्र : उत्तराषाढा नक्षत्र (रात्री 09:19 पर्यंत) त्यानंतर श्रवण नक्षत्र
योग : शुभ योग (9 मे रात्री 02:29 पर्यंत) त्यानंतर शुक्ल योग
करण : वाणीजा करण (दुपारी 12:21 पर्यंत) त्यानंतर विस्ती भद्रा करण
चंद्र राशी : मकर राशी
सूर्य राशी : मेष राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी 10:58 ते दुपारी 12:35 पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी 12:09 ते दुपारी 01:01
सूर्योदय : सकाळी 06:08
सूर्यास्त : सायंकाळी 07:02
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: 2083 विक्रम संवत
शक संवत: 1948 शक संवत
छायावृत्त…

मौजे पेरणोली सरपंच सौ. वनश्री रवींद्र देसाई आणि कोरीवडे सरपंच श्री.विवेक दिगंबर पाटील यांची लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडी झाल्याबद्दल आजरा तालुका मराठा महासंघ,आजरा व आजरा तालुका सरपंच संघटना,आजरा यांचे मार्फत सत्कार करण्यात आला.

आयपीएल न्यूज
काल गुरुवारी झालेल्या लखनौ विरुद्ध बंगळूरू सामन्यांमध्ये लखनौने जोरदार विजय मिळवला. ५६ चेंडू नाबाद १११ धावा करणाऱ्या मिचेल मार्शला सामनावीर घोषित करण्यात आले.
आजचा सामना
दिल्ली विरुद्ध कोलकत्ता
वेळ : सायंकाळी 7:30 पासून
गुणतक्ता…
१. हैदराबाद – १४
२.पंजाब – १३
३ बंगळूरू – १२
४. राजस्थान – १२
५. गुजरात – १२


