
फसवणूक प्रकरणी ‘डॉ. झाकीर हुसेन ‘ च्या माजी मुख्याध्यापकांसह लिपिकावर गुन्हा नोंद
आजरा येथील डॉ. झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेजमध्ये नोकर भरती करत असताना बनावट दस्तऐवज बनवून व अभिलेखावर खाडाखोड करून बोगस शिक्षक भरती व नेमणुका मान्यता प्रस्ताव सादर केल्याप्रकरणी माजी मुख्याध्यापक जमशिद दस्तगीर जमादार व लिपिक यायाखान निजाम बुड्डेखान ( दोघेही रा. आजरा) यांच्या विरोधात आजरा पोलिसात गुन्हा नोंद केला आहे. माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी गजानन तानाजी उकिर्डे यांनी आजरा पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की…
हायस्कूलच्या नोकर भरती वेळी शालेय रेकॉर्ड तयार करताना खाडाखोड करणे , कागद चिकटवून त्यावर शिक्षकांच्या सह्या घेणे , नोंदणी मध्ये फेरफार करणे , जनरल रजिस्टर मध्ये खाडाखोड करून बोगस दाखले देणे यासारखे निंदनीय प्रकार शाळेच्या आवारामध्ये जमादार व बुड्ढेखान यांनी केले असल्याची फिर्याद उकिर्डे याांनी दिली आहे.
गेले काही दिवस आजरा तालुक्यात या प्रकरणाची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. याप्रकरणी अनेक तक्रारी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडे करण्यात आल्या होत्या.





