शनिवार दि. ५ जुलै २०२५


सोलर हायमास्टसाठी खा. महाडिक यांचे कडून ७ कोटी १० लाखांचा निधी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
खा. धनंजय महाडिक यांच्या सहकार्यातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत आजरा तालुक्याला ग्रामीण भागातील विविध गावांसाठी सोलर हाय मास्ट दिवे उपलब्ध करून देण्याच्या पार्श्वभूमीवर सात कोटी दहा लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती भाजपाचे तालुकाध्यक्ष अनिरुद्ध केसरकर यांनी दिली.
यामध्ये इटे, हाळोली, कासार कांडगाव, लाटगाव, मेंढोली-बोलकेवाडी, मुरुडे
, मसोली , वझरे , सोहाळे, सुळेरान, सिरसंगी, साळगाव,पोळगाव, किणे, किटवडे, हात्तीवडे, देवर्डे, बुरुडे, पेरणोली, आरदाळ, बेलेवाडी हु., भादवण ,चिमणे,धामणे,हाजगोळी बु.,हाजगोळी खुर्द, होन्याळी, खेडे, कोळींद्रे,कोवाडे, मडिलगे, मलिग्रे, महागोंड, सरोळी, सुळे, उत्तुर, वाटंगी, सरंबळवाडी या गावांचा समावेश आहे.
सार्वजनिक रस्त्यावर विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या समस्येपासून या गावांना मुक्ती मिळणार असून गावा-गावांमधील मोक्याची ठिकाणे झळाळून निघणार आहेत.

खड्डे प्रश्नी शिवसेना रस्त्यावर…
प्रशासनाने रास्ता रोको चा प्रयत्न हाणून पाडला…९ जुलै रोजी बैठक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा – बुरुडे – महागांव मार्गावरील रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य पसरले असून सदर रस्ता वाहतुकी करता धोकादायक बनला आहे. मार्गावरील संताजी पुलाला १०० वर्ष पूर्ण झाल्याने सदर पुल व जीर्ण झाले असून यासाठी पर्यायी फुल उभा करावा या मागणीसाठी शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली संताजी पुलावर निदर्शने करण्यात आली. शिवसैनिकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न प्रशासनाने थांबवला नऊ जुलै रोजी तहसील कार्यालयात संबंधित अधिकारी, ठेकेदार व आंदोलकांची संयुक्त बैठक घेण्याचे ठरले. त्यानंतर सदर आंदोलन थांबवण्यात आले. यावेळी खड्डयांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख प्रा. शिंत्रे म्हणाले, या विभागाचे उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम तसेच रस्त्याचे काम करणाऱ्या बांधकाम कंपनी यांना वारंवार भेटून, निवेदन देऊन बैठका करून रस्त्याच्या कामाची व पर्यायी पुलाची शिवसेनेच्या वतीने मागणी करत आहोत. पण अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून वेळ काढूपणा करत आहेत. अधिकाऱ्यांना रस्ता कोणाकडे आहे हेच माहित नाही त्यामुळे काम कोणी करायचे हा प्रश्न उपस्थित होत आहे. तहसीलदार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत लवकरच याबाबतची माहिती देतो असे सांगतात व पुन्हा दुर्लक्ष करतात. याबाबत गांभीर्याने निर्णय न झाल्यास यापेक्षाही मोठा आंदोलन, तिरडी मोर्चा काढण्यात येईल असेही म्हणाले.
यावेळी युवराज पोवार व संभाजी पाटील यांचीही भाषणे झाली. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. प्रशासनाच्या वतीने निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई सार्वजनिक बांधकाम चे सुर्वे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली.
या आंदोलनात शहर प्रमुख ओमकार माद्याळकर , महेश पाटील, सौ. वैशांली गुरव सरपंच बुरुडे, सौ. गीता देसाई, महिला आघाडी प्रमुख, मारुती देशमुख, उपतालुका प्रमुख संजय येसादे, सुनील डोंगरे, शिवाजी आढाव, विभाग प्रमुख दिनेश कांबळे, दयानंद भोपळे, चंदर पाटील, सुनिल बागवे, उपसरपंच, बुरुडे, सौ. प्रमिला पाटील, उपसरपंच, हात्तिवडे, सरपंच, मेंढोली, समीर चाँद, सुयश पाटील संजय कांबळे, ग्रा.पं. सदस्य, बुरुडे, बबन कातकर, रवी सावंत यांच्यासह शिवसैनिक व मुरुडे, बुरुडे, भटवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

रेकॉर्ड ब्रेक पाऊस…
नद्या पात्रा बाहेर…
घरांची पडझड…

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यामध्ये पावसाचा जोर कायम असून काल शुक्रवार अखेर तब्बल नऊशे मिलिमीटर इतक्या एकूण पावसाची नोंद तालुक्यात झाली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने हिरण्यकेशी व चित्रा या दोन्ही नद्या अद्यापही पात्रा बाहेर आहेत. साळगाव बंधाऱ्यावरील वाहतूक दुपारनंतर सुरू झाली आहे. चित्री प्रकल्पाच्या सांडव्यावरून कोणत्याही क्षणी पाणी बाहेर पडण्याची शक्यता आहे.
पावसामुळे घरांची मात्र जोरदार पडझड झाली आहे. तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आता पुढे येऊ लागली आहे.

आजरा येथे छ. शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर उत्साहात

आजरा :मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजऱ्यात राजर्षी शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी राजश्री शाहू जयंती समारोपानिमित्त छ. शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबीर झाले. तालुक्यातील विविध विभागाच्यावतीने विविध दाखले, अनुदान योजनाचे मंजुरीपत्र याचे वाटप लाभार्थी व नागरीकांना करण्यात आले. या वेळी विविध योजनांच्या माहीतीचे स्टॉल, खाद्यपदार्थाचे स्टॉल मांडण्यात आले होते. याला चांगला प्रतिसाद मिळाला.
येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात शिबीर झाले. महसूल विभाग, पंचायत समितीचे विविध विभाग, कृषी, आजरा नगरपंचायत, वनविभाग, सामाजिक वनिकरण यासह विविध विभाग सहभागी झाले होते. निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई अध्यक्षस्थानी होते. या वेळी सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेटे, महसुल नायब तहसीलदार विकास कोलते,तालुका कृषी अधिकारी भुषण पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
लतिका देसाई, यूनस सय्यद, मंडल कृषी अधिकारी प्रदिप माळी यांनी मार्गदर्शन केले. विविध योजनांची माहीती दिली. या वेळी शैक्षणिक, अल्प भूधारक, नॉन क्रिमिलेयल, उत्पनाचे दाखले, जिवंत सातबारा, इ डब्ल्यू एस, तगाई कर्ज नोंदी, लक्ष्मी मुक्ती योजना, जातीचे दाखले, कजाप, अज्ञान पालक कमी करणे, सलोखा योजना यासह विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

पेरणोली उपसरपंच पदी संकेत सावंत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली ता. आजरा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संकेत सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सरपंच निवडीच्या पार्श्वभूमीवर बोलवण्यात आलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. प्रियांका संतोष जाधव होत्या.
यावेळी सदस्य संदीप नावलकर,आमोल जाधव,रणजीत फगरे, अश्वीनी कांबळे, रूपाली पाईम, सुषमा मोहीते, सुनीता कालेकर, शूभदा सावंत, आदेश गुरव, पवन कालेकर, काका देसाई यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

आजरा तालुक्यातील निराधार लोकांना उत्पन्न दाखले मिळावेत… सरपंच संघटनेची मागणी

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील निराधार लोक तसेच विधवा महिलांना गेले सहा ते सात महिने ‘उत्पन्नाचे दाखले’ ग्राम स्तरावरील महसूल अधिका-यांनी उत्पनाचे दाखले देणे बंद केले असलेमुळे निराधार लोकांची पेन्शन तसेच विधवा महिलांची पेन्शन मिळणेकामी अडचण निर्माण झाली आहे.
ग्रामस्तरावरील महसूल अधिकाऱ्यांना सदर लोकांना उत्पनाचे दाखले देण्यासाठी तहसीलदारांनी आदेश दयावेत व तशा प्रकारची कार्यवाही करून तालुक्यातील निराधार व विधवा महिलांची पेन्शन मिळण्यासाठी मदत करावी अशी मागणी सरपंच संघटनेच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष बापू नेऊंगरे, सौ.सुषमा पाटील, सौ.भारती डेळेकर, प्रियांका आजगेकर, संभाजीराव सरदेसाई, कल्पना डोंगरे, सरिता पाटील, स्मिता पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबईत हक्काच्या घरासाठी आर या पारची लढाई करणार : कॉ. धोंडीबा कुंभार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मुंबईत गिरणी कामगारांना मोफत हक्काचे घर मिळावे यासाठी २००८ पासून सर्व श्रमिक संघटना च्या माध्यमातून सातत्याने मोर्चे आंदोलने सुरु असून नऊ जुलै रोजी आझाद मैदानात आर या पारची लढाई करणार असलेचे मत काँ.धोंडिबा कुंभार यांनी व्यक्त केले. आजरा येथील गिरणी कामगार कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
सुरुवातीला प्रास्ताविक नारायण भंडागे यानी केले. यावेळी कॉ.कुंभार यांनी मुंबईतील एकूण चौदा संघटना एकत्र येत असून होऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिका नगरपरिषदा व जिल्हा परीषद अशा वेळी शासनाला आमच्या हक्काची घरे देण्यासाठी भाग पाडू.
मराठी भाषेवर हिंदी सक्ती करणारे सरकार जनतेचा रोष पाहून जी आर रद्द करू शकते. तर कायदेशीर तरतूद केलेल्या जमीनी हक्काने मिळवण्यासाठी सर्व गिरणी कामगार वारसदार यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही केले.
यावेळी कॉ.शांताराम पाटील कॉ. गोपाळ गावडे कॉ. संजय घाटगे यानी मनोगत व्यक्त केले. यावेळी बाबू केसरकर, नारायण राणे, निवृत्ती मिसाळे, हिंदूराव कांबळे यांच्यासह गावागावातील शाखाप्रमुख उपस्थित होते.
आभार मनप्पा बोलके यानी मानले.

तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा : सर्व श्रमिक संघटनेची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांना मान्सूनपूर्व पावसामुळे शेती मशागत पेरणी न करता आल्यामुळे माळरानाच्या जमिनी पडीक राहिल्या आहेत. तसेच इतर जमिनी मध्ये पेरणी करणे जमलेले नाही, जेथे पेरणी झाली आहे तेथे भात पिक लावणी पूर्वीच पाण्याखाली गेले आहे. शेतात पाणी व चिखल असल्यामुळे दुबार पेरणी देखील अशक्य होईल अशी परिस्थिती आहे.
ऊस पिकात सतत पावसामुळे लागवड घालणे शक्य नसल्यामुळे पिकाची वाढ होवू शकलेली नाही. त्यामुळे पिकाचे वजन घटणार आहे.
तरी तातडीने आजरा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, पाहणी करावी व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे.
याबाबतचे लेखी निवेदन देण्यात आले असून निवेदनावर कॉ. शांताराम पाटील, धोंडीबा कुंभार,नारायण भडांगे, नारायण राणे, संजय घाटगे, निवृत्ती मिसाळ आदींच्या सह्या आहेत.

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत व्यंकटरावच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती पंधरवडा निमित्त जिल्हा परिषद कोल्हापूर व पं .स. आजरा शिक्षण विभागाकडून तालुकास्तरावर निबंध ,वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले. तालुक्यातील एकूण ११ केंद्रातील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेतील प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांचा जिल्हा स्तरासाठी निवड करून त्यांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी विलास पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी पं.स.आजरा, सुभाष विभुते केंद्रप्रमुख, रावसाहेब देसाई केंद्रप्रमुख,श्री संजीव देसाई उपस्थित होते.
या स्पर्धेत व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजराचे जिल्हास्तरासाठी निवड झालेले (इयत्ता आठवी ते बारावी )या गटातील यशस्वी विद्यार्थी…
वक्तृत्व स्पर्धा.. कुमारी सिमरन भिकाजी पाटील,( इयत्ता दहावी) आजरा तालुक्यात प्रथम, जिल्हास्तरीय निवड..
चित्रकला स्पर्धा..अथर्व शांताराम नाईक.. (इयत्ता आठवी)आजरा तालुक्यात प्रथम व जिल्हास्तरीय निवड..
वरील सर्व विद्यार्थ्यांना आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी, सर्व संचालक मंडळ प्राचार्य एम.एम.नागुर्डेकर, पर्यवेक्षिका.सौ.व्ही.जे.शेलार यांचे प्रोत्साहन
व कलाशिक्षक कृष्णा दावणे, व्ही. एच.गवारी व वर्गशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.

निधन वार्ता
बापू नलगे
उत्तुर ता. आजरा येथील बापू केरबा नलगे ( वय६७ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा, मुलगी व नातू असा परिवार आहे.



