

अभूतपूर्व सोहळा…
रवळनाथ मंदिराचा पायाभरणी व शिलान्यास उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील ग्रामदैवत श्री. रवळनाथ देव व या परिसरातील श्री. भावेश्वरी, श्री. महादेव, श्री. पालवेर, श्री. नरसोबा, श्री. म्हसोबा या देवतांच्या मंदिर इमारतीचे भूमिपूजन, पायाभरणी आणि शिलान्यास समारंभ उत्साहात झाला. या अभूतपूर्व सोहळ्यास
भाविक व ग्रामस्थांनी मंदिर परिसरात प्रचंड संख्येने उपस्थिती दर्शविली . या मंदिराचा पाच कोटीचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
बुधवारी सकाळी सात वाजता धार्मिक विधीला सुरवात झाली. संकेश्वरचे पद्यनाभ शास्त्री पुराणिक यांच्या पौराहित्यखाली धार्मिक विधी झाला. लिंगायत मठापासून ते रवळनाथ मंदिर अशी कलश मिरवणुक झाली. सिध्द संस्थान मठ, निडसोशी जगद्गुरु शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते पायाभरणी कार्यक्रम व शिलान्यास समारंभ झाला.
राधानगरी विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रकाश आबिटकर हे प्रमुख उपस्थित होते.
या वेळी महीलांचा विशेष सहभाग होता. महीलांनी दुरड्या, आंबिल, पाणी घागर घेवून मंदिर परिसरात दाखल झाल्या होत्या. धार्मिक समारंभात सहभाग घेतला. रवळनाथ देवालय उपसमिती अध्यक्ष आनंदराव कुंभार यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात म्हणाले, हिंदू धर्ममंदिर स्थापत्याप्रमाणे मंदिर उभारण्यात येणार आहे. काळ्या पाषणात मंदिर असेल. प्रवेशद्वार, सभा मंडप, अंतरा, गर्भगृह, प्रदक्षिणा मार्ग व ३१ फुट उंचीचे दगडी शिखर उभारण्यात येणार आहे.

आमदार आबिटकर म्हणाले, मंदिर उभारण्यासाठी भाविक व ग्रामस्थांची मागणी होती. ती पूरी करण्यात वेगळे समाधान आहे. येथे रेखीव, सुंदर मंदिर तयार झाल्यावर आजऱ्याच्या वैभवात भर पडेल.
यावेळी मुकुंदराव देसाई, अशोक चराटी, जयवंतराव शिंपी, डॉ. अनिल देशपांडे, विलास नाईक, अरुण देसाई, संभाजी पाटील, संभाजी इंजल, गणपतराव डोंगरे, सुजीत देसाई, बापू टोपले, जनार्दन टोपले , दीपक कुरुणकर, मल्लिकार्जुन तेरणी, सुभाष नेवगी, रमेश शेट्टी, मंदिराचे पुजारी, सामाजिक, राजकिय, धार्मिक क्षेत्रासह भाविक, ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे रवळनाथ मंदिर देवस्थापन उपसमितीच्यावतीने नियोजन करण्यात आले. सदस्य सुधीर कुंभार यांनी आभार मानले.

युवती बेपत्ता…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कानोली ता. आजरा येथून चोवीस वर्षीय युवती गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता आहे. याबाबतची वर्दी बेपत्ता युवतीच्या भावाने आजरा पोलिसात दिली असून पोलीस शोध घेत आहेत.

भूमी अभिलेख विरोधात दुसऱ्या दिवशीही तालुकावासियांचे धरणे आंदोलन सुरूच

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील भूमिअभिलेख कार्यालयात गलथान व भोंगळ कारभार सुरु आहे.तालुक्यातील जमिनीच्या मोजणीबाबत अनेक तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर सूरू असलेले आजरा तालुकावासियांचे भूमी अभिलेख विरोधातील आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले.
अशा प्रकरणात दोषी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची वरिष्ठ स्तरावरून चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.

आज निषेध फेरी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोलकता येथे झालेली महिला डॉक्टरची अमानुष अत्याचारानंतर हत्या व बदलापूर येथे घडलेले लाजिरवाणे प्रकरण या पार्श्वभूमीवर आज दिनांक २२ (गुरुवार) रोजी आजरा शहरांमध्ये महिला दक्षता समिती व विविध संघटनांच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून दुपारी तीन वाजता निषेध फेरी काढण्यात येणार आहे.
अशा घटना घडू नयेत म्हणून महिलांनी एकत्र आले पाहिजे एकत्रपणे अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. यासाठी सदर निषेध फेरी काढण्यात येणार असून या फेरीमध्ये सर्व महिला, महिला पुरुष, मुली मुले, या सर्वांनी सामील व्हावे. असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

आजरा अक्कलकोट बस सुरु करा : अन्याय निवारण समितीची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
अक्कलकोट पंढरपूर येथे आजरा तालुक्यातून दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी ये-जा करतात. भाविकांच्या आणि पर्यायाने सर्वच प्रवाशांच्या सोयीसाठी आजरा ते अक्कलकोट सरळ बससेवा सुरु करावी या मागणीसह आजरा आगारातून कोणतीही सरळ बससेवा अक्कलकोट व पंढरपूर या प्रवासासाठी उपलब्ध नाही त्यामुळे या मार्गावर बसफे-या सुरू कराव्यात अशी मागणी आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने केली आहे.
आजरा येथून अक्कलकोट -पंढरपूर येथे भक्तगण व प्रवासी यांना जाण्यासाठी सरळ बस सेवा नसल्याने आजरा -कोल्हापूर -सोलापूर -आणि अक्कलकोट असा टप्प्या टप्प्याने प्रवास करावा लागतो असेही आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदन आगार प्रमुख आर. टी. मातले यांना समितीने दिले.
यावेळी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, विजय थोरवत, पांडुरंग सावरतकर, वाय. बी. चव्हाण, दिनकर जाधव, जोतिबा आजगेकर, संतोष ढोणूक्षे अनिल पाटील आदि उपस्थित होते.



