शुक्रवार
२१ ऑगस्ट २०२६

आजऱ्यात भरधाव कारची दुचाकीला धडक ; दोन तरुणी जखमी
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरातील गडहिंग्लज रोडवरील मयूर पेट्रोल पंपासमोर काल दि. २० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता भरधाव वेगातील कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दोन तरुणी जखमी झाल्या.
प्रेरणा रविंद्र सुतार (वय २६ ) व त्यांच्यासोबत असलेल्या मयुरी मस्कर (रा. आजरा) या दोघी दुचाकी वरून जात असताना बेळगावकडील कार चालक संतोष नंदीवाले याने त्याच्या ताब्यातील किया कार हयगय व निष्काळजीपणे, भरधाव वेगाने चालवून समोरून धडक दिली असा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या अपघातात प्रेरणा सुतार व मयुरी मस्कर या दोघी गंभीर जखमी झाल्या असून दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी पुढील तपास पो.हे.कॉ. बेनके करीत आहेत.

हाजगोळी ग्रामपंचायत कार्यालय सीलबंदच…
आज निर्णयाची शक्यता..

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हाजगोळी खुर्द ता. आजरा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी केलेली दफ्तर तपासणीची मागणी या मागणीच्या अनुषंगाने दफ्तरात कोणतेही फेरबदल होऊ नयेत म्हणून पंचायत विस्तार अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकलेले सील हा विषय संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा बनला आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत यावर कोणताही तोडगा निघाला नव्हता बाहेरच्या अधिकाऱ्यांकडूनच या ग्रामपंचायतीची दप्तर तपासणी झाली पाहिजे अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने आजतागायत ग्रामपंचायत कार्यालय हे सीलबंद अवस्थेतच आहे.
आज शुक्रवारी याबाबत निर्णय होणार आहे.
कॅन्सरविरोधी लढ्याला वाटंगीतून बळ ; ६७ नागरिकांची तपासणी

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आरोग्य केंद्र, वाटंगी येथे विशेष कॅन्सर तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या जवळच कॅन्सर तपासणीची सुविधा उपलब्ध करून देत एकूण ६७ नागरिकांची तपासणी करण्यात आली.
शिबिराचे उद्घाटन माजी सभापती श्री. अल्बर्ट डिसोजा, आजरा कारखाना संचालक श्री. शिवाजी नांदवडेकर सर, माजी सरपंच श्री. बाळू पोवार व माजी सरपंच सौ. इंदुबाई कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
यावेळी मा.श्री. अल्बर्ट डिसोजा यांनी मनोगत व्यक्त करताना कॅन्सरच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी आणि आरोग्याबाबत जागरूक राहावे, असे आवाहन केले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. जी. गुरव यांनी कॅन्सरबाबत सविस्तर माहिती देताना कॅन्सरची प्राथमिक लक्षणे, जोखमीचे घटक, प्रतिबंधात्मक उपाय तसेच कॅन्सरचे लवकर निदान होण्याचे महत्त्व याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले. संशयित लक्षणे आढळल्यास वेळ न दवडता पुढील तपासणी व उपचारासाठी संदर्भ सेवा घेण्याचे त्यांनी सांगितले.
शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. जीवन पाटील व दंतचिकित्सक डॉ. गोकुळ जाधव यांनी नागरिकांची तपासणी केली. मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग तसेच गर्भाशयाचा कर्करोग याबाबत आवश्यक तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळणे, आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे आणि नियमित तपासणी करणे याबाबतही जनजागृती करण्यात आली.कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. महेश कोळेकर यांनी केली, तर आभार श्री. रत्नदीप पारधे यांनी मानले.
शिबिराच्या नियोजन व यशस्वी आयोजनासाठी आरोग्य निरीक्षक श्री. अतुल पाथरवट, आरोग्य सहाय्यक श्री. जे. एच. साबखान, आरोग्य सहाय्यिका सौ. गीतांजली सुतार व सौ. रंजना गावडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

धामणे घाटातील धोकादायक चर ठरत आहे
अपघातास निमंत्रण

उत्तूर : मंदार हाळवणकर
धामणे घाटातील धोकादायक वळणावर संरक्षण कठडा उभारण्याचे काम दोन आठवड्यांपूर्वी पूर्ण झाले. मात्र कठड्यालगत तयार झालेली धोकादायक चर अद्यापही मुजविण्यात आली नाही. त्यामुळे घाटातील हे वळण पुन्हा अपघाताला निमंत्रण देत आहे.
धामणे-उत्तूर हा संताजी घोरपडे साखर कारखान्याला जोडणारा प्रमुख मार्ग आहे. या घाटरस्त्यावरून दररोज शेकडो चाकरमानी, विद्यार्थी आणि नागरिकांची वर्दळ असते. वळणावर उघडी असलेली चर विशेषतः दुचाकीस्वारांसाठी गंभीर धोका ठरत आहे.
संरक्षण कठडा उभारल्यानंतर रस्ता पूर्ववत सुरक्षित करणे अपेक्षित असताना ठेकेदाराने चर मुजविण्याकडे दुर्लक्ष केले. अर्धवट कामामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, संबंधित ठेकेदाराने तातडीने चर मुजवून काम पूर्ण करणे आवश्यक आहे.
आजरा तालुका फोटोग्राफर असोसिएशनतर्फे जागतिक फोटोग्राफी दिन उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त आजरा तालुका फोटोग्राफर असोसिएशनतर्फे दीनदयाळ महाविद्यालयाच्या हॉलमध्ये कार्यक्रम उत्साहात पार पडला.
प्राचार्य संजीव देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, तर ज्येष्ठ फोटोग्राफर बी. टी. सुतार यांच्या हस्ते कॅमेरा पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी देसाई म्हणाले, आनंदाचे क्षण जतन करण्यात फोटोग्राफरचा मोठा वाटा आहे. सुतार यांनी ब्लॅक अँड व्हाईट ते रंगीत फोटोग्राफीच्या आठवणी सांगितल्या, “फोटोग्राफरच्या मनात स्पार्क असला तरच फोटो बोलके होतात,” असे ते म्हणाले.
पारंपरिक ते डिजिटल प्रवासावर चर्चा झाली. अध्यक्ष संजय सावंत, शामराव पाटील, श्रीकांत देसाई, राकेश करमळकर यांच्यासह तालुक्यातील फोटोग्राफर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छाया वृत्त

आजरा साखर कारखान्या जवळील रस्त्या लगत चाळोबा डोंगरातून गावातील भटक्या कुत्र्याच्या पाठलागामुळे चितळ गवसे येथील आजरा साखर कारखानाच्या गव्हाणीत पडले.
वन विभागाच्या रेस्क्यू टीमचे वनरक्षक गणेश लहाने आणि गवसे येथील सामाजिक कार्यकर्ते रविंद्र दिवेकर आणि अविनाश हेब्बाळकर व कारखान्याच्या सुरक्षा विभागाने त्याची सुटका केली.
निधन वार्ता
सुनील सावंत

उत्तूर येथील प्रतिष्ठित फळ व्यावसायिक सुनील जोमा सावंत (वय ५०) यांचे बुधवार, दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी आकस्मिक निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व भाऊ असा परिवार आहे. रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी रक्षा विसर्जन करण्यात येणार आहे.
गंगुबाई देसाई

कोळींद्रे येथील गंगुबाई गोविंद देसाई वय ८८ वर्षे यांचे वृद्धापकाळाने काल दिनांक २० रोजी निधन झाले.
त्यांच्या पश्चात मोठा परिवार असून आज शुक्रवार दिनांक २१ रोजी सकाळी ९ वाजता अंत्यविधी कार्यक्रम होणार आहे.
त्या यशवंत देसाई आणि रमेश देसाई यांच्या आई होत.
आजचे पंचांग
दिनांक : २१ ऑगस्ट २०२६
वार : शुक्रवार
माह (अमावस्यांत) : श्रावण
माह (पूर्णिमांत) : श्रावण
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : नवमी तिथी (रात्री ११.३६ पर्यंत) त्यानंतर दशमी तिथी
नक्षत्र : अनुराधा नक्षत्र (सकाळी ११.५२ पर्यंत) त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्र
योग : वैधृति योग (2२२ऑगस्ट पहाटे ०५.१७ पर्यंत) त्यानंतर विष्कुम्भ योग
करण : बलवा करण (सकाळी १०.२५ पर्यंत) त्यानंतर कौलव करण
चंद्र राशी : वृश्चिक राशी
सूर्य राशी : सिंह राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ११.०७ ते दुपारी १२.४२ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१६ ते दुपारी 0०१.०७
सूर्योदय : सकाळी ०६.२२
सूर्यास्त : सायंकाळी ०७.०१
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत


