

आदिवासी, दलितांच्या प्रश्नासाठी प्रसंगी तुरुंगवासही भोगला : प्रतिभा शिंदे
आजऱ्यात लोकशाहीर द. ना. गव्हाणकर पुरस्काराचे वितरण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दहा वर्षात सत्ताधारी भाजपकडून देशात धर्म व जातीचे राजकारण सुरु होते. सत्ताधाऱ्यांकडून भूक, भिती व भ्रमाचा वापर करून शेतकरी, कामगार व श्रमिकांचे दमन केले गेले. त्याला थांबवण्याचे काम आदिवासी व दलितांनी लोकसभेच्या निवडणुकीत मतपेटीतून केले आहे. आदिवासींच्या प्रश्नासाठी आपण प्रसंगी तुरुंगवासही भोगला असे प्रतिपादन लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या व सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांनी केले.

येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला. श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या हस्ते लोकशाहीर द. ना. गव्हाणकर पुरस्कार श्रीमती शिंदे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार समितीचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी, उपाध्यक्ष मोहनराव देसाई, जनता बैंक आजराचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई प्रमुख उपस्थित होते.
श्रीमती शिंदे म्हणाल्या, नर्मदा आंदोलनातील सार्थीना हा पुरस्कार समर्पित करत आहे. जल, जंगल व जमिनीवर आदिवासींचा हक्क रहावा, यासाठी लढा दिला. प्रसंगी तुरुंगवास भोगावा लागला. पण मागे हटलो नाही. आदीवासीमधील समज कल्पनेच्या पलीकडील आहे. एकत्र लढण्याची ताकद आदीवासींमध्ये आहे. जिद्द, चिकाटी मुळे आदीवासींचा संघर्ष आजही वेगळा आहे. डॉ. पाटणकर म्हणाले, गव्हाणकर हे जनतेचे शाहीर होते. शाहीर अमर शेख, गव्हाणकर, अण्णा भाऊ साठे यांच्यासारखे शाहीर आज दिसत नाहीत. शाहीर निर्माण करणारी चळवळ नाहीशी होत आहे. राजकारणात परिवर्तन करायचे असेल तर नव्याने क्रांतिकारी शाहीर तयार झाले पाहीजेत. सरकार हलवण्याची ताकद चळवळीमध्ये होती अशा चळवळींची समाज व देशाला गरज आहे. जयवंतराव शिंपी यांचेही यावेळी भाषण झाले. यावेळी प्रा. आनंद मेणसे, प्रा. किसनराव कुराडे, स्वाती कोरी, अल्बर्ट डिसोझा, सुधीर देसाई, विद्याधर गुरबे, अमर चव्हाण,एम. के. देसाई, शिवाजी बोलके, प्राचार्य जी. बी. पाटील, नितीन पाटील, नरेंद्र पाटील, सम्राट मोरे, कृष्णा भारती, संजीवनी सावंत, रावसाहेब देसाई,राजू होलम, रणजित देसाई, बंडोपंत चव्हाण, मनोहर गव्हाणकर, एस. पी. कांबळे, प्रा. मीना मंगळुरकर, यासह पदाधिकारी उपस्थित होते.
मुकुंदराव देसाई यांनी स्वागत केले. कॉ. संपत देसाई प्रास्ताविक केले.डॉ.गौरी भोसले यांनी सूत्रसंचालन केले. मायकेल फनांडीस यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. संजय घाटगे यांनी आभार मानले.
पावसाच्या हजेरीने बळीराजा सुखावला

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हा आजरा तालुक्यामध्ये ठिकठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.
भाताच्या पेरणीनंतर बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत होता अपेक्षाप्रमाणे यावर्षी सहा जूनला पाऊस झाला आहे गेले दोन दिवस ठीक ठिकाणी पाऊस हजेरी लावत असल्याने बळीराजा सुखावला आहे.
रामतीर्थ धबधबा मात्र पाण्याच्या प्रतीक्षेत
हवामानात झालेल्या प्रचंड बदलामुळे पर्यटक वर्ग सुट्ट्यांचे औचित्य साधून रामतीर्थ परिसराला भेट देताना दिसत आहे परंतु अद्यापही पावसाचा जोर नसल्याने रामतीर्थ धबधबा पुरेशा क्षमतेने प्रवाहित झालेला नाही. पश्चिम भागात पावसाचा जोर कायम राहिल्यास धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित होण्याची शक्यता आहे.
शहरात चिखलाचे साम्राज्य
पावसामुळे शहरातील गल्लीबोळामध्ये चिखलच चिखल झाला आहे.अनेक ठिकाणी झालेल्या खुदाईमुळे पाण्याची डबकी तयार झाली आहे तर या डबक्यातून वाहने जाऊन सर्वत्र चिखलाचे साम्राज्य दिसू लागले आहे.
ठेकेदारांना कामे पूर्ण करण्याची गडबड
मे महिन्यात होणारी अनेक कामे अद्याप अपूर्णावस्थेत असल्याने रस्त्यासह मो-या, संरक्षक कठडे व अन्य कामे भर पावसातही गडबडीने सुरू आहेत. तालुकावासीय याबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.
लाखोंच्या उलाढालीसाठी शैक्षणिक बाजारपेठ सजली

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शाळा महाविद्यालये सुरू होत असल्याने शैक्षणिक साहित्य विक्रीची दुकाने वह्या, पुस्तकांसह शैक्षणिक साहित्याने सजली आहेत. तालुक्यामध्ये प्रतिवर्षी सुमारे पाच कोटी रुपयांची शैक्षणिक साहित्याची विक्री होत असल्याचे काही अनुभवी विक्रेत्यांकडून सांगितले जाते.
शैक्षणिक वर्ष सुरू होताच विद्यार्थी व पालक वर्गाची वह्या, पुस्तके, गाईड्स, दप्तरे, कंपास बॉक्स, छत्र्या, गणवेश, पादत्राणे इत्यादी खरेदीसाठी झुंबड उडताना दिसते. जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये शैक्षणिक साहित्य खरेदी-विक्रीची प्रचंड उलाढाल होताना दिसते.
यावर्षीही या शैक्षणिक वर्षाला सामोरे जाण्यासाठी बाजारपेठेमध्ये स्टेशनरी दुकाने व या पुस्तकांसह अभ्यासासाठी लागणाऱ्या साहित्यांनी तर कापड दुकाने व इतर दुकाने छत्र्या, गणवेश, चप्पल- बूट विक्रीसाठी सजली आहेत.
शैक्षणिक साहित्याच्या दरामध्ये यावर्षी किरकोळ वाढ झाली असल्याचे सांगितले जाते. पालक वर्गाच्या खिशाला निश्चितच या दरवाढीचा फटका बसणार आहे.
आर्थिक गणित कोलमडणार…
एकीकडे बाजारपेठेत गेल्या तीन महिन्यात प्रचंड महागाई वाढली आहे. सध्या तर भाज्यांसह कडधान्यांच्या दरामध्ये वाढ झाली असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट निस्कटले असतानाच पाल्यांच्या शैक्षणिक खर्चाची अतिरिक्त जबाबदारी आल्याने येते तीन महिने पालक वर्गाचे आर्थिक गणित कोलमडणार आहे.




