
तलवार व सत्तूरने मारामारी …
दोघे जखमी
. 
……………..◼️आजरा प्रतिनिधी◼️…………….
पूर्व वैमन्यस्यातून मुम्मेवाडी ता.आजरा येथे तलवार व सत्तूरच्या सहाय्याने झालेल्या मारामारीत जितेंद्र अंतू हरणे, संदीप शिवाजी ढोणुक्षे हे दोघेजण जखमी झाले असून या प्रकरणी पोलिसांनी तिघाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी…
मुम्मेवाडी ता.आजरा येथील जितेंद्र दत्तू हरणे व सुहास शिवाजी ढोणुक्षे यांच्यामध्ये पैशाच्या देवाण- घेवाणीतून यापूर्वी वाद झाला होता. हा वाद पुन्हा एकदा शनिवार दि. ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उफाळून आला व या वादाचे पर्यवसान तलवार व सत्तूर यांच्या सहाय्याने मारामारीत होऊन यामध्ये संदीप शिवाजी ढोणुक्षे व जितेंद्र अंतू हरणे हे दोघे जखमी झाले आहेत.
याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी आजरा पोलिसात दाखल झाल्या असून सुहास शिवाजी ढोणुक्षे,संदीप शिवाजी ढोणुक्षे व जितेंद्र अंतू हरणे या तिघांविरोधात पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारूगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक के. डी. ढेरे पुढील तपास करीत आहेत.

सोहाळे येथे वन्यजीव सप्ताह साजरा

………….. …◼️आजरा प्रतिनिधी◼️……………..
दिनांक १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर हा वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला जातो. व वन्यप्राणी व वनसंपदेचे महत्त्व त्यानिमित्ताने पटवून देऊन त्यांविषयी जनजागृती केली जाते. त्या अनुषंगाने स्मिता डाके, परिक्षेत्र वनअधिकारी, आजरा यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ- उत्तर, आजरा यांचेमार्फत मौजे सोहाळे ता.आजरा येथील अनंत विद्यामंदिर सोहाळे येथे वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.
यावेळी अनंत विद्या मंदिर, सोहाळे शाळेचे शिक्षक यांनी वनअधिकारी व कर्मचारी यांचे स्वागत केले व प्रास्ताविक मांडले. यानंतर वनरक्षक अस्मिता घोरपडे यांनी वन्यजीव विषयी महत्व पटवून दिले. जंगलात आग लावल्याने काय दुष्परिणाम होतात याबद्दल माहिती सांगितली तसेच वनांचे संरक्षण करा संवर्धन करा जतन करा असा संदेश दिला. वन्यजीव सप्ताह हा वनांचे महत्व तसेच वन्यप्राणी विषयी माहिती देऊन जनजागृती करणे हा या कार्यक्रमा पाठीमागचा उद्देश आहे असे सांगितले.यावेळी विद्यामंदिर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमासाठी परिमंडळ वनअधिकारी उत्तर आजरा बाळेश न्हावी,वनरक्षक दयानंद शिंदे,वनमजुर सुरेश पताडे, मारुती शिंदे व प्रविण कांबळे तसेच विद्यार्थी,अंगणवाडी सेविका,ग्रामस्थ उपस्थित होते.

रामतीर्थ व्यापारी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना भेटवस्तूचे वाटप

……………..◼️आजरा प्रतिनिधी◼️……………..
आजरा शहरातील रामतीर्थ व्यापारी बंधू ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्यावतीने संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना भेटवस्तूचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष संजय पाचवडेकर यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात १० सभासदांना ब्लँकेट भेटवस्तूचे वाटप करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत मॅनेंजर अशोक तांबेकर यांनी केले.
भेटवस्तू वाटपप्रसंगी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन बोलताना अध्यक्ष पाचवडेकर म्हणाले, २५ वर्षाच्या कालावधीत भागधारक, ग्राहक, ठेवीदार यांच्या हिताची जपणूक होईल अशा दृष्टीने संस्थेचे धोरण आखून संस्थेचा कारभार केला आहे. अहवाल सालात संस्थेकडे ४ कोटींवर ठेवी असून २ कोटींवर कर्जे वाटप केली आहेत. संस्थेला १० लाखांवर नफा झाला असल्याचे स्पष्ट करत संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. व रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना भेटवस्तूचे वाटप करत असून सभासदांनी त्याचा लाभ घ्यावा असेही आवाहन केले.
यावेळी सर्व संचालकांसह जयदीप देसाई, रवी देसाई, मारुती मनगुतकर, रामचंद्र निकम यासह सभासद व कर्मचारी उपस्थित होते. आभार ज्येष्ठ संचालक जोतीबा चाळके यांनी मानले.

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पोलीस दलाची बैठक

……………..◼️आजरा प्रतिनिधी◼️…………….
मंगळवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी ठीक १२ वाजता प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय, आजरा येथे राजीव नवले, उपभागीय पोलीस अधिकारी, गडहिंग्लज विभाग गडहिंग्लज यांच्या उपस्थितीत नवरात्र उत्सव २०२३ अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आले आहे सदर बैठकीस मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच सर्व पोलीस पाटील बैठकीस हजर रहावेअसे आवाहन स.पो. नि. सुनील हारू गडे यांनी केले आहे.
तसेच पोलीस पाटील यांनी स्वतःहून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीबाबत कल्पना द्यावी. नवरात्र उत्सव २०२३ करीता परवाना मागणी कागदपत्रे येताना दोन प्रतीमध्ये घेऊन यावे असेही स्पष्ट केले आहे.

आज शहरात…
विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने स.७.३० वा. छ.शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रा
निधन वार्ता
सौ.अनुसया धुरे

उत्तूर मधील जेष्ठ नागरीक व प्रगतशील शेतकरी अनंतराव धुरे यांच्या पत्नी सौ.अनुसया अनंतराव धुरे (वय ७८ वर्षे ) यांचे निधन झाले. उत्तूर मधील प्रसिद्ध बॉडी बिल्डर संजय धुरे यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात दोन मुले तीन मुली व नातवंडे आहेत. उत्तूर मध्ये त्यांचा परिवार मोठा आहे.
रक्षाविसर्जन आज (सोम.) सकाळी ९ वाजता उत्तूर येथे आहे.


