


अल्पवयीन मुलीचे अपहरण…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील बेलेवाडी हुब्बळगी येथील १५ वर्षे ९ महिन्याच्या शाळकरी अल्पवयीन मुलीचे फूस लावून अपहरण केल्याची फिर्याद संबंधित मुलीच्या पालकांनी पोलिसात दिली आहे.
३१ जुलै रोजी दुपारी राहत्या घरातून संबंधित मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचे फिर्यादीत म्हटले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हरपवडे धनगर वाड्यावरील रस्ता गेला वाहून…
शेतकऱ्यांचेही नुकसान…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील हरपवडे धनगरवाडा येथे नव्याने तयार करण्यात आलेला रस्ता पावसाने वाहून गेला असून यामुळे रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रस्ताच वाहून गेल्याने रस्त्याखाली असणारी मातीही पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाऊन ती आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पाण्याच्या लोंढ्यामुळे काही झाडे देखील तुटून गेली आहेत. रस्ता तयार करताना रस्त्याशेजारी पाणी जाण्याकरता कोणतीही व्यवस्था न केल्याने सदर रस्ता वाहून गेल्याचे सांगितले जाते, तर वनविभागाने पाणी वाहून जाण्याकरता चर खोदण्यास प्रतिबंध केल्याने हे नुकसान झाले असल्याचेही बोलले जात आहे.

आजरा शहरात चोरट्यांनी दागिन्यांसह लांबवला दोन लाखांचा मुद्देमाल

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरातील हैदरनगर येथील मुदस्सर मजीद मुल्ला यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करूनही पोलिसांच्या हाती फारसे काही लागले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की हैदरनगर येथील उर्दू हायस्कूल परिसरात राहणारे मुल्ला कुटुंबीय गुरुवारी घरगुती कार्यक्रमासाठी बाहेर गावी गेले होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बाहेरील कुलुप तोडून आत प्रवेश करत तिजोरीतील रोख रक्कम २० हजार,१ लाख ७५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व ५ हजार किंमतीचे चांदीचे दागिने असा २ लाख १०० रुपयांचे साहित्य लंपास केले आहे.
आजरा शहरात भुरट्या चोरांसह छोट्या-मोठ्या चो-यांचे प्रमाण गेल्या कांही दिवसांपासून वाढले आहे हे निश्चित.

निधन वार्ता…
सुलोचना पवार

आजरा येथील सौ. सुलोचना भगवान पवार (वय ७३ वर्षे ) यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक भगवान पवार यांच्या त्या पत्नी होत. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी नऊ वाजता आहे.
सरोजनी मुरगुडे

आजरा येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका सौ.सरोजनी रामचंद्र मुरगुडे/ शेणगावे (वय ६८ वर्षे ) यांचे अल्पश: आजाराने पुणे येथे निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, विवाहित मुलगी, सूना, जावई नातवंडे असा परिवार आहे.
येथील हॉटेल व्यवसायिक अमोल मुरगुडे यांच्या त्या आई होत.

पाऊस पाणी…
आजरा शहरासह आजरा मंडल परिसरात गेल्या २४ तासात ५० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

फोटो क्लिक…



