


मराठा व कुणबी एकच त्यात फारकत करू नका :डॉ.पाटणकर

◼️आजरा : प्रतिनिधी◼️
मराठा व कुणबी वेगवेगळे नसून ते एकच आहेत, हे यापूर्वी सिद्ध झाले असतानाही सरकार ते स्विकारायला तयार नाही. मराठा ही स्वतंत्र जात असल्याचे उल्लेख कोठेही इतिहासात आढळत नाहीत. मनोज जरांगे-पाटील यांनी मांडलेली मते याच आधारावर खरी ठरतात. शासनाने सत्याच्या आधारे परिपत्रक काढून कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही त्वरीत सुरू करावी असे प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी आजरा येथे पत्रकार बैठकीत बोलताना केले.
यावेळी डॉ. पाटणकर म्हणाले, जरांगे – पाटील यांच्याकडे याबाबतच्या निर्णयावर विचार करण्याकरीता शासनाने तीस दिवसांचा कालावधी मागितला होता. पण चाळीस दिवस उलटून गेले तरी शासनाला निर्णय घेता आला नाही. ज्यावेळी तीस दिवसांची मुदत घेतली त्यावेळी शासनाला समजले नाही का ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सत्य नाकारून तुमच्या खाजगी दुखण्यांचे राजकारण करू नका. फक्त कुणबी प्रमाणपत्र देण्याची गरज आहे. यापूर्वी आरक्षण जाहीर झालेच आहे. अशावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या मान्यतेचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरकार व सर्व पक्ष केवळ अभ्यासाच्या अभावामुळे काही गोष्टी मान्य करीत नाहीत, अथवा ते जाणून-बुजून झोपेचे सोंग घेत आहेत असेच यातून स्पष्ट होत आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्रे शासननिर्णय काढून तातडीने देण्याचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा व चर्चेचे गुऱ्हाळ थांबवून जरांगे – पाटील यांचा जीव वाचवावा असे आवाहन डॉ. पाटणकर यांनी केले. या बैठकीस कॉ. संपत देसाई, बजरंग पुंडपळ, कॉ. संजय घाटगे उपस्थित होते.
कुणबी प्रमाणपत्र द्या… प्रश्न संपुष्टात येईल..
मराठा ही जात नाही ती एक व्यापक ओळख आहे आजही पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये हजारो कुटुंबांमध्ये कुणबी दाखले आहेत परंतु त्यांची ओळख मात्र मराठा आहे. मराठवाड्यासारखे असेच पुरावे हैद्राबादमध्येही उपलब्ध आहेत. त्यामुळे फक्त तुम्ही कुणबी प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय काढला म्हणजे आपोआपच आंदोलनाचा प्रश्न संपुष्टात येईल असे आवाहनही डॉ. पाटणकर यांनी सरकारला उद्देशून केले आहे.


ग्रामदैवत श्री रवळनाथ व छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला जलाभिषेक

◼️आजरा : प्रतिनिधी◼️
ग्रामदैवत रवळनाथ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला सकल मराठातर्फे पाच धरणातील पाण्याचा जलाभिषेक करण्यात आला.
मराठा समाजाला तातडीने आरक्षण व मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आजऱ्याचे ग्रामदैवत रवळनाथ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला तालुक्यातील पाच धरणांच्या पाण्याचा जलाभिषेक घातला गेला.
चित्री, आंबेओहोळ, एरंडोळ, उचंगी, खानापूर या धरणातील पाणी घेऊन त्या त्या गावचे सरपंच आले होते.

यावेळी मारुती मोरे, बंडोपंत चव्हाण, सी. डी. सरदेसाई, राजू पोतनीस, युवराज पोवार,संजयभाऊ सावंत,महादेव पोवार, शंकरराव शिंदे,मानसिंग देसाई,प्रभाकर कोरवी, दिगंबर देशपांडे ,अमोल भांबरे, सचिन पावले, संभाजी पाटील(हात्तिवडे) डॉ.धनाजी राणे, सौ. संजीवनी सावंत, सौ.गीता नाईक, तातूअण्णा बटकडली, संभाजी इंजल, प्रकाश सावंत, कृष्णा पाटील, शिवाजी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.



प्रा. राजाभाऊ शिरगुप्पे म्हणजे ‘ बहुआयामी ‘ व्यक्तिमत्व….
आजऱ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत शोकसभा

◼️आजरा : प्रतिनिधी◼️
महाराष्ट्रभर झालेल्या विविध सामाजिक चळवळींमध्ये प्रा. राजाभाऊ शिरगूप्पे यांचा सिंहाचा वाटा आहे. बहुआयामी व्यक्तिमत्व असणाऱ्या शिरगुप्पे यांनी माणसे जोडण्याचे काम केले. कष्टकऱ्यांच्या चळवळीत ते नेहमीच अग्रभागी राहिले. त्यांच्या निधनाने सर्वसामान्यांचा मार्गदर्शक हरपला आहे. त्यांनी घालून दिलेल्या मार्गावर चालत राहणे व त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे असे प्रतिपादन आजरा येथे आयोजित शोक सभेत मान्यवरांनी केले.
येथील श्री गंगामाई वाचन मंदिरामध्ये यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी कॉ.संपत देसाई, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, लोकशाहीवादी श्रमिक मुक्ती दलाचे कॉ. धनाजी गुरव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई, माजी प्राचार्य जे.बी. बार्देस्कर, डॉ. नवनाथ शिंदे, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, डी.डी.चौगुले,सुभाष विभुते, कॉ.संजय तर्डेकर, पत्रकार ज्योतीप्रसाद सावंत, संभाजी बापट,दत्तात्रय पाटील, समीर खेडेकर, सतीश कांबळे, संग्राम सावंत, कॉ. शिवाजीराव गुरव,रवींद्र हुक्केरी, तातूअण्णा बटकडली आदींनी श्रद्धांजलीपर मनोगत आतून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
शोकसभेस जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव देसाई,जी. एम.पाटील, सुनील कांबळे, संजय घाटगे, प्रा. भीमराव पुंडपळ, डॉ, गौरी भोसले,सौ. मंजिरी यमगेकर,सौ.पुष्पलता घोळसे, सौ. पद्मिनी पीळणकर, बजरंग पुंडपळ,संजय घाटगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.



शिवसेनेची भूमिका आज ठरणार…
कार्यकर्त्यांचा मेळावा

◼️आजरा : प्रतिनिधी◼️
आजरा साखर कारखाना निवडणुकीकरिता ६ नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष व शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी आपली भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही.
पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी आज शुक्रवार दिनांक ३ रोजी दुपारी बारा वाजता हॉटेल मॉर्निंग स्टार येथे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. सदर बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन आजरा तालुकाप्रमुख युवराज पोवार यांनी केले आहे.


भात कापणी-मळणीसह सुगी सुरू
मजुरांची मात्र टंचाई

◼️आजरा : प्रतिनिधी◼️
आजरा तालुक्यामध्ये भात उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे वेध लागले असून ठीक-ठिकाणी भात कापणी व मळणीची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र मळणीकरीता सहकारी मंडळींची कमतरता भासत असल्याने यांत्रिक पद्धतीचा वापर वाढला आहे.
आजरा तालुक्याचे भात हे महत्त्वाचे पीक आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने भाताच्या उताऱ्यात घट होणार हे स्पष्ट झाले आहे. कोरोना नंतर पुन्हा ग्रामीण भागातील शहरांच्या दिशेने स्थलांतरित झालेला चाकरमानी, काजू प्रक्रिया उद्योगासारखा उपलब्ध असलेला सक्षम पर्यायी रोजगार व न परवडणारे पशुधन यामुळे शेतकरी वर्गाचा सुगी करता यांत्रिकीकरणावर भर दिसत आहे.
दिवाळीपूर्वी सुगी आटोपून घेण्याची धांदल तालुक्यात उडाली आहे.


🟩🟦🟨🟧🟥⬜🟫⬛🟪🟩🟦🟨🟧

🟧🟥🟨🟦🟩🟪⬛🟫⬜🟧🟥🟨🟦

