mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

पत्रकार सचिन चव्हाण यांचे निधन


                    आजरा : प्रतिनिधी

        आजरा येथील इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार सचिन मारुती चव्हाण यांचे अल्पश: आजाराने काल सोमवारी रात्री साडेआठ वाजता उपचारादरम्यान निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ४२ वर्षे होते.

        गेले पंधरा दिवस सचिन हे हृदयविकार व काविळीच्या आजाराने त्रस्त होते. गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून आठ दिवसापूर्वी त्यांना घरी आणण्यात आले होते.काल सोमवारी दुपारी पुन्हा एकवेळ त्याची प्रकृती गंभीर झाल्याने सायंकाळी खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.

      त्यांच्या पश्चात वडील, भाऊ सुजय, मेहुणे सी.डी. सरदेसाई , बहिण असा परिवार आहे. आजरा येथील वडाचा गोंड स्मशानभूमीत त्यांच्या मृतदेहावर मंगळवारी सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

डॉक्टरांशी बोलतानाच आला मृत्यू

    अतिदक्षता विभागात दाखल केलेल्या सचिन यांच्याशी डॉक्टरांशी संवाद सुरू असतानाच त्यांना जोराचा हृदयविकाराचा झटका आला. काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाला.

दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस…

   सचिन यांचा मित्र परिवार मोठा असून त्यांच्या मृत्यूच्या बातमीने मित्रपरिवाराला धक्का बसला. दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस गेला… अशी प्रतिक्रिया मित्रपरिवार देताना दिसत होता.


‘ आजरा ‘ पदाधिकारी निवडीसाठी कागलमध्ये मुलाखती

                   आजरा : प्रतिनिधी

        आजरा साखर कारखाना पदाधिकारी निवड गुरुवार (ता. २८) होत आहे. या पार्श्वभूमीवर काल कागल येथील विश्रामगृहावर कारखान्याचे नूतन संचालकांच्या मुलाखती पार पडल्या, पालकमंत्री हसन मुश्रीफ अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार के. पी. पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष रविंद्र आपटे, जिल्हा बँक प्रतिनिधी सुधीर देसाई प्रमुख उपस्थित होते. अध्यक्ष, उपाध्यक्षांची नावे बंद पाकीटातून नेतेमंडळी गुरुवारी निवड सभेपूवीं पाठवली जाणार आहेत.

      आजरा कारखाना निवडणु‌कीत राष्ट्रवादी पक्षाने एक हाती सत्ता मिळवली आहे. कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड गुरुवारी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज नेतेमंडळीनी ज्येष्ठ संचालकाच्याबरोबर सर्व संचालकांच्या मुलाखती घेतल्या. मुश्रीफ यांनी सर्व संचालकांनी कोणाचे नाव निश्चित केले असले तर ते देखील सांगावे असे आवाहन केले. यानंतर प्रत्येक संचालकांची मुलाखत घेण्यात आली. कारखान्या संबंधीत प्रश्न विचारण्यात आले.

       यावेळी ज्येष्ठ संचालक वसंतराव धुरे मुकुंदराव देसाई, विष्णूपंत केसरकर, एम. के. देसाई, उदयसिंह पवार, मास्ती घोरपडे, अनिल फडके, काशिनाथ तेली, सुभाष देसाई, शिवाजी नांदवडेकर, राजू मुरकुटे, राजेश जोशीलकर, दीपक देसाई, रणजित देसाई, गोविंद पाटील, संभाजी पाटील, हरीबा कांबळे, सौ.मनिषा देसाई, सौ.रचना होलम यांनी मुलाखत दिल्या. या बंद पाकीटातून निर्णय देणार आहे.त्यानंतर निवड केली जाणार आहे. जिल्हा बँक प्रतिनिधी सुधीर देसाई, नामदेव नार्वेकर आदी उपस्थित होते.


आजरा तालुका इरिगेशन फेडरेशन स्थापन करणार…
तालुक्यातील मोटर पंप धारक शेतकऱ्यांच्या बैठकीत निर्णय

                     आजरा : प्रतिनिधी

      राज्यातील शेतकऱ्यांच्या मोटर पंपाला जलमापक यंत्र (वॉटर मीटर) बसविण्याची सक्ती केली असून वॉटर मीटर न बसविल्यास दहा पट पाणी पट्टी आकारण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. या निर्णयाने शेतकरी उध्वस्त होणार असल्याने या निर्णयाला विरोध करण्यासाठी त्याचबरोबर मोटरपंप धारक शेतकऱ्यांच्या वीज बीलाबाबत आवाज उठवण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांना संघटित करण्यासाठी आजरा तालुका मोटरपम्प धारक शेतकऱ्यांची आज रवळनाथ मंदिर येथे बैठक झाली या बैठकीत हा निर्णय करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती अल्बर्ट डिसोझा होते.

      सुरुवातीला कॉ संपत देसाई यांनी प्रास्ताविक करून शासन प्रशासन आता शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. त्यांचे हक्काचे पाणी काढून घेऊन ते भांडवलदारांना त्यांना विकायचे आहे. शेतकऱ्यांच्या पाण्याच्या हक्काची लढाई ही आपल्याला संघटितपणे लढावी लागणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाने आज पाटगाव धरण अदानीला विकले आहे उद्या आजरा तालुक्यातील धरणेही विकली जातील त्यामुळे ही लढाई आपल्याला नेटाने लढवावी लागेल.

     तानाजी देसाई म्हणाले, पाण्याबरोबर विजेचा प्रश्नही आपण एकत्रितपणे मांडुया, पाणी पट्टी वाढ आणि विजदरवाढ याविरोधात सर्व शेतकऱ्यांना संघटित करून ही लढाई आपल्याला लढवावी लागेल.

       अल्बर्ट डिसोझा म्हणाले, राज्यात कोणतेही सरकार आले तरी ते शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणार नाही. त्यासाठी आपल्यालाच आता मैदानात उतरावे लागेल. आपण चळवळ केली तरच आपण वाचू शकतो. त्यामुळे सर्वांनी आता संघटित संघर्षासाठी तयार रहावे.

        बैठकीला आनंदराव कुंभार, प्रकाश मोरूस्कर, जोतिबा चाळके, सचिन देसाई, सुरेश पाटील, बाबुराव गिलबिले, सयाजी कोडक, संजय देसाई, यशवंत कोडक, नरेंद्र कुलकर्णी, अविनाश जोशीलकर, दत्तात्रय पारदे, दशरथ घुरे, आबा पाटील, मसाजी पाटील, म्हकाळी चौगुले, शैलेश निर्मळे, प्रकाश दोरुगडे, नंदकुमार देसाई, सुनील पाटील, यशवंत पाटील यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी हजर होते.

       सोमवारी कार्यकारिणी जाहीर होणार

पुढच्या सोमवारी दि १ जानेवारी २०२४ ला रवळनाथ मंदिराच्या माडीवर व्यापक मेळावा होणार आहे. या मेळाव्यात फेडरेशन ची कार्यकारिणी निश्चित करण्यात येणार आहे.


ना. चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून पुण्यात ‘ मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत फिरते मोफत वाचनालय सुरु

        महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरुडचे आमदार नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘ मृत्युंजय’ कार शिवाजीराव सावंत मोफत फिरत्या वाचनालयाचे आज सकाळी डहाणूकर कॉलनी येथील बाळासाहेब ठाकरे उद्यानात झालेल्या कार्यक्रमात लोकार्पण करण्यात आले.

       १० हजारांपेक्षा अधिक ग्रंथसंपदा आणि २८०० सभासद असलेले हे मोफत वाचनालय कोथरूड, पाषाण, बावधन, बाणेर परिसरात २४ ठिकाणी पुस्तके देण्यासाठी थांबणार आहे.

      कार्यक्रमात मृत्युंजय प्रतिष्ठानच्या आणि सावंत परिवाराच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार आणि जडणघडण मासिकाचे मुख्य संपादक डॉ. सागर देशपांडे यांनी चंद्रकांत दादांचे आभार मानले.


गाड्यांची तोडफोड… मोठे नुकसान


                  आजरा : प्रतिनिधी

       आजरा तालुक्यातील पूर्व भागातील सरोळी, निंगुडगे व गडहिंग्लज तालुक्यातील ऐनापूर येथील सुमारे १५ चारचाकी गाड्या अज्ञातांनी रात्री फोडल्या आहेत यामुळे तालुक्यातील वाहनधारकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

        रस्त्याकडेला उभ्या केलेल्या या गाड्यांची तोडफोड केली आहे.ऐनापूर येथील सुनील कुराडे, राजू कडाकणे, सदाशिव कागवाडे,सरोळी येथील डॉ. विजय पाटील ,बाळासाहेब पोवार, रमेश देसाई, एस.आर.पाटील,निंगुडगे येथील बाळू बोलके,महेश देसाई ,प्रकाश मगदूम, सुनील देसाई आदींच्या गाड्यांचे नुकसान केले आहे. या घटनेची नोंद आजरा पोलिसात झाली आहे.


होनेवाडी येथे दत्तजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन


                    आजरा:प्रतिनिधी

        होनेवाडी येथे प्रतिवर्षाप्रमाणे दि. २५ ते २७ दरम्यान दत्त जयंती उत्सव होत आहे. या उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देवस्थान कमिटी, ग्रामपंचायत, होनेवाडी ग्रामस्थ मंडळ व मुंबईकर ग्रामस्थ मंडळाच्यावतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

        मंगळवार दि. २६ रोजी सकाळी ९ वाजता दत्तगुरू व ग्रामदैवत जोर्तिलिंग देवांच अभिषेक सोहळा होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत माजी विद्यार्थी संघटनेमार्फत विद्यार्थी गुणगौरव सोहळा होणार आहे. दुपारी २ वाजता हॉलीबॉल स्पर्धा होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता दत्त जन्मकाळ व महाआरती त्यानंतर भजनी मंडळांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री ७.३० वाजता किरण दूसे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

        बुधवार दि. २७ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून दत्तगुरूंच्या पालखी सोहळ्याला सुरूवात होणार आहे. दुपारी १ वाजता पालखी सोहळ्याची सांगता होणार असुन सायंकाळी ७.३० वाजता महाआरती झाल्यानंतर महाप्रसाद वाटप होणार आहे. या श्री दत्त जयंती उत्सव सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आज आजरा तालुक्यात….

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

बहिरेवाडी येथे मुलाकडून वृद्ध बापाचा खून…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आज-यात गोवा बनावटीच्या दारुसह  साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!