
भाजपाला भविष्यात सत्ता मिळणे कठीण… आमदार सतेज पाटील
जनसंवाद यात्रेस उस्फुर्त प्रतिसाद…
भाजपला भविष्यात सत्ता मिळणार नाही असा विश्वास वाटत असल्याने शिवसेना, राष्ट्रवादी हे पक्ष फोडण्याचे पाप त्यांनी केले आहे. असा घणाघात जिल्हा काग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी केला. देश, राज्य व जिल्ह्यातील अविश्वासाचे वातावरण दूर करून काग्रेसला ताकद दद्यावी असेही आवाहन त्यांनी केले.
आजरा तालुक्यात कॉग्रेसची जनसंवाद यात्रा झाली. हांदेवाडी (ता. आजरा) येथे जनसंवाद यात्रेला सुरवात झाली. आजरा शहरात संभाजी चौकात सांगता सभा झाली. या वेळी आम. पाटील यांनी भाजप पक्षाचा कारभार व ध्येय धोरणावर हल्ला करत खरपूस समाचार घेतला. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर, संग्रामसिंह नलवडे, बाजीराव खाडे, बशीर खेडेकर आदी प्रमुख उपस्थित होते.
आजरा नगरपंचायतीचे नगरसेवक अभिषेक शिंपी यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात ते म्हणाले, देशात द्वेष पसरण्याचे काम भाजप करीत आहे. जाती धर्मात भांडणे लावली जात आहे. हा देश विविध जाती, धर्म, पंथाचा आहे. देशात बंधुभाव, समता वाढवण्यासाठी भाजपला सत्तेवरून दूर करूया.
श्री. पाटील म्हणाले, लोकांची माथी भडकावून सत्ता मिळण्याचे काम भाजपने केले आहे. गरीबाला आधार देण्या ऐवजी उदयोजकांची कर्ज माफ करण्यावर त्यांचा भर आहे. अच्छे दिन येणार असा नारा देत ते सत्तेवर आले. अच्छेदिन कुठे आहेत ? श्रीमती रेडेकर म्हणाल्या, काग्रेसने देशाला दिशा दिली आहे. भाजपला रोखण्यासाठी एकजूट ठेवूया. या तालुक्यातील सत्तेतून भाजपला हाकलून लावूया बाजीराव खाडे, सुनिल शिंदे यांची भाषणे झाली. नामदेव नार्वेकर, एस. पी. कांबळे, संजय सावंत, नौशाद बृहडेखान, रविंद्र भाटले, निसार लाडजी, किरण कांबळे, विविध संस्थाचे व गोकुळचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
ठिक ठिकाणी उत्साही स्वागत….

हांदेवाडी येथे जनसंवाद यात्रेचे उत्साही स्वागत झाले. कोळिदे, शिरसगी, वाटंगी, बुरुडे मार्गे यात्रा आजरा शहरात आली. या वेळी महाविकास आघाडीच्या मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा व पुष्पगुच्छ देवून श्री. पाटील यांचे स्वागत व सत्कार केला. छ. शिवरायांच्या पुतळ्याला हार घालून आजरा शहरातील मुख्य बाजारपेठेतून यात्रा संभाजी चौकात आली. वाटंगी येथे सभा झाली. शिवाजी नादवडेकर, विजय देसाई, गिलबिले यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. आजरा येथे जेसीबी वरून आ. सतेज पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्या :-राजीव नवलें
आजऱ्यात गणेशोत्सव मंडळiच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

गणेशोत्सव हा मांगल्य, पावित्र्याचा व आनंदाचा सण आहे. हा सण उत्साहात व शांततेत साजरा झाला पाहीजेत. सामाजिक व धार्मिक सलोखा बिघडणार नाही याची प्रत्येकांने काळजी घ्यावी. पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन मंडळानी करावे व सहकार्य करावे असे आवाहन गडहिंग्लज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी केले.
येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील सभागृहात आजरा तालुक्यातील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची व पोलीस पाटील यांची बैठक झाली. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नवले अध्यक्षस्थानी होते. तहसीलदार समीर माने, निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे प्रमुख उपस्थित होते.
श्री. हारुगडे यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात गणेशोत्सव मंडळासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचना याबाबत माहीती दिली. | आजरा तालुक्यात दरवर्षी गणेशोत्सव शांततेत व साहार्दपूर्ण वातावरणात साजरा झाला आहे. यंदाही मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करून गणेशोत्सव उत्साहात साजरा करावा. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पदाधिकान्यांनी काळजी घ्यावी. असे आवाहन केले. श्री. नवले म्हणाले, मंडळानी डॉल्बीचा वापर टाळावा. पारंपारिक वादयाचा वापर करावा. देखावे सादर करतांना याबाबत पोलीसांशी संपर्क करावा. समाजात वितुष्ट तयार होईल. समाजिक व धार्मिकतेला गालबोट लागेल असे कृत्य करू नये. या वेळी तहसीलदार श्री. माने यांनी मार्गदर्शन केले. या वेळी आजरा, उत्तूर परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, पोलीस पाटील, नागरीक उपस्थित होते. गुप्त विभागाचे पोलीस अंमलदार अनिल तराळ यांनी आभार मानले.
विशेष सूचना :-
▶️ मूर्तिकार यांनी श्रीच्या मोठ्या मुर्त्या बनवू नयेत.
▶️ शाडूच्या मूर्ती बनविण्यात याव्यात.
▶️ गणेश मंडळे मुर्ती घेणे करीता आलेनंतर त्यांना श्री ची मूर्ती व्यवस्थित तपासून करून द्यावी.
▶️ मुर्ती बनविताना चांगल्या प्रकारे, मजबूत बनविण्यात यावी. जेणे करून मंडळ मुर्ती प्रतिष्ठापना करतेवेळी व विसर्जन मिरवणूक वेळी मुर्ती हादऱ्याने खराब होणार नाही याची दक्षता घ्यावी.
▶️ फ्लेक्सधारक यांनी फ्लेक्स बोर्ड बनवताना कोणत्याही राजकीय पक्षाचे किंवा उत्सवाचे किंवा इतर कार्यक्रमाचे बोर्ड, फ्लेक्स बनविताना अक्षेपार्ह फोटो, शब्द प्रिंट करू नयेत, एखाद्या व्यक्तीच्या भावना दुखावतील असे शब्द प्रिंट करू नयेत.
▶️ गावातील सर्व पोलीस पाटील यांनी गावात घडणाऱ्या घटनांची, भावकीतील वाद, शेती वरून वाद, राजकीय पक्षांच्या सभा, मोर्चा, इतर माहिती पोलीस ठाणे द्यावी.
▶️ पोलीस पाटील यांनी एखाद्या राजकीय पक्षाचे संघटनेची बाजू घेऊ नये.
▶️ पारदर्शक काम करावे.
▶️ दहीहंडी उत्सव साजरा करताना त्याची रीतसर परवानगी घेण्यात यावी.
▶️ डॉल्बी सिस्टीम ला बंदी आहे, डॉल्बी सिस्टीम लावण्याचा प्रयत्न करू नये. मोठ्या उंचीवर दहीहंडी बांधण्यात येऊ नये, दहीहंडी उत्सवाच्या अनुषंगाने विभागाची परवानगी घेऊन योग्य ती खबरदारी घ्यावी.
.. …………………
रिपब्लिकन सेनेच्या वतीने लाठी हल्ल्याचा निषेध…

आजरा तालुका रिपब्लिकन सेनेच्या वतीने अंतरवाली सराटी ता. अंबड येथील मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याचा निषेध रिपब्लिकन सेनेच्या आजरा शाखेच्या वतीने करण्यात आला. याबाबतचे लेखी निवेदन तहसीलदारांना देण्यात आले असून जालन्याच्या आय.पी.एस./ आय.ए.एस. अधिकाऱ्यांना हा प्रश्न नीट हाताळता आला नसल्याने या घटनेची उच्चस्तरीय चौकशी होऊन संबंधित दोषीवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबतच्या निवेदनावर आजरा तालुका महासचिव परशुराम कांबळे, तालुका अध्यक्ष विजय कांबळे, तालुका उपाध्यक्ष गोपाळ होण्याळकर, अविनाश कांबळे, मधुकर कांबळे, नंदकुमार कांबळे, जनार्दन लोखंडे आदींच्या सह्या आहेत.
……………………

दाभिल येथील शाळेतील दोन स्मार्ट टीव्हीसह शालेय पोषण आहाराचे साहित्य लंपास
दाभिल ता. आजरा येथील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दोन स्मार्ट टीव्हीसह शालेय पोषण आहाराचे साहित्य लंपास केले. याबाबतची फिर्याद शिक्षक तुकाराम कृष्णा शिंगारे यांनी आजरा पोलिसात दिली असून सहाय्यक फौजदार दत्ता शिंदे पुढील तपास करीत आहेत.



