mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

सोमवार दि.५ जानेवारी २०२६

पतीच्या निधनाच्या दहाव्या दिवशी पत्नीचे निधन


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा येथील बाजारपेठेत राहणारे गंगाराम रामचंद्र रांगणेकर यांचे निधन होऊन दहा दिवसाचा कालावधी झाला असतानाच त्यांच्या पत्नी श्रीमती गीता गंगाराम रांगणेकर ( वय ७० वर्षे ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. पाठोपाठ झालेल्या या मृत्यूमुळे रांगणेकर कुटुंबीय शोक सागरात बुडाले आहेत.

त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, तीन विवाहित मुली, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

श्रीमती गीता यांचे रक्षाविसर्जन आज सोमवार दिनांक ५ जानेवारी रोजी सकाळी आहे.

तुळशीराम मुळीक म्हणजे सर्वसामान्यांचा आधारस्तंभ : खा. धनंजय महाडिक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

स्वकर्तृत्वातून छोट्या गावातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करून प्रामाणिक वागणे, रुबाबदार रहाणे व सर्वसामान्यांचे आधारस्तंभ म्हणून काम करण्याची वृत्ती असणारे तुळशीराम मुळीक हे अनेकांचे मार्गदर्शक ठरले आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत निश्चितच अनुकरणीय आहे असे गौरवोद्गार खासदार धनंजय महाडिक यांनी काढले. तुळशीराम मुळीक यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. मान्यवरांच्या उपस्थिती सदर कार्यक्रम पार पडला.

यावेळी बोलताना श्री सिद्धेश्वर श्रीक्षेत्र कारीमठचे गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी म्हणाले, जीवनामध्ये माणसे मिळवणे हे मोठे कठीण काम आहे व हे काम सहजपणे तुळशीराम मुळीक यांनी करून दाखवले आहे. मोठ्या प्रमाणावर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेले नागरिक हे त्यांनी केलेल्या कामाची साक्ष आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी आमदार राजेश पाटील, विरक्त मठ घोडगिरीचे काशिनाथ महास्वामीजी, सरपंच संघटनेचे संभाजीराव सरदेसाई, राजन दड्डीकर यांनीही शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. तुळशीराम मुळीक यांनी गेल्या ७५ वर्षांमध्ये आपणाला विविध क्षेत्रात आलेले अनुभव कथन केले.

यावेळी मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन मुळीक यांचा सपत्नीक विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे औचित्य साधून मुळीक यांच्या ‘ माझा जीवन प्रवास ‘ या आत्मचरित्रासह विकासाचा महामेरू या विशेष गौरव अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

महादेव मुळीक यांनी प्रास्ताविकपर भाषणात मुळीक यांच्या कार्याचा आढावा घेतला.

कार्यक्रमास नवाज मुश्रीफ, नाथाजी पाटील, मुकुंदराव देसाई, रामाप्पा करिगार, आनंदराव जोशीलकर,राजू जोशीलकर, एम. के. देसाई, राजू मुरकुटे, महादेव मुळीक, दत्तात्रय मांडेकर, मंजूर मुजावर, बी टी जाधव,सौ. सुषमा पाटील, विकास बागडी, जिल्हा बँक संचालक संतोष पाटील,अभय देसाई, जम्बो गोरुले, डॉ. गोपाळ केसरकर, पी.के. केसरकर,समीर चांद, शैलेश मुळीक, संजय केसरकर,,सुधीर कुंभार, नाथा देसाई, आनंदाराव जोशीलकर, राजू जोशीलकर,के.व्ही. येसणे, ॲड. धनंजय देसाई, हरीश देवरकर, राजाराम घेवडे, दत्तात्रय मांडेकर, ज्ञानदेव पाटील, अमोल हळवणकर, संदीप चौगुले, पी. बी. पाटील, राजेंद्र गवळी, पांडुरंग गाडे, मच्छिंद्र मुळीक, संजय मुळीक, संदीप देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

गवत गंज्या पेटल्या… दीड लाखांचे नुकसान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यातील मासेवाडी, भादवण गावच्या हद्दीतील शिवारामध्ये रचलेल्या गवताच्या गंज्यांनी काल रविवारी दुपारी अचानक पेट घेतला यामध्ये सुमारे दीड लाखांचे गवत आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये पारूबाई आनंदा कोलते, निवृत्ती बचाराम पाटील,महादेव ईश्वर कोलते, अनुसया भीमराव कोलते, सुगंधा सुरेश कोलते, मधुकर केदारी कोलते, रावसाहेब दत्तू कोलते, शिवाजी बाबुराव कोलते, श्रीकांत नारायण देसाई, दत्तात्रय खोराटे, विजय खोराटे आदी शेतकऱ्यांचा समावेश आहे.

आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले परंतु दरम्यान मोठ्या प्रमाणावर गवताचे नुकसान झाले. शॉर्टसर्किटमुळे सदर आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास हृदय रोगावर नियंत्रण शक्य : डॉ. अक्षय बाफना

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा यांच्यावतीने आयोजित व्याख्यानमालेची सुरवात सुप्रसिध्द हृदयरोगतज्ञ डॉ. अक्षय बाफना यांच्या ‘तंदुरूस्त हृदय : निरोगी जीवन’ या विषयावरील व्याख्यानाने झाली .

हृदय थांबले तर जीवन थांबते त्यामुळे हृदय तंदुरूस्त असेल तरच निरोगी जीवन जगता येते. रक्तदाब, रक्तातील साखर व कोलेस्टेरॉल हे थेट हृदयावर परीणाम करणारे घटक आहेत. त्यामुळे या गोष्टी नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे हृदयाच्या आरोग्यासाठी नैसगिक जीवनशैली आत्मसात करा, पोषक आहार, नियमित व्यायाम, ध्यानधारणा, योगसाधना व सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने ह्रदय तंदुरूस्त राखणे शक्य आहे. दिवसातून किमान ४५ मिनीटे चालणे व शारीरिक व्यायाम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आठ तासाची बिनमोड झोप हृदयाच्या आरोग्यासाठी गरजेची आहे असे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ अक्षय बाफना यांनी स्पष्ट केले.श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा यांच्यावतीने आयोजित व्याख्यानमालेची सुरवात सुप्रसिध्द हृदयरोगतज्ञ डॉ. अक्षय बाफना यांच्या ‘तंदुरूस्त हृदय : निरोगी जीवन’ या विषयावरील व्याख्यानाने झाली .

हृदय रोगाची लक्षणे दिसताच तातडीने वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे. हार्ट ॲटॅक आल्यास लवकर वैद्यकीय उपचार दिल्यास पेशंट वाचण्याची शक्यता अधिक असते आहारातील साखर, मिठ, तेल यांचा वापर मर्यादित करणे गरजेचे आहे. फास्टफूड, जंकफूड, कोल्डिंक्स, ज्यूस यांच्या ऐवजी फळे, भाजीपाला, कडधान्ये व सुकामेवा यांचा आहारात वापर करा असे डॉ. बाफना यांनी सांगीतले रक्तदाब, रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल याबाबतही त्यांनी चित्रफीतीच्या माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थीत श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष श्री वामन सामंत होते. वाचनालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या भूमिपूत्र साहित्यिक गौरव पुस्काराचे वितरणही यावेळीगोवास्थीत ज्येष्ठ साहित्यिक अनिल परूळेकर यांना डॉ. सुधीर मुंज यांच्याहस्ते शाल, सन्मानपत्र, ग्रंथभेट व रोख पाच हजार रूपये देऊन गौरविण्यात आले. करण्यात आले.

कार्यक्रमाला डॉ. अनिल देशपांडे, मुकुंददादा देसाई, मधुकर क्रमित, डॉ. दिपक सातोसकर, मारूतीराव मोरे, आय. के. गिलबिले, डॉ. भरत मोहिते, डॉ. अंजनी देशपांडे, डॉ. रश्मी गाडगीळ, नगरसेविका डॉ. स्मिता कुंभार, डॉ. गौरी भोसले, शुभांगी जोशी, उपाध्यक्षा विद्या हरेर, रविंद्र हुक्केरी, संभाजीराव इंजल, बंडोपंत चव्हाण, सुभाष विभुते, महंमदअली मुजावर, विनायक आमणगी, गीता पोतदार, सुचेता गडडी ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर यासह मोठ्या प्रमाणावर आजरेकर रसिक श्रोते उपस्थीत होते.

संचालिका डॉ. अंजनी देशपांडे यांनी पाहुण्यांचा परीचय करून दिला. कार्यवाह कुंडलिक नावलकर यांनी सूत्रसंचालन केले.

निधन वार्ता

आनंदा बोलके

बोलकेवाडी ता. आजरा येथील आनंदा शंकर बोलके ( वय ६२ वर्षे ) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते श्री लक्ष्मी देवी दूध संस्थेचे चेअरमन व बोलकेवाडी जोतिबा मंदिर जिर्णोद्धार कमिटीचे प्रमुख होते. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, पत्नी, सूना, नातवंडे असा परिवार आहे.

 

कृष्णा जाधव

चाफे गल्ली,आजरा येथील कृष्णा आप्पा जाधव (वय ८२ वर्षे ) यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पाठीमागे एक मुलगा मुलगी सून नातवंडे असा परिवार आहे. आज सोमवारी रक्षाविसर्जन आहे.

सुमित्रा पाटील

धामणे ता .आजरा येथील सुमित्रा बापू पाटील ( वय ८२ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात तीन भाऊ, भावजय, नातू नात सुना असा परिवार आहे.

विशेष सूचना…

मृत्युंजय महान्यूजच्या बातम्या बऱ्याच वेळा link ओपन होत नसल्याने पहावयास मिळत नाहीत अशा तक्रारी येत आहेत. याकरिता कृपया आपल्याकडे 96 37 59 88 66 हा नंबर “मृत्युंजय महान्यूज’ या नावाने save असणे गरजेचे आहे. सदर नंबर आपल्याकडे save नसल्यास आपणाला बातम्या ओपन करताना अडचण येईल. नंबर save करूनही ज्यांना बातम्या मिळणार नाहीत त्यांच्याकरता या नंबरच्या व्हाट्सअप स्टेटस वर बातम्यांची लिंक टाकण्याची व्यवस्था केली आहे. याचबरोबर jyotiprasad savant या Facebook account वरही बातम्या link द्वारे पहावयास मिळतील. बरेच मोबाईल नंबर मृत्युंजय महान्यूजकडे save आहेत परंतु  संबंधितांकडे मृत्युंजय महान्यूज चा नंबर save नसल्याने अशा वाचकांना लिंक पाठवल्यास व्हाट्सअप अकाउंट बंद होत आहे. असा व्हाट्सअप ने नवीन नियम केला आहे.

यापुढे हळूहळू ग्रुप वर बातम्या लिंक पाठवणे बंद/कमी केले जाणार आहे. कृपया सर्वांनी याची नोंद घ्यावी. 

…मुख्य संपादक

देऊळवाडी विकास सेवा संस्था चेअरमन पदी राजाराम पोतनीस यांची निवड.

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

श्री रवळनाथ विकास सेवा संस्था देऊळवाडी / सातेवाडीच्या चेअरमन पदी राजाराम पोतनीस सरपंच परिषद राज्य सरचिटणीस यांची निवड झाली. सभेच्या अध्यक्ष स्थानी श्री.जे. एन बंडगर सहकारी अधिकारी, सहाय्यक निबंधक आजरा होते. यावेळी संचालक युवराज पोवार, विठोबा पोतनीस, शंकर पोतनीस, बंडू सावंत, उत्तम शेटगे, अर्जुन कांबळे, बाबू गावडे,गंगूबाई कानोलकर, रत्नाबाई पोतनीस, सरस्वती पोतनीस तज्ञ संचालक नामदेव पोतनीस, शंकर पोवार उपस्थिती होते.

आभार सचिव प्रकाश कबिर यांनी मानले.

जनस्वास्थ्य अभियाना अंतर्गत विद्यार्थिनींना मार्गदर्शन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

जनस्वास्थ्य अभियाना निमित्ताने सावित्रीबाई फुले जयंती निमित्त पंडित दीनदयाळ विद्यालयामध्ये विद्यार्थिनींसाठी ‘किशोरवयीन लैंगिक समस्या व तरुण वयात घ्यावयाची दक्षता’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करण्यासाठी डॉ.वैशाली चौगुले व दीपा बुरुड उपस्थित होत्या .

डॉ.वैशाली चौगुले यांनी आपले आरोग्य चांगले असण्यासाठी सात्विक आहार घ्या .आपले आरोग्य चांगले असेल तरच येणारा प्रत्येक क्षण आपण आनंदात घालवू शकतो .फास्ट फूड ,मोबाईल, टीव्ही यापासून दूर रहा .आपल्या शारीरिक वाढीसाठी पोषक आहार घेतला पाहिजे.कल्पना चावला, द्रौपदी मुर्मू,राजमाता जिजाऊ यांसारख्या महान महिलांचे कर्तुत्व , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे आदर्श ,त्यांचे विचार समोर ठेवून विद्यार्थिनींनी शिक्षण घेऊन आपल्या कर्तुत्वाचा ठसा समाजावर उमटवावा असे स्पष्ट केले.

दीपा बुरुड यांनी विद्यार्थिनींना चौरस आहाराचे महत्त्व सांगितले. किशोरवयीन समस्या काय असतात ? त्यावर काय उपाय केले पाहिजेत?आपण आपल्या आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे ? आपल्या शारीरिक वाढीसाठी पोषक आहार काय घ्यावा.यासंदर्भात मार्गदर्शन केले.

कार्यक्रमासाठी विद्यार्थिनी तसेच विद्यालयातील सर्व शिक्षिका उपस्थित होत्या.

आज शहरात 

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर, आजरा यांच्या वतीने ‘ नैसर्गिक शेती आणि विषमुक्त जीवन’ या विषयावर राहुल टोपले यांचे व्याख्यान व उत्कृष्ट वाचक पुरस्काराचे वितरण सायंकाळी ५.३० वाजता ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत स्मृती दालन येथे…

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

डॉ.अशोक फर्नांडिस यांचे निधन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!