mrityunjaymahanews
अन्य

चार लाख मे.टन गाळपाचा टप्पा यावर्षी ओलांडणार : प्रा.शिंत्रे आजरा साखर कारखान्याची वार्षिक सभा संपन्न…

चार लाख मे.टन गाळपाचा टप्पा यावर्षी ओलांडणार : प्रा.शिंत्रे

आजरा साखर कारखान्याची वार्षिक सभा संपन्न

बंद अवस्थेत असणारा आजरा साखर कारखाना जर दोन वर्षानंतर सुरू झाल्यावर  साडेतीन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होत असेल तर उचंगी, आंबेओहोळ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर कारखान्याकडून, चार लाख मेट्रिक टन ऊस गाळपाच्या टप्पा ओलांडणे फारसे अवघड नाही. फक्त सभासदांनी व ऊस उत्पादकांनी सहकार्य करावे असे आवाहन आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना केले. आजरा साखर कारखान्याची 32 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर पार पडली. यावेळी सभासदांनी संचालक मंडळावर प्रश्नांचा भडीमार केला. प्रा. सुनील शिंत्रे, कार्यकारी संचालक डॉ. टी. ए. भोसले व सचिव व्यंकटेश ज्योती हे सभासदांच्या प्रश्नाला सामोरे गेले.

सभेच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व संस्थापक अध्यक्ष स्व. वसंतराव देसाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यकारी संचालक डॉ. टी. ए. भोसले यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

विषय वाचन सुरू असतानाच इंद्रजीत देसाई, सुनील शिंदे, तुळसाप्पा पवार, हरिबा कांबळे, उत्तम देसाई,सुधीर सुपल, दत्ता पाटील आदींनी विविध प्रश्नांची सरबत्ती केली.यामध्ये प्रामुख्याने मागील वर्षीचा ताळेबंद कारखाना कार्य स्थळावरील बेरिंग चोरी प्रकरण, कर्जाचे वाढलेले आकडे, कर्मचाऱ्यांना वेतनवाढ, भाग भांडवलात केलेली वाढ आदी प्रश्नांचा समावेश होता.

यावेळी प्राध्यापक शिंत्रे पुढे म्हणाले, कार्यक्षेत्रामध्ये ऊस उत्पादन वाढावे तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे याकरता गावोगावी विविध उपक्रम राबवले जात आहेत.कारखान्याच्या येणाऱ्या हंगामासाठी ,कार्यक्षेत्रातून पाच हजार, 394 हेक्‍टर क्षेत्राची नोंद झाली असून त्यापासून सुमारे 3 लाख मेट्रिक टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार आहे. तसेच कार्यक्षेत्राबाहेरून दोन लाख दहा हजार मेट्रिक टन उसापैकी इतर विल्हेवाट वजा जाता सुमारे साडेचार लाख मेट्रिक टन एकूण ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार आहे. साडे चार लाखापर्यंत गाळप झाल्यास कारखान्याचे कर्ज कमी होण्यास मदत होणार आहे.कारखान्यामार्फत सहप्रकल्पासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सभेस ज्येष्ठ संचालिका व गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, रमेश रेडेकर, शांताराम पाटील, माजी सभापती उदय पवार, विष्णुपंत केसरकर,मसनू सुतार,भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार,राजू होलम,संभाजी पाटील, युवराज पोवार, विश्वासराव देसाई, यांच्यासह , विविध संस्थांचे पदाधिकारी सर्व संचालक कारखान्याचे अधिकारी व सभासद उपस्थित होते.

उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी यांनी आभार मानले.

सभासदांना 10% लाभांश देणार
तालुका संघाच्या सभेत अध्यक्ष देसाई यांची माहिती


अहवाल सालात आजरा तालुका संघाला सर्व तरतुदी करून ३१ मार्च २०२२ अखेर ७ लाख ६२ हजार ३९२ इतका निव्वळ नफा झाला असून सभासदांना १० टक्के प्रमाणे लाभांश देणार असल्याचे चेअरमन एम. के. देसाई यांनी सांगितले. शिवाय कोरोना काळात कर्मचाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा म्हणून आपली सेवा बजावली याबद्दल त्यांना प्रोत्साहनपर एक पगार देणार असल्याचे त्यांनी सांगितले आजरा तालुका शेतकरी संघाच्या ६३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. येथील जे. पी. नाईक सभागृहात ही सभा पार पडली.

दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्रद्धाजंलीचा ठराव संचालक गणपतराव सांगले यांनी मांडला. संघाचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक सुधीर देसाई यांची जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सभासदांच्यावतीने सत्कार करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा व संघाच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना चेअरमन देसाई म्हणाले, चालू आर्थिक वर्षात संघाची उलाढाल १३ कोटी ५२ लाख इतकी झालेली असून १५०० मेट्रीक टन इतक्या मिश्र खताचे उत्पादन संघामार्फत केले आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार गावोगावी खत पुरवठा केला आहे. याबद्दल तत्कालीन जिल्हाधिकारी दौलतराव देसाई, जिल्हा कृषी अधिकारी यांनी संघाचे कौतुक करून इतर जिल्ह्यातील संघांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे सांगितल्याचे चेअरमन देसाई यांनी सांगितले.

मॅनेजर जनार्दन बामणे यांनी अहवाल वाचन केले. यावेळी तानाजी देसाई, इंद्रजित देसाई, सचिन पावले, धनाजी किल्लेदार यांनी विचारलेल्या प्रश्नांना मॅनेजर बामणे यांनी उत्तरे देऊन स्पष्टीकरण दिले. तसेच यापूर्वी मिळणारे खतावरील अनुदान शासनाने कायम ठेवावे असा ठराव तानाजी देसाई यांनी मांडला त्याला सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. तसेच सभासदांनी आपली शेअर्स रक्कमेची पूर्तता त्वरीत करून घ्यावी असे आवाहन बामणे यांनी केले. लिकिंगपद्धतीने खत विक्री करणाऱ्या कंपनीवर कारवाई करावी असे शासनाला कळवावे असे देसाई यांनी सांगितले. ठराव करून शासनाकडे पाठवू असे चेअरमन देसाई यांनी सांगितले. यावेळी सर्वानुमते सर्व विषयाला एकमताने मंजूरी देण्यात आली.

या सभेला व्हा. चेअरमन मायादेवी पाटील आजरा कारखान्याचे चेअरमन सुनील शिंत्रे, जनता बँकेचे चेअरमन मुकुंदादा देसाई, माजी सभापती विष्णूपंत केसरकर, वसंतराव धुरे, मसणू सुतार, दिपक देसाई, रणजित देसाई, संभाजी पाटील, दिगंबर देसाई, संभाजी तांबेकर, महादेव हेब्बाळकर, विठ्ठल देसाई, महादेव पाटील, राजाराम पाटील, अनिल फडके, मुकुंद तानवडे, नारायण सावंत, गोविंद पाटील, मधुकर येलगार, भिमराव वांद्रे, संभाजी रा. पाटील, राजू होलम, अनिकेत कवळेकर, युवराज पोवार यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी, सभासद उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

गॅस सिलेंडरच्या आगीतील जखमीचा मृत्यू

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये चराटी-शिंपी यांचे महाविकासआघाडी समोर कडवे आव्हान राहणार….

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!