
स्थानिकांच्या भूमिकांमुळे नेत्यांमध्ये संभ्रम

आजरा मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गेल्या दीड-दोन वर्षामध्ये राज्यातील राजकीय समीकरणांची उलथापालथ झाल्याने आजरा तालुक्यातील स्थानिक नेते मंडळी लोकसभा निवडणुकीत अडचणीत येऊ लागली असून नेमक्या भूमिका स्पष्ट करताना अनेक जणांना काळजी घ्यावी लागत आहे. यामुळे जिल्हा पातळीवरील नेत्यांना मतांची गणिते मांडताना संभ्रमावस्था निर्माण होऊ लागली असून समोर नगरपंचायतीचे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका असताना राजकीय पटलावर हा सावळा गोंधळ निर्माण झाला आहे.
विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे कट्टर समर्थक जयवंतराव शिंपी, नगरसेवक अभिषेक शिंपी यांची मध्यंतरीच्या कालावधीत आमदार सतेज पाटील यांच्याशी जवळीक वाढल्याने या निवडणुकीत ते महाआघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहणार हे स्पष्ट आहे. या निवडणुकीत त्यांना अण्णाभाऊ संस्था समुहाचे प्रमुख अशोकअण्णा यांच्यापासून बाजूला व्हावे लागणार आहे. अशोकअण्णांनी भाजपाचा झेंडा हातात घेतल्यानंतर समरजीतसिंह घाटगे यांना समर्थन दिले आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना आपण वैतागलो आहोत असे त्यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. परंतु पालकमंत्री मुश्रीफ यांनी पंतप्रधान मोदी हेच पुन्हा पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत असे सांगत महायुतीच्या प्रचारात उतरून गुगली टाकली आहे. वरिष्ठ पातळीवरच्या आघाड्या स्थानिक नेतेमंडळींची डोकेदुखी ठरत आहेत. कारखाना निवडणुकीत अशोक चराटी यांच्या आघाडीसोबत असणारे शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर यांनाही महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत रहावे लागणार आहे.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची अवस्थाही फारशी वेगळी नाही. या मंडळींना महायुती देईल त्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होण्याशिवाय पर्याय नाही. आमदार प्रकाश आबिटकर यांचे कार्यकर्ते महायुतीच्या प्रचारात राहतील तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत रहावे लागणार आहे.लोकसभा निवडणुकीत भाजपा मात्र एकसंघपणे महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहील असे दिसते.
एकंदर परिस्थिती पाहता महायुतीच्या उमेदवारासह महाविकास आघाडीच्या उमेदवाराला वेगवेगळ्या दिशेला तोंडे असणाऱ्या स्थानिक नेते मंडळींची मोट बांधताना बरीच कसरत करावी लागणार आहे हे स्पष्ट होत आहे.

दर्गा गल्लीतील विहीर मोजतेय अखेरच्या घटका

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील दर्गागल्लीतील तकीलदार वसाहतीतील विहीर आज अखेरच्या घटका मोजत आहे. विहिरीची देखभाल कमी झाली. त्याचे पर्यवसान म्हणून विहीर ढासळत चालली आहे. शिवसेनेचे (उ.बा.ठा.) रेहान तकीलदार यांनी नगरपंचायतीला विहीर दुरुस्तीविषयी निवेदन दिले. परंतु ही विहीर सार्वजनिक नाही म्हणून नगरपंचायतीवर याबाबत मर्यादा येत आहेत. विहीर दुरुस्त झाल्यास या भागातील पाणी प्रश्न कमी होण्यास मदत होणार आहे.

श्री पार्वती -शंकर विद्यामंदिर व विद्यालयाचे
गणित व विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत यश
उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्यावतीने आयोजित श्री रामानुजन गणित प्रज्ञा व डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत श्री पार्वती- शंकर विद्यामंदिर व विद्यालयाच्या ९ विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर उत्तुंग यश संपादन केले.
गणित प्रज्ञाशोध परीक्षेत इ. ८वी मधील कु.अनुष्का सुनील पोटे ही विद्यार्थिनी कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम येऊन शिष्यवृत्तीस पात्र ठरली. ओम दत्तात्रय सुतार, कु.श्रेया संदीप खोराटे, कु.गौरी संजय भिऊंगडे,अथर्व पांडुरंग भाटले , कु.आर्या अनिल घोरपडे, कु.आर्या संदीप खोराटे हे विद्यार्थी जिल्हास्तरावर प्रज्ञापात्र ठरले. तालुकास्तरावर १९ पैकी १७ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरासाठी निवड झाली होती. या विद्यार्थ्यांना गणित अध्यापिका सौ. वैशाली पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तालुकास्तरीय परीक्षेत पाचवी मधील ३० पैकी १६ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरासाठी निवड झाली होती.
विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत इ. ६ वी मधील कु. रसिका सुनील चव्हाण या विद्यार्थिनीने जिल्हास्तरावर ९४ गुण घेऊन ती शिल्लडधारक झाली. या परीक्षेत ६वी मधून १३ व ९वी मधून १२ विद्यार्थ्यांची जिल्हास्तर परीक्षेसाठी निवड झाली होती. सौ. भारती शिवणे यांचे मार्गदर्शन लाभले.

रिपब्लिकन सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सुरेश दिवेकर,संपर्क प्रमूखपदी परशुराम कांबळे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
रिपब्लिकन सेना पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सुरेश पांडूरंग दिवेकर व आजरा तालुका संपर्क प्रमुखपदी परशुराम ईश्वर कांबळे रा.मडिलगे यांची निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पश्चिम विभागप्रमूख अर्जून कांबळे होते.
याप्रसंगी कोल्हापूर पूर्व विभाग अध्यक्ष बाबासाहेब कामत, जिल्हा सचिव सागर करडे,कोल्हापूर शहर प्रमुख प्रवीण आजरेकर,तालूका अध्यक्ष विजय कांबळे, उपाध्यक्ष गोपाळ होण्याळकर, तालुका युवाध्यक्ष अविनाश कांबळे, तालुका युवा उपाध्यक्ष मधुकर कांबळे, तालुका सचिव नंदकुमार कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

नागझरी ते ग्रामीण रूग्णालय गटर्स बांधकाम करण्याची मागणी

आजरा:मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरातून चाफेगल्ली ते आजरा ग्रामीण रूग्णालय या रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटर्स बांधकाम करावे अशी मागणी छत्रपती संभाजीराजे नगरमधील नागरीकांनी केली आहे. याबाबतचे निवेदन आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांना देण्यात आले आहे.
रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खुदाई झाली आहे.त्यामुळे ऐन पावसाळ्यात रस्त्यावर पाणी तुंबून सर्वत्र चिखलाचे साम्राज्य होणार आहे.पावसाळ्यात ग्रामीण रूग्णालयापासून नागझरी ओढ्यापर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी वाहते. हे पाणी रस्त्यावरूनच ओढ्यापर्यंत येत असल्याने रस्ता खराब होतो. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी गटर्सचे काम पूर्ण करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर शंकर पाटील, सुहास मुळीक, किशोर पोवार, रणजित सुर्यवंशी, जयश्री बोलके, श्रीकांत सुतार यांच्यासह नागरीकांच्या सह्या आहेत.

आर्यन पोवार याची शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी निवड

उत्तूर:मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर –जिल्हा परिषदेकडून आजरा तालुक्यातून उत्तुर केंद्र शाळेचा विद्यार्थ्यांची शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी एकमेव निवड करण्यात आली. यामध्ये विद्यार्थी कु.आर्यन सचिन पोवार यांचा समावेश आहें.
जि. प. व मनपा शाळेतील इयत्ता सहावी व आठवीतील विद्यार्थ्यांची कोल्हापूरमध्ये सरप्राईज निवड परीक्षा घेण्यात आली.या परीक्षेत कोल्हापूरसह जिल्ह्यातून सर्व बारा तालुक्यातील गेल्या दोन वर्षात पाचवी जि. प. शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत चमकलेल्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेत केंद्र शाळा उत्तूरचा एकमेव विद्यार्थी तालुक्यातून उत्तीर्ण झाला. व त्याची निवड झाली.
त्याला वर्गशिक्षक दिनकर खवरे , सौ. अलका बामणे,एच.एन.पाटील, संतोष शिवणे, प्रशांत पाटील, केंद्र शाळा मुख्याध्यापक संजय पोवार व कन्या शाळा मुख्याध्यापक एन. टी. पाटील व इतर शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

छायावृत्त…

संकेश्वर-बांदा महामार्गाचे काम आजरा शहरातून सुरू असल्याने शहरात वारंवार वाहतुकीची कोंडी होऊन वाहतुकीचा बोजवारा उडत असतानाच बगॅसने ओव्हरलोड भरून जाणारी अवजड वाहने इतर वाहनधारकांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरू लागलेली आहेत. कांही चालत्या वाहनांमधून बगॅस खाली पडत असल्याने दुचाकीस्वारांना त्रास सहन करावा लागत आहे.



