mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

मंगळवार  दिनांक १२ नोव्हेंबर २०२४

 आमदार आबिटकरप्रेमी मुस्लिम कार्यकर्त्यांनी उभारले प्रचार कार्यालय

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा जिल्हा परिषद मतदार संघात गेल्या पाच वर्षात आमदार प्रकाश आबिटकर यांनी केलेल्या विकास कामाचा विचार करत आमदार आबिटकर प्रेमी मुस्लिम कार्यकर्ते या निवडणुकीत जोमाने कामाला लागले असून त्यांनी आजरा येथे आमदार आबिटकर यांचे स्वतंत्र प्रचार कार्यालय उभा केले आहे.

     जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता कामाचा माणूस अशी ओळख असणाऱ्या आमदार आबिटकर यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने प्रचार करावा असे आवाहन यावेळी चराटी यांनी केले.

      याप्रसंगी अमानुल्ला आगलावे, असिफ पटेल, अमित खेडेकर, करीम कांडगावकर, बशीर काकतीकर, मुजमील खेडेकर, अमजद माणगावकर, जुबेर सोनेखान, शरीफ खेडेकर, अमानुल्ला माणगावकर नदीम मुल्ला, बबलू शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

अप्पी पाटील यांची प्रचार रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद


          चंदगड : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आगामी विधानसभा निवडणुकीत महायुक्तीचा पराभव करणे हीच राजर्षी शाहू समविचार आघाडीची ओळख असल्याचे बळीराजा संघटनेचे नेते नितिन पाटील यांनी जाहीर केले. अप्पी पाटील हे आघाडीचे अधिकृत उमेदवार असून, त्यांना आमदार केल्यास सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल, असा  विश्वास त्यांनी व्यक्त केला .

         चंदगड जिल्हा परिषद माणगांव क्षेत्रातील वरगाव, गुडेवाडी, जट्टेवाडी, तांबुळवाडी, रामपूर, लाकुडवाडी, शिवणगे, लकिकटे आणि बसर्गे या गावांत अप्पी पाटील यांच्या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत अप्पी पाटील यांच्यासोबत गोपाळराव पाटील, कल्लाप्पाण्णा भोगण, गोविंददादा पाटील, नितिन पाटील आणि कॉ. संपत देसाई हे नेते उपस्थित होते.

         प्रचारादरम्यान, नेतेमंडळींनी गावागावात जाऊन मतदारांना भेट दिली आणि अप्पी पाटील यांना आशीर्वाद मिळावा यासाठी मतदारांशी संवाद साधला. या दौर्‍यात अप्पी पाटील यांनी आपल्या विकासाच्या संकल्पनांची माहिती देऊन चंदगडच्या सर्वांगीण प्रगतीचा संकल्प व्यक्त केला.

        प्रचार रॅलीला चंदगड मतदारसंघातील जनतेकडून जोरदार प्रतिसाद मिळत असून, अप्पी पाटील यांची उमेदवारी दिवसेंदिवस अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

चंदगड तालुक्यातील धनगरवाडे दत्तक घेणार

शिवाजी पाटील, नेसरी येथील बैठकीत ग्वाही


          नेसरी : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     चंदगड मतदारसंघ हा दुर्गम, डोंगरवाड्या वस्त्यांचा भाग आहे . आजही धनगरवाड्यांवरच्या  माताभगिनींना प्रसुतीसाठी झोळीतून नेण्याची वेळ येते. एखाद्या वृद्धाला आपत्कालीन वेळी डालग्यातून न्यावे लागते. साप, विंचू, जंगली जनावरं यांच्या हल्ल्यात जखमी झाल्यावर देखील सुविधाविना अनेकांना जीव गमावावा लागतो आहे. अशा बिकट परिस्थिती असतानाही याकडे अद्याप कुणीही लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे आतापासूनच १३ धनगरवाडे हे मी दत्तक घेतल्याची ग्वाही शिवाजीराव पाटील यांनी दिली. नेसरी येथील बैठकीत ते बोलत होते.

     आज केवळ चंदगड तालुका दुर्गम, मागास म्हणून फक्त त्याचा राजकारणासाठी वापर करण्याचा उद्योग सुरू आहे. इथल्या लोकांना मतांसाठी फसवल जात आहे. केवळ ‘व्होट बँक’ म्हणून या वाड्या वस्त्यांना पाहिलं जातं. आजपर्यंत या लोकप्रतिनिधींनी गेल्या पाच वर्षात कधी या गोर गरिबांच्या समस्या दिसल्या नाहीत का? या डोगरकपारीत साधे रस्ते करता आलेले नाहीत. तर वैद्यकीय सुविधा तरी लांबची गोष्ट आहे. त्यामुळेच हे धनगरवाड्यांचा संपूर्ण कायापालट करून माझ्या माता-भगिनींना प्रामुख्याने आरोग्याच्या सुविधा पुरवणार असल्याचा शब्द पाटील यांनी दिला. त्यासाठी या राजकीय लढाईत साथ द्या, पहिला निधी या कामाला लावून माझ्या कामाला सुरुवात करणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

       यावेळी नेसरी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या प्रश्नाला साथ देणाऱ्या आम. राजेश पाटील यांना निवडून द्या : राजेंद्र गड्यानवर
भडगाव येथे प्रचार रॅली द्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन

       गडहिंग्लज: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांना साथ देणारे आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक हितकारी निर्णय घेतले आहे. राजेश पाटीलही शेतकऱ्यांच्या प्रश्नांना साथ देणारे आहेत म्हणून आम्ही राजेश पाटील यांच्या पाठीशी आहोत. आपणही सर्वांनी साथ द्यावी. गाफील न राहता महायुतीतील घटक पक्षातील कार्यकर्त्यांना सोबत घेवून हक्काचे मतदान मिळवा. विजय आपलाच असेल.शेतकऱ्यांच्या प्रश्नाला साथ देणाऱ्या आम. राजेश पाटील यांना निवडून द्या आवाहन राजेंद्र गड्ड्यानवर यांनी केले. ते भडगाव येथील आमदार राजेश पाटील यांच्या प्रचार रॅली बोलत होते.

      यावेळी आमदार राजेश पाटील म्हणाले, विरोधकांनी माझ्यावर आरोप करण्यापेक्षा तुम्ही काय केले तुमची ध्येयधोरणे काय आहेत हे सांगावे.माझ्या पाच वर्षाच्या कार्य काळामध्ये अनेक प्रलंबित प्रश्न मार्गस्थ लावले आहेत. धरणग्रस्तांचे आणि विस्थापितांचे ९५ % प्रश्न सोडवून गेली २५ वर्षे रखडलेला उचंगी सारखा प्रकल्प पूर्णत्वास आणला. शेतीसाठी पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले, कोरोना काळामध्ये झालेली आरोग्याची व्यथा पाहून ऑक्सीजनचे प्लांट सुरू केले, ३ तालुक्यातील आरोग्य सेवाकेंद्रात अँब्युलन्स दिल्या आहेत. शेतकऱ्यांना ५०,००० अनुदान, पी.एम.सन्मान निधी, ३,५,७.५ एच.पी. कृषी पंपांना विज बिल माफ, गायीच्या दुधाला ७ रूपये अनुदान, काजू प्रोसेसींग युनिट्सना २.५ जीएसटी टक्के परतावा, महाराष्ट्रामध्ये विवाहित होऊन आलेल्या कर्नाटकातील भगिनींना लाभ मिळण्यासाठी लाडकी बहिण योजने मध्ये दुरुस्ती केली याचा लाभ महाराष्ट्रातील सर्व सीमा भागामध्ये राहणाऱ्या भगिनींना झाला. रखडलेली वन्य प्राण्यांपासून होणारी नुकसान भरपाई मंजूर केली, काजू बोर्डाला १३०० कोटी मंजूर करून घेतले ( १६०० कोटिमध्ये याचा समावेश होत नाही ), तिनही तालुक्यातील गावांमध्ये जलजीवन मिशन ची योजना सुरू केली. 

      संग्रामसिंह कुपेकर  ,अमर पाटील यांचीही भाषणे झाली.

       यावेळी, रामाप्पा करिगार, प्रकाश चव्हाण, प्रकाश पताडे, दिलीप बेळकुंद्री, उदय देसाई, अण्णासाहेब पाटील, वंदना शेंडुरे, रवींद्र शेंडुरे, बसवराज हिरेमठ, बसवराज मुत्नाळे, विकी कोनकेरी, संजय कांबळे बाबुराव चौगुले, अशोक महाडिक, मलाप्पा भोई, सुरेश देसाई, सुभाष पाटील, तानाजी पाटील, आनंदराव मटकर, अर्जुनराव रेडेकर, बाळासो मूर्ती, कुमार यामी, रविशंकर बंदी, मजीर शेख, इकबाल मुल्ला, सचिन जाधव आदींसह प्रमुख पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक उपस्थित होते.

क्राईम न्यूज

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

१.चार चाकीतून लॅपटॉप लंपास

   गजरगाव ता. आजरा येथे घरासमोरील दारात पार्किंग केलेल्या चार चाकीच्या डिकीतून अविनाश कृष्णा खुळे(सध्या रा. उत्तम प्लाझा, चंदन नगर, खराडी बायपास, पुणे मुळगाव गजरगाव) यांचा ३०,००० रुपये किमतीचा लॅपटॉप अज्ञात चोरट्याने उघडून लंपास केल्याची फिर्याद पोलिसात दाखल झाली आहे पोलीस पुढील तपास करीत आहेत.

२.बेकायदेशीरित्या देशी दारू विक्री : एका विरोधात गुन्हा नोंद

   किणे ता. आजरा येथे वडाची गल्ली असलेल्या किराणा दुकानांमध्ये उघड्यावर देशी दारू विक्री करताना पोलिसांनी प्रकाश दत्तू बामणे याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. याबाबतची फिर्याद विकास सुरेश कांबळे यांनी पोलिसात दिली आहे.

३.धोकादायक रित्या वाहन पार्किंग करणाऱ्यांवर गुन्हे नोंद

     दर्गा गल्ली व वाणी गल्ली परिसरात धोकादायक रित्या वाहने उभा करून रस्त्यावरील इतर वाहनांना अडथळा निर्माण केल्याप्रकरणी युसुफ बशीर कुलकर्णी व रुकसतअली मोहम्मद किल्लेदार यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल विशाल यशवंत कांबळे यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. 

निधन वार्ता
शांताबाई सूर्यवंशी

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     सुळे (ता. आजरा) येथील शांताबाई रामू सूर्यवंशी (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सुन व नातवंडे असा परिवार आहे. राज्य कर उपायुक्त प्रकाश सूर्यवंशी यांच्या त्या आई होत.

गोपाळ देसाई

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      खोराटवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक गोपाळ बाळू देसाई (वय ८८ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले . त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे .

      मुंबई महानगर पालिकेचे शहर अभियंता संजय देसाई व खोराटवाडी चे माजी सरपंच आणि आजरा तालुका शेतकरी संघाचे संचालक सुनील देसाई यांचे ते वडील होत . रक्षाविसर्जन गुरुवार दि .१४ रोजी आहे .

लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..

     तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त

       ✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
        ✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
        ✅ इतर अनेक सुविधा

                  🏡साईटचा पत्ता :

       समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा

                     ☎️ संपर्क –

            +91 9527 97 3969


 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

अपघातात एक ठार

mrityunjay mahanews

चालत्या चारचाकी वर गव्याची उडी

mrityunjay mahanews

गुरुनाथ यांचा अखेर मृत्यू….

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!