शुक्रवार दि. ११ जुलै २०२५


अखेर जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले
जि.प. मतदारसंघ रचना

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदारसंघाची म्हणजेच गट आणि गणाची प्रारूप रचना सोमवारी जाहीर होणार आहे. आजरा तालुक्यातील एक जिल्हा परिषद मतदार संघ आणि दोन पंचायत समितीचे मतदार संघ नवीन पुनर्रचनेत कमी होत असल्याने तालुक्यातून संताप व्यक्त केला जात आहे. सर्वच पक्षाच्या प्रमुख मंडळींनी याबाबत प्रशासनाकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला. परंतु याला फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. हा विषय अगदी मंत्रीपातळीवरूनही हाताळण्याचा प्रयत्न झाला. परंतु निर्णयात बदल होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट झाल्याने अखेर जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांनी उच्च न्यायालयात गुरुवारी याचिका दाखल केली आहे.
२०२२ मध्ये झालेल्या नियमातील बदलामुळे ही सदस्य संख्या ग्रामविकास विभागाकडून निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात ६८ गट आणि १३६ गण निश्चित करण्यात आले आहेत. यात आजरा तालुक्यातील एक गट कमी झाला असून तो आणि जादा वाढलेला एक असे दोन गट अनुक्रमे कागल आणि करवीरमध्ये वाढले आहेत.
सोमवार दि. १४ जुलै रोजी प्रारूप मतदारसंघ जाहीर झाल्यानंतर त्यावर २१ जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती घेता येणार आहेत. यावरचा अभिप्राय २८ जुलैला जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांकडे सादर करतील.
त्यानुसार विभागीय आयुक्त सुनावणी घेऊन हा प्रस्ताव पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे येईल आणि १८ ऑगस्टला हा प्रारूप रचना प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाला सादर करणार आहेत.
आजरा तालुक्यावर झालेल्या खासदार, आमदार यांना भेटलो, परंतु आणखी एक प्रयत्न म्हणून आम्ही उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावलि आहे असे सुधीर देसाई, जिल्हा बँक संचालक यांनी सांगितले.
जिल्हा बँकेची पुनरावृत्ती…?
जिल्हा बँकची निवडणूक प्रक्रिया मडीलगे येथील एका विकास सेवा संस्थेने न्यायालयात दाद मागितल्याने न्यायालयाच्या निकालापर्यंत थांबली होती. त्याचीच पुनरावृत्ती जिल्हा परिषद निवडणुकीत तर होणार नाही ना ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

सावित्री कालेकर यांचे निधन

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आवंडी वसाहत आजरा येथील सावित्री चंद्रु कालेकर (वय ९० वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुले सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
येथील दत्तकृपा प्रिंटिंग प्रेसचे मालक केरबा कालेकर यांच्या त्या आई होत.

आजरा साखर कारखान्यात मिल रोलरचे पुजन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यात सन २०२५-२६ गळीत हंगामाकरीता ओव्हर होलींगचे काम गतीने सुरू झाले असून कारखान्याचे चेअरमन श्री. मुकुंदराव देसाई यांचे हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थिती मील रोलर पुजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी बोलतांना चेअरमन श्री. देसाई यांनी येता गळीत हंगाम माहे ऑक्टोंबर मध्ये सुरू करणेच्या दृष्टीने मशिनरी दुरुस्ती व देखभालीची कामे सुरू आहेत. कारखान्याने गळीत हंगाम २०२५-२६ करीता ८२०० हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद पुर्ण केली आहे. येत्या गळीत हंगामात ४ लाख मे.टन ऊस गाळपाचे कारखान्याने नियोजन केले आहे. येणा-या गळीत हंगामासाठी सक्षम ३७५ परजिल्हयातील व स्थानिक तोडणी वाहतुक यंत्रणा उभारली असुन सदर यंत्रणेस पहिल्या ॲडव्हान्सची रक्कम वाटप केली आहे. त्याच प्रमाणे गळीत हंगामासाठी आवश्यक कामकाजाचे नियोजन व्यवस्थापनामार्फत केले जात आहे अशी माहिती दिली.
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन श्री. सुभाष देसाई यांच्यासह सर्व संचालक व अधिकारी वर्ग उपस्थित होता.

आजरा महाविद्यालयात गुरुपौर्णिमा संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा महाविद्यालयात वाणिज्य मंडळ ज्युनिअर विभागामार्फत गुरुपौर्णिमा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी वाणिज्य शिक्षणातील गुरुचे महत्व या विषयावर प्रा. सौ. अनुराधा मगदूम यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. व्याख्यानातून प्रा. मगदूम यांनी वाणिज्य क्षेत्रातील विविध संधी, विद्यार्थ्यांच्या अंगी आवश्यक असणारी कौशल्य, वेळेचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. वाणिज्य शाखेचा विद्यार्थी हा उद्याचा उद्योजक, फायनान्स प्लॅनर, विश्लेषक, लेखापरीक्षक कंपनी सेक्रेटरी आहे. तसेच वाणिज्य शिक्षण नव्या युगाचे, नव्या संधीचे, नव्या प्रगतीचे शिक्षण आहे. वाणिज्य शाखा रोजगारभिमुख व तांत्रिक दृष्ट्या अद्ययावत आहे. वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्याकडे इंग्रजी संभाषण कौशल्य, प्रेझेंटेशन कौशल्य, मुलाखत तयारी, टीमवर्क असणे गरजेचे आहे असे विचार आपल्या व्याख्यानातून व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. अशोक सादळे यांनी आपले प्रथम गुरू आई वडील व त्यानंतर गुरु म्हणून आपल्या आयुष्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते हे सांगितले.
उपप्राचार्य प्रा.दिलीप संकपाळ यांनी आपल्या मनोगतात जीवनातील गुरुचे महत्व विशद केले.
या कार्यक्रमासाठी प्रा. अनिल निर्मळे, प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे, प्रा. संदीप देसाई , प्रा. सुवर्णा भोकरे, अर्चना चव्हाण, रूपाली फोंडेकर, शोभा फड यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. पूनम लिचम यांनी केले. आभार प्रा. वैशाली देसाई यांनी मानले.

लहुक्रांती सेनेच्या जिल्हा युवा अध्यक्षपदी मनोज लोखंडे तर उपाध्यक्षपदी दिलीप लोखंडे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्हा लहुक्रांती संघर्ष सेनेच्या जिल्हा युवा अध्यक्षपदी मनोज दिनकर लोखंडे तर पूणे जिल्हा उपाध्यक्षपदी दिलीप शंकर लोखंडे यांची निवड करण्यात आली.

समाज माध्यमांवर गुरुपौर्णिमेची धूम…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
काल दिवसभर व्हाट्सअप इंस्टाग्राम, फेसबुकसह समाज माध्यमांवर गुरुपौर्णिमेची धूम दिसत होती. सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर संदेश व्हायरल होताना दिसत होते.
आई-वडिलांपासून ते शिक्षक, देव-देवतांना गुरु म्हणून वाटचाल करणाऱ्या अनेकजणांच्या स्टेटसवरही कृतज्ञतापूर्वक संदेश दिसत होते. काहींनी आपल्या गुरूंना प्रत्यक्ष भेटून आशीर्वाद घेतले तर काहींनी समाज माध्यमांचा अवलंब करत संदेश दिले. विविध शैक्षणिक संस्थांमध्ये गुरुपर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
एकंदर काल दिवसभर सर्वत्र गुरुपौर्णिमेची धूम दिसत होती.


फोटो क्लिक








