
आईच्या मृत्यूनंतर दोन महिन्यातच मुलाचाही मृत्यू…. अमोल बांदेकर काळाच्या पडद्याआड…

आजरा येथीलअमोल अनंत बांदेकर (वय 46)यांचे अल्पशा आजाराने बुधवारी रात्री निधन झाले.दोनच महिन्यापूर्वी त्यांच्या आईचे निधन झाले.चार दिवसापूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,मुलगी, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.निवासी नायब तहसीलदार कै. अनंत बांदेकर यांचे ते चिरंजीव होत. त्यांचा मित्रपरिवारही मोठा आहे.


कर्तव्य भावनेतून उद्यानाची केली निर्मिती…
आज-यात स्वामी विवेकानंद पतसंस्थेचाअनोखा उपक्रम
ज्योतिप्रसाद सावंत
आजरा येथे सार्वजनिक उद्यानाची गरज लक्षात घेऊन स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या पुढाकाराने सामाजिक बांधिलकीतून श्री.लक्ष्मी देवी उद्यानाची उभारणी करून शहराच्या सुशोभिकरणात सहकाराच्या माध्यमातून हातभार लावू शकतो हे देखील अधोरेखित केले आहे.
आजरा शहरांमध्ये उद्यान नसल्याने बाल गोपालांसह वयोवृद्ध मंडळींची मोठी कुचंबणा होते. यापूर्वी आजरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रामतीर्थ उद्यान उभारण्याचा प्रयत्न झाला. परंतु कालांतराने देखभालीअभावी या उद्यानाची दुर्दशा झाली. सध्या स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेचा सुवर्ण महोत्सव सुरू आहे. या सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून संस्थेचे अध्यक्ष जनार्दन टोपले व उपाध्यक्ष दयानंद भुसारी यांनी सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने आजरा शहराकरिता एक उद्यान उभारणीचा संकल्प केला. सहकारी संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ज्या शहरातून पतसंस्थेची जडणघडण झाली त्या शहराकरिता अनोख्या पद्धतीने राबवला केलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. आजरा येथील कुंभार गल्लीतील श्री .लक्ष्मी देवी मैदान परिसराचे रूपांतर एका आकर्षक अशा उद्यानात करण्यात आले आहे. बाळ -गोपाळ मंडळींसह वयोवृद्ध नागरिकांना या उद्यानाचा चांगलाच फायदा होणार आहे. कृतज्ञता म्हणून राबविण्यात आलेला हा उपक्रम आजरा शहरातील इतर छोट्या-मोठ्या आर्थिक संस्थांच्या दृष्टीने निश्चितच अनुकरणीय असाच आहे.

या आहेत आहे सुविधा…
संस्थेने मैदानाच्या प्रवेशद्वाराच्या सुशोभीकरणासाठी वयोवृद्ध मंडळींना फिरण्यासाठी ट्रॅक, बसण्यासाठी बाकडी, लहान मुलांकरीता मनोरंजनाचे साहित्य, लाँन, स्वच्छतागृह आदीची व्यवस्था येथे करण्यात आली आहे.
श्री लक्ष्मीदेवी उद्यानाचे आज लोकार्पण… अध्यक्ष जनार्दन टोपले यांची माहीती…

आजरा येथील स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेने सुवर्णमहोत्सवानिमित्त उभारलेल्या श्री. लक्ष्मी देवी उद्यानाचे आज लोकार्पण करण्यात येणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते, माजी आमदार सुरेशजी हाळवणकर आणि श्री. हिंदुराव शेळके यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्री. जनार्दन विठ्ठल टोपले आणि व्हा. चेअरमन श्री. दयानंद सिध्दाप्पा भुसारी यांनी दिली.
टोपले म्हणाले, आज गुरुवारी सायंकाळी पाच वाजता कुंभार गल्ली जवळील लक्ष्मी देवी उद्यानाच्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. ज्या गावामध्ये विवेकानंद पतसंस्थेची स्थापना झाली, ज्या स्थानिक सभासदांनी या संस्थेला पाठबळ दिल्या त्यांच्या विषयीची कृतज्ञता म्हणून हे उद्यान उभारण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला.

सुवर्ण महोत्सव निमित्त आजरेकरांना भेट… जनार्दन टोपले म्हणाले, आज-यासारख्या मोठ्या शहरांमध्ये आज नागरिकांसाठी उद्यान नाही. त्यामुळे अनेकदा ज्येष्ठ नागरिक, महिला, शाळकरी मुले यांच्यासाठी अशा पध्दतीचे उद्यान असावे अशी कल्पना होती. श्री. लक्ष्मी देवस्थान समितीने या जागेवर उद्यान उभे करण्यास परवानगी दिली. आज-यातील नागरिकांसाठी एक उत्तम विरंगुळ्याचे केंद्र उभारता आले याचे समाधान आहे. स्वामी विवेकानंद पतसंस्थेकडुन सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये आजरेकरांसाठी ही भेट आहे असेही टोपले यांनी स्पष्ट केले.

राज्यात पुन्हा मास्क सक्ती ; मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान
कोरोनामुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. त्यामुळे राज्यात नसलेली मास्क सक्ती पुन्हा एकदा होऊ शकते, असे सूचक वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मुंबईत बेस्टच्या कार्यक्रमात बोलताना राज्यात परत मास्क वापरावा लागणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
महाराष्ट्रात 1 एप्रिल रोजी मास्कसक्ती हटवण्यात आली होती. मात्र, देशातील अनेक भागात करोनाने पुन्हा एकदा धुमाकुळ घालायला सुरू केल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा मास्कसक्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्यात अद्याप स्थिती नियंत्रणात असून आमचे स्थितीवार बारकाईने लक्ष असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही काही दिवसांपूर्वी म्हटले आहे. मात्र चौथ्या लाटेच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काही राज्यांमध्ये रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे आढळून आले आहे.
दिल्लीसह काही राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशच्याही काही जिल्ह्यांत मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच अन्य राज्यांनीही खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. मध्यंतरी केंद्राने काही राज्यांना सावधगिरीची सूचना केली होती. त्यात महाराष्ट्राचाही समावेश होता. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा मास्कबाबतच्या चर्चा सुरू झाल्या. आता मुख्यमंत्र्यांनीच थेट सूचक विधान केले आहे.


मराठी शाळा टिकवणे समाजहिताचे :
उदयराज पवारपेरणोलीत शाळापूर्व तयारी संपन्न

मराठी माध्यमातूनच विद्यार्थ्यांची प्रगती होते.भाषा समृद्ध करण्यासाठी मराठी शाळा महत्त्वाची आहे. त्यामूळे मराठी शाळा टिकवणे सामाजिकदृष्ट्या हिताचे असल्याचे प्रतिपादन आजरा पंचायत समितीचे सभापती उदयराज पवार यांनी केले.
पेरणोली ता आजरा येथील केंद्रीय शाळेत मराठी शाळा व अंगणवाडीच्यावतीने आयोजित शाळापूर्व तयारी समारंभप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.सरपंच उषाताई जाधव यांची प्रमूख उपस्थिती होती.
पवार म्हणाले,शिक्षकांचा पालकासह मुलासोबत संवाद होणे आवश्यक आहे. पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे.यावेळी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष कृष्णा सावंत, सदस्य ऊदय कोडक,पालक किरण गुरव यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी पहिलीत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचे ढोलताशांच्या गजरात गावातून मिरवणूक काढून जोरदार स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्या नंदा कांबळे, विना रेळेकर,मुख्याध्यापिका स्नेहा क्षीरसागर, महेश चांदेकर, जयश्री वरेकर, कविता नाईक, सुप्रिया पाटील, अंगणवाडी सेविका शोभा फगरे, कविता कांबळे, रूपाली कांबळे, जयश्री वांद्रे, माया कांबळे, संगिता भिऊंगडे,गिता सुतार, शितल नावलकर आदी उपस्थित होते. अनुष्का गोवेकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

‘व्यंकटराव’ चे प्राचार्य गुरव यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम उत्साहात

आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री.शिवाजी गुरव यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ संपन्न झाला.
सदर कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष श्री.जयवंतराव शिंपी होते.संस्थेचे उपाध्यक्ष श्री.आण्णासो पाटील ,सेक्रेटरी श्री.एस.पी.कांबळे, खजिनदार
एस.डी.चव्हाण, माजी प्राचार्य व संचालक सुनील देसाई पांडुरंग जाधव व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजराचे प्रभारी प्राचार्य एस.जी.खोराटे पर्यवेक्षक आर.जी.कुंभार, भादवण हायस्कूलचे मुख्याध्यापक जी.वाय. देसाई ,आदर्श हायस्कूल शिरसंगीचे मुख्याध्यापक श्री.शिवाजी बिद्रे, देवर्डे हायस्कूलचे मुख्याध्यापक
सुभाष सावंत माजी मुख्याध्यापक प्रकाश सावरतकर माजी मुख्याध्यापक अशोक पाटील माजी मुख्याध्यापक श्री.शंकर गिलबिले, सर, माजी शिक्षक व माजी सभापती भिकाजी गुरव, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त गणपती ढेकळे, ए.के.पावले, श्री.सचिन शिंपी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .
प्रभारी प्राचार्य श्री.एस.जी.खोराटे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. संचालक श्री.सुनील देसाई यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.त्यांनी प्रास्ताविकात प्राचार्य श्री.शिवाजी गुरव यांचा शिक्षक ते प्राचार्य असा त्यांचा प्रवास उलगडला.गुरव हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले शिक्षक म्हणून त्यांनी आपला समाजजीवनात एक ठसा उमटवला.कोरोना महामारीत त्यांनी व्यंकटराव प्रशालेचे प्राचार्य त्यांनी विध्यार्थी व शाळेचा गुणवत्ता स्तर उंचावला असे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात स्पष्ट केले.
प्राचार्य श्री.शिवाजी गुरव यांचा सत्कार शाल,श्रीफळ व भेटवस्तू देऊन श्री.जयवंतरावजी शिंपी यांच्या शुभहस्ते करण्यात आला.तसेच त्यांच्या पत्नी सौ. सुमन शिवाजी गुरव यांचाही सत्कार प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ.व्ही.जे.शेलार यांच्या हस्ते करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी श्री.गुरव,यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणाऱ्या कृष्णा दावणे लिखित शुभेच्छापर लेखाचे वाचन करण्यात आले.
या प्रसंगी भिकाजी गुरव यांनी मनोगत व्यक्त केले.प्राचार्य श्री.शिवाजी गुरव यांनी सामाजिक,शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला असे मत व्यक्त केले.
खजिनदार श्री.एस.डी. चव्हाण यांनी आपले मत व्यक्त केले.त्यांनी श्री .गुरव यांना शुभेच्छा देताना निवृत्तीनंतरही आपण वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
सत्कारमूर्ती प्राचार्य श्री.शिवाजी गुरव यांनी सत्काराला उत्तर देताना त्यांनी संस्थेचे पदाधिकारी सहकारी शिक्षक, मित्रपरिवार यांच्याबद्दल ऋण व्यक्त केले.तसेच आपल्या आयुष्याच्या जडणघडणीतील महत्त्वाचे टप्पे उपस्थितांसमोर मांडले.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आर.पी.होरटे यांनी केले.तर आभार पी.व्ही.पाटील यांनी मानले.




