बुधवार दि. १३ ऑगस्ट २०२५

जि. प. च्या हरकती फेटाळल्या…
तालुक्यात संतापाची लाट
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील जिल्हा परिषद गटाबाबत विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे दहा जणांनी हरकती दाखल केल्या होत्या. त्या हरकती विभागीय आयुक्तांनी फेटाळल्या आहेत. त्यामुळे तालुक्यात दोन जिल्हा परिषद गट राहणार आहेत. या निर्णयाने तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
तालुक्यात तीन जिल्हा परिषद गट व सहा पंचायत समिती गण होते. नव्या पुर्नरचेनेत एक जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समिती गण रद्द झाले आहेत. विविध राजकीय पक्ष संघटनाचे पदाधिकारी व तालुक्यातील जनतेत संतापाची भावना आहे. दरम्यान याबाबत विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. त्या आयुक्तांनी फेटाळल्या आहेत. शासनाकडून १२ जून २०२५ आदेशानुसार आजरा तालुक्याकरीता दोन गट चार गण निश्चित करण्यात आले आहे. तालुक्यात भौगोलीक संलग्नता, दिशा निश्चिती व लोकसंख्येचे प्रमाणात विचारात घेवून प्रभाग रचना करण्यात आलेली आहे. आजरा तालुक्यासाठी हरकतदारांनी अर्जात नमुद केल्याप्रमाणे जिल्हा परिषद दोन गट व चार गणांची संख्या बदल करण्याचा अधिकारी या कार्यालयाकडे नाही. त्यामुळे यामध्ये हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नसल्याने त्यांची हरकत अमान्य करण्यात आल्याचे विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

शक्ती पीठ नको कर्जमाफी द्या…
शिवसेना उ.बा.ठा.आक्रमक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिवसेना उ.बा.ठा. गटाच्यावतीने आजरा शहरात सोमवारी सायंकाळी शेतकरी कर्जमुक्ती दिंडी काढण्यात आली. यावेळी आम्हाला शक्तिपीठ नको, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी मागणी करण्यात आली.
येथील छत्रपती संभाजी चौकातून या दिंडीला प्रारंभ करण्यात आला. याठिकाणी शिवसेनेचे नेते विजय देवणे म्हणाले, राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही. शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी देण्याची मागणी या शेतकरी कर्जमाफी दिंडीच्या माध्यमातून केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर दिंडी टाळ मृदंगाच्या जयघोषात मुख्य बाजारपेठेतून शिवतीर्थ या ठिकाणी आणण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या व ७/१२ कोरा करा, शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, नियमित कर्ज भरणाऱ्याला ५० हजार रुपये अनुदान द्या, शेतीपंपाला मोफत वीज मिळावी. खते, बि-बीयाणास ५० टक्के अनुदान मिळावे, शेती औजारांना ५० टक्के अनुदान द्यावे. पाटबंधारे खात्याकडून
वसूल केली जाणारी पाणीपट्टी रद्द करा. शेतकरी व शेतमजूरांना पेन्शन द्या, सन २०२४ च्या महापुरात पडझड झालेल्या घरांना नुकसान भरपाई द्या, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
शिवसेना नेते देवणे, जिल्हा प्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या दिंडीत तालुका प्रमुख युवराज पोवार, गडहिंग्लज तालुका प्रमुख दिलीप माने, शहर प्रमुख ओंकार माद्याळकर, उपतालुका प्रमुख संजय येसादे, दिनेश कांबळे, शिवाजी आडाव, युवासेना तालुका प्रमुख महेश पाटील, विजय डोंगरे, संजू, दिनेश कांबळे, शिवाजी इंगळे, अमित गुरव, महादेव गजरे,भाई सावंत, संतराम कांबळे यांच्यासह शिवसैनिक तसेच वारकरी बांधव या शेतकरी कर्जमाफी दिंडीत सहभागी झाले. शिवतीर्थवर या दींडीची सांगता करण्यात आली.

उत्तूर–गडहिंग्लज रस्ता तात्काळ पूर्ण करा
अन्यथा आंदोलन … युवकांचा इशारा

राज्य महामार्ग क्रमांक १८९ वर असलेला उत्तूर–गडहिंग्लज रस्ता गेल्या वर्षभरापासून सुरू असूनही अद्याप पूर्ण झालेला नाही. चंदगड ते गारगोटी या मुख्य मार्गाचे काँक्रीटीकरण करण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून, पावसामुळे रस्त्याची दुरवस्था अधिकच वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांचे आणि नागरिकांचे हाल होत आहेत.
कामाच्या संथ गतीबाबत आणि रस्त्याच्या निकृष्ट दर्जाबाबत स्थानिक युवकांनी ऑनलाईन पद्धतीने शासन व रस्ते विकास महामंडळाकडे तसेच तहसीलदारांकडे तक्रार नोंदवली आहे.तक्रारपत्रात नमूद केले आहे की, गडहिंग्लज–उत्तूर–गारगोटी हा राज्य मार्ग NH4 व NH548 ला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका, शेतीमाल वाहतूक करणारी वाहने आणि नागरिक सतत प्रवास करतात. मात्र, कामाचा दर्जा निकृष्ट असून गती कमी असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्याचे काम तात्काळ आणि जलदगतीने पूर्ण करावे,कामाचा दर्जा शासनाच्या निकषानुसार व उच्च प्रतीचा ठेवावा, नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात इत्यादी मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
यामध्ये शांताराम भिउंगडे यांनी थेट रस्ते विकास महामंडळाकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून, दिगंबर यादव, पराग देशमाने, प्रदीप लोकरे, विकी काटे, सौरभ वांजोळे यांच्यासह विठ्ठल उत्तूरकर, ग्राम.प. सदस्य संदेश रायकर, संभाजी कुराडे, दीपक आमणगी, सुशांत आमणगी, धोंडीराम सावंत, प्रशांत पोतदार, अमित जाधव, विकास चौथे, मारुती सावंत, विशाल उत्तूरकर, सुधाकर चव्हाण, संतोष पाटील, आर्दाळचे सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत पाटील, मधुकर पोटे, शिवाजी गाडीवड, संजय आजगेकर आदींनीही तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे.

शेळप ग्रामपंचायत कर्मचारी शंकर नवार यांचा प्रामाणिकपणा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शेळप ग्रामपंचायत कर्मचारी शंकर नवार यांनी सापडलेले पैसे प्रामाणिकपणे परत करत आजही समाजात चांगुलपणा टिकून आहे हे दाखवून दिले. कॉ. संपत देसाई हे शक्तीपीठ महामार्ग विरोधी मोर्चाच्या तयारीसाठी शेळप येथे गेले असता संपत देसाई यांचे पाकीट तिथेच पडले. रात्री दोनतीन बैठका करून कॉ. देसाई घरी परत आल्यानंतर त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. सावंतवाडी येथील मित्राने दुसऱ्या स्थानिक मित्राला देण्यासाठी वीस हजार रुपये कॉ. देसाई यांचे कडे दिले होते. ते तसेच खिशात तसेच ठेवून कॉ. देसाई शक्तीपीठ महामार्ग विरोधी मोर्चाच्या तयारीसाठी खेडगे, पारपोली, शेळप आणि दाभिल येथे गेले होते. रात्री उशिरा घरी आल्यानंतर पैसे आणि पाकीट हरवल्याचे त्यांच्या लक्षात आले.
दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या गावातील कार्यकर्त्यांना पैसे हरवल्याचे सांगून, सापडले तर कळवा म्हणून कॉ. देसाई जेऊर येथे मोर्चाच्या बैठकीसाठी गेले. त्याचवेळी शंकर नवार यांचा त्यांना फोन आला व आपले पाकीट आणि पैसे माझ्याकडे असल्याचे सांगितले. सापडलेले पैसे परत करणाऱ्या शंकर नवार या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक सगळीकडे होत आहे.

महसूल विभागाकडून महसूल लोक अदालतीचे सहा ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान नियोजन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जमिनीशी संबंधित प्रलंबित राहिलेले गावे निकाली काढण्याच्या पार्श्वभूमीवर सहा ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर या कालावधीत महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या महसूल लोक अदालतीद्वारे महसुली दावे तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत. यामुळे कायमस्वरूपी निकाल मिळवण्याची संधी पक्षकारांना उपलब्ध करून दिली जात आहे.
अर्ज दाखल करण्याचा कालावधी २० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर असून दाखला अर्जांची छाननी १५ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे. महसूल लोक अदालतीच्या पूर्वतयारीसाठी २९ सप्टेंबर व ३० सप्टेंबर रोजी बैठक होणार असून प्रत्यक्ष महसूल लोक अदालत सहा ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर दरम्यान भरवण्यात येणार असल्याचे तहसीलदार समीर माने यांनी सांगितले.

ग्रंथालय शास्त्राचे जनक पदमश्री डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर,आजरा येथे भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक, पदमश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यांचा जन्मदिवस हा देशभरात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ग्रंथालयाचे कार्यवाह श्री कुंडलिक नावलकर यांच्या हस्ते डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. १२ ऑगस्ट १८९२ रोजी मद्रास प्रांतातील शियाली या गावी जन्मलेल्या डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी देशातीय ग्रंथालय चळवळ वाढीसाठी मोठे योगदान दिले आहे. ग्रंथालय शास्त्राचे नियम, शास्त्रीय व्दिबिंदू ग्रंथ वर्गीकरण पध्दती, ग्रंथालय कायदा व सार्वजनिक ग्रंथालय चळवळ या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. यावेळी ग्रंथालयाचे सहकार्यवाह रविंद्र हुक्केरी, संचालक विजय राजोपाध्ये, बंडोपंत चव्हाण, महंमदअली मुजावर, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर, समीर चॉद, संतोष कांबळे, निखिल कळेकर, महादेव पाटील, महादेव पोवार व शालेय विद्यार्थी उपस्थीत होते.

उत्तूर येथे ‘एक राखी जवानासाठी , एक राखी वृक्षासाठी ‘या उपक्रमांस प्रतिसाद

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तुर ता . आजरा येथील नव कृष्णा व्हॅली स्कूल व ज्युनिअर कॉलेज उत्तुर यांचे वतीने रक्षाबंधनाचे औचित्य साधून ‘एक राखी जवानांसाठी, एक राखी वृक्षांसाठी व एक राखी निसर्गासाठी’ हा उपक्रम राबवण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या रंगाच्या, आकाराच्या राख्या तयार केल्या. यापैकी काही राख्या सीमेवरील जवानांच्या साठी पाठवणेसाठी सुपूर्द करणेत आल्या. याबरोबरच जवानांचे मनोधैर्य वाढवणारी शुभेच्छा पत्रे देखील मुलांनी राखी सोबत जवानांसाठी पाठवून दिली. विद्यार्थ्यांनी वृक्षांना आपले भाऊ-बहिण समजून राख्या बांधल्या.
प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येकी दोन झाडे याप्रमाणे वृक्षदत्तक योजना सुरू असून विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेल्या झाडांना राखी बांधून त्या झाडांचे संगोपन करण्याची प्रतिज्ञा घेतली.
उपक्रमाचे नियोजन प्राचार्य रामकृष्ण मगदूम यांचे मार्गदर्शनाखाली विद्या शिवणे, विशाल वडवळे, . प्रतिभा सुतार प्रियंका राजाराम, गीता पाटील, संध्या मोरबाळे, यांनी केले.
आप्पासाहेब गायकवाड हायस्कूल, महागोंड शाळेमध्ये रानभाजी महोत्सव संपन्न…

महागोंड (ता. आजरा ) येथील आप्पासाहेब गायकवाड हायस्कूलमध्ये रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी इयता आठवी ते दहावी मधील विद्यार्थी – विद्यार्थिनींनी आपल्या परीसरातील रानभाज्या,ज्यांचा उपयोग औषधी म्हणून व खाण्यासाठी केला जातो अशा आपल्या परीसरातील रानभाज्या गोळा करून शिजवून त्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.
या प्रदर्शनात मोहर, कुरडूई, भोपळा, नालगी, पाथरी, कडवी, अळू, कांगूणी, काटेली, भांगिरा, आघाडा, काटकुसुंबा या भाज्या शिजवून त्या कशा पद्धतीने केल्या त्याची क्रिया व रेसीपी सांगीतली, त्याच प्रमाणे भाज्यामध्ये असणारे औषधी गुणधर्म आणि आजीबाईच्या बटव्याप्रमाणे होणारे औषधी उपयोग, भाज्यामध्ये असणारे विविध पौष्टीक अंश, लोह, कॅल्सिअम फायबर आणि प्रथिनांचा उपयोग सांगीतले.
प्रदर्शनासाठी परीक्षक म्हणून सौ. समिक्षा आनंदा पाटील, सौ. रेश्मा बाबासाहेब पाटील सौ. शुभांगी भगवान कांबळे, सौ. अनिता सुनिल खराडे त्यांचे स्वागत प्रभारी मुख्याध्यापक श्री. दीपक कांबळे सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक- रोहण आळवेकर द्वितीय क्रमांक – समर्थ जाधव, तृतीय क्रमांक- रिषभ पाटील तर उत्तेजनार्थ – अनिकेत कांबळे यांनी पटकावला.
तालुक्यात महावितरण चे ग्राहक मिळावे उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यात महावितरणतर्फे सहा गावात ग्राहक मेळावा झाला. ग्राहकांपर्यंत प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या सोडवण्याबरोबर विविध योजनांची माहिती देण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आजऱ्यातील मेळाव्यात ग्राहकांचा प्रतिसाद लाभला.
महावितरणचे उपकार्यकारी अभियंता दयानंद अष्टेकर म्हणाले, महावितरण तर्फे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी शाखा कार्यालय स्तरापर्यंतचे ग्राहक मेळावे घेण्यात येणार आहेत. सोमवारी सुट्टी असेल तर मंगळवारी हे मेळावे होतील.
महावितरणाच्या आजरा शाखेतर्फे येथील तहसील कार्यालयासमोर मेळावा झाला. ग्राहकांना नवीन वीज जोडण्या देणे, प्रधानमंत्री सूर्यघर योजना, शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होण्यासाठी कुसुम-बी योजना, मागेल त्याला सौर कृषीपंप योजना माहिती, स्मार्ट मीटर बाबत जनजागृती, शेतीपंप ग्राहकांचे भार कमी करणे व वाढविणे याबाबत माहीती देवून ऑनलाईन अर्ज जागेवर कार्यवाही करणेत आली. ग्राहकांच्या विविध तक्रारींचे निराकरण करण्यात आले. ग्राहकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
शाखाधिकारी कृष्णात कोळी, संतोष डोंगरे, सुनील पाटील, विनोद कांबळे, शाखाधिकारी दीपक जमने, बाळकृष्ण कडूकर, प्रथमेश कातकर, रोहित शेंडे, संभाजी खंडे, शाखाधिकारी सुशांत शिवणे, तेजस पाटील, संदेश लोहार, प्रदीप हुंदळेकर, रवींद्र रेडेकर, महेश कोरे, निखिल काळोजी, महादेव पाटील, नीता गायकवाड, सुनील भाटले, श्रावण कांबळे इम्रान हवालदार, आदी उपस्थित होते.


