


आजपासून ग्रामपंचायत निवडणुकांचे धुमशान सुरू

……………….आजरा – प्रतिनिधी………………
आजरा तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींचे निवडणूक धुमशान आज पासून सुरू होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. कार्यकर्त्यांमधील रुसवे – फुगवे मिटवण्यात स्थानिक नेतेमंडळींना कितपत यश येणार यावरही निवडणुकांची रंगत अवलंबून आहे.
तालुक्यातील पेरणोली, मेंढोली- बोलकेवाडी, मसोली, बुरुडे,चांदेवाडी, सूलगाव, देऊळवाडी,हरपवडे, वेळवट्टी, इटे या दहा गावांकरता आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. २० ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत चालू राहणार आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून गावागावात आघाड्यांची रचना सुरू झाली आहे. काही गावात बिनविरोध निवडणुकांचे प्रयत्नही सुरू आहेत. परंतु तरुणाईची अपेक्षा वाढल्याने ज्येष्ठांचे आदेश फारसे गांभीर्याने घेतले जात नाहीत असेच चित्र दिसत आहे.


आजरा तालुक्यात दुर्गा मातेचे दणक्यात स्वागत…
मंडळाच्या जल्लोषात मिरवणुका

…………………आजरा – प्रतिनिधी……………..
आजरा तालुक्यामध्ये नवरात्र उत्सव मंडळांमार्फत दुर्गा मातेच्या मुर्त्यांची प्रतिष्ठापना उत्साहात करण्यात आली. सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने ठिकठिकाणी आगमन मिरवणुका काढण्यात आल्या.
मिरवणुकांमध्ये डॉल्बी,लेजर शो,ढोल- ताशा पथकांसह विविध कार्यक्रमांचे नेटके आयोजन करण्यात आले होते.

आजरा शहरांमध्ये भगवा रक्षक नवरात्र उत्सव मंडळ, छत्रपती शिवाजीनगर नवरात्र उत्सव मंडळ, क्रांतिकारी नवरात्र उत्सव मंडळ या मंडळाच्या मिरवणुका लक्षवेधी ठरल्या. लायन्स किंग नवरात्र उत्सव मंडळ व श्री रवळनाथ मंदिर येथील सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाने पारंपारिक पद्धतीने मूर्त्यांची प्रतिष्ठापना केली.

संगीताच्या तालावर तरुणाईने चांगलाच ठेका धरला होता. यावेळी जोरदार आतषबाजीही करण्यात आली.
येत्या आठ दिवसांकरिता नवरात्र उत्सव मंडळांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.


उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी स्वाभिमानीची तीन तालुक्यात उद्यापासून पदयात्रा

गतवर्षी गाळप झालेल्या उसाचा दुसरा हप्ता चारशे रुपये प्रति टन प्रमाणे मिळावा या मागणीचे कारखान्यांना निवेदन देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवार दिनांक १७ ऑक्टोबर पासून राजेंद्र गड्ड्यानवर यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात येणार आहे.
ही पदयात्रा मंगळवारी हेब्बाळ, जलद्याळ ते बिद्रेवाडी, वाघराळी बटकनंगले, शिप्पूर, ने, हांदेवाडी, कीणे, शिरसंगी बुधवार दिनांक १८ रोजी शिरसंगी, वाटंगी फाटा, चित्रानगर, बुरुडे, आजरा, पारेवाडी, वेळवट्टी, देवर्डे दि.१९ ऑक्टोबर रोजी आजरा साखर कारखाना, मेढेवाडी, विनायकवाडी, देवकांडगाव, कोरीवडे तर शुक्रवार दिनांक २० रोजी कोरीवडे, हरपवडे, पेरणोली वझरे, महागोंड, होण्याळी,कर्पेवाडी, उत्तूर् अशी होणार आहे. तर शनिवार दिनांक २१ रोजी उत्तुर,धामणे मार्गे संताजी घोरपडे साखर कारखाना असे या यात्रेचे स्वरूप राहील.
पदयात्रे दरम्यान शिरसंगी, देवर्डे, कोरीवडे, उत्तुर येथे जाहीर सभा होणार आहेत. तर संताजी घोरपडे कारखान्याला निवेदन देण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.


खड्डे आणि धुरळा…
धंदे करायचे तरी कसे ?

……………….आजरा – प्रतिनिधी………………..
गडहिंग्लज – आंबोली मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. याकरिता शहरातून जाणाऱ्या रस्त्याशेजारी जोरदार खुदाई सुरू करण्यात आली आहे. गटर्स बांधण्यासाठी केलेल्या या खुदाईमुळे सर्वत्र खड्डे व धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून दुकानदार व व्यावसायिक यांना प्रचंड अडचणी येत आहेत.
आजरा बस स्थानक ते नवीन पोलीस स्टेशन मार्गावर केलेल्या खुदाईमुळे या मार्गावरील दुकानदार व अन्य व्यावसायिकांसमोर पडलेले खड्डे व धुळीच्या साम्राज्यामुळे ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
ऐन नवरात्र उत्सव व दीपावलीच्या काळात ही खुदाई सुरू असल्याने त्याचा फार मोठा आर्थिक फटका या भागातील व्यावसायिकांना बसू लागला आहे.


हात्तीवडे येथे शुक्रवारी कबड्डी स्पर्धा

………….. …आजरा – प्रतिनिधी………………..
हात्तीवडे ता. आजरा येथे शुक्रवार दिनांक २० ऑक्टोबर रोजी ५५ किलो वजनी गटात कबड्डी स्पर्धांचे न्यू विजय बजरंग व्यायाम शाळेच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.
विजेत्यांना अनुक्रमे ७७७७/-,५५५५/-,३३३३/-२२२२/- रू.रोख बक्षीस देण्यात येणार असून इतर अनेक वयक्तिक बक्षीसेही ठेवण्यात आली आहेत.
संबंधितांनी मंडळाशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.


आज शहरात….
♦श्री रवळनाथ देवस्थान समिती नवरात्र उत्सव यांच्या वतीने रात्री नऊ वाजता ह.भ.प.पू. शशिकांत गुरव (चौडाळ) यांचे कीर्तन.
♦भगवा रक्षक नवरात्र उत्सव मंडळ, लायन्स किंग नवरात्र उत्सव मंडळ व क्रांतिकारी नवरात्र उत्सव मंडळ चाफे गल्ली येथे रास दांडियाचे आयोजन.
♦छत्रपती शिवाजी नगर, नवरात्र उत्सव मंडळ यांच्या वतीने सकाळी ८.३० वा.महाआरती होणार आहे.





