

होन्याळी येथून महाविद्यालयीन तरुणी बेपत्ता
होन्याळी (ता. आजरा) येथून अठरा वर्षीय महाविद्यालयीन तरुणी बेपत्ता झाल्याची वर्दी संबंधित मुलीच्या वडिलांनी पोलिसात दिली आहे. महाविद्यालयास जातो म्हणून बुधवारी घराबाहेर पडलेली संबंधित मुलगी अद्याप घरी परतलेली नाही. ती बेपत्ता असल्याची वर्दी आजरा पोलिसात देण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आजरा तालुक्यात उत्साहात अभिवादन
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त आजरा तालुक्यामध्ये ठीक- ठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले .
आजरा तालुक्यातील प्रमुख शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था येथे डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आजरा शहरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली .जोरदार आतषबाजी व वाद्यांच्या निनादात निघालेली ही मिरवणूक आजरा शहरवासीयांचे खास आकर्षण ठरली.
ग्रामीण भागातही फोटो पूजनासह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले .


सन 2021-22 यावर्षी 17 हजार कोटींचा महसूल जमा; राज्य उत्पादन शुल्क विभागाची माहिती

राज्य उत्पादन शुल्क विभागाने सन 2021-22 या आर्थिक वर्षात 17177.19 कोटी रूपयांचा महसूल जमा केला आहे. विभागाने सन 2020-21 यावर्षी 15078.25 कोटी रूपयांचा महसूल जमा केला होता. सन 2020-21 यावर्षीच्या तुलनेत यावर्षी महसूलात 13.92 टक्के वाढ झाल्याची माहिती विभागामार्फत देण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभाग राज्यात मद्य निर्मिती, घाऊक विक्री, किरकोळ विक्री इ. अनुज्ञप्त्या देणे व त्यांची तपासणी करुन नियमन करणे, मद्यावरील कर गोळा करणे इ. कार्य प्रामुख्याने करीत असतो. तसेच राज्यातील अवैध मद्य् निर्मिती, विक्री, वाहतूक, बनावट मद्य, परराज्यातून होणारी अवैध मद्याची तस्करी इ. विरुध्द सज्ज राहून महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 अन्वये फौजदारी गुन्हे दाखल करुन त्याचे उच्चाटन व नियंत्रणाचे कामकाज करीत असतो.

शिवप्रेमी कार्यकर्त्यांची सोमवारी
आज-यात बैठक…
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर विविध उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमांची रूपरेषा ठरवण्यासाठी आजरा नगरपंचायत सभागृहात सोमवार दिनांक 18 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता शिवप्रेमी नागरिकांची बैठक बोलावण्यात आली असल्याची माहिती नगरसेवक आनंदा कुंभार यांनी दिली.
सदर बैठकीमध्ये येणारी शिवजयंती ही जोरात साजरी करण्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात येणार , असून कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात येणार असल्याचे कुंभार यांनी सांगितले. बैठकीस शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.


