mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरगुन्हाठळक बातम्यामहाराष्ट्रराजकीयसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

बुधवार  दि. ३० जुलै २०२५         

जनावर व्यापाऱ्यांच्या राज्यव्यापी बंदला आजरा जनावरांच्या व्यापाऱ्यांचा पाठिंबा…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

राज्यात पुकारलेल्या जनावरे व्यापाऱ्यांच्या बंदला आजरा येथे जनावरे व्यापाऱ्यांच्या बैठकीत एकमुखाने जनावरांच्या खरेदी- विक्रीचा व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे सर्वांनी स्वागत करीत येणाऱ्या काळात जनावरांचे व्यापाऱ्यांनी जनावरांचा व्यापार पुढील निर्णयापर्यंत बंद ठेवण्याचा बैठकीत निर्धार करून लढा यशस्वी करण्यासाठी संघटित होऊन संघटना तयार करून सनदशीरपणे लढा देण्याचे ठरले.

आजरा तालुक्यातील तसेच आसपासच्या तालुक्यातील शेतीव्यवसाय सांभाळत जनावरांचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांची आजरा येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. स्वागत व प्रास्ताविक समीर चांद (भाजपा अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष )यांनी केले.अधिकृत परवानगी असणारी जनावरे खरेदी विक्रीसाठी नेत असतानादेखील बाहेरच्या तालुक्यामध्ये काही संघटना या व्यापाऱ्यांना जाणून बुजून लक्ष्य करतात. पोलीस प्रशासनाला चुकीची माहिती देत दबाव आणत कोणताही पुरावा नसताना खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम केले जात आहे. कायद्याने मान्यताप्राप्त जनावरे आणली तरी नाहक त्रास होत आहे असे याठिकाणी सांगण्यात आले.

यावेळी नंदकुमार नारायण देसाई,गणपती शिंदे, समीर चांद ,शिवसेना उबाठा शहर प्रमुख यांनी आपली मते मांडली. शेतकऱ्यांची भाकड जनावरे दूध देत नाहीत, काम करीत नाहीत. फक्त मांस विक्री करणाऱ्यांशिवाय ती कोणीच विकत घेत नाहीत. कायद्याने मान्यताप्राप्त त्या जनावरांना हे पैसे देऊन खरेदी करतात. मात्र काही खंडणीखोर लोक यांना मारहाण करतात यावर प्रशासनही योग्य न्याय देत नाही यावेळी या गोरगरिबांनी जायचे कोठे? न्याय मागायचा कोणाकडे? असाही सूर येथे उमटला.

यावेळी आयुब खेडेकर, दिलावर पटेल, मेहताब आगा,शांताराम गुरव यांनीही आपली मनोगत व्यक्त करीत आपल्या व्यथा मांडल्या. 

असिफ दरवाजकर, खुदबुद्दीन तगारे, महमदहनीफ नेसरीकर, महादेव बोलके, नाझिम पटेल, इरफान पिरखान, खलील बेपारी, नजीर वाडीकर,मोहसीन शिकलगार आदिंसह वाहतूकदार व जनावरे व्यापारी उपस्थित होते.

बुलढाणा प्रकरणाचा निषेध

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

बुलढाणा (ता. आजरा) येथील खामगाव येथे बौध्द तरुणास अमानुष मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी आजरा तालुका रिपब्लिकन सेनेच्या वतीने केली आहे. या घटनेचा निषेध करण्यात आला असून याबाबत तहसीलदार समीर माने यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे गाय चोरल्याच्या संशयावरून बौद्ध तरुणास जात धर्म विचारून मारहाण केली आहेत. संबंधीत तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे. यामध्ये दोषी असलेल्यांवर जातीवाचक गुन्हा नोंद करावा. या प्रकरणातील आरोर्पीना तात्काळ अटक करावी. त्यांनी पुन्हा असे कोणतीही कृती करू नये म्हणून कडक कारवाई करावी. याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

निवेदनावर तालुका अध्यक्ष विजय कांबळे, उपाध्यक्ष गोपाळ होन्याळकर, तालुका संपर्क प्रमुख परशुराम कांबळे, तालुका युवा अध्यक्ष अविनाश कांबळे, युवा उपाध्यक्ष मधुकर कांबळे, नंदकुमार कांबळे, शामराव कांबळे, संभाजी कांबळे यासह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

आवंडी ते धनगरवाडा दरम्यानच्या रस्त्याची रुंदी वाढवा -बहुजन मुक्ती पार्टी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

विटे येथील चित्री धरणापासून ते धनगरवाडा क्र.१ दरम्यान बनवलेल्या रस्त्याची रुंदी निर्धारित निकषापेक्षा कमी असल्याने त्याचप्रमाणे चित्री प्रकल्पाकडे पर्यटकांची रहदारी असल्यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण होत आहे. साधी दोन वाहनेसुद्धा जाऊ शकत नाहीत त्यामुळे कित्येकदा अपघात झालेले असल्याने सदर रस्त्याची रुंदी निर्धारित निकषाप्रमाणे वाढवून मिळावी याबाबतचे निवेदन बहुजन मुक्ती पार्टीने शाखा उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे.

निवेदनावर डॉ. उल्हास त्रिरत्ने (महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष ), राहुल मोरे, अमित सुळेकर, तुकाराम कांबळे, शरद कुंभार आदींच्या सह्या आहेत.

भादवण यांच्या संयुक्त विद्यमाने भादवण हायस्कूलमध्ये पालक मेळावा उत्साहात…


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

भादवण हायस्कूलमध्ये पालकमेळावा संपन्न झाला. HPV लसीकरण माहिती व मार्गदर्शन या विषयावर HPV लस आपण का घ्यावी? ही लस घेतल्याने गर्भाशय कर्करोगास  आपण कसा प्रतिबंध करू शकतो,या लसीबाबतचे समाजामध्ये पसरवले गेलेले समज-गैरसमज, तसेच महत्व आरोग्य सहाय्यिका सौ.घोडे यांनी सांगितले.आरोग्य सहाय्यक श्री.तराळ यांनी पालकांचे हमीपत्र व संमतीपत्र या संदर्भात मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या या लसीकरणाचा आपण आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन सौ. पावसकर व शेवाळे यांनी केले. महिला पालक, विद्यार्थिनी यांनी प्रश्न-उत्तरे यांच्या माध्यमातून चर्चा घडवून आणली.या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक आर. जी. कुंभार ग्रामपंचायत सदस्या अश्विनी पाटील पालक प्रतिनिधी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी आरोग्यसेवक पाटील, शिक्षिका बी.पी.कांबळे,एस. एस.नाईक, एम.एम.जाधव, सहाय्यक शिक्षक व्ही.एस.कोळी,पी.एम.वडर,शिपाई मारुती गोडसे,संदीप पाटील माता पालक प्रतिभा केसरकर, रंजना गुरव,मनीषा पाटील,शोभा जोशीलकर,मनीषा शिंत्रे,अनिता मुळीक,सुमन मुळीक,निता सोंडकर,साधना डोंगरे,विश्वनाथ परीट इत्यादी पालक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

सूत्रसंचालन आर.पी.होरटे वआभार पी.एस.गुरव यांनी मानले.

वेळेत उपचार झाल्याने वाचले प्राण

अपघातग्रस्तांसाठी खास ॲम्ब्युलन्सची व्यवस्था…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

मुंबई वरून गोव्याला जात असलेली चार चाकी मसोली फाट्या नजीकच्या पुलावर पलटी होऊन अपघात झाल्याची माहिती मिळताच जगद्गुरु श्री नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानची विनामूल्य सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेसह ( नंबर एम एच ०८ एच ८८६३) चालक श्री. सुधाकर कळेकर घटनास्थळी पोहोचले व अपघातग्रस्त प्रिया साहू व कबीर साहू या दोघांना ग्रामीण रुग्णालय आजरा या ठिकाणी तातडीने दाखल केले.

त्यांच्यावर वेळीच उपचार झाल्याने पुढील अनर्थ टळला. या मार्गावर नेहमीच विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका उपलब्ध असते. याकरिता अशी कोणतीही घटना घडल्यास ८८८८२६३०३०/९०४९६६२०४७ या क्रमांकाची संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

डॉ.बाचूळकर व डॉ.लता शेटे यांचा सत्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

जनता सहकारी गृहतारण संस्थेचे व्हा. चेअरमन डॉ. अशोक बाचूळकर यांना महात्मा गांधी शिक्षा प्रति सीभा सन्मान मिळाल्या बदद्ल तसेच भौतिकशास्त्र विषया मध्ये शिवाजी विद्यापीठाकडुन पी.एच.डी. मिळाले बदद्ल डॉ. सौ. लता शेटे यांचा सत्कार करण्यात आला.

स्वागत व प्रास्ताविक चेअरमन मा.श्री. मारुती आप्पा मोरे यांनी केले, प्रा. डॉ. अशोक सादळे यांनी आभार मानले. यावेळीप्रा.सौ.स्नेहा पेडणेकर, संस्थेचे सर्व संचालक आणि जनरल मॅनेजर श्री. मधुकर खवरे, प्रशासकीय अधिकारी श्री. मारुती कुंभार व संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थीत होते.

निधन वार्ता
मारुती हाळवणकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

उत्तूर ता . आजरा . येथील मारुती तुकाराम हाळवणकर (वय ८७ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा,सून ,नातवंडे असा परिवार आहे.

रक्षाविसर्जन आज बुधवारी ( ३० रोजी ) सकाळी आहे .

आजरा महाविद्यालयात ‘सर्प संवर्धनाची गरज व महत्त्व’ या विषयावर व्याख्यान संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा महाविद्यालय, आजरा येथील पर्यावरण, भूगोल आणि प्राणीशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘सर्प संवर्धनाची गरज व महत्त्व’ या विषयावर एक विशेष व्याख्यान आयोजीत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध सर्पमित्र डॉ. विनायक आजगेकर यांनी सर्पप्रजातींचे जैविक महत्त्व, पर्यावरणातील त्यांची भूमिका, सर्पांविषयी असलेले गैरसमज व अंधश्रद्धा यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी विषारी आणि बिनविषारी साप यातील फरक स्पष्ट केला. सर्पदंशानंतरच्या प्राथमिक उपचार पद्धती, सर्पसंवर्धनाचे कायदेशीर पैलू आणि सर्पांविषयी योग्य जनजागृतीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ हे होते. .

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रा. रणजित पवार यांनी मानले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे अधीक्षक श्री. योगेश पाटील, व्होकेशनल विभागाचे पर्यवेक्षक प्रा. मनोज पाटील, प्रा. अनिल निर्मळे, तसेच प्रा. वैशाली देसाई यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

पंडित दीनदयाळ विद्यालयात नागपंचमी उत्साहात साजरी.

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

मुख्यमंत्री गतिमान प्रशासन संस्कार शिबिर अंतर्गत आमच्या पंडित दीनदयाळ विद्यालात नागपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली.

आपल्या भारतीय संस्कृतीत विविध सण का साजरे केले जातात, साजरे करण्यामागचा उद्देश, नागपंचमी हा सण का साजरा केला जातो याची माहिती श्री .प्रकाश प्रभू यांनी विद्यार्थ्यांना सांगितली.

नागाची मूर्ती कशी तयार करण्याचे विघ्नेश कुंभार, सर्वेश कुंभार आणि वैभव भडगावकर, बिपिन परळकर यांनी करून दाखवले . यावेळी शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो क्लिक

(नागपंचमी निमित्त महिलांसह अबाल वृद्धांनी आजरा येथील नागझरीला भेट दिली व  पूजन केले.)

 

संबंधित पोस्ट

सोहाळे येथे एकाची आत्महत्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा- चंदगड- गडहिंग्लज परिसर वृत्त

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!