



लक्ष्मीपूजन पडले चोरट्यांच्या पथ्यावर…
सोन्याच्या दागिन्यांसह ९० हजारांवर रोकड लंपास

आजरा : प्रतिनिधी
खोराटवाडी तालुका आजरा येथील किराणा दुकानांमध्ये लक्ष्मीपूजनानिमित्त पुजलेल्या सोन्याच्या दागिन्यांसह ९० हजारांवर रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की…
खोराटवाडी ता. आजरा येथे अभिजीत आनंदराव येजरे यांचे किराणा मालाचे दुकान आहे. लक्ष्मीपूजनानिमित्त त्यांनी काल दुकानांमध्ये रितसर पूजा केली होती.पूजेकरता घरातील सोन्याचे दागिने व दुकानातील रोकड रुपये ९० हजारावर वापरण्यात आली होती. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ते दुकान बंद करून जवळच असणाऱ्या घरी झोपण्यासाठी निघून गेले.
दरम्यान सकाळी दुकान उघडल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी पूजनासाठी वापरण्यात आलेले दागिने व रोकड लंपास केल्याचे स्पष्ट झाले. दुकानावरील कौले काढून चोरट्याने दुकानात प्रवेश केला. सीसीटीव्ही फुटेज च्या सहाय्याने आजरा पोलीस चोट्यांचा शोध घेत आहे असे समजते. प्राथमिक चौकशीत सदर चोरटे कर्नाटक भागातील असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
पोलिसांनी श्वान पथक तैनात केले असून पुढील तपास सुरू आहे.
एसटीचे वेळापत्रक कोलमडले…
चाकरमान्यांचे हाल

◼️आजरा: प्रतिनिधी◼️
ऐन दिवाळीत एसटीचे वेळापत्रक कोलमडल्याने चाकरमान्यांना नाहक गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे प्रवासी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.
दीपावली कालावधीत प्रवासी संख्या प्रचंड वाढलेली असताना आजरा आगाराच्या विविध मार्गावरील फेऱ्यांचे वेळापत्रक मात्र पूर्णपणे कोलमडून गेले आहे. ग्रामीण भागातील अनेक बस फेऱ्या रद्द करण्यात येत आहेत. त्यामुळे विशेषता चाकरमान्यांची फार मोठी अडचण होऊ लागली आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानकपणे बस फेऱ्या रद्द होत असल्याने तासनतास एसटीची वाट बघण्यात प्रवासी वर्गाचा वेळ वाया जात आहे.
एकीकडे सणासुदीचा हंगाम ‘ कॅश ‘ करण्याच्या दृष्टीने एसटी महामंडळाने प्रवासी भाड्यात वाढ केली आहे, तर दुसरीकडे सामान्यांच्या प्रवासाकरता असणाऱ्या अनेक मार्गावरच्या बस फेऱ्याच रद्द करण्यात आल्याचेही दिसत आहे. लांब पल्ल्याच्या बस फेऱ्या सुरू करत असताना गावागावातील व ग्रामीण भागातील बस फेऱ्या रद्द करणे कितपत योग्य आहे ? असा सवाल आता प्रवासी उपस्थित करू लागले आहेत.




ऐन दिवाळीत झेंडू कोमजला…
फुले टाकून जाण्याची शेतकऱ्यांवर वेळ

◼️आजरा : प्रतिनिधी◼️
गतवर्षी दिवाळी कालावधीत झेंडूचा भाव वधारल्याने झेंडू उत्पादकांची चांदी झाली होती. यावर्षी मात्र झेंडूच्या अतिरिक्त उत्पादनामुळे विक्रीसाठी आणलेला झेंडू अक्षरश: टाकून जाण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली.
गेली काही वर्षे अवकाळी होणाऱ्या पावसामुळे झेंडूचे पीक वाया जाऊन उत्पादनात घट होताना दिसत होती. यामुळें दरही वाढत होते. यावर्षी मात्र पावसाने पाठ फिरवल्याने झेंडूचे प्रचंड उत्पादन झाले आहे. याचा परिणाम म्हणून दीपावली कालावधीत सर्वत्र झेंडूचे विक्रेतेच विक्रेते दिसत होते प्रति किलोचा दर ४० रुपयांपासून ६० रुपयांपर्यंत होता. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तर हा दर अगदी ३० रुपये प्रति किलो पर्यंत खाली आला होता.
दर खाली येऊनही मालाची प्रचंड आवक झाल्याने अपेक्षित उठाव न झाल्याने शिल्लक झेंडू टाकून जाण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली.
प्लास्टिकच्या फुलांमुळे झेंडूची मागणी घटली
झेंडूच्या फुलांचा दर घटण्यामागे उत्पादनात झालेली वाढ हे जरी कारण असले तरी त्याचबरोबर मध्यंतरी अचानकपणे दरात प्रचंड वाढ झाल्यामुळे अनेकांनी झेंडूचे प्लास्टिकचे हार घेण्यास प्राधान्य दिले. दीर्घकाळ टिकणारे व अल्प दरात उपलब्ध होणाऱ्या या प्लास्टिकच्या झेंडूमुळे नैसर्गिक झेंडूचे दर मात्र घटले.




आजऱ्यात किल्ले बनवण्याच्या स्पर्धा

◼️आजरा : प्रतिनिधी◼️
आजरा शहरातील बालगोपाळांकरीता दिवाळीचे खास आकर्षण असणाऱ्या किल्ल्यांच्या स्पर्धांचे नगरसेवक अभिषेक शिंपी यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.
आजरा शहर मर्यादित सदर स्पर्धा असून स्पर्धेसाठी कोणतीही फी नाही. प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे पाच हजार रुपये, तीन हजार रुपये व दोन हजार रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे.
सदर स्पर्धेकरिता इच्छुकांनी आपली नावे १३ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत संयोजकांची संपर्क साधून नोंदवावीत. १८ नोव्हेंबर रोजी तज्ञ परीक्षकामार्फत किल्ल्यांचे परीक्षण करण्यात येईल असे मुख्य संयोजक अभिषेक शिंपी आणि सांगितले.




जनता सहकारी गृहतारण संस्थेमार्फत मार्गदर्शन कार्यक्रम

◼️आजरा : प्रतिनिधी◼️
जनता सहकारी गृहतारण संस्थेमार्फत संचालक व कर्मचारी प्रशिक्षण शिबीर श्रीमंत गंगामाई वाचन मंदीर आजरा येथे आयोजीत करण्यात आले होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन मारुती मोरे यांनी केले.
जनता सह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. बी. पाटील यांनी आधुनिक बॅकींग कार्यप्रणाली यावर माहीती दिली. त्याचबरोबर आजरा अर्बन बॅकेचे असि. जनरल मॅनेजर तानाजी गोईलकर यांनी बँकीग कार्य संस्कृती यावर मार्गदर्शन केले. तसेच मुख्य कार्यालय संचालक डॉ. अशोक बाचूळकर यांनी शाखांच्या कामकाजाविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आभार संचालक प्रा. विनायक चव्हाण यांनी मानले. व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. अशोक बाचूळकर यांनी केले त्यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन गणपतराव आरळगुंडकर, संचालक प्राचार्य अशोक सादळे, प्रा. विनायक चव्हाण प्रा. डॉ. तानाजी कावळे, प्रा. लता शेटे, प्रा. नेहा पेडणेकर, मॅनेजर श्री मधुकर खवरे, व प्रशासकीय अधिकारी मारुती कुंभार तसेच सर्व शाखांचे शाखाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




PAN-Aadhaar linking न झाल्याने देशात ११.५ कोटी पॅन कार्ड्स डिअॅॅक्टिव्हेट ; तुमचं आधार-पॅन लिंक आहे का? असं तपासा !

Central Board of Direct Taxes (CBDT) ने एका आरटीआय ला दिलेल्या उत्तरामध्ये माहिती देताना दिलेल्या आकडेवारीनुसार,आधार-पॅन कार्ड यांना एकत्र न जोडल्याने देशात सुमारे ११.५ कोटी अकाऊंट्स डिअॅक्टिव्हेट करण्यात आली आहेत.
‘हिंदू ‘ चा त्याबद्दल रिपोर्ट आहे. आयकर विभागाच्या नियमावलीनुसार आधार पॅन लिकिंग अनिवार्य आहे आणि त्यासाठी ३० जून २०२३ पर्यंत मुदत होती.
७०.२४ कोटी पॅनकार्ड धारक भारतामध्ये आहेत. त्यापैकी ५७.२५ कोटी लोकांनी ही आधार-पॅनची जोडणी केलेली आहे. त्यामुळे आता सुमारे १२ कोटी पॅन कार्ड्स त्यामध्ये ११.५ कोटी डिअॅक्टिव्हेट करण्यात आल्याचं एका आरटीआय मध्ये सांगितलं आहे. मध्य प्रदेशात चंद्र शेखर गौर यांनी मागावलेल्या माहितीमध्ये याची आकडेवारी समोर आली आहे. या मध्ये असेही सांगण्यात आले आहे की १०००/- रूपये रक्कम दंड म्हणून भरल्यास ती अकाऊंट्स पुन्हा रिअॅक्टिव्हेट केली जाऊ शकतात.
आयकर कलम १३९AA मध्ये अशी तरतूद आहे की २ जुलै २०१७ पासून PAN वाटप करण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने आणि आधार क्रमांक मिळविण्यासाठी पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीला विहित फॉर्ममध्ये आधार क्रमांक कळवावा. अशा व्यक्तींनी नियोजित मुदतीपूर्वी त्यांचे आधार आणि पॅन अनिवार्यपणे लिंक करणे आवश्यक आहे.
PAN-Aadhaar linking झाले आहे की नाही? कसं तपासाल ?
◼️Income Tax e-filing portal / www.incometax.gov.in/iec/foportal/ ओपन करा.
◼️होमपेजवर ‘Link Aadhaar Status’पहा
◼️आता तुमचा पॅन नंबर आणि आधार नंबर टाका.
◼️त्यानंतर ‘View Link Aadhaar Status’वर क्लिक करा.
बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, Aadhaar documents मोफत अपडेट करण्याची तारीख UIDAI ने १४ सप्टेंबर २०२३ ते १४ डिसेंबर २०२३ पर्यंत ३ महिन्यांनी वाढवली आहे. याशिवाय UIDAI ने १० वर्षांच्या कार्डधारकांना नवीन माहितीसह तपशील अपडेट करण्यास सांगितले आहे. नाव, पत्ता आणि विवाह किंवा मृत्यू झाल्यास नातेवाईकांचे तपशील इत्यादी तपशील अपडेट करावे लागतील. तपशील UIDAI च्या वेबसाइटवर किंवा थेट जाऊन ₹ २५ भरून अपडेट करून दिले जातील.




खाद्यान्न परवाना नूतनीकरणाची मुदत आता पुन्हा पाच वर्षे

फूड सेफ्टी अँड स्टॅडर्ड ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (एफएसएसएआय) खाद्यान्न परवाना नूतनीकरणाची मुदत पुन्हा पाच वर्षांसाठी केली आहे. दरवर्षी खाद्यान्न परवाना नूतनीकरणाबाबतचा निर्णय ‘एफएसएसएआय’ने घेतला होता.
दरवर्षी परवाना नूतनीकरणास मार्केट यार्डातील भुसार बाजारातील व्यापारी संघटना दि पूना मर्चंट्स चेंबरने विरोध दर्शवून केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता. चेंबरच्या पाठपुराव्यानंतर ‘एफएसएसएआय’ने पुन्हा परवाना नूतनीकरणाची मुदत पाच वर्ष केल्याने राज्यभरातील व्यापाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
दरवर्षी खाद्यान्न व्यवसाय परवाना नूतनीकरणाची अट व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी जाचक होती. या निर्णयाच्या विरुद्ध चेंबरने केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता.
खाद्यान्न परवाना नूतनीकरणाची मुदत पुन्हा पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे, असे दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी सांगितले. दर वर्षाला खाद्यान्न व्यवसाय परवाना नूतनीकरण करण्याची अट व्यापारी आणि व्यावसायिकांना खूप जाचक होती. त्याविरुद्ध चेंबरने आवाज उठवला होता. आमची मागणी अखेर मान्य झाली आहे. आता खाद्यान्न परवाना एक ते पाच वर्षांसाठी मिळेल. राज्यातील इतर व्यापारी संघटनांनीही चेंबरच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता, असे बाठिया यांनी सांगितले.
‘एफएसएसएआय’ने ११ जानेवारी रोजी एक परिपत्रक जारी केले होते. खाद्यान्न परवाना नियमावलीत काही बदल केले होते. खाद्यान्न परवान्याचे केवळ एका वर्षासाठी नूतनीकरण होऊ शकेल. नवीन परवाना काढला तरी त्याची मुदत एक वर्षासाठी असेल. नूतनीकरण आणि नवीन परवान्याच्या कालमर्यादेत बदल करण्यात आल्याने व्यापारी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. याबाबत दि पूना मर्चंट्स चेंबरने पुढाकार घेतला. राज्यभरातील व्यापारी संघटनांच्या वतीने केंद्र शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. नव्या बदलांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींकडे शासन आणि ‘एफएसएसएआय’चे लक्ष वेधले, असे बाठिया यांनी नमूद केले. व्यापाऱ्यांनी परवाना नूतनीकरणाबाबत बदल रद्द करण्यासाठी पाठपुरावा केल्याने यश मिळाले. याबाबतचे आदेश ८ नोव्हेंबर रोजी काढण्यात आले असून, व्यापाऱ्यांसाठी ही दिवाळी भेट असल्याचे बाठिया यांनी सांगितले.
🔴🔴News : Source-🔴🔴
https://chat.whatsapp.com/JdTscwkK04n3RWNSijpnIq







