गुरुवार १६ एप्रिल २०२६

शक्तीपीठचा अट्टाहास बंद करा…
शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्या बैठकीतील सूर
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गरज नसतांना शक्तीपीठ महामार्ग करू नका. याबाबत अट्टाहास धरू नये. यामधे शेतीच्या जमीनी जाणार आहेत. शेतकरी उध्वस्त होणार आहे. हा महामार्ग रद्द करावा. यातून कोणाचा स्वाभिमान दुखावण्याची गरज नाही. यापेक्षा लोकहिताची कामे हाती घ्या , असे विनंतीपूर्वक आवाहन कॉंग्रेसचे गटनेते व आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्याना केले.
येथील ‘मृत्यूंजय’कार शिवाजीराव सावंत स्मृती दालनात शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्यावतीने शेतकऱ्यांचा मेळावा झाला. या वेळी आमदार पाटील बोलत होते. स्वाभिमानी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी, माजी नामदार राजेश पाटील, गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर, मुकुंदराव देसाई, सुधीर देसाई, राजेंद्र गड्यान्नावर, प्रा. सुनिल शिंत्रे, चंदगड पंचायत समिती सभापती विलास नाईक, अभिषेक शिंपी, अशोक तर्डेकर, संजय सावंत, गिरीष फोंडे प्रमुख उपस्थित होते.
निमंत्रक संपत देसाई यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात ते म्हणाले, येथील शेती, पर्यावरण व संस्कृती उध्वस्त करणारा हा महामार्ग आहे. महामार्ग जाणाऱ्या गावात या विरोधात जनजागृती सुरु असून लढा संघटीत केला जात आहे. आमदार सतेज पाटील म्हणाले, गरज नसतांना हा महामार्ग केला जात आहे. याला सुमारे १ लाख कोटी खर्च येणार आहे. याचा डीआरपी देखील झालेला नाही. हेच पैसे राज्यातील ४२ हजार गावामधे रस्ते, गटर्स व अन्य विकासकामासाठी खर्च कले तर गावांचा विकास होईल. माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, शक्तीपीठाची मागणी अव्यवहार्य आहे. यामुळे काही मंडळीना विकास होणार असे वाटते त्यांनी भ्रमात राहू नये. या रस्त्याच्या उभारणीत भराव टाकला जाणार असून महापपुराचा धोका आहे. एक्सप्रेस हायवे असल्याने येथे एन्ट्री नाही. रोजगार निर्माण होण्याचा प्रश्न नाही. या महामार्गची किंमत १ लाख हजार कोटी झाली. राष्ट्रीय महामार्ग व शक्तीपीठ महामार्ग याच्या किंमतीत मोठी तफावत असून यातून ठेकेदारांची घरे भरणार असे वाटते.
प्रा. शिंत्रे म्हणाले, आंदोलनाला शिवसेना उबाठाचा पाठिंबा आहे. माजी आमदार राजेश पाटील, राजेंद्र गड्यान्नावर, मुकुंदराव देसाई, तानाजी देसाई, प्रा. सुनिल शिंत्रे, का. संजय तर्डेकर, गिरीष फोंडे, सम्राट मोरे, सभापती विलास नाईक यांची भाषणे झाली.
यावेळी विठ्ठलराव देसाई, युवराज पोवार, राजू होलम, डी. ए. पाटील, प्रकाश मोरुस्कर, डॉ. धनाजी राणे, संजय देसाई, युवराज जाधव, निवृत्ती कांबळे, हरिभाऊ कांबळे, संजयभाऊ सावंत, दिनेश कांबळे, सुजय पाटील, सागर नाईक, रवी तळेवाडीकर, आनंदा कुंभार, रवि भाटले, सुभाष देसाई, प्रकाश मोरुस्कर, निवृत्ती कांबळे, शिवाजी इंगळे, सर्जेराव देसाई, रणजित देसाई , सुरेश कालेकर, यांच्यासह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
आमदार शिवाजी पाटील यांच्यावर जोरदार टीका…
यावेळी आमदार शिवाजीराव पाटील यांच्यावर वक्त्यांनी जोरदार टीका केली. भांडवलदारांचे बटीक असणाऱ्या आमदारांना रोखण्याची गरज असल्याचेही सांगितले.

पेरणोली सरपंच निवड चुरशीची होणार…
बिनविरोधला खोडा.?

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची पोटनिवडणूक बिनविरोध होईल अशा अपेक्षित असणाऱ्या मंडळींचे सरपंच पदावर बसण्याचा मार्ग खडतर झाला असून तब्बल दहा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध सरपंच निवडीची शक्यता जवळजवळ संपुष्टात आली आहे.
दोन अडीच वर्षासाठी कशाला खर्च करा अशी भूमिका काही मंडळींनी घेतली होती. परंतु प्रत्यक्षात अर्ज दाखल करताना राजश्री उदयराज पवार, संध्या संतोष कालेकर, संजीवनी मारुती नावलकर, राजश्री दीपक देसाई, दिपाली सचिन देसाई, शितल लक्ष्मण हाळवणकर ,आशा उदय कोडक, जिजाबाई तुकाराम सासुलकर, स्वाती राजेंद्र कालेकर, वनश्री रवींद्र देसाई यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सर्वच उमेदवार इच्छुक असल्याने नेते मंडळींसमोर पेच निर्माण झाला आहे.
आपलेच घोडे पुढे दामटण्यासाठी इतरांना माघार घेण्यासाठी काही इच्छुक मंडळी प्रयत्नशील आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केलेली यांची संख्या विचारात घेतली व काहींनी माघार घेतली तरीही निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडणार असे दिसत आहे.

पाठ्यपुस्तकातील वादग्रस्त मजकूर बदला
मराठा महासंघाची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात मराठा साम्राज्याचा नकाशा पूर्ववत समाविष्ट करून त्यामधे राजपुताना प्रदेश मराठा प्रभावक्षेत्रातं दाखवण्यात यावा. अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने करण्यात आली आहे. नॅशनल कौन्सील ऑफ एज्युकेशन सिसर्च ॲण्ड प्रशिक्षण (एनसीईआरटी) चे संचालकांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.
एनसीईआरटीच्या इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकामधे पूर्वी समाविष्ट असलेला मराठा साम्राज्याचा नकाशा अलिकडील आवृत्यांमध्ये वगळण्यात आलेला आहे. हा नकाशा पुन्हा समाविष्ट करून त्यामधे राजपुताना (राजस्थान) हा मराठा साम्राज्याच्या प्रभावक्षेत्रात दाखवावा. याबाबत मराठा मारवाड संबंध (सन १७२४- १८४३) या ग्रंथामध्ये राजस्थान हिंदी ग्रथ अकादमी जयपुर यांनी प्रकाशीत केलेल्या दस्तऐवजामध्ये मराठा आणि राजपूत राज्यामधील संबंध स्पष्टपणे नोंदवलेले आहेत. या पत्रामध्ये मराठा सरदाराकडे मदत, संरक्षण व सैन्य पाठवण्याच्या विनंत्या करण्यात आल्या आहेत. संबंधीत पत्रव्यवहारामधे विविध राजपूत शासकांनी मराठा सरदारांना थेट विनंती करून सैन्य मदत मागीतल्याचे नामोल्लेख आहेत. या वरून या प्रदेशावर मराठ्यांचा प्रभाव व राजकीय वर्चस्व सिध्द होते. १७५२ च्या करारानंतर मुघल बादशहा मराठ्यांच्या संरक्षणाखाली गेला होता. परिणामी मुघलांचे मांडलिक असलेले अनेक राजपूत शासक अप्रत्यक्षपणे मराठ्याच्या सत्तेखाली आले होते. असा इतिहासकारांचा सर्वसामान्य निकष आहेत. विविध एतिहासिक कागदपत्रावरून मराठ्यांनी राजस्थानातील प्रदेशातून चौथाई व सरदेशमुखी वसूल केली ही बाब त्याच्या प्रभावी राजकीय अधिकाराचे द्योतक आहे. यासह विविध प्रावे सादर केले आहेत. त्यामुळे आठवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात मराठा साम्राज्यचा नकाशा पूर्ववत समाविष्ट करून त्यामधे राजपुताना प्रदेश मराठा प्रभावक्षेत्रात अशी मागणी केली आहे.
याबाबतचे लेखी पत्र देण्यात आले असून निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण, यांच्यासह मान्यवरांच्या सह्या आहेत.

छाया वृत्त

एकता फाउंडेशन मुरूडे यांच्या वतीने मुरूडे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सूभाष भादवणकर, अर्जुन भादणकर, संजय पाटील, आप्पा दोरूगडे, रामचंद्र पाटिल, मारूती पाटील, महादेव पाटील विष्णू पाटील, भाऊराव पाटील, सुरेश कांबळे, अंकुश कांबळे, सागर कांबळे आदी उपस्थित होते.

निधन वार्ता सौ.अनुसया मुरुकटे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कानोली (ता. आजरा ) येथील सौ. अनुसया गणपती मुरुकटे ( वय ५४ वर्षे ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले, अचानक घडलेल्या घटनेने त्यांच्या कुटुंबियांवार मोठा आघात झाला आहे.
त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, नातू व मुलगी असा परिवार आहे.

फोटो क्लिक

गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे अनेक व्यावसायिकांनी शहरातील दुकाने बंद ठेवली आहेत. आजरा बस स्थानक परिसरातील हे चित्र…
आजचे पंचांग
दिनांक : १६ एप्रिल २०२६
वार : गुरुवार
माह (अमावस्यांत) : चैत्र
माह (पूर्णिमांत) : वैशाख
ऋतु : वसंत
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : चतुर्दशी (रात्री ०८.११ पर्यंत) त्यानंतर अमावस्या तिथी
नक्षत्र : उत्तराभाद्रपदा नक्षत्र (दुपारी ०१.५८ पर्यंत) त्यानंतर रेवती नक्षत्र
योग : इन्द्र योग (सकाळी १०.३७ पर्यंत) त्यानंतर वैधृति योग
करण : विस्ती भद्रा करण (सकाळी ०९.२५ पर्यंत) त्यानंतर शकुनी करण
चंद्र राशी : मीन राशी
सूर्य राशी : मेष राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०२.१३ ते दुपारी ०३.४७ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१३ ते दुपारी ०१.०४
सूर्योदय : सकाळी ०६.२२
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५५
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

आयपीएल न्यूज
लखनौचा पराभव करून बंगळूरूने अव्वलस्थानी झेप घेतली आहे. जोश डेझलवूड सामनावीर ठरला. लखनौने २० षटकात १४६ धावांचे ठेवलेले लक्ष्य बंगळूरूने १५.१ षटकात पूर्ण केले.
आजचा सामना
मुंबई विरुद्ध पंजाब स्थळ : वानखेडे स्टेडियम मुंबई
वेळ : सायंकाळी ७.३० पासून


