मंगळवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२५

प्रचार यंत्रणा वेगावल्या…
वैयक्तिक गाठीभेटीवर भर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर ताराराणी आघाडीसह शहर परिवर्तन विकास आघाडी व अन्याय निवारण समितीच्या आघाडीसह अपक्ष उमेदवारांनीही प्रचारामध्ये गती घेतली आहे सकाळच्या सत्रा मध्ये व सायंकाळी मतदारांच्या घरोघरी जाऊन आपल्याच आघाडीला मतदान करावे यासाठी संवाद साधला जात आहे.
अजूनही बहुतांशी शेतकरी वर्ग सुगी मध्ये गुंतलेला असल्याने घरोघरी जाऊन व प्रसंगी ते ज्या ठिकाणी आहेत तेथे जाऊन त्यांच्याशी उमेदवारांकडून संवाद साधला जात आहे.
हळूहळू आता सायंकाळच्या वेळी जेवणावळीही उठू लागल्या आहेत. शहर व परिसरातील हॉटेल्स, धाबे या ठिकाणी गर्दी वाढताना दिसत आहे.
शेतकऱ्याची सुगी सुरू असताना मतदार राजालाही सुगीचे दिवस आले आहेत.
शहरभर प्रचाराचे डिजिटल फलक झळकत आहेत. अद्याप चिन्ह वाटप झाले नसले तरी पक्षाच्या चिन्हावर उभे असणाऱ्या मंडळींच्याच फलकावर चिन्हांचा उल्लेख दिसत आहे. इतरांनी मात्र चिन्ह शिवाय फलक उभा केले आहेत. उद्या बुधवारी चिन्हांचा प्रश्न मार्गी निघेल. त्यानंतर झेंडे,टोप्या, स्कार्फ यासारखे साहित्य प्रचार यंत्रणेत बाहेर पडेल असे दिसते.


विरोधक आमच्या आघाडीच्या मतांच्या जवळपासही पोहोचणार नाहीत :
अशोकअण्णा चराटी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ताराराणी आघाडीकडे शहरातील जाणकार मंडळी वळू लागली असून आघाडीला मिळणारा प्रतिसाद पहाता निकालाची केवळ औपचारिकता बाकी असून आघाडीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय होतील . विरोधी आघाडीचे उमेदवार आमच्या जवळपासही पोहोचणार नाहीत असा विश्वास आघाडी प्रमुख व नगराध्यक्ष पदाचे दावेदार अशोकअण्णा चराटी यांनी पत्रकार बैठकीत बोलताना व्यक्त केला.
ताराराणी आघाडीला अबूताहेर तकीलदार, अश्कर लष्करे, सना चांद यांच्यासह शिवसेना उबाठा गटाचे शहर प्रमुख ओंकार माद्याळकर आदींनी दिलेल्या पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत ते बोलत होते.या पाठिंब्यामुळे आघाडीचे बळ वाढले आहे. या सर्वांच्या सहकार्यामुळे विरोधकांना सत्तेच्या जवळही येवू देणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी विलास नाईक म्हणाले,अशोक चराटी यांच्या विरोधात सर्व पक्ष एकवटले होते मात्र त्यानंतर विरोधकांची आघाडीचे डबे घसरले.नगराध्यक्ष पदाच्या रेसमध्ये असणारे अबूताहेर तकीलदार देखील माघार घेत त्यांनी यापूर्वीच चराटी यांना पाठिंबा दिला आहे.यानंतर अबूसईद माणगांवकर गटाने पाठिंबा दिला.आज(सोमवारी) अश्कर लष्करे (गांधीनगर),सना चाॅंद व कार्यकर्ते (वाडा गल्ली),अहमदसाब तकीलदार (दर्गा गल्ली) यांच्यासह शिवसेनेचे आजरा शहर प्रमुख (ठाकरे गट) ओंकार माद्याळकर व कार्यकर्ते यांनी पाठिंबा दिला आहे.
विजय पाटील म्हणाले, अशोक चराटी यांना सगळ्यांनी कोंडीत पकडण्याचा डाव रचला.केवलवाणी प्रयत्न केला मात्र या आघाडीत बिघाडी झाली.या विरोधी दोन्ही आघाड्यांना पूर्ण पॅनेलही उभे करता आले नाही.
अबूताहेर तकीलदार म्हणाले, माझी नगराध्यक्ष पदासाठी इच्छा होती.पण कांही गोष्टी माझ्या मनाविरुद्ध घडल्या त्यामुळे मी या रिंगणातूनच बाहेर पडून विकासाचा दृष्टिकोन असणाऱ्या अशोक चराटी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.अनेकांनी माझे मन वळवण्याचा प्रयत्न केला मात्र मी माझ्या भूमिकेवर ठाम राहीलो.यावेळी ओंकार माद्याळकर, जनार्दन टोपले, लष्करे यांनी मनोगत व्यक्त केले.
चराटी पुढे म्हणाले, मी भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना एकत्रित येण्याची विनंती केली होत मात्र त्यांनी माझ्याच विरोधात आघाडी केली. अन्याय निवारण समितीने केलेल्या कामांचे मी अनेकवेळा कौतुकही केले होते मात्र त्यांनी माझ्याच विरोधात बदनामी करण्याची मोहीम उघडली.या निवडणूकीत दोन मंत्री व एक आमदारांचा पाठिंबा आहे.माझ्या स्वप्नातील आजरा करायचा आहे.बारामती सारखा नसला तरी कागल सारखे शहर नक्कीच करणार.सत्ता आमचीच येणार हा विश्वास व्यक्त केला.हिंदू, मुस्लिम व ख्रिश्चन बांधव माझ्यासोबत आहेत. आभार डॉ.अनिल देशपांडे यांनी मानले.
यावेळी उमेदवार अनिकेत चराटी, सिकंदर दरवाजकर, माजी कारखाना संचालक दशरथ अमृते, शरीफ खेडेकर, एम.डी.दरवाजकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार थेट खळ्यावर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा परिवर्तन विकास आघाडी मधून प्रभाग क्रमांक एक मधील उमेदवार सौ.भैरवी सावंत व नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्री.संजय (भाऊ) सावंत यांनी विद्यानगर कॉलनी, सर्वोदय कॉलनी, कै. बळीराम देसाई कॉलनी तसेच रामतीर्थ शिक्षक कॉलनी व शेख कॉलनी यामध्ये उमेदवारासह कार्यकर्त्यांनी प्रचार फेरी काढली यादरम्यान मतदारांशी थेट खळयावर जाऊन उमेदवारांनी संवाद साधला.
यामध्ये मतदारांनी उमेदवाराबद्दल आनंद व समाधान व्यक्त केले. व भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी ण्यासाठी आम्ही निश्चित आपल्यालाच मतदान करणार असे सांगितले. आता परिवर्तनाशिवाय आजरा नगरीची प्रगती नाही असे मत मतदारांनी व्यक्त केले..
यावेळी संदीप कोलते,शिवाजी नाईक, जयवंत पाटील, धनाजी इलगे यांच्याशी थेट संवाद साधण्यात आला.याप्रसंगी परिवर्तन विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बहुजन मुक्ती पार्टीचा जाहीरनामा थेट स्टॅम्प पेपरवर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
नगरपंचायत आजरा येथे पंचवार्षिक निवडणुकांचे आयोजन केलेले आहे या निवडणुकांमध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आजऱ्यामध्ये प्रभाग क्रमांक सात मधून गीता नंदकुमार कांबळे प्रभाग क्रमांक १३ मधून समीर तकीलदार प्रभाग क्रमांक १६ मधून अश्विनी विजय कांबळे या तीन उमेदवारांना बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेले आहे. बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार त्यांचा जाहीरनामा थेट स्टॅम्प पेपरवर लिहून देणार आहेत बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांचा असा दावा आहे की इतर सर्व उमेदवार त्यांचा जाहीरनामा साध्या कागदावर सुद्धा लिहून देत नाहीत परंतु बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते स्वतःचा जाहीरनामा स्टॅम्प पेपरवर लिहून देणार आहेत.
सदर गोष्ट ऐतिहासिक बदल घडवून आणणार आहे. बहुजन मुक्ती पार्टीने दिलेल्या स्टॅम्प पेपरच्या विरोधात उभे असणाऱ्या उमेदवारांना आश्वासने द्यावी लागणार आहेत.बहुजन मुक्ती पार्टी एकूण वेगवेगळे ४३ विषय स्टॅम्प पेपरवर पूर्ण करणार यासाठी लिहून दिलेले आहेत यामध्ये तीस वर्षांपर्यंत टिकणारे रस्ते, पाईपलाईनचा विषय कायमचा सोडवणे, गटारे व दिवाबत्तीची सोय महिला युवक व बेरोजगारांना नोकऱ्यांसाठी प्रोत्साहन प्रबोधन शिबिरे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त इत्यादी अनेक महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. पत्रकार बैठकीत सदर माहिती देण्यात आली.
बैठकीस डॉ. उल्हास त्रिरत्ने यांच्यासह उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते.


प्रस्थापितांच्या व घराणेशाही विरोधात निवडणूक रिंगणात :
मंजूर मुजावर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची माझी सवय आहे . यामुळे काहीजणांना मी आक्रमक वाटतो. पण मला अन्यायाविरुद्धची चीड आहे. कॉलेजच्या विद्यार्थीदशेत माझा स्वभाव हाच होता. माझे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले असून मी विज्ञान शाखेचा पदवीधर आहे.कांही काळ मी डेक ऑफिसर मर्चंट नेव्ही मध्ये नोकरी ही केली आहे. सर्वसमावेशक तरुण चेहरा म्हणून मी नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक रिंगणात उभा असून शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपणाला विजयी करावे असे आवाहन अपक्ष उमेदवार मंजूर मुजावर यांनी पत्रकार बैठकीत बोलताना केले आहे.
समाजसेवा करण्याची तळमळ आहे. अन्यायाविरुद्ध मी कोणत्याही प्रसंगी उभा असतो.जातपात न पहाता मी आजपर्यंत समाजसेवा केली आहे.कोरोना काळात मी माझ्या जीवाची पर्वा न करता अनेकांचे मृतदेहांवर स्वतः अंत्यसंस्कार केले आहेत. त्यावेळी मृत पावलेली व्यक्ती कोणत्या जातीची आहे हे कधीही पाहिले नाही. या सेवेमुळे माझा अनेक सामाजिक संस्थांनी सत्कार केला आहे. आजरा शहर हे हिंदू, मुस्लिम व ख्रिश्चन बांधव असलेले शहर आहे. समाजामध्ये तेढ निर्माण होवू नये यासाठी आपला प्रयत्न राहिला आहे. समाजसेवेच्या माध्यमातून मी अनेकांना मदत केली आहे.अपघात, हाॅस्पिटल, गरजूंना मदत केली आहे.
माझ्या पत्नी सौ.यासिराबी नगरसेविका होत्या. त्यांनीही विकास कामे केली आहेत. नगरपंचायतीच्या माध्यमातून विकास कामे झाली नाहीत.अनेक त्रुट्या आहेत.पाण्यासाठी हाल झाले. व्यवस्थापनाच्या नियोजनाअभावी आजही पाणी योजना रेंगाळली आहे.रस्त्यांची तर दुर्दशा झाली आहे.निवडणूकीत मी माझ्या केलेल्या कामाच्या जोरावर उभा आहे.मला निकालाची चिंता नाही. संघर्षातून उभा राहिलेला मी कार्यकर्ता आहे घराणेशाही, प्रस्थापित यांच्या विरोधात माझा लढा हा यापुढे तीव्र असेल. मी केलेल्या कामांची पोचपावती मला जनता देईल याची मला खात्री आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी समशुद्दीन खेडेकर, आयुब माणगावकर, सादिक नेसरीकर, सलीम मुल्ला, करीम कांडगावकर, अश्पाक खेडेकर, नजीर मुजावर, युनूस मुल्ला, शौकत लमतुरे,हजरत मुल्ला,नियामत मुजावर अंजर मुजावर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रभाग एक मधील ताराराणी आघाडीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन


ताराराणी आघाडीच्या प्रभाग एक मधील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
प्रभाग एक मधील ताराराणी आघाडीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आघाडीचे प्रमुख अशोक अण्णा चराटी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उमेदवार अश्विनी चव्हाण,प्रभाग दोन मधील उमेदवार पूजा डोंगरे, अश्विन डोंगरे, संजय चव्हाण, विजय सावंत, तानाजी नाईक, दीपक बल्लाळ, शिवाजी गुडुळकर, अवधूत हरमळकर, विजय थोरवत, समीर मोरजकर,विनोद जाधव, उदय चव्हाण, सुधाकर वंजारे, अभिषेक जालकर, प्रकाश आबीटकर, अनुप कुरुणकर व कार्यकर्ते उपस्थित होते.
परिवर्तन विकास आघाडीला पाठिंबा…

प्रभाग एक मधील शहर परिवर्तन विकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार सौ. भैरवी राजेंद्र सावंत व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजयभाऊ सावंत यांना यांना अब्बास माणगावकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.




