



एक मराठा …कोटी मराठा…
आजऱ्यात सकल मराठा च्या वतीने रास्ता रोको…

आजरा :प्रतिनिधी
आजरा येथे ‘ सकल मराठा ‘च्या वतीने जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी संभाजी चौकात रास्ता रोको करण्यात आला.
यावेळी उपस्थित वक्त्यांनी जोपर्यंत टिकाऊ स्वरूपाचे आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच चालू राहील असे जाहीर केले. मराठ्यांचा अंत पाहू नका.मनोज जरांगे यांच्या तब्येतीत काही बिघाड झाल्यास पुढे होणाऱ्या परिणामांना शासन जबाबदार राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला.

यावेळी मुकुंदराव देसाई, एम.के. देसाई, मारुती मोरे, बंडोपंत चव्हाण, बंडोपंत कातकर, सुधीर परळकर,राजू पोतनीस, विजय थोरवत ,दिगंबर देसाई,संभाजी पाटील (हत्तीवडे) ,प्रभाकर कोरवी, विलासराव नाईक,धनाजी परपोलकर ,अनिल फडके, दयानंद भोपळे, अश्विन डोंगरे, सुशील तकीलदार, सौ. राजलक्ष्मी देसाई, सौ.रचना होलम,सौ. वैशाली देसाई,सौ. मनिषा देसाई,सौ. भारती डेळेकर, निलेश घाटगे, उदय चव्हाण,दशरथ अमृते, युवराज पोवार, हरिबा कांबळे, ओंकार माध्याळकर, महेश पाटील, मसनु सुतार, दत्तात्रेय मोहिते, देवदास बोलके, संजूभाई सावंत,मनोहर सुतार, शिवाजी इंजल, संभाजी इंजल, डॉ. उल्हास त्रिरत्ने, सुरेश सावंत,गणपतराव डोंगरे यांच्यासह सर्व धर्मीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सुमारे तासभर आजरा – आंबोली व आजरा – गडहिंग्लज मार्गावरील वाहतूक थांबली होती.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी चौक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


राजाभाऊ गेले…

◼️आजरा : प्रतिनिधी◼️
विद्रोही साहित्यिक, डाव्या चळवळीचे खंदे पुरस्कर्ते प्रा. राजाभाऊ शिरगुप्पे यांचे वयाच्या ६४ व्या वर्षी कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
कला व साहित्याचा प्रचंड व्यासंग असणाऱ्या राजाभाऊंचा लोकसंग्रहही अफाट होता. डाव्या चळवळींसह, शोषित, वंचित कामगार व प्रकल्पग्रस्तांच्या चळवळींना बळ देण्याचे काम त्यांनी केले.
त्यांच्या पश्चात पत्नी सौ.मीना मंगळूरकर- शिरगुप्पे, मुलगा, मुलगी व सून असा परिवार आहे.
उद्या शोकसभा
आजरा येथील विविध संघटनांच्या वतीने श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर येथे उद्या दिनांक २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
(छायाचित्र…कृष्णा दावणे यांनी रेखाटले आहे.)



दुसऱ्या दिवशीही साखळी उपोषण सुरूच…

◼️आजरा : प्रतिनिधी◼️
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आजरा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने दुसऱ्या दिवशीही तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरूच ठेवण्यात आले आहे. मंगळवारी विविध पक्ष व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला.
आज रास्ता रोको
या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज बुधवार दिनांक एक नोव्हेंबर रोजी आजरा येथील संभाजी चौकामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात येणार आहे.



वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासह नुकसान भरपाई वाढ करावी : शिवसेनेची उपवन संरक्षकांकडे मागणी

◼️आजरा : प्रतिनिधी◼️
आजरा चंदगड तालुक्यात वन्य प्राण्यांनी हरिदोष घातला असून वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याबरोबरच नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळावी यासह विविध मागण्यांचे निवेदन उपवन संरक्षक यांना शिवसेनेच्या (उ. बा. ठा.) देण्यात आले.
गेली अनेक वर्षे आजरा, चंदगड तालुक्यातील वन्यप्राण्यांच्या हल्यात अनेकांना आपला जिव गमवावा लागला आहे.तर दि.२८ रोजी तालुक्यातील त्यात एका वन कर्मचाऱ्याचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला तरी देखील अजुनही हत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी कोणतेही प्रयत्न वन विभागाकडून होत नाहीत. मिळणारी नुकसान भरपाई अल्प आहे. या सर्व बाबीमुळे दोन्ही तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालेला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत.
१. मृत कर्मचा-याला तातडीने नुकसान भरपाई आणि त्या कर्मचा-याला वन शहीद दर्जा लवकर देणेत यावा.
२. नुकसान भरपाईत वाढ होवून बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी.
३. जंगलात शेती असलेल्या शेतक-याला बंदुक परवाना मिळावा.
४. आजरा – चंदगड तालुक्यात हत्ती संगोपणाचा असलेला प्रस्ताव तातडीने मार्गी लावावा.
५. जंगलात शेती असलेल्या तयांना १०० टक्के अनुदानावर सौर कुंपण वाटप तात्काळ करावे.
या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांचा समावेश आहे.
यावेळी नवनाथ कांबळे ( सहायक वनसंरक्षक ), प्रा.सुनिल शिंत्रे शिवसेना जिल्हाप्रमुख कोल्हापूर, संभाजी पाटील उप जिल्हा संघटक, युवराज पोवार तालुका प्रमुख आजरा, अधिकारी निकम उपस्थित होते.



क्रीडा संकुल की ओपन बार…?

◼️आजरा : प्रतिनिधी◼️
आजरा शहरातील गांधीनगर येथे लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलाची इमारत वापरा भावी पडून असून रात्रीच्या वेळी मद्यपी तरुणांकडून या परिसराचा आता ओपन बार म्हणून वापर होऊ लागला आहे.
गेली तीन वर्षे हे क्रीडा संकुल उभारण्याचे काम सुरू आहे. क्रीडा संकुलाची मुख्य इमारत बांधून पूर्ण झाली आहे. रनिंग ट्रॅक व संरक्षक कठडा बांधकाम अद्यापही अपूर्ण आहे. त्यामुळे या संकुलाचा खेळाडूंना सध्या तरी फारसा उपयोग होत नाही. मात्र रात्रीच्या वेळी मद्यपींच्या मैफिली या क्रीडा संकुल परिसरात बसलेल्या दिसतात.
क्रीडा संकुलाची उर्वरित कामे करण्यात येऊन याचा वापर खेळाडू घडवण्यासाठी व्हावा अशी मागणी आता शहरवासीय करू लागले आहेत.

निधन वार्ता…
रामचंद्र चौगले

शिरसंगी ता. आजरा येथील रामचंद्र गोविंद चौगले ( वय ६५ ) यांचे अल्पश: आजाराने कोल्हापूर येथे उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. शिरसंगीचे सरपंच संदीप चौगले व संतोष चौगले यांचे ते चुलते होत.
सेवानिवृत्त वनरक्षक गणपती डोंगरे
मडिलगे ता. आजरा येथील सेवानिवृत्त वनरक्षक गणपती नागोजी डोंगरे (वय वर्षे ६७) यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे.


🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛⬜🟥🟧🟨🟩

🟦🟩🟨🟧🟥⬜⬛🟫🟪🟦🟩🟨🟧

