गुरुवार १९ जून २०२५


गव्याचा हल्ल्यात बाप ठार….
पाठोपाठ मुलाचाही मृत्यू….
व्हळतकर कुटुंबीयांवर आले संकट

महिनाभरापूर्वी गव्याने केलेल्या हल्ल्यात साळगाव ता. आजरा येथील विठ्ठल व्हळतकर यांचा मृत्यू झाला. या घटनेला महिनाभराचा कालावधी होतो तोच ४८ वर्षीय मुलगा चंद्रकांत याचाही मृत्यू झाला. यामुळे व्हळतकर कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे.
४ मे रोजी ७० वर्षीय विठ्ठल व्हळतकर हे साळगाव येथील आपल्या शेतामध्ये गेले असता गव्याने केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. याच दरम्यान आजारी असलेल्या मुलगा चंद्रकांत यांची प्रकृती गंभीर झाली. मंगळवार दिनांक १७ जून रोजी साळगाव मुक्कामी त्याचेही निधन झाले. एकाच वेळी महिनाभराच्या अंतराने दोन कर्ते पुरुष निघून गेल्याने या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.
सध्या या कुटुंबात चंद्रकांत यांची आई, पत्नी, एक मुलगी व मुलगा असा परिवार आहे.

हेल्पिंग हँड्स फौंडेशन, उत्तूर मार्फत शैक्षणिक साहित्य वितरण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हेल्पिंग हँड्स फौंडेशन, उत्तूर मार्फत शैक्षणिक साहित्य वितरण ‘शैक्षणिक साहित्य वितरण उपक्रम २०२५’ ला परिसरातील नागरिकांनी या वर्षी देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
जमा झालेल्या साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणात वह्या, पेन, टिफिन बॉक्स, पेन्सिल, रबर, शार्पनर, व इतर शैक्षणिक साहित्य जमा झाले होते.
हे साहित्य भुदरगड तालुक्यामधील आरळगुंडी , सावतवाडी, धनगर वाडा आणि बेगवडे या वाड्यावस्तीतील गरजू मुलांना तसेच उत्तूर भागातील काही गरजू मुलांना आणि ग्रामीण वाड्या वस्तीवरील शाळेमधील गरजू विद्यार्थ्यांना या साहित्याचे वितरण करण्यात आले.
हा उपक्रम गेली चार वर्षे अव्याहतपणे सुरू आहे आणि दरवर्षीचा दानशूर व्यक्ती यांचा प्रतिसाद पाहता या पुढेही सातत्याने सुरू राहील असे यावेळी सांगण्यात आले
या उपक्रमामध्ये ग्रुपचे सदस्य वैभव गुरव,गोपी देसाई, ऋतिक रेडेकर, फिरोज मुल्लाणी, ओमकार खाडे, रणजीत घेवडे, प्रितेश पटेल, मनोज भाईगडे, संतोष गाड्डीवडर, अभिषेक जाधव,प्रथमेश तेली, स्वप्निल मांडे, निलेश जाधव हे सदस्य होते.

भर पावसात विकासकामे…?
शहरवासीयांतून संताप

ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे व कारभाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वेळेत पूर्ण न झालेली कामे भर पावसात पूर्ण करण्याचा सपाटा सुरू असून या प्रकारामुळे शहरवासीयांतून संताप व्यक्त होत आहे.
मुळात सध्या शहरभर चिखलाचे व डबक्यांचे साम्राज्य आहे. यामुळे शहरात कावीळ, टायफाईड, मलेरिया, डेंग्यू सदृश्य आजार यासारखे रुग्ण आढळत असतानाच सध्या शहरातील गटर्सची बरीच कामे अर्धवट अवस्थेत आहेत. काही कामे अर्धवट अवस्थेत सोडून देण्यात आलेली आहेत तर कांही बिले मिळवण्याच्या उद्देशाने पूर्ण करण्याचा सपाटा ठेकेदारांनी लावला आहे. भर पावसात होणाऱ्या या कामांच्या दर्जाबद्दल बोलण्याचा प्रश्नच नाही. अनेक ठिकाणी केलेल्या खुदाईमुळे पाणीपुरवठा योजनेच्या पाण्यामध्ये गटरचे व तुंबलेल्या डबक्यातील पाणी थेट जाऊ लागले आहे. ठीक ठिकाणी पडलेले बांधकामाचे साहित्य रस्ते अडवून आहे. विकासकामांचा हा फार्स आता थांबवावा अशी मागणीही होत आहे.
चुकीच्या पद्धतीने कामांचे वाटप… परशुराम बामणे
शहरातील गटर्स व अंतर्गत रस्त्यांचे लाखोंचे ठेके केवळ कार्यकर्ते सांभाळण्यासाठी अनुनभवी व कामाचे काडीचेही ज्ञान नसणाऱ्या मंडळींना दिले जात असल्याने शहराचे वाटोळे होत आहे. अशा सदोष कामांची बिले थांबवण्यासाठी आंदोलन उभे करण्यात येणार असल्याचे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे यांनी सांगितले.

नवागतांचे स्वागत…



फोटो क्लिक


गट विकास अधिका-यांची बदली
आजऱ्याचे गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांची पंचायत समिती, वेल्हा, जिल्हा पुणे येथे बदली झाली आहे. सद्यस्थितीत आजरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पद रिक्त आहे.
चला पंढरीला जाऊ…



