mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

रविवार  १५ जून २०२५       

कदाचित आपल्या सिबिल स्कोरवर थकबाकी दिसत असेल…
बोगस कर्ज प्रकरणे केल्याचे उघडकीस

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आम्ही ठेवी स्वीकारत नाही, इतर कोणत्याही प्रकारचे कर्ज देत नाही, फक्त महिलांना कर्ज देतो असे सांगत शहरातील एका उपनगरात छोटेसे कार्यालय थाटून कर्ज देण्याचा आव आणणाऱ्या एका खाजगी कंपनीच्या कारभाऱ्यांनी जुन्या कर्जदारांच्या नावावर कागदपत्रांचा वापर करत कर्ज उचल केले असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. शहरवासीयांनी आता अशा मंडळींपासून सावध राहण्याची गरज आहे.

      शहरामध्ये जेथे उच्चभ्रू नागरी वसाहत आहे तेथे कंपनीने कार्यालय सुरू केले आहे. मॅनेजर पदाच्या खुर्चीवर सांगलीस्थित एका व्यक्तीला आणून बसवले आहे. विशेषतः महिला वर्गाला भरमसाठ व्याजदराने कर्ज वाटपाचे काम या कार्यालयातून चालते. कागदपत्रांची फारशी आवश्यकता नसल्याने सहजपणे कर्ज उपलब्ध होते. यामुळे अनेक महिलांनी येथून कर्जाची उचल केली आहे. कर्जफेड केल्यानंतरही सिबिल उताऱ्यामध्ये कर्जाची नोंद थकीत असल्याचे दाखवत असल्याने काही महिलांनी संबंधित कार्यालयाकडे धाव घेतली. या महिलांच्या नावावर जुन्या कागदपत्रांच्या आधारे कारभाऱ्यांनीच रकमा उचलल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.

      सुमारे ५३ प्रकरणे अशा प्रकारची असून लाखो रुपयांचे येणे संबंधित महिलांच्या खात्यावर दिसत आहे. सिबिल स्कोर विस्कटल्याने इतरत्र कर्ज मिळत नसल्याने संबंधित महिला हवालदिल झाल्या आहेत.

      याबाबत कंपनीच्या वरिष्ठांशी संपर्क साधला असता सदर प्रकार घडल्याचे मान्य करत लवकरच संबंधित महिलांच्या खात्यावर ज्यांनी रकमा उचलल्या आहेत त्यांच्याकडून वसूल करून घेण्यात येतील असे सांगितले गेले.

खात्यावर येणे बाकी शून्य… प्रत्यक्षात मात्र सिबिल स्कोरवर थकबाकी

      सदर प्रकार लक्षात आल्यानंतर कंपनीच्या कार्यालयात जाऊन संबंधित महिला व त्यांच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला. अधिक चर्चा नको म्हणून तातडीने त्यांना आपल्या खात्यावर काहीही येणे नाही असे संबंधितांकडून सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र सिबील स्कोरवर ही थकबाकी दिसतच आहे. गेले दोन महिने अशा स्वरूपाचे प्रकार सुरू असून दोन महिन्यात कोणालाही ना हरकत दाखला देण्यात आलेला नाही.

आजऱ्यातील शिबीरात विक्रमी १५४ बॅग रक्त संकलन

स्व. राजारामबापू देसाई फौंडेशनच्यावतीने आयोजन

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून आजरा येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात विक्रमी १५४ बॅग रक्त संकलन करण्यात आले. स्व. राजारामबापू देसाई फौंडेशन आजरा व गडहिंग्लज येथील आण्णासाहेब गळतगे लायन्स ब्लड बैंक यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

      जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनिल फडके, जनता बँकेचे संचालक रणजित देसाई, तालुका संघाचे व्हा. चेअरमन दौलतराव पाटील, संचालक विठ्ठलराव देसाई यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत रक्तदान शिबीराचा शुभारंभ करण्यात आला.

     सध्या सर्वत्र भासत असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन फौंडेशनने जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधत रक्तदान शिबीराचे आयोजन केल्याचे फौंडेशनचे अध्यक्ष वृषाल हुक्केरी यांनी सांगितले. आण्णासाहेब गळतगे ब्लड बँकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष पाटील, संपर्क अधिकारी अनिल आडावकर, तंत्रज्ञ अश्विनी कुपटे-पताडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी रक्तसंकलन केले.

      रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी फौंडेशनचे अध्यक्ष वृषाल हुक्केरी यांच्यासह उपाध्यक्ष व शिवसेना उबाठा गटाचे तालुकाप्रमुख युवराज पोवार, सचिव रवींद्र देसाई, शंकर सुतार यांच्यासह सर्व सदस्यांनी परीश्रम घेतले.

अनिकेत चराटी यांची निवड

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       कै. श्री. राजाराम गुरव विकास सेवा संस्था, खानापूरच्या नूतन संचालक पदी श्री. अनिकेत अशोक चराटी व श्री. अजिंक्य सिताराम गुरव यांची बिनविरोध निवड झाली.

      सदर निवड श्री. सुजय येजरे, सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निरीक्षक अधिकारी आजरा व सेवा संस्थेचे सेक्रेटरी श्री. संतोष ढोणूक्षे यांच्या उपस्थितीत श्री. अशोकअण्णा चराटी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

      यावेळी सेवा संस्थेचे चेअरमन, सर्व संचालक व समूहाचे सर्व कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.

गिजवणेच्या अपघातग्रस्त बांधकाम कामगाराला ‘रवळनाथ’ ची मदत १५ हजारांची आर्थिक मदत 

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       बांधकाम करत असताना अपघात होवून गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील महादेव नागाप्पा कुंभार हा तरुण गंभीर जखमी झाला. त्यांना उपचारासाठी गडहिंग्लज येथील सेवा सदन हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. हे वृत्त समजताच श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल. चौगुले यांनी त्याची भेट घेवून आपुलकीने विचारपुस केली आणि तातडीने त्यांना डॉ. ज्ञानेश्वर मुळे फौडेशन संचलित चांगुलपणाची चळवळ या उपक्रमांतर्गत १५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली.

      मुळ खानापूर (जि. बेळगाव) येथील महादेव कुंभार हा गवंडी काम करतो. नेहमीप्रमाणे रविवार दि. ८ जून, २०२५ रोजी गडहिंग्लज येथे तो कामानिमित्त आला होता. साईटवर काम करत असताना त्याच्या पायाखाली असणारे बांबुचे आधारासाठी असलेले पायाड मोडून तो खाली कोसळला आणि खाली असणारी लोखंडी सळी त्याच्या शरीरात घुसून तो गंभीर जखमी झाला. सेवा सदन हॉस्पिटलचे डॉ. नागेश पट्टणशेट्टी व डॉ. धीरज डांग यांनी अथक प्रयत्नांनी त्याची शस्त्रक्रिया यशस्वी केली. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे या वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत करण्यासंदर्भात हॉस्पीटलचे डॉ. पट्टणशेट्टी यांच्याकडून यासंदर्भात माहिती घेण्यात आली.

     श्री. एम. एल. चौगुले यांच्या हस्ते महादेव यांचे बंधू सुभाष नागाप्पा कुंभार यांच्याकडे १५ हजार रुपयांची मदत सुपुर्द करण्यात आली. यावेळी रवळनाथच्या उपाध्यक्षा सौ. मीना रिंगणे, संचालक प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर, प्रा. व्ही. के. मायदेव, सीईओ श्री. डी. के. मायदेव यांच्यासह रवळनाथ व सेवा सदन हॉस्पीटलचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कुंभार कुटुंबियांनी या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

शैक्षणिक साहित्य वितरण उपक्रमासाठी गरजू विद्यार्थ्यांचा शोध…
हेल्पिंग हँड्स फाउंडेशनचा उपक्रम

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      गेल्या चार वर्षांपासून, हेल्पिंग हँड्स फाउंडेशनच्या माध्यमातून उत्तूर परिसरातील दुर्गम भागांतील शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य (वह्या, पेन, पुस्तके, डबा, दप्तर इ.) वाटपाचा उपक्रम राबवला जात आहे.
यंदाही हा उपक्रम अधिक गरजूंना पोहोचावा यासाठी फाउंडेशन प्रयत्नशील आहोत.

     उत्तूर परिसरात शाळेत,गावात अशी मुले-मुली असतील ज्यांचे आई-वडील हयात नाहीत, परिस्थिती अतिशय हलाखीची आहे मात्र विद्यार्थी हुशार, शिकण्याची इच्छा असलेले आहेत अशा विद्यार्थ्यांची माहिती फाउंडेशनला द्यावी. फाउंडेशन मार्फत शक्य तितक्या मदतीचा हात पुढे केला जाईल अशी माहिती फाउंडेशनच्या प्रमुखांनी दिली आहे.

तालुक्यात पाऊस…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा शहरासह तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून शनिवारी दिवसभर पावसाची रिपरीप सुरू होती.

      पावसामुळे हवेमध्ये गारठा निर्माण झाला आहे. शेतीकामे वेगावली असून आंबा,फणस हंगाम अंतिम टप्प्यात आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा कारखान्याची धाव सव्वा तीन लाख मे. टनापर्यंतच

mrityunjay mahanews

वझरे येथील तरुणाचा संशयास्पद मृत्यू…?

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आता आमची सटकले… आमास्नी रागबी यायलाय…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!