


प्रतिष्ठेच्या उमेदवारामुळे रंगतदार लढत
आजरा-शृंगारवाडी गट

✍️✍️✍️ज्योतिप्रसाद सावंत
बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न ऐनवेळी फसल्याने उमेदवारांची निवड करताना दोन्ही आघाडयांच्या राजकीय समीकरणांमध्ये थोडाफार फरक पडला असला तरीही दोन्ही आघाड्यांनी नेटके उमेदवार दिल्याने व आघाडी प्रमुखच उमेदवाऱ असल्याने आजरा- शृंगारवाडी उत्पादक गटामध्ये रंगतदार लढत होणार आहे.
या उत्पादक गटामध्ये चाळोबा देव विकास आघाडीकडून आघाडी प्रमुख अशोकअण्णा चराटी, अभिषेक जयवंतराव शिंपी व जनता बँकेचे माजी संचालक विजयराव देसाई यांना तर श्री रवळनाथ विकास आघाडीतून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई, कारखान्याचे माजी संचालक सुभाष देसाई व शिक्षक नेते शिवाजी नांदवडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आजरा शहराचा या उत्पादक गटामध्ये समावेश आहे.
गत निवडणुकीत या गटातून मुकुंदराव देसाई, अशोकअण्णा चराटी व दिगंबर देसाई हे तीन उमेदवार विजयी झाले होते. तर अल्बर्ट डिसोजा व जयवंतराव शिंपी यांना मोजक्या मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते.
गेल्या पाच सहा वर्षांमध्ये या उत्पादक गटातील राजकीय समीकरणे निश्चितच बदलली आहेत. गतवेळी परस्पर विरोधी असणारे अशोकअण्णा व जयवंतराव यावेळी मात्र एकाच आघाडीतून निवडणुकीला सामोरे जात आहेत.
याच उत्पादक गट कार्यक्षेत्रातील श्री चाळोबा देव विकास आघाडीचे पाच उमेदवार विविध गटातून उमेदवाऱ्या भूषवत आहेत. त्यामुळे या आघाडीला मताधिक्य मिळेल असा आघाडी प्रमुखांचा दावा आहे. परंतु उमेदवारी निश्चित करताना खानापूर, पोळगाव,यरंडोळ, इटे सातेवाडी, देऊळवाडी हा भाग उमेदवारी पासून वंचित असल्याने याचा फटका या बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.याउलट राष्ट्रवादीने महिला राखीव गटातून पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.रचना होलम व इतर संस्था ब वर्ग गटातून नामदेवराव नार्वेकर यांना उमेदवारी देऊन या भागातील मतदानावर आपला हक्क सांगितला आहे.
आजरा शहरातील मुस्लिम मतदारांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. विद्यमान संचालक दिगंबर देसाई यांना चाळोबा देव विकास आघाडीतून उमेदवारी डावलल्याने त्यांनी थेट राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. याचा परिणामही कितपत होणार यावर या उत्पादक गटातील उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
एकंदर राजकीय समीकरणांची उलथापालथ झालेल्या या उत्पादक गटामध्ये रंगतदार लढत होणार हे स्पष्ट होत आहे.
नगरपंचायतीचेही चित्र स्पष्ट होणार
या उत्पादक गटामध्ये आजरा शहरातून मतदारांचा कोणाच्या बाजूने कौल राहणार यावर येत्या नगरपंचायत निवडणुकीचा कल स्पष्ट होणार आहे.
फारसे मताधिक्य नाही
या उत्पादक गटातून कोणत्याही एका आघाडीला घसघशीत मताधिक्य मिळेल असे चित्र सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे किरकोळ मताधिक्य एखाद्या आघाडीला मिळू शकते. अन्यथा या गटातील मतदान हे घासूनच राहणार आहे.

चाळोबादेव आघाडीची भव्य प्रचार रॅली

आजरा: प्रतिनिधी
आजरा साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारार्थ श्री चाळोबादेव शेतकरी विकास आघाडीच्या वतीने आज आजरा शहरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. सकाळच्या प्रहरात घरोघरी पोचलेल्या चाळोबादेव आघाडीच्या उमेदवारांनी मतदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन मतदानास विनंती केली .
आजरा साखर कारखाना निवडणुकीचे प्रचार वातावरण सध्या तापू लागले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी एकमेकांवर झडत आहेत. प्रचाराला रंग भरू लागल्याने प्रत्येक दिवस, प्रहर आणि क्षण एनकॅश करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि शेतकरी संघटनेच्या श्री चाळोबादेव आघाडीने आज आजरा शहरातून प्रचार रॅली काढली. आजरा अर्बन बँकेपासून सुरू झालेली ही भव्य रॅली जुनी पोस्ट गल्ली, सीडी फार्म, सुतार गल्ली, भगवा रक्षक चौक, गोठण गल्ली, तुळजाभवानी कॉलनी, व्यंकटेश गल्ली, गणपत गल्ली ते वाडा गल्ली दरम्यान काढली गेली.
यावेळी कारखाना निवडणुकीतील आजरा-शृंगारवाडी गटातील आघाडीचे उमेदवार व आघाडी प्रमुख अशोकअण्णा चराटी, अभिषेक शिंपी, इतर मागास गटातील जनार्दन टोपले, अनुसूचित जाती-जमाती गटातील मलीककुमार बुरुड आदींनी मतदारांशी व्यक्तिगत संपर्क साधून आघाडीची भूमिका स्पष्ट केली व आशीर्वाद घेतले. यावेळी आघाडीच्या वतीने आजरा बँक अध्यक्ष रमेशअण्णा कुरूणकर, डॉ. दीपक सातोसकर, विलासराव नाईक, के. व्ही. येसणे, योगेश पाटील, सचिन शिंपी, संजय सावंत आदी उपस्थित होते.



स्वर्गीय कै. वसंतराव देसाई यांना अशोक चराटी यांनी कलंकित केले…..
वसंतराव धुरे यांचे प्रत्युत्तर

आजरा : प्रतिनिधी
स्वर्गीय वसंतराव देसाई यांनी उभारलेले आजरा सहकारी साखर कारखाना हे शेतकऱ्यांच्या श्रमाचे मंदिर आहे. अशोक चराटी यांनी स्वर्गीय कै. वसंतराव देसाई यांच्यासह शेतकऱ्यांच्या या श्रममंदिरालाही भ्रष्ट आणि कलंकित केले, असा घणाघात माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे यांनी केला.भादवणवाडी ता. आजरा येथे प्रचार सभेत श्री. धुरे बोलत होते.
भाषणात वसंतराव धुरे पुढे म्हणाले, अवघ्या साडेतीन कोटी रुपयांसाठी अशोक चराटी यांनी कारखाना बंद पाडला. खरेतर हा कारखाना तो बंद पाडून कोणाला तरी चालवायला देण्याचाच त्यांचा कुटील डाव आणि उद्देश होता.यापुर्वी बंद पाडलेला हा कारखाना नंतर जयवंतराव शिंपी यांनी चालवायला दिला होता. कारखाना बंद पाडून चालवायला देणाऱ्यांच्या हातात या सत्तेच्या चाव्या कशा सुरक्षित राहतील? असा सवालही त्यांनी केला. अशोक चराटी यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत शेतकऱ्यांना ऊस तोडणीसाठी जाणीवपूर्वक टोळ्या दिल्या नाहीत. त्यांच्या कारकीर्दीतच कारखान्याला सव्वाशे कोटीचा तोटा होऊन उसबिले मिळाली नाहीत. त्यामुळेच कारखाना बंद पडला.
वसंतराव धुरे म्हणाले, उसाचे कांड न कांड आजरा सहकारी साखर कारखान्याला घातलेले आहे. ज्यांचे उसाचे कांडे नाही ते आमच्यावर काय बोलणार?
कारखान्याचे माजी अध्यक्ष विष्णुपंत केसरकर म्हणाले, अशोक चराटी यांनी कारखाना बुडवून शेतकरी सभासदांचे वाटोळे केले. कामगार, शेतकरी सभासद आणि जनताही त्यांना कंटाळली होती. त्यामुळेच कामगारांनी त्यांना खोलीत कोंडून घालून त्यांचा राजीनामा घेतला.
यावेळी मारुती घोरपडे, दीपक देसाई, शिरीष देसाई, संभाजी तांबेकर यांच्यासह रवळनाथ विकास आघाडीचे नेते व सभासद उपस्थित होते.


संत निरंकारी मंडळातर्फे विशाल सत्संग सोहळा

आजरा: प्रतिनिधी
संत निरंकारी मंडळ शाखा आजरा तर्फे विशाल सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमांमध्ये संत दिंडी मध्ये हजारो भावीक सामील झाले होते. दिंडी दरम्यान भक्तगणांना मंडळाचे मोफत प्रकाशन वाटण्यात आले. आरोग्य शिबिर घेण्यात आले त्यामध्ये डोळ्यांची तपासणी ३०० रुग्णांनी करून घेतली त्यातील दोनशे रुग्णांना अल्प दरात चष्मा उपलब्ध करून देण्यात आला. ४० जणांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. जनरल चेकअप ७०० रुग्णांनी करून घेतली त्यांना मोफत औषध देण्यात आली. संध्याकाळी सहा ते दहा वेळेत परमपूज्य महात्मा जालिंदर जाधव यांच्या उपस्थितीत सत्संगचा कार्यक्रम झाला. त्यामध्ये क्षेत्रीय संचालक शहाजी पाटील यांनी मार्गदर्शन केले.

हा कार्यक्रम सेक्टर गडहिंग्लज तर्फे पार पाडण्यात आला. या कार्यक्रमासाठी मुखी भिकाजी पाटील, सेवा दल संचालक संजय संजय शेंनवी, अकाउंटंट संजय यादव सत्संग कमिटी मधील विजय भडांगे, संदीप सावंत, तुळशीराम चव्हाण यांनी या कार्यक्रमासाठी विशेष योगदान दिले.
या कार्यक्रमासाठी आजरा चंदगड गडहिंग्लज कुलिक भुदरगड ,थड्याचीवाडी येथून सर्व संतजन भाविक भक्त राहिले उपस्थित राहिले या कार्यक्रमासाठी ६००० पेक्षा जास्त भाविक आले होते.




