मंगळवार दि. २२ जुलै २०२५

विवाहितेचा छळ
तिघांविरोधात गुन्हा नोंद…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
घराशेजारील भिंत बांधण्यासाठी माहेरून पैसे घेऊन ये असा तगादा लावत किरकोळ कारणावरून शिवीगाळ व मारहाण यासारखा शारीरिक व मानसिक छळ केल्याची सासू-सासर्यांसह पती विरोधात सौ. प्रणाली नामदेव सुतार रा. हाजगोळी बुll यांनी आजरा पोलिसात फिर्याद दिल्याने पती व सासू-सासर्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस हवालदार राहुल पन्हाळकर करीत आहेत.

निंगुडगेतील चोरीप्रकरणातील चार आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील निंगुडगे येथील संभाजी श्रीपती भोसले या गोवास्थित हॉटेल व्यावसायिकाच्या निंगुडगे येथील रहात्या घरातून तब्बल साडेदहा लाखांचे सोने सहा जणांनी लंपास केले होते.यामध्ये सहा साथीदारांनीच सोन्यावर डल्ला मारल्याचे निष्पन्न झाले होते. त्यातील दुंडगे ता. गडहिंग्लज येथील सहावा आरोपी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून यामधील चौघांना २४ जुलै पर्यंत आजरा न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. आणखी काही संशयित या प्रकरणात असल्याची शक्यता पोलिसातून व्यक्त केली जात आहे.

किरकोळ अपवाद वगळता सरपंच पदाचे आरक्षण जैसे थे...

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींचे फेर आरक्षण आज पुन्हा तहसीलदार समीर माने, निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, निवडणूक निवासी तहसीलदार आप्पासाहेब तोडसे, चंद्रकांत पालकर व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
पेरणोली, बहिरेवाडी खानापूर वगळता बहुतांशी आरक्षण पूर्वीप्रमाणेच राहिले.
सरपंच पदाचे जाहीर आरक्षण पुढीलप्रमाणे…
सर्वसाधारण प्रवर्ग…
पेरणोली, हाजगोळी बुद्रुक, खोराटवाडी मलिग्रे, चव्हाणवाडी, जाधेवाडी, गवसे, एरंडोळ, हात्तीवडे, किणे, कासार कांडगाव, लाकूडवाडी, सरंबळवाडी, वझरे,पारपोली, कानोली, पोळगाव, सोहाळे, चांदेवाडी,इटे, बुरुडे, आरदाळ
सर्वसाधारण महिला प्रवर्ग…
खेडे, सरोळी, शिरसंगी,हालेवाडी, देवर्डे, कोवाडे, वाटंगी, मुरुडे, देव कांडगाव, कोरीवडे, लाटगाव, दाभिल, सुळेरान, आवंडी, शेळप, मासेवाडी, शृंगारवाडी, गजरगाव, चाफवडे, करपेवाडी, वेळवट्टी, मसोली
नागरिकांचा मागास प्रवर्ग…
बहिरेवाडी, खानापूर, पेंढारवाडी, होनेवाडी, कोळिंद्रे, चितळे, भादवण, महागोंड, मुमेवाडी, वडकशीवाले
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला…
सुलगाव, भादवणवाडी, किटवडे,पेंढारवाडी, चिमणे, धामणे, पेद्रेवाडी, हाळोली, बेलेवाडी हु ll, साळगाव
अनुसूचित जाती प्रवर्ग…
हरपवडे, देऊळवाडी,होन्याळी, सुळे,
अनुसूचित जाती महिला राखीव प्रवर्ग…
मेंढोली-बोलकेवाडी, हाजगोळी खुर्द, उत्तुर, मडिलगे
यावेळी मुकुंदराव देसाई, अनिल फडके, अल्बर्ट डिसोझा, रणजीत देसाई, बापू नेऊंगरे, विजय थोरवत, राजू होलम, युवराज जाधव, युवराज पोवार, दयानंद पाटील, संभाजी सरदेसाई, इंद्रजीत देसाई, विजय केसरकर, दत्ता पाटील कोरिवडे, दशरथ अमृते, उत्तम रेडेकर, सहदेव नेवगे, सुनील बागवे, राजू पोतनिस, संजूभाई सावंत, अमित गुरव, कृष्णा कुंभार,आदिल मुल्ला, अजित हरेर, सूर्यकांत दोरुगडे, सौ.सुषमा पाटील, सौ. पूजा कांबळे, सौ.जयश्री गिलबिले, सुनिता कांबळे, दशराज आजगेकर, सौ. भारती डेळेकर यांच्यासह तालुकावासीय उपस्थित होते.

वाघाची तालीम मंडळाचा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील श्रीराम प्रासादिक वाघाची तालीम मंडळाचा १४ वा वर्धापन दिन विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सन २०११ साली स्थापन झालेल्या या मंडळाने कला, क्रीडा, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. या मंडळाचा १४ वा वर्धापन दिन उत्साहाच्या वातावरणात आणि वृक्षारोपण, कोविड काळात आशा सेविकांनी समर्पण वृत्तीने केलेल्या कार्याबद्दल त्यांचा सत्कार, भजनाचा कार्यक्रम, आजरा तालुक्यामधील विविध शाळांमध्ये शालोपयोगी वस्तूंचे वाटप, शासकीय रुग्णालयामध्ये फळांचे वाटप, रामतीर्थ या पर्यटन स्थळाजवळ पर्यटकांना विविध सूचनांचे दिग्दर्शन करणारे सूचनाफलक आणि कचराकुंडींची सोय अशा उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
गेल्या चौदा वर्षांमध्ये या तालीम मंडळाने आजरा तालुक्यातील सामाजिक कार्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आजरा हा तसा दुर्गम तालुका आहे. त्यामुळे या भागातील रुग्णांची बऱ्याचदा रुग्णसेवेच्या अभावी अडचण होते. परंतु या मंडळांने रुग्णवाहिकेची सेवा आजरेकरांना उपलब्ध करून देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. राष्ट्रीय सण व उत्सव विधायक दृष्टीने साजरे करण्यात या मंडळाचा नेहमी पुढाकार असतो. विशेषतः शिवजयंती, रंगपंचमी यासारख्या उत्सवांमध्ये या मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात.

आजरा येथील टोलनाका हलवा : उबाठा सेनेची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संकेश्वर-बांदा महामार्गावर आजरा एम.आय.डी.सी. जवळ बसविलेल्या टोल नाक्याच्या विरोधात आजरा तालुक्यातील लोकांना टोल माफ व्हावा यासाठी गेली १ वर्ष सर्व पक्ष संघटना आंदोलने, मोर्चे काढत आहेत यावर तोडगा निघण्याअगोदरच वृत्त पत्रांमधून टोल चालूची जाहिरात देवून अचानक टोल चालू करणार हे माहिती पडल्यानंतर टोल विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आम्ही मोर्चा देखील काढला. यावेळी आपल्या विभागामार्फत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी व तालुक्यातील नागरिक यांची पुढील बैठक होईपर्यंत टोलला स्थगिती दिली आहे. परंतू तात्पुरती स्थगिती देवून लोकांच्यावर होणारा अन्याय दूर होणार नाही यासाठी कायम स्वरुपी आजरेकरांना टोलपासून मुक्ती मिळावी यासाठी हा टोल आजरा तालुक्यातील शेवटचे गाव किटवडे येथे हलवण्यात यावा अशी मागणी कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष संभाजी पाटील, तालुकाध्यक्ष युवराज पोवार, प्रदीप पाचवडेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

केंद्रशाळा महागोंडचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

उत्तुर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत केंद्र शाळा महागोंडची विद्यार्थ्यांनी स्वरांजलीअरुण पाटील हिने ३०० पैकी २५४ गुण मिळवून शिष्यवृत्ती प्राप्त केली.
राधिका पाटील,अथर्व देसाई,सम्राट कांबळे, आर्यन सुतार, जानवी देसाई या विद्यार्थ्यांनीही शिष्यवृत्तीत यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांना विवेकानंद साबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

छाया वृत्त…

सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र) आजराच्या वतीने पंचायत समिती आजराचे नूतन गट विकास अधिकारी संतोष नागटिळक यांचे
सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र) च्या आजरा शाखेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
आज शहरात…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबिर व वृक्षारोपणाचा कार्यक्रम अनुक्रमे आजरा महाविद्यालय व अण्णाभाऊ सूतगिरणी येथे होणार आहे.

निधन वार्ता
ताराबाई देसाई
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील ताराबाई गोपाळ देसाई ( वय ९२ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने आज मंगळवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे, नातसून असा परिवार आहे.
त्या आजरा अर्बन बँकेचे माजी सहाय्यक सरव्यवस्थापक व तालुका मराठा महासंघाचे सरचिटणीस प्रकाश देसाई यांच्या आई व व्यावसायिक मयूर देसाई यांच्या आजी होत. त्यांच्यावर वडाचा गोंड स्मशानभूमीत सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


